“आबांचे आजारपण”
आबांना (माझे सासरे) स्पाइनल इन्फेक्शनमुळे एका वेगळ्याच प्रकारचा लकवा झाला. सकाळी त्यांना गादीतून उठताच येईना. हातापायातली शक्ती हरवल्यासारखे झाले. आई त्यांच्याजवळ होत्याच. त्यांनी सुहास, श्री, विवेका यांना हाका मारताच सारे आबांभोवती जमले. आबांचे बोलणे अस्पष्ट वाटत होते. अशा परिस्थितीतही त्यांनी श्रीला सांगितले, ”दादाला बोलाव. त्याला फोन लाव.”
विलास ने श्रीला, ”आबांना टॅक्सी किंवा ॲम्बुलन्स करून आहे त्या परिस्थितीत ताबडतोब जळगावला घेऊन ये. मी डॉक्टर सुभाष चौधरींशी बोलतो.” असे सांगितले.”
दरम्यान आबांचे नेहमीचे डॉ.कोठारी घरी येउन त्यांना तपासून गेले होते आणि त्यांनीही “यांना जळगावला घेऊन जा” असाच सल्ला दिला. अमळनेरपेक्षा जळगावला वैद्यकीय सुविधा चांगल्या असल्यामुळे आणि तेथील डॉक्टरांशी आमचे चांगले स्नेहसंबंध असल्यामुळे विलासने दिलेला सल्ला सर्वांना पटला.
दोन तासाच्या आतच श्री एक खास टॅक्सी करून आबांना डॉक्टर सुभाषच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. आई सोबत होत्याच. आम्ही दोघे डॉक्टर सुभाषकडे आधीच पोहोचलो होतो. डॉक्टर सुभाष चौधरी जळगाव मधले एक नामांकित फिजिशियन आणि वैद्यकीय व्यवसायाशी पूर्णपणे समर्पित होते. क्लिनिकमधून बाहेर येऊन गाडीतच आबांना तपासले आणि त्यांना ताबडतोब अॅडमिट करून घेतले.
आबांच्या निरनिराळ्या तपासण्या झाल्यावर सांगितले, ”ही न्युराॅलाॅजीची केस आहे. आपण आबांना माझ्या हॉस्पिटलमध्ये काही दिवस ठेवूया. मी संबंधित तज्ञांशी बोलून त्यांना इथेच व्हिजिटसाठी बोलावतो. काळजी करू नकोस. वेळ लागेल पण यावर उपचार होऊन आबा संपूर्णपणे पूर्ववत होतील यावर विश्वास ठेव. आपल्याला फक्त काटेकोरपणे नियमित औषध उपाययोजना आणि फिजियोथेरेपी घ्यावी लागेल.”
डॉक्टर सुभाष च्या हातात आबांची केस असल्यामुळे आम्ही तसे निर्धास्त होतो. शिवाय डॉक्टर अनिल कोतवाल, डॉक्टर सतीश गुप्ता या व्यावसायिक तज्ज्ञ आणि मित्रमंडळींकडूनही आम्हाला खूप नैतिक मानसिक पाठबळ मिळाले.
तीन-चार महिन्याचा हा काळ कठीण आणि लक्षात राहण्यासारखा गेला. विलासचा वाढता कामाचा व्याप, माझी नोकरी, मुलींच्या शाळा, अभ्यास, परीक्षा, इतर उपक्रम हे सर्व सांभाळून आबांवरच लक्ष केंद्रित करण्याची ंजबाबदारी पार पाडणे हे आमचं कर्तव्य होतं आणि त्यासाठी मानसिक धैर्य, संयम आणि संतुलन याचे आयुष्यात किती महत्त्व असते त्याची जाणीव त्या काळात झाली. वेळेचे नियोजन एकदा जमले की सारं सुरळीत होऊ शकतं हे अनुभवलं. माझ्याकडे असणाऱ्या मदतनिसांनीही आम्हाला चांगली साथ दिली. मी ऑफिसात जाण्यासाठी थोडी वेळेच्या आधीच निघत असे आणि जाताना वाटेवरच्या हॉस्पीटलमध्ये आई आबांचा नाश्ता जेवण घेऊन जात असे. आई सकाळीच घरी येत आणि अंघोळ वगैरे उरकून पुन्हा दवाखान्यात जात. दिवस रात्र त्या आबांजवळच असत. मधल्या काही वेळात विलास, माझे दीरही येऊन जाऊन असत.
