“परिवर्तन”
ठाण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मागच्या गल्लीतल्या गांगल बिल्डिंग मधल्या वन रूम किचन ब्लॉक मध्ये ताईच्या संसाराची घडी हळूहळू बसत होती. अनेक नकारात्मक बाजूंना आकार देत स्थिरावत होती. ताईचे मोठे दीर प्रकाशदादा आणि नणंद छाया नोकरीच्या निमित्ताने ताई -अरुणच्या घरी रहात असत. काही दिवसांनी ताईची धाकटी नणंद अभ्यासाच्या दृष्टीने चांगले म्हणून त्यांच्या सोबत रहायला आली. ताई -अरुणने सर्वांना ममतेने, कर्तव्य बुद्धीने आणि आपुलकीने सामावून घेतले. ताईचे सासू-सासरे मात्र सासऱ्यांच्या निवृत्तीनंतर लोणावळ्यात राहायला गेले होते तिथे त्यांनी एक बंगला खरेदी केला होता. एकंदर सगळे ठीक होते.
विशेष श्रेणीत कला शाखेत एमए झालेली हुशार ताई “रांधा, वाढा, उष्टी काढा यात अडकलेली पाहून माझं मन मात्र अनेक वेळा कळवळायचं. चौकटीत बंदिस्त असलेल्या गुणवंत स्त्रियांच्या बाबतीत मी तेव्हापासूनच वेगळे विचार नेहमीच करायचे मात्र त्यावेळी माझे विचार, माझी मतं अधिकारवाणीने मांडण्याची कुवत माझ्याकडे नव्हती. मी आपली आतल्या आत धुमसायची पण ताईचं बरं चाललं होतं.
बाळ तुषारच्या बाललीला अनुभवण्यात आणि त्याचं संगोपन करण्यात ताई अरुण मनस्वी गुंतले होते पण जीवन म्हणजे ऊन सावल्यांचा खेळ. तुषार अवघा दहा महिन्याचा होता.
एके रात्री ऑफिसच्या पार्टीला जाण्याची तयारी करत असताना अरुणच्या पोटात अचानक तीव्र कळा येऊ लागल्या. सुरुवातीला ताईने घरगुती उपचार केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही तेव्हा तिने दादाला (मोठे दीर) फोन करून सर्व हकीकत सांगितली आणि ताबडतोब घरी यायला विनविले. दादांनी तात्काळ ऑफिसच्या गाडीतून अरुणला फॅमिली डॉक्टर अलमेडा यांच्याकडे नेले. त्यांनी तात्पुरते बॅराल्गनचे इंजेक्शन देऊन घरी पाठवले पण दुखणे थांबले नाही उलट ते वाढतच होते. अरुणचे मेव्हणे, ठाण्यातले प्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर मोकाशी यांनी “हे दुखणे साधे नसल्याचे” सुचित केले व त्वरित ठाण्यात नव्यानेच सुरू झालेल्या शल्यचिकित्सक डॉक्टर भानुशालींच्या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये अरुणला दाखल केले. अरुणला “पँक्रीयाटाइटिस”चा तीव्र झटका आलेला होता. अंतर्गत रक्तस्त्राव होत होता. १९६८साल होते ते. आजच्या इतकं शल्यचिकित्सेचं विज्ञान प्रगत नव्हतं. डॉक्टरांनी ताईला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं.” पेशंटची स्थिती नाजूक आहे. डॉक्टरांच्या हाताबाहेरचे आहे कारण या व्याधीवर लागणारे Trysilol हे औषध भारतात उपलब्ध नाही. तेव्हा आता फक्त भरवसा ईश्वराचाच. काही चमत्कार झाला तरच…”
ताई इतकी कशी धीराची ! ती पटकन म्हणाली, ”डाॅक्टर ! तो मला असे सोडून जाऊ शकत नाही. चमत्कार होईल. माझी श्रद्धा आहे. मी तुम्हाला हे औषध २४ तासात मिळवून देईन.“
त्यावेळी अरुण लंडनच्या B O A C या एअरलाइन्समध्ये इंजिनीयर होता. (आताची ब्रिटिश एअरलाइन्स). ताईने ताबडतोब सर्व दुःख बाजूला ठेवून प्रचंड मन:शक्तीने पुढचे व्यवहार पार पाडले. अरुणच्या मुंबईतल्या ऑफिस स्टाफच्या मदतीने तिने सिंगापूरहून ट्रायसिलाॅल हे औषध इंजेक्शनच्या रूपात डॉक्टरांना २४ तासात उपलब्ध करून दिले आणि अरुणची हाताबाहेर गेलेली केस आटोक्यात येण्याचा विश्वास आणि आशा निर्माण झाली. डॉक्टर भानुशाली यांनी लगेचच ट्रीटमेंट सुरू केली. अरुणने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. आता त्याने धोक्याची रेषा ओलांडली होती. अरुणचे आई-वडील, भाऊ, बहिणी, इतर नातेवाईक सारे धावत आले. ताई सोबत आम्ही होतोच. याही सर्वांचा ताईला मानसिक आधार मिळावा हीच अपेक्षा असणार ना? पण ताईच्या जीवनातल्या एका वेगळ्याच कृष्णकाळ्या अंकाला इथून सुरुवात झाली.
