Saturday, July 12, 2025
Homeलेखमाझी जडणघडण : ५६

माझी जडणघडण : ५६

“बकेट लिस्ट”

“सेटलमेंट किंवा आयुष्यात स्थिरावणं” याचा विचार नव्या पिढीतले युवक युवती किती गांभीर्याने आणि सखोलपणे करतात ! काही वर्षांपूर्वी मी माझ्या लेकीला म्हटले होते; म्हणण्यापेक्षा विचारले होते, जेव्हा तिचे लग्न होऊन दोन-तीन वर्ष झाली होती की, “तुम्ही मूल होण्याविषयी काही विचार करत आहात की नाही ?” तेव्हा ती झटकन म्हणाली होती, ”अगं,अजून वेळ आहे. अजून आम्ही नीट सेटल नाही झालोय. थोडं स्थिरस्थावर होऊ दे. आमच्या जॉब विषयीही आम्हाला अजून निर्णय घ्यायचेत वगैरे वगैरे …”

“सेटल नाही झालो अजून” या अंतर्गत मुलांचे अनेक विचार असतात. बँक बॅलन्स, मनासारखी नोकरी किंवा परदेशी जाऊन अधिक पैसे मिळवण्याची योजना,“ड्रीम हाऊस” खरेदी करणे. एकंदरच आयुष्याचा रेखीव शाश्वत आराखडा केल्यानंतरच मुलांना जन्म देण्याचा विचार येतो. या संपूर्ण सद्यस्थितीतल्या तरुण मुलांच्या पार्श्वभूमीवर मी जेव्हा मागे वळून याच वयात असतानाचे “आम्ही दोघं” पुन्हा पाहते तेव्हा मला प्रचंड आश्चर्य वाटतं. “आधी लगीन कोंढाण्याचे” या टॅगलाईन प्रमाणे आजची पिढी आधी आयुष्यात सेटल व्हायचे मग पुढचे.. असाच विचार करते.
ते योग्य की अयोग्य, शहाणपणा की वैचारिक अतिरेकीपणा हे मला माहीत नाही. या प्रश्नांविषयी मी ठामपणे माझे मत मांडू शकत नाही. “पाण्यात पडले की आपोआप पोहोता येते” या संस्कारातून कदाचित आमची जडणघडण झाली असावी. हात पाय कसे मारायचे त्याचं शास्त्रोक्त तंत्र आम्हाला अवगत नव्हतं तरी आम्ही पोहोत होतो. नाकातोंडात पाणी जाऊनही बुडलो मात्र नाही याचंच अप्रूप होतं.

विलासचा स्टार्टअप, माझी बिन पगारी, कधीही सोडावी लागणारी डळमळीत नोकरी, स्वतःचं आयुष्य स्वतः घडवण्याची प्रतिज्ञा आणि भाड्याच्या घरातली सहजीवनाची सुरुवात, चार रिकाम्या भींती, हातगाडीवरून आणलेलं अगदीच प्राथमिक स्वरूपाचं मोजकच सामान आणि झिरो बँक बॅलन्स पण प्रचंड आत्मविश्वास आणि “साथी हाथ बढाना” यामुळे जीवनाच्या भिंतींवर खरोखरच बहारदार रंग आपोआपच चढत गेले.

खरं म्हणजे आयुष्याच्या अत्यंत अनोळखी टप्प्यावर आम्ही होतो. मागच्या पिढीतल्या तीर्थरूप मंडळींच्या सहजीवनाची पाहिलेली चित्रं, अनुभव, त्यांचं जगणं, त्यांनी आखलेल्या दिशा आणि मार्ग ही केवळ शिदोरी होती. भांडवल होतं म्हणूया. पण जाणीवा प्रगल्भ झाल्यानंतरच आपोआपच त्यांनी आखून दिलेल्या रस्त्यांवरच्या आदर्शपणा बरोबरच अपुरेपण, त्रुटी यांचाही विचार मनामध्ये अधिक आव्हाने घेऊन येत होता. पण या साऱ्यात नक्कीच खूपच गंमत होती. एक निराळंच थ्रिलिंग होतं. “आपल्याकडे काहीच नाही” ही भावना नेहमीच निराशाजनक नसते तर ती आपल्याला नकळत अधिक उद्युक्त आणि कार्यक्षम बनवते.

ब्रुक बाॅन्ड कॉलनीतल्या “तीन ब” बिल्डिंग मधल्या वरच्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये आम्ही राहत होतो आणि खाली शरद, पद्मजा पिंगे त्यांच्या मनीष आणि मोनिका या अत्यंत गोड, लहान मुलांसमवेत राहत होते. पद्मजा तत्पर गृहिणी आणि शरद हे हेस्ट या जर्मन औषधी कंपनीचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होते. जळगावला आल्याबरोबर पहिली जर आमची कुणाशी घट्ट मैत्री झाली असेल तर ती या चौकोनी गोजीरवाण्या कुटुंबाशी. नकळतच घर, संसार याबाबतच्या अनेक उपयुक्त टिपा मला पद्मजाकडून मिळाल्या. तसे आम्ही एकाच पिढीतले, एकाच वयाचे होतो पण त्यांचे लग्न लवकर झाल्यामुळे ते वैवाहिक जीवनातले अनुभवी. फरक इतकाच होता की त्यांचा प्रेमविवाह होता आणि आमचं ठरवून झालेलं लग्न होतं. लग्न प्रकारातला हा फरक हे पती-पत्नीचं नातं घडवण्यात नक्कीच महत्त्वाचा ठरतो. शरद आणि पद्मजाचं नातं आधीच मुरलेलं होतं. आमचा मात्र टीदींग पिरेड होता. त्यामुळे आमच्या नात्याची वीण जमवण्यात शरद आणि पद्मजाचा नक्कीच महत्त्वाचा सहभाग होता.

