Saturday, December 21, 2024
Homeसाहित्यमाझी जडणघडण भाग १५

माझी जडणघडण भाग १५

गौरी गणपती : २

पप्पांचा गणपती आणि आईची गौर अशी या पूज्य दैवतांची आमच्या घरात अगदी सहजपणे विभागणीच झाली होती म्हणा ना आणि ही दोन्ही दैवते अत्यंत मनोभावे आणि उत्साहाने आम्हा सर्वांकडून पुजली जायची. त्यांची आराधना केली जायची.

पप्पांचे मावस भाऊ आणि आमचे प्रभाकर काका दरवर्षी आईसाठी गौरीचं, साधारण चार बाय सहा कागदावरचं एक सुंदर चित्र पाठवायचे आणि मग आगामी गौरीच्या सोहळ्याचा उत्साह आईबरोबर आम्हा सर्वांच्या अंगात संचारायचा.

माझी आई मुळातच कलाकार होती. तिला उपजतच एक कलादृष्टी, सौंदर्यदृष्टी प्राप्त होती. ती त्या कागदावर रेखाटलेल्या देखण्या गौरीच्या चित्राला अधिकच सुंदर करायची. गौरीच्या चित्रात असलेल्या काही रिकाम्या जागा ती चमचमणाऱ्या लहान मोठ्या टिकल्या लावून भरायची. चित्रातल्या गौरीच्या कानावर खऱ्या मोत्यांच्या कुड्या धाग्याने टाके घालून लावायची. चित्रातल्या गौरीच्या गळ्यात सुरेख गुंफलेली, सोन्याचे मणी असलेली काळी पोत त्याच पद्धतीने लावायची. शिवाय नथ, बांगड्या, बाजूबंद अशा अनेक सौभाग्य अलंकाराची ती सोनेरी, चंदेरी, रंगीत मणी वापरून योजना करायची. या कलाकुसरीच्या कामात मी आणि ताई आईला मदत करायचो. आईच्या मार्गदर्शनाखाली या सजावटीच्या कलेचा सहजच अभ्यास व्हायचा. मूळ चित्रातली ही कमरेपर्यंतची गौर आईने कल्पकतेने केलेल्या सजावटीमुळे अधिकच सुंदर, प्रसन्न आणि तेजोमय वाटायची. त्या कागदाच्या मुखवट्याला जणू काही आपोआपच दैवत्व प्राप्त व्हायचं. गौरीच्या सोहळ्यातला हा मुखवटा सजावटीचा पहिला भाग फारच मनोरंजक आनंददायी आणि उत्साहवर्धक असायचा. एक प्रकारची ती ऍक्टिव्हिटी होती. त्यातून सुंदरतेला अधिक सुंदर आणि निर्जिवतेला सजीव, चैतन्यमय कसे करायचे याचा एक पाठच असायचा तो !

पप्पांचा तांदुळाचा गणपती आणि आईच्या गौरी मुखवटा सजावटीतून नकळतच एक कलात्मक दृष्टी, सौंदर्यभान आम्हाला मिळत गेलं.

घरोघरी होणारे गौरीचे आगमन हे तसं पाहिलं तर रूपकात्मक असतं. तीन दिवसांचा हा सोहळा… घर कसं उजळवून टाकायचा. घरात एक चैतन्य जाणवायचं.

आजीकडून गौरीची कथा ऐकायलाही मजा यायची. ती अगदी भावभक्तीने कथा उलगडायची. गौरी म्हणजे शिवशक्ती आणि गणेशाच्या आईचं रूप ! असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया गौरीकडे गेल्या आणि सौभाग्य रक्षणासाठी त्यांनी गौरी कडे प्रार्थना केली. गौरीने असुरांचा संहार केला आणि शरण आलेल्या स्त्रियांचे सौभाग्य रक्षण केले. पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. ही कथा ऐकताना मला गौरीपूजन ही एक महान संकल्पना वाटायची. मी गौरीला प्रातिनिधिक स्वरूपात पहायची. माझ्या दृष्टीने अबलांसाठी गौरी म्हणजे एक प्रतीकात्मक सक्षम शौर्याची संघटन शक्ती वाटायची.

