“माझी कन्यारत्नं”
लग्नानंतरचा जवळजवळ वीस पंचवीस वर्षाचा काळ अत्यंत धामधधूमीत आणि झपाट्याने सरला असे म्हणायला हरकत नाही. “आधी प्रपंच करावा नेटका” या संत वचनाप्रमाणे आम्ही दोघेही प्रापंचिक जबाबदाऱ्यांमध्ये आकंठ बुडालो होतो. विलासचा व्यवसाय, माझी नोकरी, ज्योतिका, मयुराच्या भविष्याचा भक्कम पाया उभारण्याचं ध्येय, त्याचबरोबर मित्रपरिवार, सोशल लाईफ, रोटरी, इनरव्हील, अनेक कौटुंबिक, सामाजिक सोहळे, रीती परंपरा, सणांचा यथायोग्य साजरेपणा, कधी कधी तर अगदीच रोलर कोस्टर मध्ये बसल्यासारखी अवस्था व्हायची पण आयुष्य गतिमान होतं. थांबायला वेळच नव्हता. म्हणजे थांबण्याची ती वेळच नव्हती.
आयुष्य वेगवान होतं पण बेभान नव्हतं. आम्ही दोघेही जे काही करत होतो किंवा प्रत्येक क्षण जगताना आमच्या मनात मुलींना खूप चांगल्या प्रकारे घडवायचं, त्यांना उत्तम शिक्षण द्यायचं, त्यांच्या आवडीनिवडीचा, त्यांचा मानसिक कल कुठे आहे याचाच विचार करून त्यांना सर्वतोपरी स्वावलंबी आणि सक्षम करायचं. पुढे भविष्यात “स्त्री” म्हणून जगताना त्यांची बौद्धिक, शारीरिक सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक जडणघडण ही उत्तम प्रकारेच झाली पाहिजे हे आमचं महत्त्वाचंं प्रापंचिक कर्तव्य आम्ही मानलं होतं, स्वीकारलं होतं.
या ठिकाणी काही गोष्टी मला अभिमानाने सांगाव्याशा वाटतात की जळगाव सारख्या काहीशा गढूळ राजकीय पार्श्वभूमी असलेल्या जिल्ह्यात वास्तुशास्त्रज्ञ म्हणून स्वतःच्या व्यवसायातले इमान जपताना विलासला अतिशय मनस्ताप अनेक वेळा भोगावा लागला होता पण त्याने कधीही स्वतःची नीती आणि तत्वांशी तडजोड मात्र केली नाही. व्यवसायाचे एथिक्स मोडले नाहीत. अनेक प्रलोभनांना त्याने बेदरकारपणे पाठ फिरवली. अनेक पॉवरफुल व्यक्तींच्या विरोधात गेल्यामुळे खूप वेळा जबरदस्त व्यावसायिक किंमतही त्याला मोजावी लागली असेल पण त्याने स्वतःभोवती आखलेल्या लक्ष्मण रेषा कधीही ओलांडल्या नाहीत. “जळात राहून मत्स्यांशी वैर करू नये” असे म्हणतात पण जर असे काही मासे आपले स्व:त्वच गिळंकृत करायला टपले असतील तर त्यांना धिक्कारणे हेच योग्य ठरते ना ?
अर्थात हा विषय मला इथे फार भरकटवू द्यायचा नाही. मूळात तो माझ्या लेखनाचा उद्देशही नाही. मला इतकेच सांगायचे आहे की अशी अनेक धुरकट, जळकट वलये आमच्या भोवती असतानाही “आम्ही जीवनात संपूर्णपणे सुखी आहोत, आनंदी आहोत, समाधानी आहोत” ही भावना आम्हाला कधीही सोडून गेली नाही. नीतीचे उंबरठे सांभाळत असताना एक प्रकारचा अज्ञात अदृश्य पाठिंबा आम्हाला कुठूनतरी सहज मिळत जातो याचा आम्ही नक्कीच वेळोवेळी अनुभव घेतला.
आमच्या दोन हुशार कन्या आमच्या आयुष्याचा भला मोठा प्लस पॉईंट राहिला आहे. अगदी शिशुवर्गापासून ते महाविद्यालयाच्या उच्च पदवीपर्यंत त्या कायम टॉपर्स होत्या. शिक्षण क्षेत्रातली बजबजपुरी, भ्रष्टाचार, खोटेपणा, अनैतिकता या कुठल्याही बाबींचा सामना आम्हाला ज्योतिका – मयुराच्या शिक्षणासाठी कधीही करावा लागला नाही. कुठेही शैक्षणिक प्रवेशासाठी आम्हाला वाकडे मार्ग जसे की शिफारस पत्र, आरक्षण पत्र, खोटे क्रिमी लेयर डिक्लेरेशन अथवा डोनेशन द्यावेच लागले नाही. स्वतःच्या गुणवत्तेवरच त्या दोघी सहज एक एक दालनं पार पाडत गेल्या. दोघीही पुणे इन्स्टिट्युट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी (PICT) या नामांकित संस्थेतून संगणक आणि टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातल्या उच्च श्रेणीत अभियंता झाल्या. त्यांच्या हातातले बॅचलर ऑफ इंजीनियरिंगचे पदवीपत्र पाहून आम्ही दोघेही खरोखरच भरून पावलो. आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा अगदी सहज पार झाला.
ज्योतिकाला कॅम्पस इंटरव्यू मध्येच “महेंद्र ब्रिटिश टेलिकॉम” मध्ये जॉबही मिळाला. तिथूनच तिला पुढे लंडनमध्ये तिच्या क्षेत्रात काम करण्याचा प्रगत अनुभव घेण्याची संधी मिळाली.
मयुरा मात्र बी. ई झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी युएसला गेली.
ज्योतिका जेव्हा लंडनला गेली तेव्हा मात्र एक प्रकारचा काळजीयुक्त ताण आम्ही दोघांनी अनुभवला होता. थोडासा कौटुंबिक, सामाजिक दबावही आम्ही अनुभवला. सर्वसाधारणपणे मुलींचे लग्नाचे एक वय आपल्या संस्कृतीत ठरलेलं असतं त्यामुळे आम्हाला त्यावेळी असे अनेकांकडून सल्ले मिळाले होते “तिचे लग्न न करता तुम्ही तिला परदेशी कसे काय पाठवता ?”
१९९६ साल होते ते. तेव्हा मुली परदेशी जात त्या परदेशस्थ मुलाशी लग्न करून त्याच्यासोबत डिपेन्डट व्हीसावर. (आता काळ खूप बदलला आहे). त्यामुळे कदाचित आमचा, तिचा हा निर्णय आणि पुढे टाकलेलं पाऊल धाडसाचं ठरावं हे स्वाभाविकच होतं पण याचबरोबर एक दिलासा देणारं भाष्यही होतं.
ज्या शाळेत ज्योतिकाने शिक्षण घेतलं त्या शाळेच्या प्रिन्सिपॉल सिस्टर मोना विलासला म्हणाल्या, ”मिस्टर भांडारकर, ज्योतीका ही अतिशय हुशार आणि गुणी मुलगी आहे. तिचं वर्तन इतकं चांगलं आणि स्वच्छ आहे की तिच्यासाठी तुम्हाला कधीच खाली मान घालावी लागणार नाही. ती जगात कुठेही गेली तरी तिचं सांस्कृतिक नातं इथल्या मातीशी आणि तुमच्या संस्कारांशीच अतूट राहील. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तिच्या उज्वल भविष्याची ही सुरुवात आहे असेच समजा.”
सिस्टर मोनांनी विलासच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाल्या ! “गॉड ब्लेस यु अँड युअर स्वीट डॉटर्स !” इथे आणखी एक आवर्जून सांगावसं वाटतं ज्या शाळेत ज्योतिका आणि मयुरा शिकल्या ती “सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल” ही जळगाव मधली पहिली कॉन्व्हेंट स्कूल होती आणि विलासने आर्किटेक्ट म्हणून टप्प्याटप्प्याने शाळेच्या विस्तारत जाणाऱ्या इमारतीचे काम उत्कृष्टपणे केले. त्या कामाच्या निमित्ताने सिस्टर मोनासकट त्यांचा भला मोठा मिशनरी समूह विलास ची कामाप्रतीची निष्ठा, प्रामाणिकपणा, तळमळ पाहून प्रभावित झालेला होता. त्यामुळेच एक प्रकारचे अदृश्य, अज्ञात आशीर्वाद आमच्या सोबत सतत आहेत असे आजही वाटते, जाणवते. त्यांच्यासाठीचे जळगावातले पहिले “चर्च” ही विलासनेच बांधले. त्यामुळे सहाजिकच एका धार्मिक कार्याशी आमचा परिवार नकळत जोडला गेला.
ज्योतिका आणि मयुरा दोघीही हुशार असल्या तरी दोघींच्यात खूप फरक होता. ज्योतिका अधिक अभ्यासू, वाचनप्रिय, काहीशी इन्ट्रोव्हर्ट, बडबड, मस्ती, घोळक्यांपासून दूर राहणारी, अतिशय फोकस्ड होती. आजही ती तशीच आहे. तिचं बोलणं वागणं अगदी संयमित आणि मीटर मध्ये असतं. उगीचच “टाईमपास” वृत्तीच नाही तिच्यात आणि चुकून जर ती या अशा घोळक्यात सापडली तर तिला चटकन रडूच येतं आणि ती तिथून निघून जाते. हा गुण की अवगुण हे कोणीच ठरवू शकत नाही. ज्याचं त्याचं अंतरंग एवढेच म्हणूया.
त्यामानाने मयुरा ही आनंदी वृत्तीची, अत्यंत सोशल, भरपूर मित्र-मैत्रिणींच्यात रमणारी आणि “मजेत जगायचं” या वृत्तीची. प्रत्येक गोष्टीत, अगदी पाककलेपासून ते एस्ट्रोनॉमीपर्यंत इंटरेस्ट घेणारी. पण म्हणून काही वाहवत जाणारी मुळीच नव्हती. शाळा कॉलेजच्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात तिचा सहभाग असायचा पण या सगळ्याचा तिने तिच्या शैक्षणिक करिअरवर कधीच परिणाम होऊ दिला नाही ही अभिमानाची गोष्ट ! आपल्या शिक्षणासाठी आपले आई-बाबा आणि मोठी बहीण ज्योतीका किती मेहनत करतात याची जाणीव मात्र तिने कायम ठेवली. तिने बी.ई. ची (इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन) पदवी मिळवली आणि नंतर एम.एस. करण्यासाठी ती अमेरिकेला गेली. त्या दरम्यान काही महिन्यांचा काळ तिच्यासाठी थोडा रिकामा होता. डॉक्टर उल्हास पाटील यांचे जळगावला विनाअनुदानित इंजिनिअरिंग कॉलेज होते. त्यांनी मयुराला स्वतःहून “काही महिन्यांसाठी तरी आमच्या मुलांना येऊन शिकव” अशी गळ घातली आणि मग काय आमच्या बाईसाहेब विद्यार्थीदशेतून त्या काळापुरती बाहेर पडून चक्क एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या “लेक्चरर” बनल्या.
घरी आल्यावर एक दिवस ती मला म्हणाली होती, “मम्मी काय भारी वाटतं ग मला ! मला चक्क तिथली मुलं “अहो” म्हणतात. रिस्पेक्टफुली “मिस” म्हणून हाक मारतात, वास्तविक ती काही माझ्यापेक्षा फार लहान नाहीयेत.” अशा छोट्या छोट्या गोष्टीतही गंमत वाटून घेणारी मयुरा आज युएस मध्ये एका मोठ्या अमेरिकन कंपनीत डायरेक्टर पदावर असतानाही तशीच आहे हे कौतुकास्पद नाही का ?

खरं म्हणजे या दोघींच्या यशोगाथा सांगताना मी संयम ठेवणे हेच योग्य. आत्मस्तुती नको.
एका नव्या विकसित तंत्रज्ञान युगाच्या प्रतिनिधी म्हणून मी जेव्हा त्यांच्याकडे पाहते तेव्हा मला स्वत:ला अशिक्षित आणि निरक्षर असल्याची भावना प्राप्त होते आणि त्याचवेळी त्यांची शिखरावरची वाटचाल पाहून छाती अभिमानाने रुंदावते.
खरंच अशा अनेक आठवणीत रमताना या सांजवेळी एकच गाणं माझ्या मनात घुमत असतं..
“घरात असता तारे हसरे
मी पाहू कशाला नभाकडे…”
दूर जातात मग सारे ते कृष्णधवल चेहरे, ज्यांनी कधीतरी आम्हाला दुःख दिले, फसवले, डोळ्यात धुळ फेकली, अगदी ज्यांना जवळचे, आपले मानले त्यांनीही विश्वासघात केला..
पण त्याचवेळी माझ्या वडिलांनी म्हटलेली एक गणेश प्रार्थनाही आठवते.
सिद्धगणेश सिद्धंकार
मनीच्छले मोतेहार
सोन्याची काडी
रुप्याची माडी
तेथे सिद्धगणेश राज्य करी
राजा मागे राज
राणी मागे सौभाग
निपुत्राला पुत्र
आंधळ्याला नेत्र
त्यांनी वाहिली सोन्याची काडी
आम्ही वाहू दुर्वांची पत्री
त्यांना प्रसन्न झालात
तसे आम्हाला व्हा…
ज्योतिका-मयुराला ही प्रार्थना खूप आवडते. संस्काराचे, सद्विचारांचे परंपरेचे एका पिढीतून दुसर्या पिढीत अशाप्रकारे वहन होते हेच खरे..
क्रमश:

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
