दिल्ली एअरपोर्टवर मी, वैशाली आणि प्रमोद सकाळी सव्वा नऊ ते साडेबारापर्यंत गप्पा करत बसलो होतो. सिडनीच्या विमानाचा बोर्डिंग पास साडेबाराला मिळेल असे चौकशीत कळले होते.
साडेबाराला ट्रॉली सामानासकट ढकलत आम्ही पुन्हा एअर इंडियाच्या स्टाफ तिकीट विंडोला आलो. प्रत्यक्षात तिघांना हातात बोर्डिंग पास मिळेपर्यंत दीड वाजला. कस्टम, सिक्युरिटी वगैरे करून गेटवर पोहोचण्यासाठी एक तास होता. म्हणजे व्हिसा कार्डवर लाउंजमध्ये फ्री जेवणाचे स्वप्न सोडून द्यावे लागणार होते !
आम्ही धावत पळत गेट गाठलं. खूप गर्दी होती. बोर्डिंग सुरू झाले होते. कुठे जाऊन एखादे चॉकलेट विकत घ्यायलाही वेळ नव्हता.
ऑस्ट्रेलियात प्रवेश करताना बऱ्याच गोष्टी नेलेल्या चालत नाहीत. उदा. रोपटी, बिया, पॅकबंद नसलेले खाद्यपदार्थ वगैरे. त्यामुळे सिडनीच्या विमानात आम्ही घरून काहीही आणले नव्हते. खूप भूक लागली होती. पण सहन करावी लागणार होती. अडीच वाजता आम्ही विमानात आपापल्या सीटवर विराजमान होऊन बसलो. मी आणि वैशालीने ऍडजेस्ट करून शेजारी शेजारी सीट मिळवली. पण प्रमोद कुठेही दिसेनात. कुठेतरी गेटच्या काउंटरवर गेले होते. नंतर ते दिसलेच नाहीत. आम्ही काळजीत पडलो. शेवटी प्रमोद यांना फोन लावला तर त्यांचे तिकीट बिजनेस क्लासला अपग्रेड झाले होते. त्यामुळे त्यांना त्या प्रोसेसमध्ये थांबावे लागले होते. ते नंतर आम्हाला हाय हॅलो करून परत गेले.
आता मी आणि वैशाली रिलॅक्स मूडमध्ये हातात एअर होस्टेसने दिलेला ज्यूस घेऊन बसलो. ज्यूस बरोबर गप्पांना वेगळा रंग आला होता. ड्रायफ्रूट्स मिळाले. तेही या क्षणी महत्वाचे होते. जेवणाची ट्रॉली कधी येते याची आम्ही वाट पाहत होतो. भूक म्हणजे काय असते याचा अनुभव मी पहिल्यांदाच घेत होते. आली शेवटी जेवणाची ढकलगाडी. दुपारी तीन साडेतीनला जेवण मिळाले.
विमानात मिळालेले जेवण म्हणजे काय (खरा तो ब्रेकफास्ट असतो) पण तेव्हढ्यानेही हुश्श झाले आम्हाला. आम्ही दिवसाची फ्लाईट एन्जॉय करू लागलो. निळे आकाश आता आमच्या सोबत नव्हते, जमीनही नव्हती. पांढऱ्या ढगांची दाटीवाटी होती. बेल्ट थोडे मोकळे करून शतपावली (खरंतर पन्नासपावली) करून आलो. विमानात लहान बाळे रडत होती. ती टेक ऑफ नंतर झोपी गेली होती. त्यांच्या तरुण माता आता नवऱ्याचा हात हातात घेऊन समोरच्या स्क्रीनवर चित्रपट पाहत होत्या.