गावोगावच्या, घराघरातल्या पद्धती वेगळ्या असतात. काही ठिकाणी मुखवट्याच्या गौरी, कुठे पाणवठ्यावर जाऊन पाच —सात — अकरा खडे आणून खड्यांच्या गौरी पूजतात पण आमच्याकडे तेरड्याची गौर पुजली जायची. पद्धती विविध असल्या तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा, भूमी फलित करण्याचाच असतो.

सकाळीच बाजारात जाऊन तेरड्याच्या लांब दांड्यांची एक मोळीच विकत आणायची, लाल, जांभळी, गुलाबी पाकळ्यांची छोटी फुले असलेली ती तेरड्याची मोळी फारच सुंदर दिसायची. तसं पाहिलं तर रानोमाळ मुक्तपणे बहरणारा हा जंगली तेरडा. ना लाड ना कौतुक पण या दिवशी मात्र त्याची भलतीच ऐट ! आपल्या संस्कृतीचं हेच खरं वैशिष्ट्य आहे. पत्री, रानफुलांना महत्त्व देणारी, निसर्गाशी जुळून राहणारी संस्कृती आपली !

तेरड्यासोबत केळीची पाने, विड्याची पाने, सुपाऱ्या, फुलं, फुलांमध्ये प्रामुख्याने तिळाच्या पिवळ्या फुलांचा समावेश असायचा आणि असं बरंच सामान यादीप्रमाणे घरी घेऊन यायचं. बाजारात जाऊन या साऱ्या वस्तू आणण्याची सुद्धा गंमत असायची. माणसांनी आणि विक्रेत्यांनी समस्त ठाण्यातला बाजार फुललेला असायचा. रंगीबेरंगी फुले, गजरे, हार, तोरणं यांची लयलूट असायची. वातावरणात एक सुगंध, प्रसन्नता आणि चैतन्य जाणवायचं. मधूनच एखादी अवखळ पावसाची सरही यायची. खरेदी करता करता जांभळी नाक्यावरचा गणपती, तळ्याजवळचं कोपीनेश्वर मंदिर, वाटेवरच्या विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन घेतलेलं देवतांचं दर्शन खूप सुखदायी, ऊर्जादायी वाटायचं. जांभळी नाक्यावरच्या गणपतीला या दिवसात विविध प्रकारच्या फुलांच्या, फळांच्या, खाद्यपदार्थांच्या सुंदर वाड्या भरल्या जात, त्याही नयनरम्य असत. देवळातला तो घंटानाद आजही माझ्या कर्णेंद्रियांना जाणवत असतो.

अशा रीतिने भाद्रपद महिन्यातल्या शुद्ध पक्षात, अनुराधा नक्षत्रावर आमच्या घरी या गौराईचं आगमन व्हायचं आणि तिच्या स्वागतासाठी आमचं कुटुंब अगदी सज्ज असायचं. गौराई म्हणजे खरोखरच लाडाची माहेरवाशीण. आम्हा बहिणींपैकीच कुणीतरी त्या रूपकात्मक तेरड्याच्या लांब दांडीच्या मोळीला गौर मानून उंबरठ्यावर घेऊन उभी राहायची मग आई तिच्यावरून भाकरीचा तुकडा ओवाळून, तिचे दूध पाण्याने पाद्यपूजन करायची. तिला उंबरठ्यातून आत घ्यायची. गौर घाटावरून येते ही एक समजूत खूपच गमतीदार वाटायची. गौराईचा गृहप्रवेश होत असताना आई विचारायची, “गौरबाय गौरबाय कुठून आलीस ?” बहीण म्हणायची, ”घाटावरून,”

“काय आणलंस ?”
“धनधान्य, सुख, संपत्ती, आरोग्य, शांती, समृद्धी..”

हा गोड संवाद साधत या लाडक्या गौराईला हळद-कुंकवाच्या पावलावरून घरभर फिरवले जायचे आणि मग तिच्यासाठी खास सजवलेल्या स्थानी तिला आसनस्थ केले जायचे.

