Monday, December 23, 2024
Homeसाहित्यमाझी जडणघडण - २९

माझी जडणघडण – २९

पत्रिका

ताई आणि संध्या दोघीही कला शाखेत पदवीधर झाल्या. दोघींनी वेगवेगळ्या विषयात पदव्युत्तर शिक्षणही घेतले. संध्याला मुंबई विद्यापीठाची फेलोशिपही मिळाली. माझ्या आठवणीनुसार ताईने एम. ए. ला सोशिऑलॉजी हा विषय घेतला होता आणि त्यानंतर तिला सचिवालयात चांगली हुद्देवाली नोकरी मिळाली. त्याचवेळी उपवर कन्या ही सुद्धा जोड पदवी दोघींना प्राप्त झाली होती. परिणामी आमच्या जातीतल्याच काही इच्छुक आणि एलिजिबल बॅचलर्सच्या कुटुंबीयांकडून दोघींसाठी सतत विचारणा होऊ लागली. काय असेल ते असो पण ताई मात्र याबाबतीत फारशी उत्सुक वाटत नव्हती. काही विचारलं तर उडवाउडवीची उत्तर द्यायची शिवाय आमचं कुटुंब हे व्यक्ती स्वातंत्र्य जपणारं असल्यामुळे आमचे आई पप्पा याबाबतीत तसे शांतच होते. मात्र संध्याचे वडील ज्यांना आम्ही बंधू म्हणायचो ते मात्र “संध्याचे लग्न” याबाबतीत फारच टोकाचे बेचैन आणि अस्वस्थ होते. “ यावर्षी संध्याचं लग्न जमलंच पाहिजे.” या विचारांनी त्यांना पुरेपूर घेरलं होतं. संध्याचं लग्न जमण्याबाबत काहीच नकारात्मक नव्हतं. सुंदर, सुसंस्कारित, सुविचारी, सुशिक्षित आणखी अनेक “सु” तिच्या व्यक्तिमत्त्वाभोवती दिमाखदारपणे जुळले होते. प्रश्न होता तो तिच्याकडून होणाऱ्या योग्य निवडीचाच. अशातच कोल्हापूरच्या नामवंत “मुळे” परिवारातर्फे संध्या आणि अरुणा या दोघींसाठी लग्नाचा प्रस्ताव आला. घरंदाज कुटुंबातील, अमेरिकेहून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेला, भरगच्च अकॅडॅमिक्स असलेला, कलकत्ता स्थित, “युनियन कार्बाइड” मध्ये उच्च पदावर मोठ्या पगाराची नोकरी असणाऱ्या “अविनाश मुळे” या योग्य वराची लग्नासाठी विचारणा करणारा प्रस्ताव आल्यामुळे सारेच अतिशय आनंदित झाले.

रितसर कांदेपोहे कार्यक्रम भाईंकडेच (आजोबांकडे) संपन्न झाला. मुलगा, मुलाकडची माणसं मनमोकळी आणि तोलामोलाची होती. विवाह जमवताना “तोलामोलाचं असणं” हे खरोखरच फार महत्त्वाचं असावं आणि अर्थात ते तसं त्यावेळी होतं हे विशेष.

आतल्या खोलीत बंधूंनी पप्पांना सांगितलं की, ”मुलाच्या उंचीचा विचार केला तर या मुलासाठी संध्याच योग्य ठरते नाही का जना ?”
पप्पा काय समजायचं ते समजलेच होते. शिवाय त्यांना मूळातच अशा रेसमध्ये भाग घ्यायचा नव्हता. ते दिलखुलासपणे बंधूंना म्हणाले, ”अगदी बरोबर आहे, आपण संध्यासाठीच या मुलाचा विचार करूया आणि तसेही अरुला एवढ्यात लग्न करायचेही नाहीय.”
बघण्याचा कार्यक्रम अतिशय सुंदर, आनंदात, खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. न बोलताच होकारात्मक संकेत मिळालेही होते. तरीही पत्रिका जमवण्याचा विषय निघाला. वराच्या माननीय आईने दोघींच्याही पत्रिका मागितल्या आणि या “पत्रिकेमधील कोणती जुळेल त्यावर आपण पुढची बोलणी करूया.” असं त्या म्हणाल्या.
बंधूंचा चेहरा जरा उतरलाच असावा. पपांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. न बोलताच स्पर्शातूनच सांगितले, “काळजी करू नका. होईल सगळं तुमच्या मनासारखं.”

