Wednesday, July 2, 2025
Homeलेखमाझी जडणघडण : ३७

माझी जडणघडण : ३७

“वासंती”

गुलाब मावशीचा ज्येष्ठ सुपुत्र, पप्पांचा मावसभाऊ आणि माझा काका ज्याला आम्ही “भाऊ” अशी हाक मारत असू. आमचा आणि गुलाबमावशीचा परिवार हा संयुक्त परिवारासारखाच होता. एकमेकांच्या कुटुंबामध्ये घडणाऱ्या सर्वच चांगल्या- वाईट, सुख- दुःखांच्या घटनांमध्ये आमची खोलवर गुंतवणूक असायची.

“भाऊचं लग्न” ही एक अशीच घटना होती की ज्यामुळे औत्स्युक्य आणि चिंता आमच्या घरात पसरली होती. औत्स्युक्य अशासाठी की आता भाऊचे लग्न होणार घरात सून येणार, काकी मामी येणार, काहीतरी कौटुंबिक बदल घडणार म्हणून आणि चिंता अशासाठी की भाऊ कोणतीच मुलगी पसंत करत नव्हता. त्याला सुंदरच मुलगी हवी होती बायको म्हणून. तसा भाऊसुद्धा गोरा, देखणा होताच. हसरा, मिस्कील होता. त्याचे शिक्षण मात्र तुलनेने कमी होते. खरं म्हणजे तो हुशारही होता, त्याचं गणित फार चांगलं होतं शिवाय आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक, राजकीय घटनांचे त्याला ज्ञान होते. त्यावर तो सफाईदारपणे बोलू शकायचा. आपली मते मांडू शकायचा पण तो शिकू शकला नाही कारण त्याच्यावर अचानक कुटुंबाचा आर्थिक भार पेलण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच्यावर पाठच्या दोन भावांचे शिक्षण आणि भविष्य घडवण्याची जबाबदारी होती.

भाऊ तसा कर्तव्यदक्ष होताच आणि त्याचे त्याच्या भावांवर अपार प्रेम होते. ज्या संधी आपल्याला मिळाल्या नाहीत त्या भावांना मिळाव्यात ही त्याची मनापासून इच्छा होती आणि तशी त्याची धडपड होती आणि खरोखरच त्याने त्यासाठी त्याची स्वतःची घडण बाजूला ठेवून आई-वडिलांच्या संसाराची जबाबदारी कर्तव्यपरायणतेने खांद्यावर पेलली.. त्यात तो यशस्वी झाला. सत्यरंजन ज्याला आम्ही “पपी” म्हणत असू आणि सुभाष ज्याला आम्ही “बाळू” म्हणत असू, त्या दोघांची शिक्षणं विनाअडथळा पार पडली. दोघांनाही उत्तम पगाराच्या नोकऱ्याही मिळाल्या. “पपी” तर शिक्षण आणि नोकरीत अधिक सरस ठरला. भविष्यात त्याला अनेक संधी उपलब्ध झाल्या. हे फक्त “भाऊ” मुळे शक्य झाले याची जाणीव मात्र दोघांनाही होती. भाऊ जरी जिथे होता तिथेच राहिला पण त्याची कारणे या दोघांनी कधीही स्मृतीआड केली नाहीत. त्यांनी भाऊविषयी सदैव आदरच बाळगला.

मग लग्न ठरवताना आज पर्यंत स्वतःसाठी कुठलंही स्वप्न न पाहणाऱ्या भाऊने सुंदर मुलीशी विवाह करायचा निर्धार केला तर गैर काय होते ? म्हणूनच सारे जण याबाबतीत.. जरी ही बाब फारशी कुणाला रुचत नसली तरी भाऊसोबत राहिले.