पुन्हा एकदा मनात खदखदणाऱ्या घटनांचा प्रवाह उसळला. जातीबाहेरचे, विरोधातले लग्न, आचार विचारांतली दरी, पुन्हा एकदा पट्टेकरी बुवा विचारधाराही उसळली. वास्तविक आमचं कुटुंब सोडलं तर आमच्या आजूबाजूचे सारेच या पट्टेकर बुवांच्या अधीन झालेले. तसे पट्टेकर बुवा पप्पांशी, माझ्या आजीशी भेटल्यावर आदराने बोलत पण कुणाच्या मनातलं कसं कळणार? पट्टेकरांना पप्पांच्या बुद्धिवादी विचारांवर कुरघोडी करण्याची जणू काही संधीच मिळाली असावी. सर्वप्रथम त्यांनी अरुणच्या परिवारास “ढग्यांची आजी ही करणी कवटाळ बाई आहे” असे पटवून दिले. परिणामी आमच्या कुटुंबास हॉस्पिटलमध्ये अरुणला भेटायला येण्यापासून रोखले गेले. हाच “बुवामेड” कायदा मुल्हेरकरांनी ताईलाही लावला.

अरुण त्याच्या आईला विचारायचा, “अरु कुठे आहे ? ती का आली नाही”. अरुणची आई उडवाउडवीची उत्तरे द्यायची. पप्पा ऑफिसातून जाता येता हाॅस्पीटलमध्ये जात. अरुणच्या रूममध्ये बाहेरूनच डोकायचे. अरुण अत्यंत क्षीण, विविध नळ्यांनी वेढलेला, रंगहीन, चैतन्य हरपलेला असा होता. तो हातानेच पपांना आत येण्यासाठी खुणा करायचा. खरं म्हणजे पप्पा बलवान होते. ते या सगळ्यांचा अवरोध नक्कीच करू शकत होते पण प्राप्त परिस्थिती, हॉस्पिटलचे नियम, शांतता अधिक महत्त्वाची होती. ते फक्त डॉक्टर भानुशालींना भेटत व अरुणच्या प्रकृतीचा रोजचा अहवाल समजून घ्यायचे. डॉक्टरांनाही या मुल्हेरकरी वर्तणुकीचा राग यायचा पण पप्पा त्यांना म्हणत, ”ते सर्व जाऊद्या! तुम्ही तुमचे उपाय चालू ठेवा. पैशाचा विचार करू नका.”
अत्यंत वाईट, दाहक मनस्थितीतून आमचं कुटुंब चालले होते. बाकी सगळे मनातले दूर करून आम्ही फक्त अरुण बरा व्हावा” म्हणूनच प्रार्थना करत होतो ज्या आजीनं आम्हाला कायम मायेचं पांघरूण पांघरलं तीच आजी नातीच्या बाबतीत कशी काय “करणी कवटाळ” असू शकते. काळजाच्या चिंध्या झाल्या होत्या. ओठात केवळ संस्कारांमुळे अपशब्द अडकून बसले होते.
आजारी अरुणला ताईने भेटायचेही नाही हा तिच्यावर होणारा अन्याय, एक प्रकारचा मानसिक अत्याचार ती कसा सहन करू शकेल ? ती तिच्याच घरी याच साऱ्या माणसांसोबत त्यांची उष्टी खरकटी काढत लहानग्या तुषारला सांभाळत मनात काय विचार करत असेल ? एक दिवस डोक्यात निश्चित विचार घेऊन मीच ताईच्या घरी गेले आणि उंबरठ्यातच ताईला म्हणाले, ”बस झालं आता ! बॅग भर, तुषारला घे आणि चल आपल्या घरी.”
