“रेडिओ”
अमळनेर हे माझं सासरगाव. जेव्हा मी अमळनेरला जाते तेव्हा अगदी निवांत असते. देहाने आणि मनानेही. माझी धाकटी जाऊ सरोज, माझा तिथला मुक्काम आरामदायी व्हावा म्हणून अगदी मनापासून प्रयत्नशील असते. ती पहाटे लवकर उठते. प्रभात फेरफटका मारून येते. शांत झोपलेल्या मला- खुडबुडीचे आवाज येऊ नयेत म्हणून माझ्या रूमचा दरवाजा हलकेच ओढून घेते. खरं म्हणजे मी जागीच असते. माझा धाकटा दीर सुहास खराट्याने खरखर अंगण झाडत असतो. सरोज बाहेर गेली, आत आली, मागचा दरवाजा उघडला या सर्वांचे आवाज येत असतात पण तरीही मी उठत नाही. अशी घरी बनवलेल्या, घरच्या कपाशीच्या गादीवर अर्धवट झोपेतली जाग मी मजेत अनुभवत असते.
त्या पहाटेच्या वेळी फिरून आल्यानंतर पहिलं जर काय सरोज करत असेल तर, ती तिचा छोटासा रेडिओ लावते. रेडिओवर सकाळची मंगल गाणी, भक्ती गीतं, भगवत् गीतेच्या अध्यायावरचं विवेचन वगैरे एकापाठोपाठ एक चालू असतं. मधून मधून निवेदिकेचा मंजुळ आवाजही येत असतो. सरोज रेडिओ काही कान देऊन ऐकत नसते पण दरम्यान ती चहापाणी, घरातला केरवारा, कपडे, भांडी यासारखी कामे रेडिओच्या तालात सहजपणे आवरत राहते, तेव्हा माझ्या मनात विचार येतो आजच्या दूरदर्शन, संगणक, मोबाईलच्या जमान्यातही सरोज सारखी रेडिओ ऐकणारी माणसं आहेतच की !
“सकाळचे सहा वाजले आहेत, आम्ही जळगाव आकाशवाणी केंद्रावरून बोलत आहोत” या एका वाक्याने मी जवळजवळ ६० वर्षे मागे जाते.
“रेडिओ“
हा रेडिओ म्हणजे एक महत्त्वाचं स्थान आहे आमच्या बालपणातलं आणि जडघडणीतलंही. एक अखंड नातं त्या ध्वनीलहरींशी जुळलेलं आहे. त्यावेळी घरबसल्या करमणुकीचं रेडिओ हे एकमेव साधन होतं. घराघरात वाजणारा, बोलणारा रेडिओ म्हणजे त्या त्या परिवाराचा एक महत्त्वाचा सदस्य होता.
ऑल इंडिया रेडिओ. AIR.
आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पहाटेच्या प्रहरी वाजणाऱ्या सिग्नेचर ट्युननेच आम्ही जागे व्हायचो. आजही ती विशिष्ट वाद्यवृंदातील सुरमयी धुन कानात आहे आणि तिच्या आठवणीने अंतःकरणात खूप काहीतरी अनामिक अशा भावनांच्या लाटा उसळतात. बाल्य, कौमार्य आणि तारुण्य सारं काही आकाशवाणीच्या या धूनमधून उलगडत जातं.
रात्री झोपताना दिल्ली आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणारी संगीतसभाही सोबत असायचीच. आता टेलिव्हिजन वरच्या अनेक दुष्ट, मतलबी, स्वार्थी, विकृत मानवी भावनांचा अविष्कार घडवणाऱ्या, मनोवृत्ती बिघडवणाऱ्या, वर्षानुवर्षे चालणाऱ्या अनेक दीर्घ मालिका बघताना सहज मनात येते, रेडिओ हे त्यावेळेचे केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते तर ते साहित्य, संगीत, कलेच्या माध्यमातून सामाजिक संस्कार करण्याचे, समाज घडवण्याचे एक श्राव्य माध्यम होते. आनंदी जीवनाची दिशा दाखवणारं साधन होतं. नि:संशय..
गंमत- जम्मत नावाचा लहान मुलांसाठी एक सुंदर कार्यक्रम आकाशवाणी वरून प्रसारित केला जायचा. त्यातले नानुजी आणि मायाताई मला अजूनही आठवतात. त्यांचे ते प्रेमळ आवाज आजही कानात घुमतात. कितीतरी कथा, बालनाट्ये, बालगीते या कार्यक्रमातून ऐकली. इतिहास, भूगोल, विज्ञान, समाजशास्त्र यांचेही मनोरंजक पद्धतीने ज्ञानार्जन व्हायचे. याच कार्यक्रमातून एखादी ऐतिहासिक किंवा भौगोलिक प्रश्नपत्रिका दिलेली असायची. आम्ही ती उतरवून घ्यायचो आणि त्याची उत्तरे पत्राद्वारे मागवलेली असायची.