आबांच्या प्रकृतीत अत्यंत धीम्या गतीने उतार पडत असला तरी सारे काही सकारात्मक होते आणि अक्षरशः युद्धपातळीवर आम्ही सारे आबांना बरं करण्यासाठी सज्ज होतो. या सर्व पार्श्वभूमीवर खोलवर कुठेतरी जाणवणारे प्रवाह मात्र काहीसे विचित्र, अनपेक्षित आणि अचंबित करणारे वाटत होते.
आई सकाळी सकाळीच घरी यायच्या. बऱ्याच वेळा विलास त्यांना आणायला जायचा. कधी कधी त्या रिक्षानेही घरी यायच्या. त्या घरी आल्या की माझा पहिला प्रश्न असे,
”कसे आहेत आबा ? रात्री झोप लागली का त्यांना ?”
“ते चांगले आहेत गं ! तुम्ही सगळे आहात ना त्यांची व्यवस्था बघायला .मग त्यांचं काय ? ते बरेच आहेत. झोपतात ही छान बरं का! माझीच झोप होत नाही. ती लहानशी कॉट, एवढ्याशा जागेत सगळं काही, शेजारच्या खोलीतल्या रुग्णांचे विव्हळणे, औषधांचे वास.. जाऊ दे! ठीक आहे. काहीच विचारू नकोस. चहा करतेस का ? दे जरा गरम गरम पटकन. स्नान करून घेते आणि जाते, उशीर नको व्हायला बाई!”
मला कळायचं नाही आई अशा का कातावल्यात? त्यांचे वैतागलेले बोलणं ऐकून मी जजमेंटल न होण्यासाठी स्वतःला बजावत असे. कदाचित प्रेम काळजी आणि चिंता या भावनिक मिश्रणाचा तर हा परिणाम नसेल ना? असे मला वाटायचे. एकीकडे वाटायचे,”कधी ना कधी असे प्रसंग कुणाकुणावर येतातच ना? करावं लागतं, यातून जावं लागतं आणि आईंनी आजपर्यंत काही कमी केलंय का? मग आताच काय झालंय असं ? ”पण तरीही याही विचाराच्या आत मला काहीतरी वेगळ्या भावनांची आकृती दिसायची.
एक दिवस मी त्यांना म्हणाले “आई, आबांसाठी रात्रीच्या वेळी आपण एखादा माणूस बघूया का? मी सुभाषला विचारते म्हणजे तुम्हाला घरी येऊन रात्रीची नीट झोप मिळू शकेल. ”तुमच्यासाठी ते जरुरीचे आहे.”
“भलतंच काहीतरी सांगतेस गं! आबांना मुळीच नाही चालणार.. मलाच म्हणतील ते,”कंटाळा आला का माझा तुला ?” जाऊ दे तिकडे. जे चाललंय ना ते बरं आहे आणि मी ठणठणीत आहे बरं का त्यांचं करायला. कुटुंबात आयुष्य गेलंय माझं. असं एवढ्या तेवढ्याला कुणा परक्याची काहून मदत घ्यायची? चहा दे लवकर.”
आईंशी बोलण्यात, विरोध करण्यात, त्यांना समजावण्यात काहीच अर्थ नाही असे वाटून मी गप्पच राहायचे पण ऑफिसमध्ये काम करताना त्यांच्याशी होणारे हे सकाळचे संवाद माझ्या मनात ठणठणत राहायचे.”
एक दिवस पोहे खाताना नेमका एक केस आला, त्यांचं लुगडं बाईने नीट झटकून, काठ सरळ करून वाळत घातलं नाही, कधी चहात साखरच कमी पडली, कधी डब्यातली पोळीच वातड झाली, भाजीला चवच लागली नाही वगैरे अनेक बारीक- सारीक गोष्टीवरून त्या नाराजी व्यक्त करायच्या. या साऱ्यांकडे मी पूर्णपणे दुर्लक्षच करायचं ठरवलं होतं. कदाचित माझ्यापाशी मन मोकळं करण्याचा हा मार्ग असेल त्यांचा.
विषय बदलावा म्हणून कधीतरी मी त्यांना विचारलं,
”आजची कारल्याची भाजी आबांनी खाल्ली का ? आवडली का त्यांना ?”
“चाटून पुसून खाल्ली बरं का.
तुझ्या हातचं कारलं सुद्धा त्यांना कडू लागलं नाही. भेटायला येणाऱ्या सगळ्यांना तुझं कौतुक किती करू नि किती नको असं होतं त्यांना. सर्वांना सांगतात, ”माझी मुलगीच आहे हो ती! घरचं, बाहेरचं आणि आता हे माझं असं सांभाळून ती कशी हसतमुख असते!”
या क्षणी मला खदखदून हसू येत होतं. कुठेतरी एखादं हट्टी, रुसून बसलेलं एक लहान मूल मला त्यांच्यात दिसायचं. खरं म्हणजे अशा प्रसंगी आईंच्या काहीशा विक्षिप्त वागण्यामागची मानसिकता समजून घेण्याचा मी प्रयत्न करत होते.
रोज एक नवा प्रश्न आई माझ्यापुढे उभा करायच्या. एक दिवस म्हणाल्या, आमच्या शेजारच्या रूममध्ये ना एक आजारी बाई आहे तिला काय व्याधी आहे कोण जाणे पण अख्खा दिवस तिचा नवरा तिच्या उषा पायथ्याशी असतो. परवा तर त्या माणसाने चक्क तिची वेणी घातली, पावडर कुंकूही केलं. मी म्हणते,” किती भाग्याची ना ती बाई. ”उद्या मला काय झालं तर ?”
“कशाला आई असं म्हणता? आबांचं खूप प्रेम आहे बरं तुमच्यावर, प्रत्येक क्षणी त्यांचं तुमच्या वाचून अडतं आणि म्हणूनच त्यांना सतत तुम्ही जवळ असावं असं वाटतं.”
महिना दीड महिना उलटून गेला असेल, हळूहळू आम्हा सर्वांनाच या वेगळ्या रुटीनची ही सवय होऊन गेली. सुरुवातीला वाटणारी दमछाक अंगवळणी पडत गेली. आता आबांच्या प्रकृतीतही बरीच सुधारणा दिसू लागली. आई कधी शांत, अबोल, समंजस तर कधी चिडलेल्या, उसळलेल्या अशा मानसिक चढ-उतारात असत. बऱ्याच वेळा मला त्यांची कणव यायची. दिवस रात्र हॉस्पिटलची ती ऊर्जाहीन जागा, रात्रीची जागरणं, आमचं ब्रुक बाॅन्ड कॉलनीतलं घर- त्यांना हवी ती मोकळीक मिळायची नाही. मोठ मोठ्या खोल्यांतून वावरण्याची सवय असलेल्या त्यांची खूप कुचंबणा व्हायची. त्या होमसिक व्हायच्या. त्यांना अमळनेरचं घर, तिथला सारा त्यांच्या संसाराचा व्याप, गल्लीतल्या गावातल्या त्यांच्या आयाबाया, एकंदर ते सारंच वातावरण इथे नसल्यामुळे त्या बेचैन वाटायच्या. शिवाय यापुढे आबांची प्रकृती नक्की कितपत पूर्ववत राहील याची एक अदृश्य भीती स्वरूप काळजी त्यांच्या मनाला कुरतडत असणार.