मी त्यावेळी प्रतिक्रिया देणे हा कदाचित उद्धटपणा ठरलाच असेल पण तरीही मी म्हणालेच, “इतकी वर्षं अमेरिकेत राहणारा मुलगाही पत्रिकेत कसा काय बांधला जाऊ शकतो किंवा आईच्या विरोधात जाण्याचं टाळत असेल का ? निर्णय क्षमतेत जरा कमीच वाटतोय मला. ”परंतु ‘अविनाश मुळे’ हा मुलगा सर्वांनाच खूप आवडला. माझ्या त्यावेळच्या शंकेचंही निरसन कालांतराने झालंच. बाबासाहेब ..ज्यांना आम्ही संध्याच्या लग्नानंतर हे संबोधन दिले..ते अतिशय उच्च प्रकारचं व्यक्तीमत्त्व होतं. त्यांचं आदरणीय स्थान माझ्या मनात कायमस्वरुपी आहे.

संध्याच्या चेहऱ्यावरचे त्यावेळचे अस्फुट, संदिग्ध भावही तिची पसंतीच सांगत होते. त्या काही दिवसांपुरता तरी “या सम हाच” हेच वातावरण आमच्या समस्त परिवारात होते. त्याच दरम्यान ताईने संध्याजवळ हळूच म्हटलेलं मी ऐकलंही, “तुझीच पत्रिका जुळूदे बाई ! म्हणजे प्रश्नच मिटला.”

पत्रिका संध्याचीच जुळली आणि घरात सगळा आनंदी आनंद झाला. लग्न कसं करायचं, कुठे करायचं, कपडे दागिने, खरेदी, जेवणाचा मेनु, पाहुण्यांचे स्वागत.. उत्साहाला उधाण आले होते. दरम्यान अविनाश दोन-तीन वेळा येऊन संध्याला वैयक्तिकपणे भेटलेही. एकंदर सूर आणि गुण दोन्ही छान जुळले. ताई मात्र प्रचंड आनंदात होती. नकारातही दडलेला हा तिचा खुला आनंद मला मात्र जरा विचार करायला लावणारा वाटला पण सध्या तो विषय नको. “संध्याचं लग्न” हाच आघाडीचा प्रमुख विषय नाही का ?
अवर्णनीय असा संध्याच्या लग्नाचा सोहळा होता तो ! सनईच्या मंगल सुरांसोबत संध्या मनोभावे गौरीहर पूजत होती. बाहेर दोन्ही वर्‍हाडी मंडळीत गप्पागोष्टी, खानपान मजेत चालू होतं भेटीगाठी घडत होत्या, जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता, नव्याने काही नात्यांचं पुनर्मिलन होत होतं. करवल्या मिरवत होत्या. पैठण्या शालू नेसलेल्या, पारंपरिक दागिने घालून महिला ठुमकत होत्या. नवी वस्त्रं, नवी नाती, नवे हितसंबंध, नव्या भावना. याचवेळी पप्पा हळूच गौरीहर पुजणाऱ्या सौभाग्यकांक्षिणी संध्याजवळ प्रेमाने गेले. संध्या आमची सहावी बहीणच. “मावस” हे नुसतं नावाला. लेक चालली सासुरा या भावनेने पप्पांना दाटून आलं होतं. डोळे पाणावले होते. संध्याने पप्पांकडे साश्रू नयनाने पाहिले. तिच्या नजरेत, ”काय पप्पा ?” हा प्रश्न होता.