घरातली सर्व कामं आवरल्यानंतर गौरीला सजवायचं. तेरड्यांच्या रोपावर सजवलेला तो गौरीचा मुखवटा आरुढ करायचा. आईची मोतीया कलरची ठेवणीतली पैठणी नेसवायची पुन्हा अलंकाराने तिला सुशोभित करायचे. कमरपट्टा बांधायचा. तेरड्याच्या रोपांना असं सजवल्यानंतर खरोखरच तिथे एक लावण्य, सौंदर्य आणि तेज घेऊन एक दिव्य असं स्त्रीरूपच अवतारायचं. त्या नुसत्या काल्पनिक अस्तित्वाने घरभर आनंद, चैतन्य आणि उत्साह पसरायचा. खरोखरच आपल्या घरी कोणीतरी त्रिभुवनातलं सौख्य घेऊन आले आहे असंच वाटायचं.

दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ नक्षत्रावर तिचं पूजन केलं जायचं. आज गौरी जेवणार म्हणून सगळं घर कामाला लागायचं. खरं म्हणजे पप्पा एकुलते असल्यामुळे आमचं कुटुंब फारसं विस्तारित नव्हतं. आम्हाला मावशी पण एकच होती, मामा नव्हताच. त्यामुळे आई पप्पांच्या दोन्ही बाजूंकडून असणारी नाती फारशी नव्हतीच पण जी होती ती मात्र फार जिव्हाळ्याची होती. पप्पांची मावशी— गुलाब मावशी आणि तिचा चार मुलांचा परिवार म्हणजे आमचा एक अखंड जोडलेला परिवारच होता. आमच्या घरी किंवा त्यांच्या घरी असलेल्या सगळ्या सणसोहळ्यात सगळ्यांचा उत्साहपूर्ण, आपलेपणाचा सहभाग असायचा. पप्पांची मावस बहीण म्हणजे आमची कुमुदआत्या तर आमच्या कुटुंबाचा मोठा भावनिक आधार होती. आईचं आणि तिचं नातं नणंद भावजयीपेक्षा बहिणी बहिणीचं होतं. अशा सणांच्या निमित्ताने कुमुदआत्याचा आमच्या घरातला वावर खूप हवाहवासा असायचा. मार्गदर्शकही असायचा. घरात एक काल्पनिक गौराईच्या रूपातली माहेरवाशीण आणि कुमुद आत्याच्या रूपातली वास्तविक माहेरवाशीण असा एक सुंदर भावनेचा धागा या गौरी सोहळ्याच्या निमित्ताने गुंफलेला असायचा.

केळीच्या पानावर सोळा भाज्या एकत्र करून केलेली भाजी, भरली राजेळी केळी, अळूवडी, पुरणपोळी, चवळीची उसळ, काकडीची कढी, चटण्या, कोशिंबीर, पापड, मिरगुंडं, वरण-भात त्यावर साजूक तूप असा भरगच्च नैवेद्य गौरीपुढे सुबक रीतीने मांडला जायचा. जय देवी जय गौरी माते अशी मनोभावे आरती केली जायची. आरतीला शेजारपाजारच्या, पलीकडच्या गल्लीतल्या, सर्व जाती-धर्माच्या बायका आमच्याकडे जमत. त्याही सुपांमधून गौरीसाठी खणा नारळाची ओटी आणत. फराळ आणत. कोणी झिम्मा फुगड्याही खेळत.

हिरव्या पानात हिरव्या रानात गौराई नांदू दे अशी लडिवाळ गाणी घरात घुमत. आमचं घर त्यावेळी एक कल्चरल सेंटर झाल्यासारखं वाटायचं. मंदिर व्हायचं, आनंदघर बनायचं.

या सगळ्या वातावरणात माझ्या मनावर कोरलं आहे ते माझ्या आईचं त्या दिवशीच रूप ! सुवर्णालंकारांनी भरलेले तिचे हात, गळा, कपाळावरचं ठसठशीत कुंकू, कळ्याभोर केसांचा अलगद बांधलेला अंबाडा, त्यावर माळलेला बटशेवंतीचा गजरा, नाकात ठसठशीत मोत्यांची नथ, दंडावर पाचूचा खडा वसवलेला घसघशीत बाजूबंद आणि तिनं नेसलेली अंजिरी रंगाची नऊवारी पैठणी ! आणि या सर्वांवर कडी करणारं तिच्या मुद्रेवरचं सात्विक मायेचं तेज ! साक्षात गौराईनेच जणू काही तिच्यात ओतलेलं !

संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रमही असायचा. ठाण्यातल्या प्रतिष्ठित बायकांना आमंत्रण असायचं पण आजूबाजूच्या सर्व कामकरी महिलांसाठी हळदी कुंकवाचं आमंत्रण आवर्जून दिलेलं असायचं. पप्पा हळदीकुंकवाच्या कार्यक्रमासाठी प्रिन्सेस स्ट्रीटवरच्या पारसी डेअरी मधून खास बनवलेले केशरी पेढे आणायचे. एकंदरच गौरीच्या निमित्ताने होणारा हा हळदीकुंकवाचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न व्हायचा. त्यावेळच्या समाज रीतीनुसार हळदीकुंकू म्हणजे सुवासिनींचं, या मान्यतेला आणि समजुतीला आमच्या घरच्या या कार्यक्रमात पूर्णपणे फाटा दिलेला असायचा. सर्व स्त्रियांना आमच्याकडे सन्मानाने पूजलं जायचं. आज जेव्हा मी याचा विचार करते, तेव्हा मला माझ्या आई-वडिलांचा खूप अभिमान वाटतो. त्यांनी किती सुंदर पुरोगामी विचारांची बीजं आमच्या मनात नकळत रुजवली होती.

तिसऱ्या दिवशी गौरीचं विसर्जन असायचं. भरगच्च माहेरपण भोगून ती आता सर्वांचा निरोप घेणार असते. तिच्यासाठी खास शेवयांची खीर करायची, तिची हळद-कुंकू, फुले— फळे, धान्य, बेलफळ यांनी ओटी भरायची. मनोभावे आरती करून तिला निरोप द्यायचा. जांभळी नाक्यावरच्या तलावात तिचे विसर्जन करताना मनाला का कोण जाणे एक उदासीनता जाणवायचीच पण जो येतो तो एक दिवस जातो किंवा तो जाणारच असतो हे नियतीचे तत्त्व या विसर्जन प्रसंगी प्रकर्षाने जाणवायचं. गौरी गणपती विसर्जनासाठी तलावाकाठी जमलेल्या जमावात प्रत्येकाच्या मनात विविधरंगी भाव असतील. “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या“ या हाकेतल्या भक्तीभावाने मन मोहरायचं.

आजही या सोहळ्याचं याच प्रकाराने, याच क्रमाने, याच भावनेने आणि श्रद्धेने साजरीकरण होतच असतं पण आता जेव्हा जाणत्या मनात तेव्हाच्या आठवणींनी प्रश्न उभे राहतात की या सगळ्या मागचा नक्की अर्थ काय ? एकदा आपण स्वतःवर बुद्धीवादी विज्ञानवादी अशी मोहर उमटवल्यानंतर या कृतिकारणांना नक्की कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं ? उत्तर अवघड असलं तरी एक निश्चितपणे म्हणावसं वाटतं की या साऱ्या, जगण्याला आकार देणाऱ्या एक प्रकारच्या अॅक्टिव्हिटीज आहेत. त्यात एक कृतीशीलता आहे ज्यातून जीवनाचे सौंदर्य, माधुर्य कलात्मकता टिकवताना एक समाज भानही जपलं जातं. श्रद्धा, भक्ती, विश्वास या पलीकडे जाऊन या सोहळ्यांकडे तटस्थपणे पाहिलं तर मानवी जीवनाच्या संस्कार शाळेतले हे पुन्हा पुन्हा गिरवावेत, नव्याने अथवा पारंपरिक पद्धतीने पण हे एक सोपे सकारात्मक ऊर्जा देणारे महान धडेच आहेत. क्रमश:

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. राधिका किती साग्रसंगीत वर्णन केलं आहेस ग बाप्पा आणि गौराईचं .डोळ्यासमोर उभं राहिलं सारं चित्रं. तुझ्या आईपाशी असलेली कलात्मक दृष्टी आणि त्याची कदर करणारं तुझं कुटुंब मी जवळून बघितलं आहे. आपल्या पिढीची जडणघडण थोड्याफार फरकाने अशीच असायची नाही का? ओघवत्या शैलीतला तुझा लेख खूप भावला. तू एक परिपक्व विचारांची लेखिका आहेस. वाचकांची नस सहज पकडतेस.

  2. अतिशय सुंदर आणि प्रभावी लेखन.
    लेखिकेच्या विचारांतील परिपक्वता चांगलीच जाणवते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments