Home लेख माझी जीवन नौका : १२

माझी जीवन नौका : १२

1

“परिचय जहाजाचा…..”

त्यादिवशी संध्याकाळी जेट्टीवर फिरायला न जाता आम्ही दोघं शिपवरंच हॅचच्या जवळच्या म्हणजे शिपच्या सर्वात खालच्या डेक वर फिरून आलो. आज मुकुंद मला जहाजाची ओळख करून देत होते.

जहाजाचा मागचा भाग रुंद, त्यामानाने पुढचा निमुळता असतो. पुढून मागे जवळजवळ दोन तृतीयांश भागात माल भरण्यासाठी भल्या मोठ्या हॉल सारखी रचना असते.
आतून संपूर्ण स्टीलने बांधलेला हा हाॅल आत भरलेल्या मालात पाणी शिरणार नाही याची काळजी घेऊनच डिझाईन केलेला असतो. याला hatch – हॅच किंवा hold – होल्ड म्हणतात.

मुख्यत्वे जहाजाच्या पाण्याखाली असलेल्या भागात ही व्यवस्था केलेली असते. त्याचा थोडा भाग डेकच्या वरती मधोमध असतो. त्याच्या सर्व बाजूंनी भरपूर रुंद रस्ता वाटावा असे डेक्स असतात.

हॅच घट्ट बंद करता येईल अशी वरून सरकती लोखंडाची अवजड दारे असतात. ती यंत्रांनीच उघडली – बंद केली जातात. ती व्यवस्थित बंद झाली की शिप पावसातून जात असताना किंवा समुद्राच्या जहाजाच्या कडेवर धडकणाऱ्या लाटांचं पाणी आत अजिबात जाऊ नये अशी व्यवस्था असते.
माल भरण्याच्या व उतरवण्याच्या वेळी ही दारे कडांना सरकवली जातात. हॅचिस बंद झाल्या की जहाजाचा हा भाग एखाद्या अवाढव्य पटांगणासारखा दिसतो.

या हॅचच्या दोन्ही बाजूला जहाजाच्या पुढच्या भागापासून अगदी जवळजवळ मागच्या टोकापर्यंत रुंद डेक्स असतात. त्यांना लोखंडी बारचं पांढरा ऑइल पेंट दिलेलं रेलिंग असतं.
यात मध्ये काही भाग मोकळा सोडलेला असतो. तो नेहमी साखळदंडांनी बंद ठेवलेला असतो. हे साखळदंड पाहिजे तेव्हा काढून बाजूला ठेवता येतील असेच भक्कम हुक्सवर अडकवलेले असतात.

काही वेळा जहाज समुद्रात दूर उभे असते.त्यावेळी काही कारणामुळे कोणाला किनाऱ्याला जावे लागले अगर जहाजावर यावे लागले तर खाली समुद्रात जहाजा जवळ पडाव किंवा लॉन्च आणतात. त्यात उतरावे लागते. तेव्हा हे साखळदंड काढून तिथून उतरण्यासाठी एक शिडी लावली जाते.
ती नायलॉन व काथ्याच्या भक्कम दोरखंडांना गाठी मारून तयार केलेली असते.दोन्ही बाजूला हे दोरखंड, त्यांच्या मधे एकेक फूट अंतरावर जाड लाकडी छोट्या फळ्यांच्या पायऱ्या बांधलेल्या असतात.
कडेच्या दोनही दोरखंडाना हात धरण्यासाठी साधारण एक दीड फुटावर अगदी वर पासून खालपर्यंत गाठी बांधलेल्या असतात. ही शिडी लाँच किंवा पडावात पोहोचेल एवढी लांब सडक असते. तिला pilot ladder – पायलट लॅडर असे म्हणतात.

जहाजाच्या पुढचा भाग असतो forward – फॉरवर्ड किंवा bow – बो. हा भाग निमुळता असतो. त्यामुळे जहाजाला पाणी कापणे सोपे जाते. काही जहाजांना याच्या बाहेरच्या बाजूला समोर ढेरपोट दिसावं तसा आकार असतो. त्याला Bulbas bow असं म्हणतात.या बो वर समोरून वेगानं धडकणारे प्रवाह झेलले जाऊन त्याची डाव्या उजव्या बाजूला विभागणी होते. प्रवाहाची शक्ती कमी होते. जहाज सुरळीत पुढे जाऊ शकते.

या फॉरवर्डच्या डाव्या आणि उजव्या भागात जहाजाचे दोन anchor अर्थात नांगर असतात. या अँकरना भली मोठी स्टीलची चेन म्हणजे साखळदंडच असतो.ही चेन गुंडाळणाऱ्या आणि सोडणाऱ्या मोठे दाते असलेल्या मशीनचं जहाजावरचं नाव काय, तर…. विंडलास !
नाव ऐकूनच मी खल्लास !
अहो Lass म्हणजे सुंदर नाजूकशी नवयौवना !
एवढं त्राटिकेसारखं दंताळं असणाऱ्या त्या ओबडधोबड मशीनला wind lass – विंडलास म्हणणं ही रसिकपणाची परिसीमा होती.
मी तिचं मराठीकरण ‘वाऱ्यावरची तरुणी‘ असं करून टाकलं.
जहाजावरच्या अनेक मशीन्सची नावे स्त्रीलिंगी असतात….
असो !

आमची लोकपालक जेट्टीला उभी असल्यामुळे दोन्ही अँकर वरती खेचलेले होते. शिप दोरखंडांनी फॉरवर्ड आणि आफ्टला जेट्टीवरच्या बोलार्डना बांधली होती. त्यामुळे समुद्रावर न नाचता ती बऱ्यापैकी शांतपणे उभी होती.

शिपच्या मागच्या भागाला aft-आफ्ट किंवा Stern-स्टर्न म्हणतात.
इथे खाली जहाजाला गती देणारा पंखा आणि रडार हे भाग असतात. मुकुंद म्हणाले, “हे दोन्हीही आत्ता पाण्याखाली आहेत. dry-doc repairs च्या वेळी सबंध शिप पाण्याबाहेर काढली जाते. तेव्हा तुला ते दिसतील.
एवढी अवाढव्य शिप पाण्याबाहेर कशी काढत असतील याची मी कल्पना सुद्धा करू शकत नव्हते.

जहाजाच्या डाव्या बाजूला port side – पोर्ट साईड तर उजव्या भागाला starboard side म्हणतात. पोर्ट व स्टारबोर्ड या दोन्हीही बाजूंना पायलट लॅडर सोडायची सोय केलेली असते.

शिपच्या मागच्या रुंद भागात खाली इंजिनरूम असते. त्याच्यावरती सर्व ऑफिसर्स आणि क्रू मेंबर्स यांचे ऍकॉमोडेशन अर्थात राहण्याच्या केबिन्स, गॅली,पॅन्ट्री असतात.

तिथेच मागे खूप मोठ्या आकाराची दोन तीन मजले होईल अशी प्रचंड चिमणी अगर धुराडं असतं. इंजिनरूम मधील निरनिराळ्या यंत्रातून अनेक घातक वायू तयार होत असतात. ते बाहेर फेकले जाण्यासाठी हे जहाजाचं प्रचंड मोठं फनेल असतं. मुकुंद माहिती देत होते, “आमच्या मोगल लाईन कंपनीच्या सर्व जहाजांवर काळ्या रंगाचे फनेल असते. त्यावर वरच्या बाजूला लाल आणि पांढऱ्या रंगाचे भले मोठे पट्टे पेंट केलेले असतात, उरलेला सर्व भाग काळा असतो. हे फनेलचे रंग हे आमच्या कंपनीचे emblem – प्रतीकचिन्ह !”

“फनेल वरचे हे पट्टे रेखलेलं प्रतीकचिन्ह समुद्रात दूरवरून सुद्धा दिसून यावं अशा तऱ्हेने काढलेले असते. शिप ज्या कंपनीची आहे त्या कंपनीची ओळख पटवणारं हे चिन्ह असतं. त्यामुळे निरनिराळ्या कंपन्यांच्या फनेलची रंगसंगती वेगवेगळी असते”

जहाजाच्या मधोमध एक खूप उंच असा खांब होता. ही जहाजाची डोलकाठी – main mast !
याच्या उंच टोकावर वेगवेगळे दिवे अतात.तसेच अंधुक वातावरणात दिवे धूसर दिसले तर जहाज जवळ आहे हे समजावं म्हणून याच्यावरून भाॅं… भाॅं…..असा आवाज करणारा भोंगा असतो.

जहाज पोर्ट मध्ये उभं असताना त्याच्या पोर्ट आणि स्टारबोर्ड बाजूचे बाहेरचे दिवे रात्री सुरू असतात.