एक दिवस हताशपणे त्या म्हणाल्या, “काय सांगू तुला ? एकत्रात सारं आयुष्य याची त्याची उठबस करण्यात गेलं. आबा तर कामाच्या निमित्ताने फिरतीवरच असत. आता जरा कुठे आयुष्य निवांत होत चाललं होतं ! म्हटलं !” आता सुनांवर जबाबदारी टाकून गंगोत्री जन्मोत्रीला जाऊन येऊ. चारधाम यात्रा करू, खूप राहून गेलं गं जग पाहायचं !”
त्यावेळी मला असं मुळीच वाटलं नाही की एखाद्या बाईचा नवरा असा गादीवर असहाय्य असताना तिने असा विचार करणे हे बरोबर आहे का? त्या क्षणी मला समोर बसलेल्या माझ्या सासूबाईंच्या पलीकडचं एक दबलेलं स्त्रीमन हुंदके देत असलेलं जाणवलं. खरंच त्यांचंही तर वय उताराला लागलं होतं. वरवर त्या कितीही बोलू देत पण आजारी आबांची सेवा करण्यात त्यांनी कुठलीही कसर ठेवली नव्हती. अनेक रात्री त्या शांत झोपल्याही नव्हत्या. त्यासाठी त्यांना दिलेले पर्यायही त्यांनी स्वीकारले नव्हते. एकाच वेळी त्यांनाच सर्व करायचं होतं आणि कर्तव्याचं हे ओझं त्यांना पेलवतही नव्हतं.
मी माझ्या अधिकारात एक दिवस एक निर्णय घेतला. आईंना म्हटलं, ”नटवर टॉकीजला खूप सुंदर मराठी चित्रपट लागला आहे. तुमची आवडती सुलोचनाही त्यात आहे. मी तिकीटं काढली आहेत. दुपारी दवाखान्यात तुम्हाला घ्यायला मी येईन. विलासच्या ऑफिसमधल्या शिपायाला मी आबांपाशी बसायला सांगितले आहे आणि हे बघा हे ठरलेलं आहे. आईंनीसुध्दा नाही, नको, लोक काय म्हणतील असं काहीच म्हतलं चित्रपट खूपच सुंदर होता मला आता नाव आठवत नाही पण चित्रपट कौटुंबिक अजिबात रडका नव्हता. गमतीदार वास्तविक आणि मनोरंजक होता. मध्यंतरात मी आईंसाठी कुल्फी आणि कागदाच्या पुडीतले भाजलेले शेंगदाणे घेतले. मोगऱ्याचा गजरा ही घेतला. आई या सर्वात मनापासून रमल्या होत्या. त्यांना असं रीलॅक्स्ड बघून मला बरं वाटलं.
चित्रपट सुटल्यानंतर आम्ही बाहेर आलो तेव्हा दिवस लहान असल्यामुळे अंधारलं होतं. आई लगेच म्हणाल्या, “काय ग बाई किती उशीर झाला! आबा बरे असतील ना? त्यांचं काही दुखलं खुपलं ना तर माझ्याशिवाय ते कुणाला सांगणार नाही बरं का? माझीच वाट पाहत राहतील. काहीतरीच बाई तुझं पिक्चरला जाणं वगैरे! चल लवकर, मला सोड तिकडे..”
आज हे सगळं लिहिताना माझं मन खूप भरून आलंय. “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे” या उक्तीचा अर्थ आता चांगलाच समजतो. ऐंशीच्या उंबरठ्यावर असताना, तेव्हा न कळलेले, न जाणवलेले, विचित्र वाटलेले अनेक अर्थ आता स्पष्टपणे उलगडतात आणि वाटतं “कोणी चुकीचं नसतं. परिस्थिती कारण असते. मनाच्या डोहात उंच लाटा उसळतात त्यांना नेहमीच कर्तव्याचे किनारे नाही रोखू शकत. आज आईंच्या जागी मी जेव्हा स्वतःला ठेवून बघते तेव्हा त्यांच्यातल्या घायाळ स्त्री मनाची मी काही अंशानी तरी दखल घेऊ शकते.
क्रमशः

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800