भाऊने अक्षरश: नव्व्याणव मुलींना नकार दिले. कोण सावळी, कोण बुटकी, कुणी अधिक उंच, कुणाचे दात किंचित पुढे, कोणाचे केस पातळ, कुणी जाडी कुणी लुकडी अशा विविध कारणांनी भाऊने धडाधड विवाहयोग्य वधूंवर फुल्या मारल्या. माझे पप्पा आणि आप्पा (भाऊ चे वडील) कधी कधी त्याला समजावण्याचा प्रयत्नही करायचे.
“अरे या मुलीला नाकारतोस ? काय खोड दिसते तिच्यात तुला ? शरीरयष्टी थोडी किरकोळ आहे पण लग्नानंतर होईल की ती भरदार आणि शिवाय तिचे वडील सचिवालयात मोठ्या पदावर आहेत. नाही म्हटलं तरी तुझ्यासाठी ते फायद्याचे ठरू शकते. तुलाही ते पुढे आणतील.” पण या कशाचाही होकारार्थी परिणाम भाऊ वर व्हायचा नाही. झालाही नाही.

भाऊची स्त्रीसौंदर्यविषयीची नक्की काय कल्पना होती तेच कुणाला कळत नव्हते. सारेच हैराण होते. जिजी मात्र म्हणायची, ”योग यावा लागतो. वेळ आल्याशिवाय काही घडत नाही. आता भाऊ साठी मुली बघूच नका,”

कधी कधी ती असेही म्हणायची, ”बघ हं भाऊ ! “चापू चापू दगड लापू” असं व्हायचं तुझ्या बाबतीत,” पण जिजीचे पहिले म्हणणे खरे ठरले. अखेर भाऊचे लग्न जुळण्याचा योग आला. वासंतीला भाऊने बिनतक्रार, कसलीही खोड न काढता क्षणात पसंत केले. वासंती ही शंभरावी मुलगी होती आणि भाऊच्या स्त्रीसौंदर्य कल्पनेत ती १००% उतरली. दोघांनीही एकमेकांना पसंत केले आणि भाऊचे लग्न जमले. गंगेत घोडं नहालं !

मोरेश्वर ढगे (मला नक्की नाव नीट आठवत नाही) यांची वासंती ही ज्येष्ठ कन्या. तिला अनिल नावाचा एकच भाऊ होता. वासंतीची आई जाडजूड, लठ्ठ, चष्मेवाली, थोडं अंगाशी सैल झोळ असलेलं नऊवारी लुगडं नेसणारी पण बोलण्यात स्पष्ट, ठणठणीत आणि काहीशी चतुर, चौकस होती. त्या मनाने वासंतीचे वडील मात्र शांत, गरीब, सरळ स्वभावाचे वाटले. अनिल उंच, मिस्कील आकर्षक असला तरी थोडासा कलंदर, बढायाखोर, उनाड असावा असा आपला एक अंदाज. अर्थात पहिल्याच भेटीत जजमेंटल कशाला व्हावे ?

वासंती

पण वासंती मात्र खरोखरच सुंदर होती. नाकी डोळी नीटस, रंग जरी सावळा असला तरी कांती सतेज होती. तिचे डोळे तर फारच सुंदर होते. मोठे पिंगट रंगाचे आणि पाणीदार, बोलके. केसही सरळ आणि लांब सडक. बांधा थोडा बसका आणि स्थूल असला तरी तिच्या एकूण व्यक्तीमत्वाला तो शोभून दिसत होता आणि बोलताना तिच्या पातळ ओठांची सुरेख हालचाल व्हायची. थोडक्यात काय वासंती सगळ्यांनाच आवडली. भाऊला हवी तशी मनासारखी जोडीदार मिळाली म्हणून सारेच खुश झाले. थोडं दडपण होतं ते म्हणजे गुलाबमावशीच्या स्टेशन रोडवरच्या राहत्या घराचं. घराला काहीच रेखीवपणा, सुविधाबद्ध आराखडा नव्हता. मुळात शयनगृह हा प्रकारच तिथे नव्हता. कशाही एकमेकांना जोडलेल्या, अर्थहीन, हेतूशून्य खोल्या. पाठीमागच्या बाजूने जिना उतरून खाली गेल्यावर कॉमन पद्धतीचे संडास तेही त्यावेळच्या टोपली पद्धतीचे. कॉमन अशासाठी की खालच्या मजल्यावर एक दोन भाडोत्री राहत होते आणि त्यांच्यासाठी वेगळी सोय नव्हती.

वासंती ही मुंबईत ग्रँटरोड सारख्या भागात राहणारी. त्यांचंही घर मोठं नसलं तरी मुंबईच्या वेगळ्याच शहरी वातावरणात वाढल्यामुळे त्यांच्या जीवन पद्धतीत फरक नक्कीच होता पण लग्न जमण्याच्या आनंदात काही बाबी किरकोळ ठरतात किंवा “पुढचं पुढे बघू” अशा सदरात जाऊन बसतात हेही तितकंच खरं.

वासंती आणि भाऊचे लग्न झाले. “लक्ष्मी नारायणाचा जोडा जणूं” म्हणून सारे नावाजले. दोन्ही कुटुंबात आनंदी आनंद होता. गृहप्रवेशाच्या वेळी वासंतीने लाजत मुरकत सुरेख शब्दांची गुंफण करून नावही घेतले. भाऊ तर काय हवेतच होता.

जिना चढून वर आल्यानंतर झोपाळा असलेल्या बाहेरच्या जागेच्या उजव्या बाजूच्या काहीशा काळोख्या खोलीचे रूपांतर भाऊ आणि वासंतीच्या शयनगृहात झाले. पूर्वी त्या खोलीतून पापड लोणच्याचे वास यायचे पण आता पावडर, परफ्युमचे सुगंध यायला लागले. काही आधुनिक, छान छान वस्तू तिथे दिसू लागल्या, सुंदर चादरी, पडदे झळकले. एक वेगळाच साज त्या खोलीला चढला आणि हे सारं केवळ वासंतीमुळे.

शक्यतो तिच्या आवडीनिवडी जपण्याचा भाऊ बऱ्याच वेळा रिकाम्या खिशाचा विचार न करता प्रयत्न करायचा. घरात वापरायची एक खोली नकळतपणे कमी झाली तरी बाकीच्या सर्व सदस्यांनी सांभाळून घेतले. याच घराच्या माळ्यावरच्या दोन खोल्यात कुमुद आत्या आणि तिचे कुटुंब राहत होते. गुण्यागोविंदाने सारे नांदत होते. सारी प्रेमाची, अत्यंत घट्ट जुळलेली नाती. याच नात्यात वासंती नावाचा एक नवा धागा सुंदररित्या विणला जावा हीच साऱ्यांची अपेक्षा असणार ना ? पण तसे झाले नाही. का ? कुठे बिनसले ? नक्की काय चुकले ? कलहाची सुरुवात कशी कधी झाली हे कळलंच नाही. भाऊने पसंत केलेली शंभरावी, सुंदर वासंती, आज पर्यंत ज्या कुटुंबात फक्त प्रेमाचीच कारंजी उसळली, एकमेकांसाठी कठीण परिस्थितीतही सारी भक्कमपणे उभी राहिली, त्या कुटुंबात वासंतीचे अस्तित्व एका उसवू पाहणाऱ्या ठिगळासारखे जाणवायला लागलं.

सुरुवातीला तिची दबक्या आवाजातली भाऊशी कुरबूर सुरू झाली. भाऊ दुर्लक्ष करायचा म्हणून मग मोठ्या आवाजात खोलीच्या बाहेर भांडणं आली. सारं घर हादरलं.

