“पालकत्वाची परीक्षा”
त्या दिवशी संध्याकाळी फोनवर बोलता बोलता मयुरा म्हणाली, ”सानवीला न थोडा ताप आलाय.”
त्यावर मी तात्काळ आणि अत्यंत काळजीने तिला विचारले, “डॉक्टर कडे घेऊन जा तिला. अजून पर्यंत का नाही नेलंस ?”
त्यावर ती म्हणाली, “अगं ! मम्मी लो फीवर आहे. डॉक्टर लगेच तर काय तिला औषध देणारच नाही. तीन दिवसाने बघेन. नाहीच उतरला ताप तर घेऊन जाईन डॉक्टरकडे. इथे हीच पद्धत आहे. भारतात लगेच अँटिबायोटिक्स सुरू करतात. त्यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते आणि सध्या इथे “स्टमक फ्लू”ची साथच आहे. काही दिवसांनी आपोआपच इन्फेक्शन जातं. फार तर काही घरगुती उपाय करायचे. बाकी काही नाही.”
काळजी करण्यासारखं नसेलही काही. पण लांबलचक भौगोलिक अंतर कधी कधी काळजीला जन्म देते.
मयुरा शांत होती. अर्थात तिचा समंजस, शांतपणा, अजिबात न घाबरणं आणि पॅनिक न होणं हे नक्कीच प्रशंसनीय होतं. शिवाय ही आजकालची पिढी ! यांना गुगलवर कुठल्याही विषयावरची चटकन माहिती मिळते. अनंत शंकांचं प्राथमिक निरसन तरी गुगलमुळे नक्कीच होतं. अशी ही शास्त्रीय पद्धतीने, विकसित माध्यमाने ज्ञानी झालेली माझ्या मुलींची पिढी आणि आठ आठ मुलं वाढवणारी माझ्या सासूबाई, माझी आई यांची एक पिढी.
एक दिवस माझ्या सासूबाई मला म्हणाल्या होत्या, ”कशी वाढवली असतील आम्ही इतकी मुलं ? तेही एकत्र कुटुंबाच्या जंजाळात, अगं कोणींकोणी सतत आजारी असायचंच. मग निळू वैद्य नाहीतर कोपऱ्यावरचा डॉक्टर कोठारी ठरलेलाच. हिरवट काचेच्या चपट्या बाटलीवर चार किंवा पाच टक दाखवणारा कागद चिकटवलेला आणि बाटलीतलं गुलाबी, कडू, तुरट औषध. सकाळ संध्याकाळ त्या टकप्रमाणे घेतलं की दुखणं गायब.
आमची आई सुद्धा आम्ही आजारी झालो की पालिका हॉस्पिटलच्या डॉ. कोटस्थाने कडे घेऊन जायची. गळ्यात लोंबकळणारा स्टेथोस्कोप, शर्ट पँट आणि ऐटदार टाय. पण बोलणं कमी त्यातून अत्यंत हळू, कान देऊन ऐकावं लागायचं. “लांब श्वास घ्या, सोडा, जीभ दाखवा, उपडे व्हा” वगैरे झाल्यानंतर तशीच चपटी बाटली, त्यातलं गुलबट पांढरं औषध आणि बाटलीवर चिकटवलेली ती डोस निर्देशित कागदाची कातरलेली पट्टी ! अगदीच बदल असेल तर कधी कधी पुड्या बांधून पांढऱ्या रंगाची पावडरही दिलेली असायची. पण तेवढ्याने व्याधी गायब व्हायचीच.
दोन पिढींच्या मधली आमची पिढी. पालकत्वाचं काही ज्ञान मागच्या पिढीकडून नक्कीच झिरपलेलं होतं पण पालकत्व या विषयावरचा जाणीवपूर्वक, जागरूकतेचा एक आवश्यक दृष्टिकोन आमच्या पिढीपासून विकसित होत होता. त्यात “आम्ही दोघे आमची दोन” ही गोजिरवाणी चौकटही प्रचलित होत होती आणि मुलांच्या बाबतीत मागच्यांनी, (पण त्यांना न वाटणार्या) केलेल्या चुकाही जाणवू लागल्या होत्या आणि आपल्या मुलांच्या बाबतीत हे घडू द्यायचं नाही हा एक निर्धार पालकत्व निभावताना त्या वाटेवर सतत होता.
डोळ्यात तेल घालून मुलांना वाढवायचं, सर्वस्व पणाला लावायचं, आदर्श आईबाप होण्याच्या वाटेवरचे सगळे टप्पे त्यांच्या समृद्ध भविष्यासाठी डोळसपणे ओलांडायचे. मागच्या पिढीपेक्षा या मधल्या पिढीचे आर्थिक बळ काहीसे वरचढ होते. स्रियाही मिळवत्या झाल्या होत्या.
ज्योतिका तीनच महिन्याची होती. ज्योतिका म्हणजे माझं आणि विलासचं एक अत्यंत गोंडस स्वप्न ! ती हसली, काहीतरी मजेदार मधुर आवाज तिच्या ओठातून उमटला, ती कुशीवर वळली, ती उपडी झाली.. तिच्या अनेक बारीक-सारीक हालचाली टिपताना आम्ही खरोखरच खूप हरखून जायचो. वास्तविक तिच्या जन्माने आम्ही फक्त आई-बाबा झालो होतो पण पालक व्हायला मात्र वेळ होता. याच दरम्यान एक दिवस रात्री ज्योतिका अचानक तापाने फणफणली. घरात आम्ही दोघेच कोणी वडीलधारी नाही. रात्रीची वेळ असल्यामुळे काॅलनीत अशा भलत्यावेळी कुणाला कसे उठवणार ? त्यावेळी मोबाईल काय फोन सुद्धा नव्हते. आम्ही दोघं रात्रभर ज्योतिकापाशी बसून होतो पहाट होण्याची वाट पाहत. सकाळ झाली की विलास, डॉ. केळकर यांना घेऊनच येणार होता.
