“देना बँक”
“आता नाही, तर कधीच नाही !” अशा एका गोंधळलेल्या निर्णय स्थानकावर मी अडकले होते. काय करावे कळत नव्हतं. खानदेशात बँक ऑफ इंडियाची शाखा नसल्यामुळे आणि भविष्यात कधीतरी होईल या आशेवर विसंबून न राहता आल्यामुळे मी तिथल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गर्भारपण, प्रसृती वगैरेत काही काळ गेला. तरीही संसार, मुलं -बाळं या व्यतिरिक्त काहीही न करता आयुष्याचा प्रवास चालू ठेवावा असे काही मला वाटत नव्हते. सर्वसामान्य आयुष्यात मी रमू शकत नव्हते हे निर्विवाद !
खरं म्हणजे याही दरम्यान मी नोकरीसाठी काही ठिकाणी सहज म्हणून अर्ज पाठवले होते. अचानक एक दिवस मला देना बँकेच्या मुलाखतीचं पत्र आलं. ते पाहून मी जितकी आनंदले होते तितकीच चिंतातुरही झाले होते. कारण समोर अनेक प्रश्न उभे ठाकले होते. ज्योतिका अवघी सहा महिन्यांची होती. विलासच्या व्यवसायाचा जम चांगल्या रीतीने बसत चालला होता. पण आम्हा दोघां व्यतिरिक्त तिसरं जबाबदार असं कोणी आमच्या घरात नव्हतं. ज्योतिकाच्या संगोपनाचा फार मोठा प्रश्न माझ्या नोकरीने उद्भवणार होता. आई म्हणून माझी पहिली जबाबदारी ज्योतिकाच होती पण इतकी सहजपणे आलेली संधी आयुष्यात पुढे मिळेलच याबद्दल नक्की कसे सांगावे ? मी अत्यंत द्विधा मनस्थितीत होते. त्यावेळी लहान मुलांसाठी आजच्यासारखी पाळणा घरेही नव्हती. शिवाय लहान मुलांना पाळणा घरांमध्ये ठेवून नोकरीवर जाण्याची तेव्हा पद्धतही नव्हती. ज्यांच्या घरात आजी-आजोबा आहेत किंवा एकत्र कुटुंबा मधल्या स्त्रीला हे काहीसं शक्य होत होतं. आमचं कुटुंब मोठं होतं पण कायमस्वरूपी आमच्या सोबत राहणे त्यापैकी कुणालाच शक्य नव्हते. फार तर अडीअडचणीच्या वेळेस मदतीला येण्यासाठी सारेच तयार होते. एक दिलासा मात्र होता मी पुन्हा नोकरी स्वीकारण्याचा विचार करत असताना मला कोणीही विरोध केला नाही किंवा माझ्या विचाराला जरी पुष्टी दिली नाही तरी मी “हे करणे किती अयोग्य किंवा अनावश्यक आहे” असे म्हणून कोणी माझं मनोधैर्यही खच्ची केलं नाही.
मी देना बँकेच्या मुलाखतीसाठी मुंबईला जायचे ठरवले होते .पण जर नोकरी मिळालीच तर ती स्वीकारायची की नाही याबद्दल मनात प्रचंड गोंधळ होता. ते काही दिवस अत्यंत विचित्र मानसिकतेत गेले. एक विचार मात्र पक्का होता की नेमणूक जर जळगावला मिळाली तरच नोकरी स्वीकारायची. माझ्या लहानग्या निरागस मुलीला; जिला माझ्या सहवासाची अत्यंत गरज होती, तिला सोडून घराबाहेर काही काळासाठी पडणे मला नक्की जमेल का याविषयी मी खूप साशंक आणि धास्तावलेली होते. त्यावेळी मला लग्नाआधीच्या माझ्या “नऊ आठ” च्या गाडीतील विवाहित मैत्रिणींचीही आठवण झाली. नोकरी दहा ते पाच असली तरी घरून निघण्यापासून ते घरी परतेपर्यंतचा काळ १२ ते १४ तासांचा सहज होत असे. म्हणजे जवळजवळ संपूर्ण दिवसच. त्यावेळी त्या माझ्या सख्यांच्या मनातली घालमेल जाणवली नव्हती. पण आज जेव्हा मी त्यांच्याच ठिकाणी मला पाहत होते तेव्हा मात्र मी पार भांबावून गेले होते. पण त्यातही एक आशेचा किरण असा दिसत होता की जळगावात नोकरी करण्यात माझ्या दिवसांच्या कितीतरी तासांची बचत नक्कीच होणार होती. नुसता वेळच नव्हे तर श्रम आणि त्यातून येणारा थकवाही, माझ्या ठाणे ते सीएसटी असा रोजचा प्रवास करणाऱ्या सख्यांपेक्षा नक्कीच कमी असणार होता. विचार करून मेंदूचा नुसता भुगा झाला होता. स्त्रियांसाठी वेगळ्या वाटेवर जाणं हे नेहमीच किती कठीण होतं याची मी झलक अनुभवत होते.