ताईचे सासरे जेवत होते. ते जेवण टाकून उठले. त्यांनी माझ्या हातून तुषारला घेण्याचा प्रयत्न केला मात्र माझ्या मोठ्या डोळ्यांनी त्यावेळी मला साथ दिली. ते घराबाहेर गेले. ताईने मला घट्ट मिठी मारली आणि ती हमसाहमशी रडली. मी तिला रडू दिले. एक लोंढा वाहू दिला. शांत झाल्यावर तिला म्हटले, ”चल आता. सगळं ठीक होईल. बघूया.”
ताई आणि तुषारला घेऊन मी घरी आले. हा संपूर्ण निर्णय माझा होता आणि आमचं संपूर्ण कुटुंब त्यानंतर ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभं होतं !
दोन अडीच महिन्यांनी अरुणला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला. तिथून त्याला त्याच्या ठाण्यातल्याच मावशीकडे नेलं. त्यानंतर एक दोनदा ताईने मावशीच्या घरी जाऊन अरुणची विरोधी वातावरणातही भेट घेतली होती. नंतर अरुणच्या परिवाराने अरुणला लोणावळ्याला घेऊन जाण्याचे ठरवले. त्यावेळी अरुणने “तूही लोणावळ्याला यावेस” असे ताईला सुचवले पण ताईने स्पष्ट नकार दिला. म्हणाली, ”आपण आपल्याच घरी जाऊ. मी तुझी संपूर्ण काळजी घेईन याची खात्री बाळग” नाईलाजाने तिने तो हॉस्पिटलमध्ये असताना काय काय घडले याची हकीकत सांगितली आणि या कुटुंबीयांवरचा तिचा विश्वास ढळल्याचेही सांगितले. अरुणने ऐकून घेतले पण तरीही लोणावळ्याला जाण्याचा बेत कायम राहिला. समस्त कुटुंब लोणावळ्याला रवाना झाल्यावर ताईने एक दिवस गांगल बिल्डिंग मधल्या तिच्या घरी जाऊन घर आवरून त्यास कुलूप घातले आणि ती कायमची आमच्या घरी राहायला आली. ताईच्या वैवाहिक जीवनातल्या कष्टप्रद अध्यायाने आणखी एक निराळे वळण घेतले.
एक दिवस अरुणचे पत्र आले. अरुणच्या पत्राने ताई अतिशय आनंदित झाली. तिने पत्र फोडले आणि क्षणात तिचा हर्ष मावळला. अरुणने पत्रात लिहिले होते, ”तुझे माझे नाते सरले असेच समज..”
पत्रात मायना नव्हता. खाली केलेल्या सहीत निर्जीवपणा, कोरडेपणा होता. “सखी सरले आपले नाते” या गीत रामायणातल्या ओळीच जणू काही हृदयात थरथरल्या पण या वेळेस ताई खंबीर होती. ती अजिबात कोलमडली नाही, ढासळली नाही, मोडली पण वाकली नाही. तिने डोळे पुसले, ढळणारे मन आवरले आणि जीवनातलं कठिणातलं कठीण पाऊल उचलण्याचा तिने निर्धार केला.
संकटं परवानगी घेऊन घरात शिरत नाहीत पण ती आली ना की त्यांच्या सोबतीनं राहून त्यांना टक्कर देण्यासाठी मानसिक बळ वाढवावं लागतं.
शिवाय यात ताईचा दोषच काय होता? खरं म्हणजे तिचा स्वाभिमान दुखावला होता. तिच्या अत्यंत मायेच्या माणसांना अपमानित केलेलं होतं. त्यांच्या भावनांना, वैचारिकतेला पायदळी तुडवलेलं होतं. NOW OR NEVER च्या रेषेवर ताई उभी होती आणि ती अजिबात डळमळलेली नव्हती. नातं खरं असेल तर तुटणार नाही आणि तुटलं तर ते नातच नव्हतं या विचारापाशी येऊन ती थांबली. आयुष्याच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी जणू तिने शूर सैनिकाचं बळ गोळा केलं आणि या तिच्या लढाईत आमचं कुटुंब तिच्या मागे भक्कमपणे उभं होतं. पिळलेल्या मनातही सकारात्मक उर्जा होती. काही काळ जावा लागला पण अखेर हा संग्राम संपण्याची चाहूल लागली. या साऱ्या घटनांच्या दरम्यान प्रकाश दादाने (ताईच्या दिराने) अनेकदा सामंजस्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला. हे त्यांनी अगदी मनापासून केले. त्याच्या कुटुंबीयांनी ताईच्या बाबतीत किती चुका केल्या आहेत याची जाणीव ठेवून केले पण तरीही ताईने माघार घेतली नाही. तिच्या स्त्रीत्वाचा, मातृत्वाचा, अस्तित्वाचा, स्वयंप्रेरणेचा स्त्रोत तिला विझू द्यायचा नव्हता. प्रचंड मानसिक ताकदीने ती स्थिर राहिली.