जहाज समुद्रातून प्रवास करत असताना, किंवा अँकरेज मध्ये थांबलेले असताना, बंदरात जेट्टीवर थांबलेले असताना, अगर यांत्रिक बिघाडामुळे काही वेळा गतिशील होऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना….. थोडक्यात जहाजाच्या वेगवेगळ्या स्थिती प्रमाणे रात्रीच्या वेळी जहाजाच्या फॉरवर्ड, मेनमास्ट आणि आफ्ट वरती कोणत्या रंगाचे, कोणते दिवे लावायचे याचे संकेत ठरलेले असतात.
त्यामुळे दूरच्या जहाजांना ही खूण दिसते. त्याप्रमाणे जरूर तेथे मदत पाठवता येते, अगर इतर जहाजं आपली दिशा व मार्ग त्याप्रमाणे आखतात.

दिवसाच्या उजेडात या मेन मास्टच्या उंच टोकावर काळ्या रंगाचा मोठा ब्लॅकबॉल किंवा डायमंडच्या आकाराचे चिन्ह लावले जाते. ते समुद्रात दुरून दिसू शकते. या रंग व आकारावरून जहाज कोणत्या अवस्थेत आहे ते समजू शकते.

शिपच्या दोन्ही बाजूंना आकड्यासारख्या रचनेत अडकवलेल्या बऱ्याच लाईफ बोट्स असतात. संकट समयी हे आकडे खालच्या दिशेने वळवून लाईफ बोट त्यातून मोकळी करून समुद्रात सोडली जाते. लाईफ बोट सोडायला थोडासा तरी वेळ जरुरी असतो. म्हणून त्याच्या जोडीला तेवढेच life rafts – लाईफ रॅफ्ट्स पण शिपवर असतात. पाण्यावरती हे रॅफ्ट्स पडले की ते आपोआप फुगून मोठे होतात. त्याच्यावरती बरीच माणसं मावू शकतात.

“जहाजावर एकूण जेवढी मनुष्यसंख्या असते त्या प्रत्येकाला लाईफबोटीत जागा मिळू शकेल इतक्या बोटी डाव्या व तेवढ्याच बोटी उजव्या बाजूला अडकवलेल्या असतात.”

मी विचारलं. “कोणत्याही एका बाजूच्या सगळ्या लाईफबोटीत मिळून सर्वजण मावू शकतात.मग 100% क्षमतेच्या बोटी दोन्ही बाजूला कशासाठी हव्यात ?”
मुकुंद म्हणाले, “दुर्दैवाने काही अपघात झाला आणि जहाजाची एक बाजू पाण्यावर कलली तर त्या भागात असलेल्या बोटीत कसं चढणार ? अशा वेळेला सुरक्षित बाजूकडे सर्व माणसांना चढता यावं म्हणून तितक्याच बोटी दोन्हीकडे असतात. जहाजावरच्या प्रत्येकाचा जीव आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. तू टायटॅनिक सिनेमा मध्ये पाहिलेलं आठवतंय का, की माणसं नेण्याची लाईफ बोट्सची क्षमता कमी पडल्यामुळे अनेक प्रवाशांना सुटकेचा मार्ग बंद झाला आणि प्राण गमावावे लागले”

“प्रत्येक लाईफ बोटीत संकटाच्या प्रसंगी किनाऱ्याला लागेपर्यंत आतल्या माणसांसाठी प्रोटीन बिस्किटे, औषधे, इतर जहाजांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोठ्या आवाजाच्या शिट्ट्या प्रत्येक बोटीत ठेवलेल्या असतातंच. अँकर सारखी अत्यावश्यक सर्व यंत्रे या प्रत्येक बोटीत असतात. रात्रीच्या अंधारात किंवा अंधुक उजेडात लाईफ बोट कुठे आहे हे कळावं म्हणून pyrotechnics चा वापर करतात. आपण दिवाळीत बाण उडवतो तसे हे असतात. ते उडवले की बाणा सारखे वर जाऊन त्याचा पिवळा केशरी प्रकाश दिसतो. याचा अर्थ : आम्ही अमुक या ठिकाणी आहोत, संकटात आहोत, मदतीला यावे”

जहाजाच्या विशिष्ट ठिकाणी लागणारे विशिष्ट रंगाचे दिवे किंवा आकाशात दिसणारा हा प्रकाश याचे संकेत जगभरातल्या सर्व जहाजांसाठी सारखेच असतात.

