Saturday, December 21, 2024
Homeलेखमाझी जडणघडण : १९

माझी जडणघडण : १९

“ब्रेक्स”

माझं आणि सायकलचं नातं अतूट आहे. आजही मला काळ्याभोर डांबरी मोकळ्या रस्त्यावरून मस्त “बनके पंछी गाये प्यारका तराना…” असे नूतन फेम गीत गात बेभान सायकल चालवायला आवडेल. मस्त गार हवा, आजुबाजूची हिरवळ, निळे डोंगर…वाह ! क्या बात है !!
असो !  पण सध्या मी जीम मधेच सायकल चालवण्याचा आनंद घेत असते !

ठाण्याचा कळवा पूल, पुलाखालून वाहणारी खाडी, जवळचे सेंट्रल मैदान, मैदानाच्या बाजूला प्रतिष्ठित लोकांसाठी असलेला क्लब जिथे टेबल टेनीस, बुद्धीबळ, पत्त्यातले रमी, ब्रिज असे खेळ, शिवाय क्लबची क्रिकेट टीमही होती जे मैदानात प्रोफेशनल  क्रिकेट खेळत..(आमच्यासारखं गल्ली क्रिकेट नव्हतं ते) ठाण्यातला एक उच्चभ्रू वर्ग ज्यात श्रीमान श्रीमती सदस्य असत. त्या क्लबविषयी मला खूपच कुतुहल असायचं. पण आम्ही वाढत असलेल्या बाळबोध संस्कृतीपासून तो वेगळा होता. तरीपण चुकारपणे मनात यायचं आयुष्यात कधीतरी आपण अशा हायफाय क्लबचे सदस्य होऊ.

क्लबला लागून असलेलं तळं, तळ्याजवळचा सदैव सळसळणारा, गर्द हिरव्या पानांचा, भला मोठा पिंपळवृक्ष आणि बाजूचं शांत मंदिर. (मंदिर बहुदा हनुमानाचं असावं. आता स्पष्टपणे आठवत नाही) पण ही सारी ठाण्यातली विशेषतः आमच्या घराजवळची ठळक ठिकाणे होती ज्यांच्याशी आमचं बालपण बांधलेलं होतं आणि आताही आहे. आता क्वचित कधी त्या परिसरात जायचा योग आला तरी मी त्या वातावरणातले माझे बालपणीचे क्षण नकळतपणे वेचत राहते. खूप काही तिथे बदललेलं असलं तरी आठवणींच्या खुणा मी शोधत राहते.

धोबी गल्ली ते सेंट्रल मैदान दरम्यानचा रस्ताही मला चांगला आठवतोय. पहिल्या टप्प्यावर टेंभी नाका, डाव्या हाताला घुले यांचं मोठं चहा भजीचं काहीसं इराणी टाईप हॉटेल. तिथून पुढे चालत गेलं की आमची बारा नंबरची शाळा, पुढे डाव्या बाजूला गुरुद्वार, त्यानंतर जिल्हा न्यायालय आणि नंतरचा खारकर आळीकडे जाणारा चौक आणि मैदानाकडचा रस्ता. कितीतरी वेळा त्या रस्त्यावरून आम्ही सारे हातात हात घालून मजेत एकमेकांची टिंगल टवाळी करत चालत गेलेलो आहोत.  थंडीच्या दिवसात वाटेवरच्या बुचाच्या झाडाखाली पडलेली असंख्य लांब देठाची, चार पाच पांढऱ्या पाकळ्यांची सुवासिक फुलं वेचून त्याचे गुच्छ करायचे आणि कुणाचा गुच्छ मोठा, कुणाचा लहान यावरूनही मस्करी चालायची.

मैदानाच्या बाजूच्या त्या पिंपळवृक्षावर संध्याकाळच्या वेळी शेकडो वटवाघुळे उलटी लटकलेली असत आणि त्यांचे अविरत चिं चिं चित्कारणे चालू असायचे. तो नाद, मंदिरातली शांतता, मधूनच वाजणारी समोरच्या चर्चमधली घंटा आणि तळ्यातलं हिरवट, काळं, संथ पाणी.. या साऱ्यांमुळे एक गूढता त्या वातावरणात दाटलेली असायची. मैदानात भरपूर खेळून दमून गेल्यानंतर आम्ही सारे सवंगडी हळूहळू सरत चाललेल्या त्या संध्यासमयी मस्त पाय पसरून मैदानातल्या खुरट्या गवतावर आरामशीर बसलो की डोक्यावरचं ते मोकळं आभाळ आणि आभाळातल्या हळुहळू काळोखात बुडणाऱ्या निळ्या, जांभळ्या, केशरी, रंगाशी आमचा एक अनामिक संवाद चालायचा. चुकारपणे उगवलेल्या एकुलत्या एक चांदणीकडे पाहताना खूप पॉझिटिव्ह वाटायचं. त्यावेळी wishing star ही संकल्पना अवगत नव्हती पण त्या गूढतेत कसलीतरी शाश्वती वाटायची. खरं म्हणजे बालपणी शरीराच्या अंतःप्रवाहात त्यावेळी डचमळणारा हा भावनांचा डोह काय होता हे कळत नव्हतं पण खुरट्या गवतावर —खेळातली भरपूर मस्ती संपल्यानंतर पाय पसरून बसल्या नंतरची परस्परांमधली ही शांतता मला आठवते. मात्र नक्की या शांततेशी जुळलेलं नातं, त्याचं नाव हे काही कळत नव्हतं. बिनरंगाचं, बिनरेषांचं एक अनामिक चित्र मात्र असावं ते जे अजूनही मनातून पुसलेलं नाही म्हणून पुन्हा जेव्हा त्या आठवणीत मी रमते तेव्हा याच चित्राचे तेव्हा न कळलेले अर्थ आता उलगडत जातात.

लिहिता लिहिता मी थोडी भरकटले पण खरा मुद्दा होता तो “मे”  महिन्याच्या सुट्टीचा आणि सुट्टीतल्या खेळांच्या मुक्त आनंदाचा आणि माझ्या सायकल चालवण्याच्या भन्नाट छंदाचा. या सायकल सफारीशी माझ्या काही गमतीदार आठवणी जुडलेल्या आहेत.

मे महिन्याची सुट्टी लागली की आम्ही गल्लीतली सगळी मुलं मुली सेंट्रल मैदानात भाड्याची सायकल फिरवत असू. एका तासाचे  दोन आणे भाडं ! पण तेही सहजासहजी मिळायचे नाहीत, त्यासाठी वडिलांना अडीचक्याचा पाढा तोंडपाठ म्हणून दाखवावा लागायचा… आता मुलांचे तीस पर्यंत तरी पाढे पाठ असतात की नाही कोण जाणे ! तेव्हां कुठे होते कॅलक्युलेटर्स..संगणक..?
तर माझी सायकल शिकण्याची गोष्ट अशी अडीचक्यापासून सुरु होते..गल्लीतल्या मुलांनीच मला सायकल शिकवली. एक सवंगडी फार शहाणा होता. मला चिडवत म्हणाला, “तुला कधीही सायकल चालवता येणार नाही…तुला बॅलन्सींगचं तंत्रच कळत नाही आणि तू भित्री भागुबाई आहेस.”
माझा इगो प्रचंड तुटला. मला भित्री म्हणतो ? (आजही मला कुणी “भित्री” म्हटलेलं आवडत नाही.)
मग त्याला दाखवण्यासाठी मी मस्त डाव्या पेडलवर पाय ठेवून, थोडी गती घेऊन, उजवा पाय उचलून, त्याची मदत न घेता सायकलवर बसले आणि सुसाट निघाले. जिथे मैदान संपत होते तिथे खड्डा होता. तो माझ्या मागून पळत येत होता, ओरडत होता..
“मूर्ख !! ब्रेक्स लाव .. ब्रेक्स लाव…आपटशील”
सायकलसकट मी खड्ड्यात आपटले. भरपूर लागले. गुडघे फुटले. सायकलची चेन  तुटली.
मात्र माझ्या त्या सो काॅल्ड मित्राने मला काही  फिल्म स्टाईल उचलून वगैरे खड्यातून बाहेर आणले नाही बरं का ? तो मस्त खिदळतच राहिला.
माझ्या डोळ्यातलं पाणी, संताप, अंगावरच्या जखमा या सार्‍यांनी कोलमडून गेलेली मी मित्राशी भांडत घरी आले. सायकल दुकानात परत करण्याचे काम तेव्हढे त्याने केले.

सायकल आणि ही आठवण सतत हातात हात घालून असतात. मात्र या घटनेनेने मला दोन गोष्टी शिकवल्या. एक, मी सायकल चालवायला शिकले आणि दुसरी महत्वाची जी आयुष्याला उपयोगी  पडली. योग्य बॅलन्सींग आणि योग्य वेळी अपघात टाळण्यासाठी ब्रेक्स लावणे. आयुष्य जगत असताना या “ब्रेक्स”चे महत्त्व फार जाणवले. असो.

नंतरच्या आयुष्यात इंजिनवाली दोन चाकी चारचाकी वाहने अनेक वर्षे चालवली. पण त्याहीवेळी जेव्हा, जिथे  संधी मिळाली तेव्हा तिथे मनसोक्त सायकल चालवली. आजही मला ही इको फ्रेंडली सायकल रपेट करायला आवडेल. पण या सगळ्यात महत्त्वाचे काय ?
*ब्रेक्स* हे विसरले नाही.
क्रमशः

राधिका भांडारकर

— लेखन : सौ. राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. लहानपणच्या सायकल चालवण्याच्या प्रयत्नांमधून मिळालेली शिकवण नकळतपणे मनात रुजली आणि ती आयुष्यात आतापर्यंत कामी आली.
    आलेल्या अनुभवातून चांगलं ते घेणं आणि ते जगण्यासाठी किती पूरक ठरलं हे शोधण्याची मॅडमची लहानपणापासूनची वृत्ती मनाला भावून जाते आणि आपल्यालाही शिकवण देते पुढचं कधी वाचायला मिळते ही उत्सुकता लागून राहते

  2. राधिका भांडारकर मॅडम यांचा ब्रेक्स लेख वाचून लहानपण आठवले. सुरेख लेख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” १७
Purnima anand shende on निसर्गोपचार : ३
Manisha Shekhar Tamhane on निसर्गोपचार : ३