एक दिवस अरुण स्वत: आमच्या घरी आला. त्याचे ते एकेकाळचे राजबिंडे, राजस रूप पार लयाला गेले होते. दुखण्याने त्याला पार पोखरून टाकलं होतं. त्याच्या या स्थितीला फक्त एक शारीरिक व्याधी इतकंच कारण नव्हतं तर विकृत वृत्तींच्या कड्यांमध्ये त्याचं जीवन अडकलं होतं त्यामुळे त्याची अशी स्थिती झाली होती. जीजीने त्याला प्रेमाने जवळ घेतले. त्याचे मुके घेतले. अरुणने जवळच उभ्या असलेल्या ताईला म्हटले, “अरु झालं गेलं विसरूया. आपण नव्याने पुन्हा सुरुवात करूया. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.” ताईने त्याला घट्ट आलिंगन दिले. त्या एका मिठीत त्यांच्या आयुष्यातले सगळे कडु विरघळून गेले.
इतके दिवस ठाण मांडून बसलेली आमच्या घरातली अमावस्या अखेर संपली आणि प्रेमाची पौर्णिमा पुन्हा एकदा अवतरली. त्यानंतर माझ्या मनात सहज आले, अरुण फक्त घरी आला होता. तो जुळवायला की भांडायला हे ठरायचं होतं. त्याआधीच जिजी कशी काय इतकी हळवी झाली ? मी जेव्हा नंतर जिजीला हे विचारलं तेव्हा ती म्हणाली, “भांडायला येणारा माणूस तेव्हाच कळतो. अरुणच्या चेहऱ्यावर ते भावच नव्हते. ”माणसं ओळखण्यात जिजी नेहमीच तरबेज होती. “फरगेट अँड फरगिव्ह” हेच आमच्या कुटुंबाचं ब्रीदवाक्य होतं. शिवाय जीजी नेहमी म्हणायची, ”सत्याचा वाली परमेश्वर असतो. एक ना एक दिवस सत्याचा विजय होतो.”
त्यानंतर ताई आणि अरुणचा संसार अत्यंत सुखाने सुरू झाला. वाटेत अनेक खाचखळगे, काळज्या होत्याच. अजून काट्यांचीच बिछायत होती पण आता ती दोघं आणि त्यांच्यातलं घट्ट प्रेम या सर्वांवर मात करण्यासाठी समर्थ होतं. बिघडलेली सगळी नाती कालांतराने आपोआपच सुधारत गेली इतकी की भूतकाळात असं काही घडलं होतं याची आठवणही मागे राहिली नाही. ढगे आणि मुल्हेरकर कुटुंबाचा स्नेह त्यानंतर कधीही तुटला नाही. सगळे गैरसमज दूर झाले आणि प्रेमाची नाती जुळली गेली कायमस्वरुपी. ही केवळ कृष्णकृपा.
आज जेव्हा मी या सर्व भूतकाळातल्या वेदनादायी घटना आठवते तेव्हा वाटतं युद्धे काय फक्त भौगोलिक असतात का ? भौगोलिक युद्धात फक्त हार किंवा जीत असते पण मानसिक, कौटुंबिक अथवा सामाजिक युद्धात केवळ हार -जीत नसते तर एक परिवर्तन असते आणि परिवर्तन म्हणजे नव्या समाजाचा पाया असतो. यात साऱ्या नकारात्मक विरोधी रेषांचे विलनीकरण झालेले असते आणि जागेपणातली किंवा जागृत झालेली ही मने शुचिर्भूत असतात याचा सुंदर अनुभव आम्ही घेतला. तेव्हाही आणि त्यानंतरच्या काळातही. खरं म्हणजे आम्हाला कुणालाच ताईचं आणि अरुणचं नातं तुटावं असं वाटत नव्हतं पण ते रडतखडत, लाचारीने, कृतीशून्य असमर्थतेत, खोट्या समाधानात टिकावं असंही वाटत नव्हतं. कुठलाही अवास्तव अहंकार नसला तरी “स्वाभिमान हा महत्त्वाचा” हेच सूत्र त्यामागे होतं त्यामुळे त्यादिवशी समारंभात भेटलेल्या माझ्या बालमैत्रिणीने विचारलेल्या, ”इतक्या खोलवर झालेले घावही बुझू शकतात का ?” या प्रश्नाला मी उत्तर दिले, “हो !” तुमची पायाभूत मनोधारणा चांगली असेल तर खड्डे बुझतात नव्हे ते बुझवावे लागतात.”
क्रमश:

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800