द्वारा केंद्राधिकारी,
आकाशवाणी मुंबई केंद्र
गंमत जंमत विभाग. मुंबई ४
असा त्यांचा पत्ता असायचा. मी अनेक वेळा या पत्त्यावर प्रश्नपत्रिका सोडवून पत्रं पाठवलेली आहेत आणि पुढच्या कार्यक्रमातून जेव्हा उत्तरे बरोबर असलेल्या अनेक नावांबरोबर माझे नाव घेतले जायचे तेव्हा मला खूप गंमत वाटायची.
माझ्या आजीचे आवडते कार्यक्रम म्हणजे “कामगार सभा” आणि “कीर्तन”. ती रेडियोला कान लावून कीर्तन ऐकायची आणि तिच्याबरोबर आम्ही सुद्धा. या कीर्तनानेही आम्हाला नकळत घडवलेच की ! नऊ रसात ओथंबलेले ते कीर्तन ऐकताना आम्ही पुरणकाळात, ऐतिहासिक काळात सहजपणे फेरफटका मारून आलोय. हरिभक्त परायण कीर्तनकाराच्या संगीतातून, गायनातून आम्ही विस्तृत अशा लोक परंपरेच्या हातात हात घालून नाचलो, बागडलो. टाळचिपळ्यां सोबत गायलेल “जय जय रामकृष्ण हारी” अजूनही कानात आहे. प्रत्येकवेळी निरुपण संपले की आम्हीही बुवां बरोबर…
“बोला ! पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम ।।
असा जयघोष करायचो.
या क्षणी मला रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांच्या वेळा, त्यात सहभागी असणाऱ्या आकाशवाणीच्या प्रत्येक कलाकारांची नावे आठवत नाहीत पण प्रहर आठवतात, आवाज आठवतात. त्या त्या कार्यक्रमाच्या वेळी वाजणारा वाद्यवृंद आठवतो आणि मन पुन्हा पुन्हा त्या काळात झेपावत.
संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या, ऑल इंडिया रेडिओ दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही न चुकता ऐकायचो. सगळ्या घडामोडींचा ताजा आणि निखळपणे घेतलेला मागोवा आम्हाला समाजाबरोबर ठेवायचा. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून बातम्या देणाऱ्या “सुधा नरवणे” यांचा स्पष्ट, मोकळा आवाज आमच्या पिढीतली एकही व्यक्ती विसरू शकणार नाही.
अनेक संगीत नाटकांचं रेडिओवरूनच सुंदर सादरीकरण व्हायचं. कलाकारांच्या संवाद बोलीतूनच डोळ्यासमोर ती पात्रं, ते सीन, वातावरण साकारायचे आणि आभासी असला तरी प्रत्यक्ष रंगभूमीवर नाट्यप्रयोग पाहत असल्याचा आनंद या आकाशवाणीने आम्हाला दिला. गो. नी. दांडेकरांच्या “शितू” या गाजलेल्या कादंबरीचे अभिवाचनही आम्ही रेडिओ जवळ बसून ऐकले. काय आनंद दिला आहे आम्हाला या दर्जेदार कार्यक्रमाने ते कसं सांगू तुम्हाला ?
हलक्या- फुलक्या, विनोदी श्रुतिका हे तर मुंबई आकाशवाणीचं खास वैशिष्ट्य. त्या संबंधात मला “प्रपंच” ही श्रुतिका मालिका आठवते. प्रत्येक भाग हा विशेष, हसवणारा आणि मनोरंजक असायचा. त्यातले टेकाडे भाऊजी आणि वहिनी यांच्यात घडणारे खुसखुशीत संवाद आठवले की आताही सहज हसू येतं. “बाळ कुरतडकर”, “नीलम प्रभू”, प्रभाकर (आडनाव आठवत नाही) हे कसलेले कलाकार त्यात सहभागी असायचे. काय जिवंतपणा असायचा त्यांच्या नाट्य सादरीकरणात !
