ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे मक्वारीफिल्डस् या भागात मी बेर्डे परिवारासोबत दोन आठवडे राहणार होते. एक मार्चला पोचले आणि ४ मार्चला शिवजयंती उत्सव पाहायला मिळणार होता. या दोन-तीन दिवसात जेट लॅग असल्याने आरामच करण्याचा बेत होता. पण निलिमाच्या परिवारासोबत जवळचे मॉल, इंडियन स्टोअर वगैरे बघून आले.
इंडियन स्टोअर मध्ये मिळणाऱ्या एकेक वस्तू पाहून आपण इंडियातच आहोत की काय असे वाटत होते. तेथील माणसांच्या गरजा पाहून एका मराठी दांपत्याने इंडियन स्टोअर सुरू केले आहे. ऑस्ट्रेलियात अनेक ठिकाणी मराठी माणसांच्या स्वयंपाकघरातील गरजा पुरवणारी इंडियन स्टोअर्स आहेत.
दालवडा, सामोसे, खारा मीठा, धान्यधुन्य, एवढेच काय मातीची भांडीसुद्धा काही ठिकाणी पाहायला मिळाली.
मी सिडनीत उतरले आहे हे कळल्यावर ‘सह्याद्री सिडनी’ संस्थेतर्फे तर्फे एक कार्यकर्ते शेखर महाजन मला भेटून गेले. पुन्हा एकदा कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाले.
कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे असे त्यांच्या संवादावरून कळले.
लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे हे या सर्व कार्यकर्त्यांना आपल्या मित्रांप्रमाणे वागवून त्यांची हिम्मत वाढवत होते.
भाऊसाहेब पाटील सर्व तरुण कार्यकर्त्यांच्या कामावर लक्ष ठेवून आपला परिवारातील आहेत, असे समजून वागवत होते.
निलीमा तर सर्वांची ताईच झाली होती. कधी कोणी तिच्याकडे आले तर ती जेवणाचाच आग्रह करत होती आणि गरम पोळ्या करून वाढतही होती. फोनवरून संपर्क करून मीडिया सांभाळत होती. नोकरी सांभाळून या कसरती कशा जमतात बुवा ? हेच मला कोडे पडले होते.
माझ्या अमरावतीच्या शाळेतील ग्रुपवर मी ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याची पोस्ट टाकली होती. तेव्हा सिडनीत राहणाऱ्या माझा एक क्लासमेट के.डी. जोशी मला भेटायला बेर्डे यांच्या घरी आला. बेर्डे परिवाराशी त्याची अनेक वर्ष मैत्री होतीच. “के.डी. जोशी आमच्या नाटकांना बॅकस्टेजला सुद्धा मदत करतात. अनेक कलाकारांना पाठिंबा देतात.” असे नीलिमाने मला त्याच्याबद्दल आदराने सांगितले. जोशी पती-पत्नीनी मला भेटून घरी यायचा आग्रह करून गेले. अर्थात शिवजयंतीचा कार्यक्रम झाल्यानंतरच सर्वांना वेळ मिळणार होता.
४ मार्चचा दिवस उजाडला. मला कार्यक्रम पाहण्याची खूप उत्सुकता होती.
शिवजयंती उत्सवाचा कार्यक्रम सिडनीतच विटलाम सेंटरमध्ये होणार होता. निलिमा कार्यक्रमाची मीडिया पब्लिसिटी, वगैरे सांभाळत असल्याने बेर्डे यांच्या घरात लगबग होती. तिचे पती प्रशांत, ‘सह्याद्री सिडनी’साठी पडेल ती मदत करणार होते. निलिमाची लेक तनया शिवजयंतीच्या उत्सवात भरतनाट्यम् नृत्य सादर करणार होती. सिडनीत राहून तिने भरतनाट्यमचे शिक्षण घेतले होते आणि अरंगेतरम देखील पूर्ण केले होते. येथील वातावरणात त्यांना भरतनाट्यम् शिकावे असे वाटते याचे मला कौतुक वाटले. तिची बहीण अनिता देखील नृत्य शिकली होती.
“सिडनीमध्ये लहान मुलांसाठी संस्कार वर्ग चालवणारी माझी एक मैत्रीण आहे. माझी मुले तिच्या संस्कार वर्गात जातच होती. पण आता दुसरी पिढी तिच्याकडे शिकत आहे. ती मोहिनी अंतुरकर आपल्याला भेटायला येणार आहे.” निलिमा म्हणाली.
मोहिनी यांच्याशी संवाद करून मला खूपच छान वाटले. तिच्याकडे दर शुक्रवारी संस्कारवर्ग भरतो. त्यात गोष्टी, श्लोक, संस्कारमय कथा, राष्ट्रगीत अशा अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात. मी तिची ‘रेडीओ विश्वास’ साठी मुलाखत घेऊन टाकली आणि ती प्रसारित देखील झाली.
आम्ही सारे विटलाम सेंटरमध्ये कारने निघालो. तेथे प्रवेश करताच मी भारावून गेले. मराठी स्त्री-पुरुषांची पारंपरिक वेशातील लगबग महाराष्ट्राची आठवण करून देत होती. शिवाजी महाराजांचे भव्य तैलचित्र असलेला बॅकड्रॉप स्टेजवर, आजूबाजूला किल्ल्यासारखी सजावट. दोन हजार लोक मावतील एवढे मोठे सभागृह, बाहेर स्टॉल्स, जत्रा वगैरे ! काहीतरी भव्य दिव्य पाहायला मिळणार असे प्रवेश केल्याबरोबरच भासत होते.
हळूहळू सभागृहात स्त्री-पुरुष जमायला लागले. आणि हॉल चक्क भरायला लागला की! सह्याद्री सिडनीने एवढ्या प्रचंड प्रमाणात मराठी लोकांना एकत्र आणलेले पाहून मी थक्क झाले.
माझे मुलाखती घेण्याचे काम मी सुरू केले. ‘शिवगर्जना’ ढोल ताशा पथकाजवळ के.डी.जोशी मदत करायला उभे होते. पथकाच्या म्होरक्यांना गाठून त्यांच्या मुलाखतीचे शूटिंग करायला त्यांनी मला मदत केली.
ढोल ताशा पथकात स्त्रियाही मोठ्या प्रमाणात होत्या. काही मिनिटातच के.डी. यांना पथकात सामील व्हावे लागले. कारण वाजवणाऱ्यांच्या कमरेला ढोल बांधणे, इतर प्रॉपर्टी देणे हे काम देखील होतेच. असे अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या कामांसाठी झटत होते.
शिवकाळाची आठवण करून देणारे विविध कार्यक्रम या शिवजयंती उत्सवात सादर झाले. शेवटी प्रमुख पाहुणे लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांचे जोशपूर्ण आणि प्रेमळ भाषण ऐकून मराठीचा अभिमान अधिकच जागृत झाला.
कार्यक्रमांतर्गत प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला. मी भारतातून आलेली कलाकार म्हणून माझाही स्मृतिचिन्ह देऊन सत्कार झाला.
अन्नपूर्णा टीमने बनवलेल्या सुग्रास भोजनाचा आस्वाद घेऊन आम्ही सारे घरी परतलो.
संपूर्ण कार्यक्रमाचे मी आणि निलिमाने शूटिंग केले होते. आता ई प्रसारणसाठी त्याचा एपिसोड बनवायचा होता.
क्रमशः

– लेखन : मेघना साने
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अप्रतिम 👌👌👌