आम्हीही चित्रपट लावायचा प्रयत्न केला. पण दोन्ही स्क्रीन खराब असल्याचे कळले. एअर इंडियाला शिव्या देत बसलो. पण हीच खरी संधी होती. आम्ही एकमेकींना गप्पांमधून जाणून घेऊ शकत होतो. संवाद सुरू झाला. खरे तर दोन स्त्रिया अशा बराच वेळ एकत्र असल्या की लेडीज टॉक वगैरे सुरू होते. पण आमची जडणघडणच वेगळी होती. आम्ही त्यातल्या स्त्रिया नव्हतोच. व्यक्ती म्हणून बोलत होतो. वैशाली बागुलचा काही संस्थांशी असलेला संबंध, तिचे समाजकार्य जाणून घेता आले. वरवर ती एक फॅशनेबल लेडी वाटत असली तरी समाजातील सहृदय आणि चांगली कार्यकर्ती होती. तिच्या घरातील समस्यांना तोंड देऊन तिचे कार्य सुरू होते. माझ्याबद्दल तिला काहीच माहिती नसावी असे मला वाटत होते. पण ती म्हणाली, “तू कार्यक्रम वगैरे करतेस, साहित्यिक आहेस असं कळलं.” मी आश्चर्यचकित झाले. तेव्हा तिने उलगडा केला. “दिल्ली एअरपोर्टवरून मी आईला फोन केला पोचल्याचा. तेव्हा मी तिला सांगितलं की माझ्यासोबत मेघना साने आणि प्रमोद शिंदे आहेत. ती म्हणाली मेघना साने म्हणजे ठाण्याच्या का ? त्या खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचा कार्यक्रम मी पार्ल्याला पाहिला आहे.”
“अच्छा !”
वैशालीनेही माझे कार्यक्रमाचे काही अनुभव जाणून घेतले. आपल्याला विमानात काही काम नसतं. एअर होस्टेस ही सुंदरी हवे तेव्हा हवे ते आणून देत असते. तरीही झोप कशी ती लागत नव्हती.
रात्र झाली. विमानात मिळालेल्या शाली पांघरून आम्ही झोपायचा प्रयत्न करत होतो. दोन-तीन डुलक्या काढल्या की लगेच जाग येत होती. पुढच्या दहा दिवसाचा आराखडा मी मनात आखत होते. दोन दिवस जेट लॅगसाठी ठेवले होते. मग काम सुरू करावे. ‘सह्याद्री सिडनी’च्या लोकांशी बोलून मुलाखतीचे ठरवायचे होते. संगीतकार किरण प्रधान यांच्यावर ई-प्रसारणचा एपिसोड बनवायचा होता. त्यांची माझी ओळख फोनवरूनच झाली होती. ‘सह्याद्री सिडनी’च्या शिवजयंती उत्सवाचे शूटिंग करायला मला कोणीतरी कॅमेरामन हवा होता. अशा अनेक गोष्टी मॅनेज करायच्या होत्या. ज्यांच्याकडे मी उतरणार होते त्या मात्र नोकरी करून घर सांभाळणाऱ्या होत्या. त्यांना मी भार तर होणार नाही ना ? दोन आठवडे सलग त्यांच्याकडे राहण्यापेक्षा काही दिवस मित्राच्या मुलाकडे वगैरे फिरायला जावे असे मनात योजत होते. पण जायचे कसे ? कोणी पोचवेल का ? सर्व दीड तास अंतरावर राहतात. या सगळ्या टेन्शनने झोप लागत नव्हती.
ऑस्ट्रेलियाला निघण्याच्या दोन दिवस आधी मी निलिमा बेर्डे यांना विचारले होते की एअरपोर्टवरून त्यांच्या घरापर्यंत टॅक्सी करता येईल ना ? ती “हो” म्हणाली होती.
“पण त्यापेक्षा एअरपोर्ट वरून ट्रेनने या. मी येथील स्टेशनवर घ्यायला येईन.”
मी काही लोकांना विचारून त्यांची माहिती काढली. पण त्यांच्या रेल्वे स्टेशनवर कुठेही तिकीट विंडो नसते असे कळले. लोक ओपेल कार्ड नावाचे एक ट्रेन प्रवासाचे कार्ड वापरतात. ते महिन्याभराचे असते. ते फार तर स्टेशनवर अपडेट करता येते. तेही एका वेळी वीस ऑस्ट्रेलियन डॉलर भरावे लागतात. तरच अपडेट होते.”