तशी मी लहानच होते पण तरीही १९५५ ते १९५६ हे साल म्हणजे आकाशवाणीच्या इतिहासातले सुवर्णाचे पान म्हणून गाजले ते पक्के लक्षात आहे. पुणे आकाशवाणी केंद्राचे तत्कालीन अधिकारी, भारतीय शास्त्रीय संगीत आणि मराठी नाट्य संगीताचे जाणकार “सीताकांत लाड” यांनी रामायणावर आधारित साप्ताहिक कार्यक्रमाची संकल्पना मांडली. कवी गदिमा आणि संगीतकार, गायक सुधीर फडके यांच्या सहभागाने “गीत रामायण” हे हृदयात राहणारे संगीतमय महाकाव्य अस्तित्वात आले. एक एप्रिल १९५५ रोजी ऑल इंडिया रेडिओ पुणे केंद्रावरून रामनवमीच्या पवित्र प्रसंगी
।स्वये श्री रामप्रभू ऐकती कुश लव रामायण गाती।
या परमसुंदर, श्रवणीय गीताने गीतरामायण कार्यक्रम सुरू झाला. हा कार्यक्रम वर्षभर चालला. अधिक मासामुळे हे वर्ष ५६ आठवड्यांचं होतं म्हणून ५६ भागात हे “गीत रामायण” वर्षभर श्रोत्यांनी प्रचंड भावनात्मकतेने, श्रद्धेने आणि अपार आनंदाने ऐकले.
आज काय रामजन्म होणार…
सीता स्वयंवर ऐकायचे आहे…
राम, सीता, लक्ष्मण वनवासात चालले आहेत..
“माता न तू वैरिणी” म्हणत भरत कैकयीचा तिरस्कार करतोय…
भरत भेटीच्या वेळेस,
। पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ।
या गाण्याने तर कमाल केली होती.
“सेतू बांधा रे” या गाण्याबरोबर श्रोतृवर्ग वानरसेने बरोबर जणू काही लंकेलाच निघाला. घरोघर “सियावर रामचंद्रकी जय” चा गजर व्हायचा. शेवटचं,
। गा बाळांनो श्री रामायण।
या गाण्याने कार्यक्रमाचा जेव्हा समारोप झाला तेव्हा एक अनामिक हुरहूर दाटून आली. खरोखरच या श्रोतृगणात आमची पिढी होती हे आमचं किती भाग्य ! या अमर महाकाव्याची जादू आम्ही या रेडिओमुळे प्रत्यक्ष अनुभवली. त्यानंतरच्या काळात गीतरामायणाचे अनेक प्रत्यक्ष कार्यक्रम झाले.. आजही होतात पण रेडियोवर ऐकलेल्या त्या पहिल्या कार्यक्रमाची मजाच और होती ! आजही आठवताना, लिहिताना, माझ्या अंगावर काटा फुलतो. कसे आम्ही कुटुंबीय, शेजारी, आजूबाजूचे सारेच हातातली कामे टाकून गीत रामायणातल्या समृद्ध रचना गाणाऱ्या रेडिओ जवळ मग्न होऊन, भान हरपून बसून राहायचे आणि पुढच्या आठवड्याची प्रतीक्षा करायचे.
आज ओठातून सहज उद्गार निघतात, “रेडिओ थोर तुझे उपकार.”
शालेय जीवनातला आणखी एक- रेडिओ सिलोन वरून प्रसारित होणारा अतीव आनंददायी, औत्स्युक्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे… “बिनाका गीतमाला”.
“अमीन सयानी”चं बहाररदार निवेदन आणि तत्कालीन हिंदी चित्रपटातील एकाहून एक आवडती गाणी ऐकताना मन फार रमून जायचं. दर बुधवारी रात्री आठ वाजता, रेडिओ सिलोन वरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही न चुकता ऐकायचो. त्यासाठी दुसऱ्या दिवशीचा गृहपाठ पटापट संपवून “बिनाका गीतमाला” ऐकण्यासाठी सज्ज व्हायचे हे ठरलेलेच. आज कुठले गाणे पहिल्या पादानवर येणार यासाठी मैत्रिणींमध्ये पैज लागलेली असायची. तसेच नव्याने पदार्पण करणार्या शेवटच्या पादानवरच्या गाण्याचे ही अंदाज घेतले जायचे. आम्ही अक्षरश: ”बिनाका गीतमालाची” डायरी बनवलेली असायची. शेवटच्या पादानपासून पहिल्या पादानपर्यंतची दर बुधवारची गाण्यांची यादी त्यात टिपलेली असायची. मुकेश, रफी, तलत, आशा, लताची ती अप्रतीम गाणी ऐकताना आमचं बालपण, तारुण्य, फुलत गेलं.
जाये तो जाये कहा..
जरा सामने तो आओ छलिया..
है अपना दिल तो आवारा..
जिंदगी भर नही भूलेंगे..
जो वादा किया वो..
बहारो फुल बरसाओ..
बोल राधा बोल ..
बिंदिया चमकेगी, कंगना खनकेगी..
वगैरे विविध सुंदर गाण्यांनी मनावर नकळत आनंदाची झूल या कार्यक्रमातून पांघरली होती.