“बाबी ! या डबीत एक ताईत आहे लग्नानंतर तू तो सतत जवळ ठेव, नाहीतर गळ्यात घाल. तुझ्या सौभाग्याचं हा ताईत सदैव रक्षण करेल.”
त्या क्षणी संध्याच्या मनातला गोंधळ पप्पांना जाणवत होता. “पप्पा तुम्ही हे सांगताय ? हा प्रश्न तिच्या ओठावर आलाही असणार. पप्पा एव्हढंच म्हणाले, ”बाबी ! नंतर बोलु. तुझ्या वैवाहिक जीवनासाठी या बापाचे खूप आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत.” संध्याचा पपांवर निस्सीम विश्वास होता.

तर्काच्या पलिकडच्या असतात काही गोष्टी खरं म्हणजे! पप्पांचा ज्योतिष शास्त्रावरचा सखोल अभ्यास होता. ते स्वतःही जन्मपत्रिका मांडत. आमच्या, आमच्या मुलांच्या ही पत्रिका त्यांनीच अचूक मांडल्यात पण तरीही भविष्य सांगण्यावर आणि मानण्यावर त्यांचा कधीच भर नव्हता. एकाच वेळी ते “ज्योतिष” या शास्त्राला मानत असले तरी ते त्यावर विसंबून राहण्याबाबत फार विरोधात होते. पत्रिका जुळवून लग्न जमवणे, कुंडलीतले ग्रहयोग, त्यावरून ठोकताळ्याचं चांगलं -वाईट भविष्य अथवा चांगल्यासाठीची व्रत वैकल्यं, वाईट टळावं म्हणून शांती वगैरे संकल्पनांवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. Rule your stars.. असेच ते कुणालाही सांगायचे. मग अशा व्यक्तीकडून संध्याबाबतच्या या छोट्याशा घटनेचं कसं समर्थन करायचं ? काय अर्थ लावायचा ?

त्याचं असं झालं.. डोंबिवलीच्या एका ज्योतिषांकडे (मला आता त्यांचं नाव आठवत नाही) “अविनाश मुळे” यांच्या पत्रिकेशी जुळतात का हे तपासण्यासाठी संध्या आणि अरुणाच्या पत्रिका आल्या होत्या. त्यांनी काही निर्णय देण्याआधीच बंधू त्यांना भेटले होते. गंमत अशी की हे डोंबिवलीचे सद् गृहस्थ आणि पप्पा बऱ्याच वेळा एकाच लोकल ट्रेनने व्ही.टी.पर्यंतचा आणि व्ही. टी. पासून चा (आताचे शिवाजी छत्रपती टर्मीनल) प्रवास करत. दोघांची चांगलीच मैत्री होती. त्या दिवशी पप्पांना गाडीत चढताना पाहून या सद्गृहस्थांनी पप्पांना जोरात हाक मारली, “ढगेसाहेब ! या इकडे, इथे बसा.” त्यांनी शेजारच्या सहप्रवाशाला चक्क उठवले आणि तिथे पप्पांना बसायला सांगितले.
“हं ! बोला महाशय काय हुकूम ?” पपांनी पुढचा संवाद सुरू केला.
“अहो ! हुकूम कसला ? एक गुपित सांगायचंय. बरे झाले तुम्ही भेटलात.”
मग त्यांनी विषयालाच हात घातला. “अविनाश मुळे” यांच्या पत्रिकेशी कुठलीच पत्रिका नाही जुळत हो ! अरुणाची सहा गुण आणि संध्याची केवळ पाच गुण. पण श्रीयुत निर्गुडेंमुळे (बंधु) थोडा नाईलाज झाला. गृहस्थ फारच नाराज झाले होते. ”काहीतरी कराच” म्हणाले.
“काय पंडितजी तुम्ही सुद्धा ? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. बरं मग पुढे काय आता.?”
“निर्गुड्यांना मी काहीच सांगितलेले नाही. हे बघा. पत्रिकेत मृत्यूयोग आहे. लग्न झाल्यावर आठ वर्षानंतर काहीतरी भयानक घडणार आहे पण ही पनवती, हे गंडांतर जर टळले तर मात्र उभयतांचा पुढच्या आयुष्याचा प्रवास अत्यंत आनंददायी आहे हे निश्चित.”
“म्हणजे सत्यवान सावित्रीची कलियुगातील कथा असेच म्हणूया का आपण ?” पप्पांना गंभीर प्रसंगी विनोद कसे सुचत ?
“ढगे साहेब हसण्यावारी नेऊ नका. माझं ऐका. मी एक ताईत तुम्हाला देतो. तेवढा कन्या जेव्हा गौरीहर पुजायला बसेल ना तेव्हा तिच्या हाती सुपूर्द करा किंवा तिच्या गळ्यात तुम्ही स्वत: घाला. उद्या आपण याच संध्याकाळच्या सहा पाचच्या लोकलमध्ये नक्की भेटू.?”

