या सफरीच्या निमित्ताने मला माझी जून 2018 मधील दुसरी अमेरिका वारी आठवली.
मी त्यावेळी प्रथमच कॅनडातील मिसीसागातील राहुलच्या घरी गेलो होतो. त्यानंतर न्यूजर्सीत डाॅ.सर्जेराव देशमुखाकडे गेलो. यावेळी माझ्यासोबत उषाही होती. तिची यापूर्वीच एकदा लेडीज स्पेशल मधून मोठी टूर झाली होतीच.
मागच्या ट्रीपच्या वेळी हरकेन नावाच्या वादळाने अमेरिकेतील काही भागाचे जीवन अस्ताव्यस्त झाले होते. न्यूयॉर्क प्रशासनाने तत्परेने लिबर्टी स्टॅच्यू बंद केले होते. तेथील सागर किनारपट्टीवर नांगरलेल्या बोटी उसळलेल्या लाटांनी बाहेर फेकून रौद्ररूप दाखविले होते.
वृक्ष उन्मळून गेले होते, वीज गायब झाली होती. लोकांनी पेट्रोलचा साठा जनरेटर चालविण्या करिता अतिरिक्त साठा केल्याने त्याचाही पुरवठा ठप्प झाला होता. टी.व्ही.सुरू असण्याचा प्रश्नच नव्हता. ही परिस्थिती तीन दिवस होती. मित्रांनो मी ही हकीगत न्यूजर्सीतील सांगत आहे.
तर सांगायचे काय, मला तेव्हा स्वातंत्र्य देवतेच्या स्मारकास भेट देता आली नव्हती याची खंत माझ्यापेक्षा डाॅ.सर्जेराव यांनाच जास्त झाली होती. म्हणून माझी अमेरिकेची दुसरी वारी झाली. असो… प्रस्तावना थोडी लांबली आहे. क्षमस्व !
तर सांगत काय होतो ? प्रथम आम्ही न्यूयॉर्क कडे जाणारी सार्वजनिक बस पकडून लिबर्टी स्टॅच्यू कडे गेलो. तेथे कोलंबसच्या आगमनानंतर रेड इंडीयन्सच्या इतिहासापासून आजच्या युनायटेड स्टेट्स अमेरिकेचा इतिहास कसा घडत गेला त्याचे सुंदर प्रदर्शन पाहिले. तद्नंतर डाॅ.प्रतिभाताईनी घरून दिलेल्या सँडविच आणि थेपल्यांचा भरपूर समाचार घेऊन तृप्तीचा ढेकर दिला. अन्नदाता सुखी भवो असेही बोललो. सर्जेरावानी नेहमीप्रमाणेच गोड स्मित दिले.
स्वातंत्र्य देवता स्मारका कडे जाणार्या बोटींमधून आम्ही तेथे पोचलो. या बोटींमधूनही आजूबाजूच्या भागाची, विहंगम इमारतीची माहिती देतच होते.
येथील लिबर्टी आयलंडचे लँडस्केपींग खूप छान प्रकारे करण्यात आले आहे. स्वातंत्र्य देवतेचे माॅडेल फ्रान्सचा सुप्रसिद्ध शिल्पकार फ्रेडरिक ऑगस्टीन यांनी तयार केला होते. ते फ्रान्सच्या जनतेने सद्भावना प्रतिक म्हणून अमेरिकेला भेट दिले. त्या माॅडेल बरहुकूम ह्या स्मारकाची रचना करण्यात आली. दिडशे फूट उंच पेडेस्टलवरील आणि त्यावर आणखीन दिडशे फूट पुतळा नीट व्यवस्थित दिसण्यासाठी अकरा कोन असलेला चौथारा बांधण्यात आला. सभोवताली अतिविशाल मोकळ्या जागेवर लाॅन लावले आहे. स्टॅच्यूच्या सर्वात वरच्या मजल्यावर जाण्यासाठी अगोदरच ऑनलाईन बुकिंग करावे लागते. येथे एक सुंदर संग्रहालय आहे. त्याला भेट दिली.
येथेही लोकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रंगबेरंगी कपडे, हॅट्स घालून लोक झुमत होते. माझे स्वातंत्र्य देवतेचे स्मारक पाहाण्याचे स्वप्न डाॅ.सर्जेरावानी पूर्ण केले होते. त्या आनंद पूर्तीत आम्ही बोटींमधून परतलो होतो.
त्यानंतर आम्ही टाईम स्क्वेअरला भेट दिली. उध्वस्त झालेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जागी अत्यंत कलात्मक पध्दतीने शांती स्मारक निर्माण केले आहे. एका भव्य चौकोनी फाऊंटनच्या चौथर्यावर 9/11 च्या दुर्घटनेत मृत झालेल्यांची नावे लिहीली आहेत. त्यात भारतीयांची नावे लक्षणीय आहेत.
त्यानंतर टाईम स्क्वेअरचा नजारा. चालणे सुध्दा मुश्किल व्हावे एव्हढी गर्दी. पण त्या गर्दीतूनही न्यूयॉर्क स्क्वेअरचा दबदबा, रूबाब जाणवत होता. दिवसभरात खूप चालणे झाले होते. मी दमलो होतो. पुन्हा आम्ही परतीची बस पकडली. डाॅ.सर्जेराव देशमुख म्हणाले, न्यूयॉर्क शहर अमेरिकेतील सर्व राज्यांना रेल्वेमार्ग व बसमार्गाने त्याचबरोबर हवाई मार्गाने जोडले आहे. मी अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्कला मनोमनी सलाम केला.

– लेखन : डाॅ भास्कर धाटावकर
निवृत्त पुराभिलेख संचालक. महाराष्ट्र शासन.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800