दुसऱ्या दिवशी शाळेतही मधल्या सुट्टीत पटांगणातल्या आंब्याच्या पारावर बसून आम्ही मैत्रिणी ही सारी गाणी सुर पकडून (?) मुक्तपणे गायचो. अमीन सयानीचे विशिष्ट पद्धतीने केलेले सूत्रसंचालन, त्याचा आवाज आम्ही कसे विसरणार ? अजूनही हे काही कार्यक्रम चालू आहेत की बंद झालेत हे मला माहीत नाही. असतीलही नव्या संचासहित पण या कार्यक्रमाचा तो काळ आमच्यासाठी मात्र अविस्मरणीय होता हे नक्की.
फौजीभाईंसाठी लागणार्या विविधभारतीनेही आमचा ताबा त्याकाळी घेतला होता.
वनिता मंडळ नावाचा एक महिलांसाठी खास कार्यक्रम रेडिओवरून प्रसारित व्हायचा. तो दुपारी बारा वाजता असायचा. त्यावेळी आम्ही शाळेत असायचो पण आई आणि जिजी मात्र हा कार्यक्रम न चुकता ऐकायच्या. खरं म्हणजे त्या काळातल्या सर्वच गृहिणींसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आणि मनोरंजनाचा ठरला होता. माझा या कार्यक्रमांशी प्रत्यक्ष संबंध आयुष्याच्या थोड्या पुढच्या टप्प्यावर आला. त्यावेळच्या आठवणी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. अकरावीत असताना माझे अत्यंत आवडते, इंग्लिश शिकवणारे, खाजगी क्लासमधले “काळे सर” हे जग सोडून गेले तेव्हा मी खूप उदास झाले होते. त्यांच्या स्मृतीसाठी मी एक लेख लिहिला आणि “वनिता मंडळ” या आकाशवाणीच्या कार्यक्रमात तो सादर करण्याची मला संधी मिळाली. त्यावेळी मा.लीलावती भागवत, विमल जोशी संयोजक होत्या. त्यांना लेख आणि माझे सादरीकरण दोन्ही आवडले आणि तिथूनच आकाशवाणी मुंबई केंद्रावर माझ्या कथाकथनाच्या कार्यक्रमाची नांदी झाली. तेवढेच नव्हे तर मी लेखिका होण्याची बीजे या आकाशवाणीच्या माध्यमातूनच रोवली गेली. माननीय लीलावती भागवत या माझ्या पहिल्या लेखन गुरू ठरल्या. रेडिओचे हे अनंत उपकार मी कसे आणि का विसरू ?
अगदी अलीकडे “उमा दीक्षित” संयोजक असलेल्या एका महिला कार्यक्रमात कथाकथन करण्यासाठी मी आकाशवाणी मुंबई केंद्रावर गेले होते. पन्नास वर्षात केवढा फरक झाला होता ! दूरदर्शनच्या निर्मितीमुळे आकाशवाणीला ही अवकळा आली असेल का असेही वाटले. नभोवाणी केंद्राचे एकेकाळचे वैभव मी अनुभवलेले असल्यामुळे त्या क्षणी मी थोडीशी नाराज, व्यथित झाले होते. फक्त एकच फरक पडला होता. त्या दिवशीच्या माझ्या कार्यक्रमाचा अडीच हजाराचा चेक मला घरपोच मिळाला होता पण त्याकाळचा १५१ रुपयाचा चेक खात्यात जमा करताना मला जो आनंद व्हायचा तो मात्र आता नाही झाला. आनंदाचे क्षण असे पैशात नाही मोजता येत हेच खरं ! माझ्या कथाकथनाला ऑडीअन्स मिळेल का हीच शंका त्यावेळी वरचढ होती.
आता अनेक खाजगी रेडिओ केंद्रेही अस्तित्वात आहेत. गाडीतून प्रवास करताना अनेक RJ न्शी ओळख होते. कुठल्याही माध्यमांची तुलना मला करायची नाही पण एक नक्की माझ्या मनातलं नभोवाणी केंद्र… ऑल इंडिया रेडिओ… त्याचे स्थान अढळ आहे आज मी रेडिओ ऐकत नाही हे वास्तव स्वीकारून सुद्धा…
“ताई उठता का आता ? चहा ठेवू का तुमचा ? साखर नाही घालत..”
सरोज माझ्या डोक्यावर हात ठेवून मला उठवत होती…
“अगबाई ! इतकं उजाडलं का ? उठतेच…
आणि हे बघ तो रेडियो चालूच ठेव. बरं वाटतं गं ! ऐकायला”
गरमगरम वाफाळलेला *आयता* चहा पिताना रेडियोवर लागलेलं कुंदा बोकीलचं,
। शाळा सुटली पाटी फुटली
आई मला भूक लागली।
हे गाणं ऐकत पुन्हा मी त्या आनंददायी ध्वनीलहरीत बुडून गेले.
क्रमश:
— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800