डॉ. सुनंदा केळकर, विलास च्या चेहऱ्यावरची काळजी पाहून लगेच घरी आल्या. तो पर्यंत ज्योतिका मस्त गादीत खेळत होती, मजेदार आवाजही काढत होती. तापही पळाला होता, केळकर डॉक्टरांनी तिला झटकन उचललं आणि हातातल्या हातातच उंचावत म्हणाल्या,”किती हसरं खेळतं निरोगी बाळ आहे ! भांडारकर किती काळजी करता हो ? लहान मुलं आजारी पडतातच. इतकं नसतं घाबरायचं.”
डॉ. सुनंदा केळकर म्हणजे हसरं, स्वतःच्या वैद्यकीय ज्ञानाविषयी पूर्णपणे आत्मविश्वास असणारं, अभ्यासू, मृदू आणि कणखर बोलकं व्यक्तिमत्त्व त्यांच्या नुसत्या बोलण्यानेच माणसाचं अर्ध दुखणं पळून जायचं. पण या वेळेस जेव्हा त्या बोलत होत्या तेव्हा मनातल्या मनात मी मात्र म्हणाले, ”या घरी येईपर्यंत ज्योतिकाचा ताप उतरला म्हणून पण त्यापूर्वी आमच्या काळजाचा ठोका चुकला होता हे त्यांना कसं कळणार ?”
पण त्या दिवशी डॉक्टरांनी आम्हाला काही उपयुक्त टिप्स दिल्या. घरात नेमकी कुठली औषधं कायम असावीत, कधी कुठली द्यावीत आणि मूल जोपर्यंत खेळत असतं ना तोपर्यंत काळजी करू नये वगैरे वगैरे अगदी अनुभवी व्यक्तीच्या मायेने त्यांनी आम्हाला सांगितले. रात्री झोपताना बाळाने त्रास दिला तर खिडक्यांचे पडदे टाकून किंचित निळसर शांत प्रकाश असू द्यावा आणि कुठलंही छान हळुवार संगीत लावावं, अंगाई गीत गावं. मग माझ्याकडे वळून त्या म्हणाल्या, ”आईला गाता आलेच पाहिजे असा काही नियम नाही बरं का, आईच्या आवाजातलं कुठलंही लडीवाळ गीत बाळाच्या मनाला शांत ठेवतं, झोपवतं.” असं बरंच काही त्या सांगत होत्या. मातृत्वाची चाहूल लागताच आम्ही बाल संगोपनाची, गर्भ संस्कारांची बरीच पुस्तकं आणली होती, वाचलीसुद्धा पण खरा बाल संगोपनाचा पहिला धडा डॉ. केळकरांकडूनच मिळाला,”मुळीच घाबरायचं नाही.” आणि तेव्हा आणि त्यानंतरही हळूहळू जाणवत गेलं की मातृत्व- पितृत्व- पालकत्व या पुस्तकातून वाचण्याच्या संज्ञा नाहीतच तर त्या अनुभवण्याच्या बाबी आहेत. प्रत्येक मूल हे वेगळं असतं आणि त्या मुलाला वाढवताना कसलेही पुस्तकी निकष न लावता ते वाढताना बघणं, आणि त्या बघण्यातून त्या नव्याने घडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आई-बाबांना करून घ्यावी लागते आणि त्यानुसार आपल्यालाही घडावं लागतं.
मला अगदी आजही वाटतं आपण मुलांना घडवत असतोच पण एकाच वेळी मुलंही आपल्याला घडवत असतात आणि याचा अनुभव आनंदाने, गृहीतकांना सोडून तुम्ही घेतलात तरच तुम्ही चांगले पालकही बनू शकाल. मी आणि विलासने अगदी एकमताने तसेच वागायचे ठरवले. मात्र त्या क्षणी विलासच्या खांद्यावर रात्री तापाने फणफणलेली आणि आता बरी झालेली ज्योतिका शांत झोपली होती. मिटलेले डोळे, गालावरची पापण्यांची सावली, तिचा गोड, पौर्णिमेच्या चांदोबा सारखा गरगरीत गुलाबी रंगाचा चेहरा आणि दुमडलेला ओठ पाहून माझं उर इतकं भरून आलं होतं ! किती विश्वासाने हा निरागस, निष्पाप गोळा आमच्या खांद्यावर विसावला आहे ! तिच्या आयुष्यात आमच्यावरचा हा विश्वास कुठल्याही कृतीतून कधीही ढळू द्यायचा नाही हे आमच्या दोघांच्या जीवनातलं एक अधोरेखित ध्येय ठरलं.
आज हे लिहिताना आणि संसारात कर्तृत्व सिद्ध करून रमलेल्या माझ्या दोन्ही कन्यांना मला विचारावेसे वाटते, ”आम्ही चांगले आईबाबा झालो का ??”
आयुष्यात तुम्ही कितीही बक्षीसं मिळवा, कितीही ट्रॉफी जिंका पण खरी ट्रॉफी तीच असते जेव्हा आपली मुलं म्हणतात, “तुमच्यासारखे आई बाबा लाभले किती भाग्यवान आम्ही !” या इतकी, श्रेष्ठ ट्रॉफी जगात कुठलीही नाही.
क्रमशः

— लेखन : राधिका भांडारकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800