इंडियन पब्लिक ट्रेल्स लायब्ररी व विलो पार्क
मी नेहमीच मला आवडलेल्या वस्तु, वास्तु, संग्रहालये तसेच भव्य दिव्य ग्रंथालयांच्या आकंठ प्रेमात पडतो.
त्याप्रमाणेच शिकागो येथील इंडियन पब्लिक ट्रेल्स लायब्ररी आणि विलो पार्क या अतिविशाल मैदानाच्या मोहात पडलो आहे. किती प्रकारच्या सुविधा, हवे ते आणि हव्या विषयावरील ग्रंथराज तुम्ही स्वतःच घेऊ शकता किंवा ते शोधून दिले जातात. वृतपत्रे आहेत, विविध मॅगझिन आहेत, निरव शांतता असते. सर्व सहाय्यक हसतमुखपणे सेवा देत असतात. वेळ कसा जातो ते कळतच नाही.
दुसरे जिवाभावाचे ठिकाण म्हणजे विलो पार्क. या विषयी लिहीले आहेच आता त्यामध्ये आणखीन थोडी भर घालावीशी वाटते. येथे अनेक सिनियर्स फिरावयास येतात. मायबोली मराठीत कोणी बोलत असले कि नमस्कार करून बोलायला सुरुवात होते. मग छानपैकी गप्पा होतात. पत्ते, फोन नंबर घेतले जातात. उद्या भेटू म्हणून निरोप घेतला जातो.
कधी भारताच्या इतर प्रांतातील नागरिक भेटतात. मग हिंदीतून किंवा इंग्रजीतून गप्पाष्टकांचा फड जमून जातो. मला चेन्नईतील एक तरुण इंजिनियर भेटला. हिंदीतून बोलण्याचा प्रयत्न तो करीत होता. त्याच्या आठ, नऊ वर्षांच्या मुलीला काही समजण्याचा प्रश्नच नव्हता. मग मी स्वातंत्र्यानंतर आपला त्रिभाषा सूत्राचा फार्मुला कसा हिंदी भाषिकांनी सोयीस्कर हाणून पाडला त्यावर बोललो. उत्तरेकडील राज्यांनी साऊथ कडील एक भाषा शिकावी, काॅमन लँग्वेज म्हणून किंवा राष्ट्रीय भाषा म्हणून कोणत्याही भाषेला अधिकृत मान्यता देण्यात आली नव्हती आणि अजूनूही त्यावर एकमत झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मग आम्ही कळत नकळत त्यांच्यावर हिंदी लादण्याचा प्रयत्न करतो या भावनेतून ते विरोध करतात.
संस्कृत ही सर्वात प्राचीन भाषा नसून तमिळ हीच या देशातील प्राचीन भाषा आहे हे सुध्दा उपलब्ध ऐतिहासिक कागदपत्रे, साहित्यिक ग्रंथ संपदेमधून स्पष्ट झाले आहे. हा तरुण मित्र रोजच संध्याकाळी वाट पाहून भेटतोच.
या पार्कमध्ये काही पाकिस्तानी नागरिकही भेटतात. ते सुध्दा प्रेमाने वार्तालाप करतात. आपले खानपान, संगीत, हिंदी चित्रपटांची आवड, त्यातील गाण्यांचे गारूड, लतादीदी, नूरजहाॅन यांची मैत्री असे विषय वाढत जातात. शेवटी पोलटीशियन सारा माहोल बिघडून राजकारणांची रोटी शेकावतात यावर एकमत होते.
काही जण स्मरणरंजनात रमून जातात. येथे सरहद्दीच्या काटेरी कुंपण काहीची मुलायम झाल्यासारखी वाटते. श्रीलंकेतील, तसेच बांगलादेशीयही गप्पात रमत असतात.
मग शांतपणे उषा आणि मी त्या अतिविशाल मैदानावरील ट्रॅकवर 40/50 मिनीटे चालत असतो. आमच्याही बीते हुवे दिनोकी याद करीत घराकडे परततो. एक दिवस आनंदात गेला हीच एकमेव भावना मनात असते. अशी ही इंडियन पब्लिक ट्रेल्स लायब्ररी आणि विलो पार्क, ज्यांच्या मी आकंठ प्रेमात पडलो आहे.

– लेखन : डाॅ.भास्कर धाटावकर.
निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800