आता हे ओपेल कार्ड कुठे शोधायचे सकाळी सकाळी ? आणि पंधरा तास प्रवास करून गेल्यानंतर ट्रेनमध्ये सामान चढवायचे, उतरवायचे हे जरा कठीणच होईल. किरण प्रधान यांना अपॉइंटमेंटसाठी फोन केला होता. तेव्हा ते स्वतःहून म्हणाले, “मी तुम्हाला एअरपोर्टवर घ्यायला येईन आणि निलिमा बेर्डे यांच्याकडे पोहोचवेन. मी त्यांच्याच एरियात राहतो.” सकाळी ट्रॅफिक असते वगैरे असा बाऊ त्यांनी केला नाही. मला आश्चर्य वाटले. कारण किरण प्रधान यांच्याशी माझी अजून एकही भेट झाली नव्हती. तरी ते मला मदत करायला तयार होते. त्यांना दादर मधील मोहन गोरे यांच्याकडून माझी सगळी माहिती मिळाली होती.आता प्रश्न असा होता की मी विमानातून उतरल्यावर त्यांना संपर्क कसा करायचा ? माझा फोन ऑस्ट्रेलियात गेल्यावर सुरू राहिला पाहिजे यासाठी मी इंडियात एअरटेलमध्ये जाऊन फोन इंटरनॅशनल रोमिंग करून घेतला होता. मी ऑस्ट्रेलियात पोचल्यावर एक मार्चला सकाळी सात पासून रोमिंग होणार होता.
सकाळी आठ वाजता विमान सिडनी एअरपोर्टवर लँड झाले तेव्हा आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आम्ही आता ऑस्ट्रेलिया खंडात होतो. पृथ्वीचा नकाशा पाहिला तर भारतापासून कितीतरी दूर ! विमानाला वातावरणाच्या काही अडचणी न येता सेफ लँडिंग झाले होते.
मी, वैशाली आणि प्रमोद इमिग्रेशनच्या लाईनमध्ये उभे राहिलो. प्रमोद शिंदे यांचा जावई न्यायला आला होता. ते बाय बाय करून निघून गेले. मी आणि वैशाली अजूनही इमिग्रेशनच्या लाईनमध्येच उभे होतो आणि किरण प्रधान यांना फोन ट्राय करत होतो. आम्ही लँड झाल्यावर फोन करायचे असे ठरले होते. पण माझा रोमिंग फोन अजून सुरू झाला नव्हता. त्यामुळे फोनच लागत नव्हता. एअरपोर्ट वरून वायफाय कसे घ्यायचे ते माहीत नव्हते. वैशाली म्हणाली, “माझी मुलगी बाहेर मला न्यायला आलेली आहे. ती किरण प्रधान यांना फोन लावेल. तिचा फोन ऑस्ट्रेलियाचा आहे. लोकल फोन करून ते कुठे उभे आहेत हे शोधून काढेल. काळजी करू नकोस.” तिने किरण प्रधान यांचा फोन नंबर मुलीकडे सुपूर्द केला. वैशालीच्या लेकीने, पूजाने ते काम बरोबर केले. पुन्हा फोन करून किरण प्रधान कोणत्या पार्किंग मध्ये उभे आहेत हे शोधून ती त्यांना घेऊननही आली. त्यांनी गाडी अर्धा तास फ्री पार्किंग मध्ये ठेवली होती. (अर्थात गाडी जास्त वेळ ठेवायला लागली असती तर २५ डॉलर भरावे लागले असते !) हे कळल्यावर आम्ही ताबडतोब गाडीकडे कूच केले. वैशाली मला त्यांच्या ताब्यात देऊनच लेकी बरोबर घरी गेली.
माणसं किती चांगली असतात याचा अनुभव मी प्रवासाला निघाल्यापासून घेत होते.
