Wednesday, August 6, 2025
Homeलेखमाझी जडणघडण : ६०

माझी जडणघडण : ६०

“पुन्हा नोकरी सुरू….”

देना बँकेत रुजू होण्याच्या काही दिवस आधी मी विलासला म्हटलं, ”सुरुवातीचे तरी काही दिवस आईंना आपण बोलवूया का ?” विलास ने थोडा विचार केला. नंतर म्हणाला, ”हरकत नाही. आई येईलही. पण मला काय वाटतं आपण अशी सवय नको लावायला. आपले प्रश्न आपणच सोडवावेत. आपल्या समस्यांचं ओझं कुणाच्या डोक्यावर टाकून असं निवांत राहणं योग्य होईल का ?”
विलासचं हे म्हणणं मलाही पटलं होतं. क्षणभरच माझ्या मनात विचार आला होता की, ”आई येतीलच अशी याला खात्री वाटत नसेल का आणि खरोखरच आईंना, कारण कुठलंही असो पण नाहीच जमलं यायला तर स्वाभाविकपणे आपल्यालाही थोडी नाराजी वाटूच शकली असती.” पण नंतर मलाही वाटलं आईंना तरी या ‘हो’ ‘नाही’ च्या पेचात आपण कशाला टाकायचं ? आणि खरोखरच शेतीचा पसारा, कुटुंबाचा व्याप, सगळ्यांचं ‘हवं नको’ बघण्यातून त्या तरी अजून कुठे निवृत्त झाल्या आहेत ? अशा परिस्थितीत आपण आपल्या सोयीसाठी विनाकारणच त्यांच्यावर हा मानसिक आणि नैतिक भार का म्हणून टाकायचा ? विलास म्हणतो तेच बरोबर आहे.

दरम्यान मला दिवसभराची एक चांगली मदतनीस मिळाली. ‘विमल’ तिचे नाव. आमच्या घरासमोरच पोलीस कॉलनी होती. विमलचे वडील पोलीस होते आणि ते त्या वसाहतीत राहत होते. विमल सातवी आठवी पर्यंत शिकलेली होती पण नंतर तिने शाळा सोडली होती. तिची आईच तिला माझ्याकडे काम मिळावं म्हणून घेऊन आली होती आणि विमलचीही काम करण्याची इच्छा होती. प्रथमदर्शनीच मला ‘विमल’ शांत, समंजस आणि कामसू वाटली. मी तिला मदतीसाठी योग्य तो पगार देऊन ठेवून घेतली. तिला बजावून सांगितले, ”आम्ही दोघेही घरात नसताना ज्योतिकाला व्यवस्थित सांभाळण्याचं महत्त्वाचं काम तुझं” ज्योतिकाच्या खाण्यापिण्याच्या, झोपेच्या वेळांचं एक पत्रकच मी तिला लिहून दिलं होतं. ज्योतिकासाठी भरपूर खेळणी आणली होती. कोणते खेळ तिच्याबरोबर कसे खेळायचे हे विमलला मी शिकवले. एकंदरच विमलला व्यवस्थित प्रशिक्षण दिल्यानंतरच मी बँकेत रुजू व्हायचं ठरवलं. शिवाय कॉलनीतल्या पांडे मावशी, पूनम मानुधने, अलका राणे (आम्ही एकाच शाळेतल्या विद्यार्थिनी.जग किती लहान असतं!), सुचूची आई, क्षमा वाठ या सगळ्यांचा मनापासून आधार होता. विलासचंही ऑफिस घरापासून फार दूर नव्हतं. तो त्याच्या साईट व्हिजिट्स, गावातल्या, गावा बाहेरच्या, नव्या क्लाएंटच्या मीटिंग्ज वगैरे सांभाळून ज्योतिकासाठी, मी ऑफिसात असताना काही तासांसाठी तरी घरी येऊ शकत होता. त्याचा स्वतंत्र व्यवसाय असल्यामुळे त्याला “दहा ते पाच’ असं वेळेचं बंधन नव्हतं. बऱ्याच वेळा मी घरी आल्यानंतर तो संध्याकाळ नंतर उशिरापर्यंत त्याच्या ऑफिसमध्ये काम करू शकत होता. शिवाय कामाव्यतिरिक्त उगीचच सोशल सर्कलमध्ये रमणारा तो नव्हता. तो कुटुंबवत्सल आणि घराची अत्यंत ओढ असणारा होता. थोडक्यात काहीशा चौकटीबाहेरच्या आमच्या जीवनाचा आराखडा संगनमताने, सहकार्याने नीट साधला गेला होता.

“देना बँक, स्टेशन रोड, नवी पेठ ब्रांच.” सकाळचे पावणे अकरा वाजले होते. अकरा वाजता ग्राहकांसाठी शाखेचे काम सुरू होत असे. ११ ते ३ ग्राहक सेवा आणि तीन नंतर पाच साडेपाच पर्यंत दिवसभरच्या ट्रांजॅक्शनचा ताळमेळ जमवणे वगैरे इतर कामे..

बँकेत पहिलं पाऊल टाकल्याबरोबरच माझ्या एक लक्षात आलं की मुंबईच्या फोर्ट ब्रांच मधलं कॉस्मॉपोलीटन वातावरण आणि इथलं स्थानिक लोकांमधलं वातावरण यात खूप तफावत आहे. मी बिचकलेली, भांबवलेली, शिवाय घरातून निघताना विमलच्या कडेवर असलेल्या ज्योतिकाला “बाय” करून निघताना झालेली घालमेल घेऊनच बँकेत आले होते. पर्समधून माझं नेमणूक पत्र काढलं. कुणाकडे जावं तेच कळतच नव्हतं पण केबिनमध्ये बसलेल्या शाखाप्रमुखांनीच बाहेर येऊन “या या मॅडम, आत या” असे अगदी आदरपूर्वक म्हटले. एस. व्ही शहा त्यांचे नाव. उंच, गोरे, चेहऱ्यावर समंजस भाव, गोड खालच्या सूरात बोलणं आणि एकंदरच त्यांच्याकडे पाहिल्यावर हे शाखाप्रमुख आहेत असे न वाटणारे, अत्यंत साधं सर्वसाधारण कर्मचाऱ्यांसारखं त्यांचं वागणं होतं. पदाचा रुबाब, दरारा शून्य. मला हा माणूस आवडला. थोडंसं ओझं उतरल्यासारखं वाटलं. मी केबिनमध्ये त्यांच्यासमोर बसले. शहा सरांनी एक दोघांना आत बोलावून घेतले. त्यातले एक होते देशपांडे. (जे युनियन लीडर होते. हे नंतर मला कळले) आणि दुसरे “किशोरभाई शहा’ एक सीनियर किंवा जबाबदार स्टाफ मेंबर. (देना बँकेत शहांची कमी नव्हती.बहुतेक “केम छो” वाले.) असो!माझी त्यांच्याशी ओळख करून दिली.” या भांडारकर मॅडम. मुंबईच्या आहेत बरं का ! आज पासून आपल्याबरोबर असणार आहेत. त्यांना कामाचा अनुभव आहेच पण तरी त्यांचं डिपार्टमेंट आणि काम याबद्दल थोडं मार्गदर्शन तुम्ही करावे.”

मला कुठल्याही डिपार्टमेंट विषयी काहीच अडचण नव्हती पण ज्यांच्या बरोबर आता मला काम करायचे होते त्यांचे आणि माझे सूर कितपत जुळतील याविषयी मी थोडी साशंक होते. कारण ही स्थानिक माणसे होती. त्यांची संस्कृती, विचार, जीवन पद्धती, त्यांचं खानदेशी बाजातलं मराठी किंवा गुजराथी बोलणं ही सगळी दुरावा निर्माण करणारी लांबलचक अंतरं होती. प्रत्येकाच्या नजरेत मला जाणवत होतं, ”मुंबईहून आलेली एक शिष्ट, स्वतःला काहीतरी समजणारी एक व्यक्ती, एक बलाच. जाऊ दे म्हणा आपल्याला काय करायचे आहे ?”

त्यांच्या नजरेतले हे भाव जरी मी टिपले होते तरी मला मात्र ही साधी माणसं, अजिबात स्टाईल न मारणारी गावातली माणसं चांगलीच वाटली होती. कधीतरी यांच्याशी आपली नक्की मैत्री होऊ शकेल याची खात्री वाटत होती. ती तशी का वाटत होती याचं नेमकं कारण मलाही माहीत नव्हतं. कदाचित मुंबईच्या वातावरणात नाईलाजाने सॉफीस्टीकेटेड असल्याचा आव आणणारी पण आतून बाळबोध साधी अशीच मी असेन. त्याचवेळी ‘किशोरभाई शहा’ मला म्हणाले, ”तुम्हाला कसलीही अडचण वाटली तर मला सांगा मॅडम.”
खप्पड चेहऱ्याची, किरकोळ प्रकृतीची, अत्यंत अनाकर्षक अशी ही सावळी व्यक्ती होती. मात्र बँकिंग या विषयात परिपूर्ण आणि तरबेज. सुरेख वळणदार अक्षर. कामातला व्यवस्थितपणा, जाण यामुळे शाखाप्रमुखांचाही या व्यक्तीवर पूर्ण भरवसा होता हे माझ्या लक्षात आले आणि मग मीही, ”आल्याच अडचणी तर याच व्यक्तीला सांगू, विचारू“ असे तेव्हाच ठरवले.

एक सांगते एखादी संसारी स्त्री, घर, लहान मुलाबाळांचे सांभाळून जेव्हा वेगळ्या वाटेवर जगण्याची ईर्षा बाळगते तेव्हा ती तिच्या कामाच्या ठिकाणच्या वातावरणाशी जमवून घेऊन, सामावून घेऊन, स्नेहसंबंध जुळवून, स्वतःचं प्रभावी व्यक्तित्वही सांभाळू शकली तर मग कुठल्याच वाटा कठीण नसतात.

माझ्या जडणघडणीतला हाही एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
क्रमशः

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. तरल शब्दांनी राधीका भांडारकर यांनी लेख लिहिला आहे.

  2. बॅंकेचं वातावरण डोळ्यासमोर उभं केलंस‌ बिंबा. अर्थात ती तुझी लेखनशैली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on श्रावण : काही कविता
सौ. सुनीता फडणीस on काही भक्ती रचना
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on देवश्रीच्या पत्रकारितेचा गौरव !
संदीप सुरेंद्र भुजबळ on देवश्रीच्या पत्रकारितेचा गौरव !