विलास मात्र माझ्याबरोबर सतत होता, ही फार मोठी जमेची बाजू होती. मुलाखतीच्या दिवशी तो माझ्याबरोबर आला होता. विलास आणि ज्योतिका ठाण्याला आईकडेच थांबले. मी मुंबईला बॅलार्ड पीअर्सच्या देना बँकेच्या मुख्य कार्यालयात मुलाखतीसाठी वेळेवर गेले. मुलाखत अगदीच अनौपचारिक होती. माझा पाच वर्षांचा बँकेतल्या नोकरीचा अनुभव हीच माझी मोठी गुणवत्ता ठरली होती. काही अगदी जुजबी प्रश्न विचारून झाल्यानंतर त्यांनी, ”तुम्हाला कुठे नेमणूक हवी ?” म्हणून विचारलं. मी अर्थातच त्यांना “जळगाव.” असेच सांगितले. मग शुभेच्छा, धन्यवाद वगैरे औपचारिकतेचे आदान- प्रदान झाले. मुलाखत संपवून मी ठाण्याला संध्याकाळी परतले. कधी एकदा ज्योतिकाला पाहते, तिला कडेवर घेते असं झालं होतं मला ! वास्तविक ज्योतिका जवळ विलास, माझी आई, जीजी, बहिणी सगळ्याच होत्या. काळजी करण्यासारखं काहीच नव्हतं पण आपल्या मुलापासूनचा वियोगाचा काळ किती धाकधुकीचा असू शकतो याची मी झलक अनुभवली.
मला नोकरी करायचीच होती ती माझ्या स्वतःसाठी. त्याबरोबर इतर अनेक “स्व”ही होते. स्वसुरक्षा, स्वबल, स्वतंत्र वर्तुळ, स्वावलंबन आणि त्याचबरोबर लग्नानंतर बदललेल्या परिस्थितीत मी हे सारं कसं काय करू शकेन, किंबहुना करू शकेन की नाही हे सारे प्रश्न मनाला वेढा घालून उभे होते. “मी बरोबर” की “मी चूक” हेही मला ठरवता येत नव्हते.
त्याचवेळी ब्रुक बाॅन्ड कॉलनीतील माझी सखी पूनम माझ्यासाठी खूप आदर्शवत ठरली. “मानुधने” यांचं मारवाडी कुटुंब हे जळगाव पासून काही किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या एरंडोल गावचं. तिथे त्यांचं एकत्र मोठं कुटुंब होतं. पूनम आणि तिचे पती शरद मानुधने हे व्यवसायासाठी जळगावला राहत होते. माझ्यात आणि तिच्यात हे एक समान सूत्र होतं. पूनम जळगावच्या “एम.जे” महाविद्यालयात प्राणीशास्त्र विषयाची प्राध्यापक होती. आम्ही दोघी एकाच वयाच्या. घर संसार, विस्तारित कुटुंबातील विविध नाती प्रेमाने आणि कर्तव्य बुद्धीने जीवापाड जपत प्राध्यापकीय जबाबदार पदही तितक्याच सक्षमतेने निभावणारी, संसारी आणि करीअरवाली अशी दुहेरी कणखर स्त्री मी पूनम मध्ये सदैव पाहिली आणि आपणही का नाही “घर आणि संसार” या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळू शकणार ? एक आतून आलेला आवाज मी ऐकला. “ही कसरत यशस्वी रीतीने पार करायचीच.”
काही दिवसांनी देना बँकेतून मला रितसर नेमणूक पत्र आले. नवी पेठ जळगाव या शाखेत माझी नियुक्ती झाली होती. पंधरा दिवसाच्या आत मला स्वीकारपत्र पाठवून नोकरीवर हजर व्हायचे होते.
३१ जानेवारी १९७६ रोजी देना बँक, नवी पेठ जळगाव इथे माझ्या आयुष्याचा एक अनोळखी टप्पा सुरू झाला, पण या प्रवासात मी एकटी नव्हते. विलासचे संपूर्ण आश्वासक सहकार्य मला मिळत होतं आणि आई, आबां सोबत (माझे सासु- सासरे) माझं संपूर्ण कुटुंब माझ्यासाठी केव्हाही कुठेही हजर असणार होतं. “भिऊ नको आम्ही आहोत पाठीशी“ हा दिलासा खूप महत्वाचा असतो. नोकरी करणारी एक संसारी स्त्री म्हणून माझ्यासाठी या नक्कीच जमेच्या बाजू होत्या.
क्रमशः

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800