पप्पांनी फक्त त्या सद् गृहस्थांच म्हणणं ऐकलं आणि एका महत्त्वाच्या माध्यमाची भूमिका पार पाडली होती. त्यात त्यांची अंधश्रद्धा मुळीच नव्हती. होतं ते संध्यावरचं लेकी सारखं प्रेम आणि केवळ तिच्या सुखाचाच विचार. त्यात ते गुंतलेले नसले तरी कुठेतरी सतत एका अधांतरी भविष्याचा वेध मात्र ते घेत असावेत. बौद्धिक तर्काच्या रेषेपलिकडे जेव्हा काही घडतं ना तेव्हा त्यावर वाद आणि चर्चा करण्यापेक्षा त्या घटनांकडे तटस्थपणे पहावे नाही तर त्या जशाच्या तशा स्वीकाराव्यात हेच योग्य. फार तर “आयुष्यात आलेला असा एक अतिंद्रिय अनुभव“ या सदरात समाविष्ट करावे.

संध्याचे लग्न झाले. बंगालच्या भूमीत एक महाराष्ट्रीयन संसार आनंदाने बहरू लागला. दिवस,महिने, वर्षं उलटत होती आणि ते पनवतीचं आठवं वर्षं उगवलं. खरं म्हणजे पपांशिवाय कुणाच्याच मनात कसलीच भीती नव्हती. कारण सारेच अनभिज्ञ होते.पण आठव्या वर्षीच आमच्या परिवाराला प्रचंड दडपण देणारे ते घडलेच. बाबासाहेबांना अपघात झाला होता. संध्याचाच भाईंना फोन आला होता. तशी ती धीर गंभीर होती पण एकटी आणि घाबरलेली होती. ताबडतोब कलकत्त्याला जाण्याची तयारी झाली. प्रत्यक्ष भेटीनंतर बराच तणाव हलका झाला. कारण श्री. अविनाश मुळे हे केवळ योगायोगाने किंवा दैवी चमत्काराने किंवा पूर्व नियोजित अथवा पूर्व संचितामुळेच एका भयानक प्राणघातक अपघातातून सही सलामत वाचले. जणू काही त्यांचा पुनर्जन्मच झाला. आता तुम्ही काही म्हणा.
“ काळ आला होता पण वेळ आली नव्हती.”
अथवा
“आयुष्याची दोरी बळकट किंवा देव तारी त्याला कोण मारी.”
पण यानंतरची पप्पांची प्रतिक्रिया फक्त मला आठवते. ओंजळभर प्राजक्ताची फुले त्यांनी देव्हाऱ्यातल्या कृष्णाच्या मूर्तीवर भक्तीभावाने वाहिली आणि ते म्हणाले, । हे जगन्नाथा! कर्ताकरविता तुज नमो ।

अजूनही माझ्या मनात एक प्रश्न आहे. डोंबीवलीच्या त्या होरापंडितांनी त्यावेळीचं गुपित बंधुंनाच का सांगितलं नाही आणि पपांनाच का सांगितलं? या मागचं गुपित काय असेल ?
जाऊ दे ! काही प्रश्नांची उत्तरं न मिळण्यातच आयुष्याची जडणघडण असते हेच खरं !
क्रमशः

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. हे अशाप्रकारचे लेखन राधिका(आमची बिंबा) तूच करू शकतेस.
    मी तर या घटनेची अत्यंत निकटची साक्षीदार आहे, पण माझ्या मनात हे विचार कधी का आले नाहीत?
    तुझी लेखणी एका कसदार साहितत्यिकाची आहे यात शंकाच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments