बैलपोळा एक कृषीसंस्कृती.
श्रावण महिन्यातला एक अत्यंत महत्त्वाचा खानदेशी सण म्हणजे बैलपोळा.
बैलपोळा हा सण कृतज्ञता दिन आहे..आमचे कुटुंब शेतकर्यांचे. त्यामुळे बैलपोळा हा पशुधन पूजेचा दिवस आणि आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असा सण. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा व्यक्त करण्याचा दिवस. आता शेतीची तंत्रे बदलली. शेती यांत्रिक झाली असली तरीही शेतकरी आणि बैल यांचं नातं अबाधितच आहे.
श्रावण अमावस्येला बैलपोळ्याचा सण साजरा होतो. श्रावणातला शेवटचा दिवस. त्यादिवशी पिठोरी अमावस्याही असते. हिंदू संस्कृतीतला हा मातृदिनच. माझ्या माहेरी श्रावणातल्या शेवटच्या दिवशी म्हणजेच श्रावण अमावस्येला “पिठोरी अमावस्ये”च्या पूजेचं महत्त्व असायचं.
या दिवशी ६४ योगिनींना प्रतिकात्मक रीतीने पूजले जाते. उपजीविकेसाठी उपयुक्त आशा या ६४ कला. घरच्या देव्हाऱ्यात ६४ योगिनी स्थानापन्न झाल्या आहेत असे समजून त्यांची पिठाच्या दिव्यांनी आरती केली जाते. घराचे प्रवेशद्वार, तुळशी वृंदावन आणि ईशान्य व दक्षिण दिशेला हे दिवे ठेवले जातात. आई, मुलांना एकत्रित बसवून ओवाळते आणि या दिव्यांचं “अतिथी कोण” म्हणत वाण देते. या पूजेमुळे पितृदोष दूर होतो, मुलाबाळांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते. पितरांचा आशीर्वाद मिळतो अशी भावना आहे आणि याच श्रद्धेनुसार आमच्याकडे पिठोरी अमावस्या साजरी केली जायची. तोपर्यंत मी पोळा या सणाविषयी फक्त पुस्तकातून वाचले होते.
माझे लग्न झाल्यानंतर जेव्हा मी अमळनेरला, आमच्या घरी याच दिवशी साजरा होणारा बैलपोळ्याचा सण अनुभवला तेव्हा त्या सणामागचा आनंदोत्सव नेमका कशासाठी हे कळल्यावर मी खरोखरच भावनात्मकतेने भारावून गेले.
त्यादिवशी प्रामुख्याने माझे दीर ज्यांनी आमच्या शेतीची धुरा अत्यंत मनापासून सांभाळली त्या सुहासदादांचे या मुक्या प्राण्यांशी तसेच शेतमजुरांशी जडलेले नाते पाहून मी तेव्हाही आणि आजही भावनिक होते.
खरं म्हणजे मातृदिन (पिठोरी अमावस्या) आणि बैलपोळा दोन्ही दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याची माध्यमे.
ज्या बैलांनी वर्षभर शेतकर्याची सेवाच केली असते त्यांच्या श्रमाचा गौरव, जाणीव म्हणजे बैलपोळा.
त्यादिवशी बैलाला सुट्टी. वर्षातला एक दिवस त्याच्यासाठी आरामाचा, विश्रांतीचा.
पोळ्याच्या अदल्या दिवशी शेतकर्यांकडून बैलांना आमंत्रण दिले जाते.
“आज आवतण घ्या, उद्या जेवायला या.”
पोळ्याच्या दिवशी त्यांना प्रेमाने आंघोळ घालायची. त्यांची शिंगे रंगवायची, गळ्यात घुंगुरमाळा, पाठीवर रंगीबेरंगी, सुरेख कशीदा काढलेली झूल—अशी ही नटलेल्या, सजलेल्या ढवळ्यापवळ्यांची जोडी इतकी गोजीरी दिसते…!
घरातल्या सुना, पुरणपोळी, तांदळाच्या खिरीचा रुचकर स्वयंपाक रांधतात. या महत्वाच्या पाहुण्यासाठी.
गावात मस्त फेरफटका मारुन संध्याकाळी हे सजलेले बैल घरी आले की सुना, लेकीबाळी त्यांचे औक्षण करतात. कपाळावर गंधाचा टिळा लावतात आणि स्वत:च्या हातानं घास भरवतात. फार ह्रद्य सोहळा असतो हा ! शेतकर्यांच्या डोळ्यातला भाव आणि ढवळ्या पवळ्यांची मऊ पाणीदार नजर एकमेकांना भिडते आणि या अलौकीक नात्याचा बंध अधिक घट्ट होतो.
thank you आणि you are welcome..