किरण प्रधान यांच्या गाडीत बसल्यावर आमच्या संगीताबद्दल गप्पा सुरू झाल्या. त्यांची मुलाखतच एक प्रकारे सुरू झाली म्हणा ना. त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी देखील ऐकली. साधारण पाऊण तास प्रवास करत आम्ही बेर्डे यांच्या घरी पोहोचलो. निलिमा वाट पाहतच होती. जोरदार स्वागत झाले. चहा, पोहे सकट मैफल रंगली. ती तेथील नाट्य क्षेत्रातली असल्यामुळे किरण तिला ओळखतच होते. तिच्या घरी मात्र ते पहिल्यांदाच येत होते. अतिशय शुभ्र अशा भिंती असलेला निलिमाचा बंगला मला खूप आवडला. परसात हिरवीगार बागही होती.गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात माझा मोबाईल वाजला. रोमिंग सुरू झाल्याचा मेसेज आला. इंडियात आता कुठे सकाळचे सात वाजले होते. त्यामुळे त्यानुसार हे रोमिंग सुरू झाले की काय ? अरे देवा, सकाळी मी केवढी अडचणीत होते. चला एकेक शिकत असतो आपण. ऑस्ट्रेलियाचे घड्याळ इंडियाच्या साडेपाच तास पुढे आहे हे आता लक्षात ठेवायला हवे. पुढे दहा दिवस मात्र माझा मोबाईल सुरूच राहिला. सर्व प्रकारचे संपर्क होऊ शकले. फोन करणाऱ्याला कळायचेही नाही की मी ऑस्ट्रेलियात आहे. माझ्या नेहेमीच्या कोळणीचाही फोन येऊन गेला म्हावरं हवंय का म्हणून ! गंमत आहे की नाही ?
(क्रमशः)

– लेखन : मेघना साने
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप सुंदर ,ऑस्ट्रेलिया सफर ,प्रवास वर्णन वाचताना प्रत्यक्ष सफारीचा आनंद मिळाला,धन्यवाद
मेघना सर्वप्रथम तुझ मनःपूर्वक अभिनंदन सातत्य राखून तू कार्यक्रम करतेस आणि केवळ भारतात नव्हे तर परदेशात ही…खूप कौतुक..
आँस्ट्रेलियाचा प्रवास,इतंभूत,सखोल,आणि सूक्ष्म निरीक्षणे सगळच छान.. अशीच संधी तुला मिळो आणि सुंदर लेख वाचायला मिळोत ही मैत्रिणीची शुभेच्छा.
सौ.मानसी मोहन जोशी
ह्या सुंदर प्रवासात माझा पण सहभाग होता त्या बद्दल मी देवाबरोबर ह्या दोघींचे पण आभार मानतो
ह्या सुंदर प्रवासात माझा पण सहभाग होता त्या बद्दल मी देवाबरोबर, ह्या दोघींचे पण आभार मानतो
तुमचे प्रवास वर्णन थेट त्या स्थळी घेऊन जाणारे आहे.वाचकाला आपणही सोबत असल्यासारखे वाटते.ऑस्ट्रेलिया हा देश मोठा आहे आणि त्यातील प्रत्येक शहर खास आहे.आपले वर्णन वाचकाला गुंतवून ठेवणारे असल्याने पुढील भागाची उत्सुकता नक्कीच लागली आहे.
सुंदर अप्रतिम लेखन 👌
खूप सुंदर तुमची लेखनशैली ओघवती आहे त्यामुळे वाचायला मजा येते
पुढच्या भागाची उत्सुकता आहे
मेघना साने यांची ऑस्ट्रेलिया सफर भाग १ आणि २ दोन्ही वाचले. त्यांच्या सोबत मी पण एक प्रवासी होऊन mumbai-delhi, Delhi-Austrelia असा प्रवास केला. इतकं सुंदर वर्णन आणि अगदी घरातून निघून ऑस्ट्रेलिया या अनभिज्ञ देशात प्रवेश करेपर्यंत अगदी खिळवून टाकणार वर्णन वाचून माझी पण एक ऑस्ट्रेलिया सफर पूर्ण झाली. अप्रतिम