वासंतीला वेगळं व्हायचं होतं. तिच्या मनासारखं घर तिला थाटायचं होतं. इथे राहणं तिला अजिबात आवडत नव्हतं पण भाऊ असहाय्य होता. एक तर कुटुंबावर त्याचं अतिशय प्रेम होतं आणि दुसरा व्यावहारिक मुद्दा म्हणजे स्वतंत्र घर घेण्यापासून ते चालवण्यापर्यंत लागणारं आर्थिक सामर्थ्य त्याच्यात नव्हतं. इथे कमावणाऱ्या पाठच्या भावांच्या साथीने एकत्र राहणं नक्कीच अवघड नव्हतं. शिवाय एकमेकात जिव्हाळा होता. नाना तर्‍हेने त्याने वासंतीला हे पटवण्याचा प्रयत्न केला पण तिचं म्हणणं एकच, ”तुमच्याच जीवावर तुमचे भाऊ मोठे झाले ना, मग आता त्यांनी तुम्ही त्यांच्यावर खर्च केलेले धन द्यावं की परत तुम्हाला ! या निमित्ताने त्यांनी त्याची परतफेड करायला हवी.”

भाऊच काय वासंतीच्या या बोलण्याने सारं घर कळवळलं. वासंतीने नात्यातला सारा गोडवाच शोषून घेतला. त्यानंतर सगळंच हळूहळू तुटत गेलं. वासंतीने कुठल्याच नात्याचा, कुणाच्या वयाचा आदर बाळगलाच नाही. तिच्यासाठी ते घर, घरातली माणसं म्हणजे जणू काही एक उकिरडा होता, नरक होता. ती केव्हाही कुणालाही मनाला येईल ते जिभेला बांध न घालता, वारेमाप बोलत सुटायची. भाऊ तर तिच्यासाठी एकदम फोडणीतून बाजूला काढलेल्या कढीपत्यासारखा होता. येता जाता ती त्याला म्हणायची, ”मुलांना जन्म देताना तरी विचार करायचा ? त्यांचं भविष्य घडवण्याची क्षमता नाही तुमच्यात तर कशाला संसार मांडलात ? भावांचेच संसार ओढायचे होते ना आयुष्यभर ! उपयोग काय हो तुमच्या हुशारीचा ? पुढे येण्यासाठी काही मेहनत केलीत का ? यापुढे तरी कराल का ? माझ्या आई बापाने काय पाहिलं तुमच्यात कोण जाणे ! अशा अडाणी, स्वार्थी कुटुंबात त्यांनी मला ढकलून दिलं !”
मग दिवस असो, करकरीत संध्याकाळ असो, तिथे फक्त भांडण, रडणं, अबोला आणि भयाण मौनातील अमंगल, अशुभ शांतता !

एकंदरच दिघे कुटुंबाची स्वस्थता हरपली. चार भिंतीतली प्रतिष्ठा पणाला लागली. घर म्हणजे असतं एक विसाव्याचं स्थान. थकूनभागून आल्यानंतर सुखसंवाद घडवणारं ठिकाण असतं पण ते सारं उध्वस्त होत होतं. कुणालाच घरी परतावंसं वाटत नव्हतं. जिथे एकेकाळी सुखद वारे वाहत होते तिथे तप्त लाव्हारसाचीच धग जाणवायला लागली होती. केवळ एका व्यक्तीमुळे. भाऊने पसंत केलेली ही शंभरावी सुंदर मुलगी वासंती हिच्यामुळे. वासंती आमच्या घराची खलनायिका ठरली. माणसं, नाती पर्यायाने कुटुंब पार दुभंगलं. जिजीचं दुसरं भाष्यही खरं ठरलं. “चापू चापू दगड लापू.” अतिचिकित्सेचं कडू फळ !

भाऊचं वासंती वर फार प्रेम होतं ते जाणवायचं पण तो तिच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं, महत्त्वाकांक्षापूर्तीसाठी अपुरा ठरला. एक हुशार, देखणा, कुटुंब बांधून ठेवण्यासाठी धडपडणारा भाऊ अखेर व्यसनाधीन झाला. नैराश्याच्या गर्तेत लोटला गेला. वासंतीचे माहेरी जाणं, तिथेच मुलांना घेऊन महिनो नि महिने राहणं आताशा वाढलं होतं. ती माहेरच्या आधाराने भाऊला धमक्याही द्यायची म्हणे !

एकदा भाऊ माझ्या आईजवळ म्हणाला होता, ”मालू वहिनी तू आमच्या घरातली आदर्श व्यक्ती ! तू तर एका श्रीमंत बापाची मुलगी, पण आमच्या “जनाचा” संसार कसा छान सांभाळलास ! आज “जना” जो काही आहे तो केवळ तुझ्यामुळे. जिजी आमची मावशी असूनही तू आम्हाला जवळची वाटतेस.
माझंच नशीब असं फुटकं का ग ?” तेव्हा आई त्याला म्हणाली होती, ”असं बोलू नकोस. आपल्याही काही चुका असतील. वासंतीला समजावून घेण्यात आपणच कमी पडत असू. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि वासंतीतही अनेक गुण आहेत रे ! कला आहेत. दिवाळीत ती रांगोळ्या किती सुंदर काढते ! तुमचे “जना” तर तिच्या हातच्या पोळ्या आणि वालाच्या बिरड्याचं इतकं कौतुक करत असतात ! नीटनेटकं कसं राहावं ते तिच्याकडूनच शिकावं. संसाराच्या तिच्या काही वेगळ्या कल्पना असतील. तुमच्यातल्या मतभेदामुळे आणि भिन्न वृत्तीमुळे नात्यांमध्ये या दर्‍या निर्माण झाल्यात. त्या बुजण्यापेक्षा अधिक खोल होत आहेत पण अजूनही वेळ गेलेली नाही भाऊ. खरं म्हणजे तुझी जबाबदारी आहे हे सारं नीट करण्याची. सगळ्याच काही मराठी चित्रपटातल्या सुलोचना नसतात हे लक्षात ठेव.“

त्या दिवशी भाऊने आईला अक्षरश: साष्टांग नमस्कार घातला आणि तो मुकाटपणे निघून गेला. आज मी जेव्हा या घटनांचा दुसऱ्या बाजूने विचार करते तेव्हा मला आईचे हे शब्द आठवतात. बालमनावर असे मी म्हणणार नाही कारण त्यावेळी आम्ही अर्धवट वयात होतो.. आमच्यावर हेच रुजले होते की वासंती म्हणजे भांडकुदळ, बेलाभांड, शिवराळ, घरभेदी स्त्री. प्रथम दर्शनी तिच्या सौंदर्याने प्रभावित झालेल्या आम्हाला नंतरच्या भागात मात्र ती परीकथेतील कुरूप, दुष्ट, चेटकीण भासायला लागली होती. आमच्या घरातला “वासंती” हा एक अत्यंत नकारात्मक घटक ठरला होता. जिने भाऊचं जीवन उध्वस्त केलं होतं.

पुष्कळ दिवस, महिने, वर्ष सरली. खूप बदल झाले. पपी, बाळू चतुर्भुज झाले. त्यांचे संसार मार्गाला लागले. आमच्या लाडक्या कुमुद आत्याचं निधन झालं. वासंतीचं अस्तित्व जरी ठिगळ लावल्यासारखं विसंगत होतं तरी तेही कायमस्वरूपी राहिलं. स्टेशन रोडवरचं त्यांचं घर रीडेव्हलपमेंटला गेलं आणि कालांतराने प्रत्येक भावाला स्वतंत्र दोन-तीन खोल्यांचे असे मोठे फ्लॅट्स मिळाले. वेगळं होण्याचं वासंतीचे एकेकाळचं स्वप्न अशा रीतीने पूर्ण झालं म्हणायला हरकत नाही. या व्यवहारात कुमुद आत्याच्या परिवाराची मात्र होरपळ झाली. ज्या जावयाने आप्पांवर शेकलेल्या गंभीर प्रकरणातून त्यांची सहीसलामत सुटका केली आणि आयुष्यभर पत्र्याचे छत असलेल्या माळ्यावर आनंदाने राहण्याचे पत्करले त्यांची मात्र घराच्या या व्यवहारात दखल घेतली गेली नाही हे गैर झाले. गुलाबमावशी आणि आप्पांचीही वाटणी झाली. बाळूने आणि बाळूच्या बायकोने मात्र डीमेन्शिया झालेल्या गुलाबमावशीला मरेपर्यंत सांभाळले.