मेन मास्टवर कंपनीचा flag – ध्वज लावलेला असतो. त्याच्या जोडीला ज्या देशात शिप जाते त्या देशाचा ध्वज ही चढवला जातो. ध्वज सूर्योदयाला चढवतात आणि सूर्यास्ताला परत खाली उतरवतात.

जहाजावरच्या प्रत्येक माणसासाठी त्याच्या केबिनमध्ये एक एक लाइफ जॅकेट ठेवलेले असते. त्याच्या बाहेर थोडी लाईफ जॅकेट्स इंजिनरूम, डेक, जहाजावरून बाहेर पडायचे मार्ग, तसेच ब्रिज या ठिकाणीही ठेवलेली असतात.

ब्रिज म्हणजे जहाजाचा सर्वात वरचा मजला. त्याला लागूनच रेडिओ रूम असते.
जहाजाला येणारे व शिप वरून पाठवले जाणारे संदेश तिथल्या यंत्राद्वारे येत जात असतात. हे सर्व काम रेडिओ ऑफिसर करत असतो. त्यासाठी त्याला विविध परीक्षा द्याव्या लागतात. ते सर्टिफिकेट मिळालं की मगच तो रेडिओ ऑफिसर होऊ‌ शकतो.

त्यादिवशी आम्ही सगळ्यात खालच्या डेकवर फिरत होतो. ब्रिज हा जहाजाचा सर्वात उंचावर असलेला शेवटचा मजला. त्याच्याजवळच रेडिओ रूम. मग त्यांना नंतर भेट देऊ असं ठरलं.

हुश्श झालं मला !
या सर्व जागा, रचना, ती यंत्रं, जहाजांच्या दिव्यांचे – रंगांचे संकेत यांची माहिती एका भेटीत कळणं….. इतका अभ्यास एकाच भेटीत करणं….. कठीणंच होतं. त्यातून आठ-दहा मजले चढून परत वर जा, त्यापेक्षा हे छान वाटलं.

“जहाजाच्या सर्व यंत्रणांची, सुरक्षिततेच्या व्यवस्थेची, तसंच या लाईफ बोट्सची, वारंवार तपासणी होत असते.”

“तसंच अत्यंत काळजीपूर्वक fire fighting equipments अर्थात अग्निशामक यंत्रणेची ही सतत तपासणी होत असते.संकट समयी गडबडून न जाता काय काय करायचं त्यासाठी खूप वेळा mock drills घेतल्या जातात. या सर्व यंत्रणांचे ठराविक महिन्यां नंतर survey होत असतात.”

“मालवाहतूक करणं हे मुख्य काम, त्याचे loading unloading, इंजिनरूम मधील सर्व मशीनरी या बरोबरच सुरक्षिततेच्या यंत्रांची ही सर्व जबाबदारी जहाजावरचे सर्व ऑफिसर्स आणि क्रू यांच्यावर असते. इथे अखंड जागरूकताच लागते.”

मुकुंद सांगत होते आणि मी थक्क होऊन ऐकत होते. जहाजाच्या दुनियेत सारंच अजब होतं.

जमिनीवरच्या आपल्या घरी किती गोष्टी आपण गृहीत धरत असतो. इथे प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची किती काळजी घ्यावी लागते याची कधी कल्पनाही केली नव्हती.

जमिनीवर संकटाच्या प्रसंगी अनेक माणसं, वाहनं इतर साधनं सहज जलद मदतीला येऊ शकतात.पण ही मदत समुद्रातल्या जहाजावर चटकन उपलब्ध होऊ शकत नाही. जहाजालाच त्यासाठी स्वयंसिद्ध रहावे लागते.

हे शिपवरचं सारं काम आणि आयुष्य किती आव्हानांनी भरलेलं, कष्टाचं आणि क्षणोक्षणी तुमच्या सावधानतेची परीक्षा पाहणारं आहे याची मला थोडी थोडी जाणीव होऊ लागली होती.
इतकी प्रचंड यंत्रं, त्याची कमालीची गुंतागुंतीची रचना हे सारं ही मंडळी कसं लक्षात ठेवत असतील. इंजिन रूम मध्ये प्रचंड तापमानात चूक न होऊ देता कसं काम करत असतील हे सारंच चकित करणारं होतं.

मुकुंदांच्या बद्दलचा माझा आदर आणि अभिमान क्षणोक्षणी आणखी वाढत चालला होता.
क्रमशः

— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version