असं तर नाही ना म्हणत ते एकमेकांना ?
या सणामागेही एक सुंदर कथा गुंफलेली आहे. अंधश्रद्धेचा भाग सोडून दिला तरी या सर्वच पौराणिक कथांमागची कल्पना आणि फँटसी मला आजही आकर्षित करते. साहित्य क्षेत्रात परंपरेनं जपलेलं हे शब्दधन आहे. त्या कथांत गुंफलेली पात्रं, संवाद म्हणजे एक महान कल्पनाविश्व आहे आणि जे नकळत आपलं जीवन आनंददायी करतं.
अशीच ही पोळ्याची कथा —
नंदी म्हणजे भगवान शंकर-पार्वतीचे वाहन. नंदी हा शिवभक्त आणि पार्वतीलाही तो प्रिय होता. काही कारणाने, पार्वतीने रागाच्या भरात नंदीला शाप दिला की, ”तुला पृथ्वीवर जाऊन शेतकऱ्यांसोबत कष्ट करावे लागतील आणि तुझ्या माथ्यावर ओझे व्हावे लागेल.”
नंदीला हा शाप ऐकून धक्का बसला. त्याने पार्वतीची क्षमा मागितली. माता पार्वतीचाही राग नंतर शांत झाला. तिचे हृदय परिवर्तन झाले आणि तिने नंदीला सांत्वन करत सांगितले, ”तुला मी शापमुक्त करते. मात्र तू शेतकऱ्यांचा साथीदार म्हणून कष्ट करशील आणि वर्षातून एकदा शेतकरी तुझी पूजा करतील आणि तुझा सन्मान करतील. त्या दिवशी तुला विश्रांती मिळेल आणि तुझा गौरव होईल”.
हाच तो पोळ्याचा सण जो कृषी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.
या दिवशी शेतावर राबणार्या सगळ्या मजुरांनाही जेवणाचे आमंत्रण असते. माझ्या सासुबाई सर्वांना स्वत:आग्रह करुन वाढायच्या..
“पुरे माई…”
“कारं इतनामंदी कसकाय जालं…?”
असे जेवतानाचे अहिराणी संवाद. अतिशय गोडव्याचे.
ज्यांच्या श्रमानं धान्याची रास रचली, त्यांचा या घासावर खरा अधिकार या भावनेचा हा सण. विशेषत: खेड्यात त्याचे महत्व अधिक असले तरी काही ठिकाणी बाजारातून मातीचे बैल आणून त्यांची प्रतिकात्मक पूजा केली जाते. नैवेद्य दाखवला जातो. बळीराजा हाच अन्नदाता. त्याच्याविषयीची ही उपकृत भावना या सणाच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. त्याचबरोबर “बळीराजा सुखी तर राष्ट्र सुखी” ही भावना जपली जाते.
वसुधैव कुटुंबकम ! हे हिंदुधर्माचे तत्व आहे आणि या कुटुंबात पशु, पक्षी, प्राणी, वृक्षवल्ली, माती, जल, आकाश, तारे सगळ्यांची पूजा होते.
बैलपोळा म्हणजे बैलांची पूजा. ”श्रमिकहो ! घ्या इथे विश्रांती.” हाच त्यातला भाव. हीच त्यांच्या श्रमाला दिलेली भावपूर्ण वंदना….!!
आजकाल शेतीत ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धीमत्तेचेही लोण शेतकर्यांच्या जीवनात क्रांती करेल पण तरीही ग्रामीण भागात बैलांचे महत्त्व कायम असेल. महाराष्ट्राच्या शेती संस्कृतीचा आणि ग्रामीण जीवनशैलीचा एक भाग म्हणून पिढ्यानुपिढ्या जपला जाईल.
माझ्या कन्यांच्या एका भारतभेटीत त्यांच्या सुहासकाकाने त्यांना एकेक शुभ्र रंगाची, लाल शिंगांची सुरेख छोटीशी बैलजोडी भेट म्हणून दिली. त्यांनीही ती तितक्याच आत्मीयतेने उरापोटी सांभाळत अमेरिकेला नेली. प्रारूपतेने परंपरेचं लोण असं जपलं जातं हेच खरं !
क्रमश:

— लेखन : सौ.राधिका भांडारकर. पुणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