वासंती बदलली की नाही माहीत नाही पण निवळली असं वाटायचं, पण तरीही वासंतीची “घरभेदी” प्रतिमा कुटुंबीयांच्या मनावरून पुसली जाणं जरा अशक्यच होतं. कुटुंबाचे तुकडे तिच्यामुळेच झाले हा दगडावरचा ठसा ठरला.

माझ्या लग्नानंतर मी माहेरी आले असताना वासंतीला भेटायला गेले होते. भाऊ घरात नव्हताच पण ती होती. वयान थकलेली जाणवत होती. तिच्या देहावरच्या लावण्यखुणा विझलेल्या दिसत होत्या. डोळ्याखालची काळी वर्तुळं त्यात भर घालत होती. तिला भेटायला जाण्याचं आणखी एक कारण म्हणजे किरण, संजय, अमिता. आम्हा सर्वांनाच त्यांच्याविषयी उपजत ओढा होता. अखेर ती आमची भावंडच होती ना !
माझं पहिलं लक्ष गेलं ते वासंतीच्या दारात रेखलेल्या सुरेख रांगोळीवर. रांगोळी.. छोटीशीच पण कलात्मक. दारावर तोरण होतं. वसंतीने माझं अगदी प्रेमाने स्वागत केलं. तिने स्वतःच्या हाताने उत्कृष्ट स्वयंपाक माझ्यासाठी रांधला होता. तिच्या हातच्या साध्या वरण-भातालाही काय स्वाद होता ! मी तिला तसं म्हटल्यावर तिचे डोळे पाणावले. म्हणाली, ”तुझ्या पप्पांना मी केलेला प्रत्येक पदार्थ आवडायचा आणि ते तोंडभरून कौतुक करायचे.”
मी काही बोलले नाही पण मला एक सहज आठवलं. त्यावेळी पप्पा वासंतीचे कौतुक करत असताना गुलाब मावशी एकदा म्हणाली होती, ”चांगलं न व्हायला काय झालय ? तेल बघा केवढं घातलंंय !” असो !
आता तो साराच भूतकाळ होता.

वासंतीकडून परतताना तिने माझी ओटी भरली. तिने स्वतः गुंफलेला मोगर्‍याचा गजरा माझ्या केसात माळला आणि म्हणाली, ”अशीच येत जा बरं का ! पुढच्यावेळेस जावईबापूंना घेऊन ये.” आज हे सारं तुम्हाला सांगताना, लिहिताना माझे डोळे भरून आलेत. अनेक घटनांची प्रतिबिंबे त्या पाण्यात तरळत आहेत. आयुष्याचे इतके टप्पे ओलांडल्यानंतर, नानाविध अनुभव घेतल्यानंतर, अनेक व्यक्तींचे स्वभाव, जीवनं जवळून, लांबून पाहिल्यानंतर मनाच्या पातळीवर परिपक्व झाल्यानंतर एकच वाटतं आपण कुणाही बद्दल पटकन इतके निर्णयात्मक का होतो…?
का नाही थांबत ? का नाही वाट पहात ?
अलिप्तपणे का विचार करू शकत नाही…?
क्रमशः

राधिका भांडारकर

— लेखिका : राधिका भांडारकर. पुणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४