शरदकडे कंपनीकडून आलेले मोठमोठे लाकडी पॅकिंग बॉक्स असत. त्यात आलेली औषधे काढून त्या रिकाम्या बॉक्सेसची शरद वासलात लावत असे. एक दिवस विलासने शरदला विचारले, “यातले काही बॉक्सेस मला देशील का?” ते बॉक्सेस रफ असले तरी रुंद आणि लाकडाचे आणि तसे मजबूत होते. शरदला काहीच प्रॉब्लेम नव्हता. असेही ते बॉक्सेस ठेवणे त्याच्यासाठी अडचणीचेच होते. विलास आर्किटेक्ट असल्यामुळे त्याने काही भन्नाट कल्पना आमचं घर सजवण्यासाठी वापरल्या. सारख्या लांबी रुंदीचे ते लाकडी बॉक्स त्यांनी असे रचले की चक्क छानसा डबल बेड तयार झाला. त्यावर आम्ही गादी टाकली आणि वरून छान चादर घालून ते बॉक्स झाकले. शिवाय तशाच बॉक्सेसचा उपयोग करून हॉलमध्ये सेंटर टेबल पासून छान बैठक विलासने तयार केली. लगेच कोपऱ्यातील एका सजवलेल्या बॉक्सवर मी फुलदाणी ठेवली आणि त्यात भरण्यासाठी लागणारी सुंदर फुलं मला शेजारच्या पूनम मानधनेनी आणून दिली. ही माझी ब्रुक बॉन्ड कॉलनीतली अत्यंत जवळची, हुशार प्राध्यापक सखी, जिच्याशी माझी आजही तितकीच घट्ट मैत्री आहे. तिच्याविषयी जितकं लिहावं तितकं थोडंच आहे. नक्की लिहीन कधीतरी.

पिंगे दांपत्याशी घनदाट दोस्ती होण्याचं आणखी एक कारण म्हणजे, पद्मजा मुंबईची सीकेपी आणि शरद कोकणातला. दोघंही मत्स्याहारी. ही खाद्यसंस्कृती फारच जुळली. पांडे मावशी (ज्यांच्यामुळे आम्हाला एक सुंदर घर मिळालं) तर अगदी पहाटे आमचं दार वाजवायच्या. ते दोघं (मिस्टर अँड मिसेस पांडे) भल्या पहाटे लांबलचक प्रभात फेरी मारून यायचे. पांडे काका घरी जायचे आणि पांडेमावशी आमच्याकडे. “ तुला काही हवंय का? काहीही लागलं तर विनासंकोच सांग” म्हणायच्या. कधी त्यांच्या लिंबाच्या झाडाला आलेले लिंबू, मोगरा, अबोलीची फुलं घेऊन यायच्या तर कधी,”उद्या पाणी येणार नाही बरं का! टाकी भरली जाणार नाही. जरुरीपुरतं पाणी साठवून ठेव“ असं काळजीने सांगायच्या. कधी घरी केलेले उडदाचे पापड, चिवडा डब्यात घेऊन यायच्या. मी चौदा वर्ष कॉलनीत राहिले आणि त्यांनी सदैव माझ्यावर माया केली. काय नातं होतं आमचं ? नाती काय रक्ताचीच असावी लागतात का ? ही अशी अनेक ऋणानुबंधांची नाती म्हणजे आयुष्याचा एक मोठा ठेवा असतो !

त्यावेळी मोबाईल्स नव्हते नाहीतर आमच्या घरातील या कल्पक सजावटीचे फोटो नसते का काढले ? आज आपण प्रत्येक आनंदाचा क्षण मोबाईल मध्ये तात्काळ बंदिस्त करतो पण या तंत्रज्ञानाच्या अभावाने आमच्या आयुष्यातल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण क्षणांची फक्त मनात उमटलेली छायाचित्रंच उरली आहेत.

अद्ययावत वेलफर्निश्ड घरात, माझ्या आवडत्या खिडकीत, भुरभुरणारा पाऊस निरखत हे सारं लिहिताना मला आठवतोय तो माझा कोवळ्या कळीतला संसार. लहानशीच बकेट लिस्ट. थोडे थोडे पैसे मिळाले की ती लिस्ट पूर्ण करायची धडपड आणि त्यातला आनंद. एकीकडे नोकरीचा राजीनामा द्यावा लागल्याची खंत तर दुसरीकडे वेलीवर उमलणाऱ्या फुलाच्या चाहुलीचा आनंद. खरोखरच,
। दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे ।।
आनंद, हुरहूर, उत्सुकता आणि काहीशी धडधड बाकी काही म्हणजे काही नाही..
क्रमशः

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. काडी,काडी, जमवून बांधलेलं घरटं , सिमेंट कॉक्रीट ला टक्कर देऊ शकतं,हे “जावे त्यांच्या वंशा, तेव्हा कळे’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments