“ब्रिज, रेडिओ रूम आणि मंकी आयलँड”
जहाजावर नव्याने काही लोक जॉईन होत होते.काही Sign off करून घरी जात होते. याच सुमारास चीफ ऑफिसरची बायको कलकत्त्याला घरी गेली. अजून कॅप्टन कुठार यांची बायको आणि मुलगा जहाजावरच होते. आमची अधून-मधून भेट व्हायची, गप्पा व्हायच्या. कधी कधी त्यांना मी गप्पा मारायला आमच्या केबिनमध्ये पण बोलवायची.
अनेक दिवसांनी मला अभ्यासाची पुस्तकं उघडायची हुक्की आली. पुस्तकांची ट्रंक उघडली. तर त्यात अभ्यासाच्या पुस्तकांच्या जोडीला आईने दिलेलं कमलाबाई ओगले यांचं रुचिरा हे पुस्तक पण माझ्या हाताला लागलं. आपण ते आणलं आहे हे मी विसरलेच होते.
तसं तर अभ्यासाची पुस्तकं आणलेली आहेत हे ही बऱ्यापैकी विसरायलाच झालं होतं. (पण त्याचे विशेष काही नाही !)
आता विचार करताना खूप आश्चर्य वाटतं की अगदी मनापासून अभ्यासाची आवड असणारी मी…..पण आता असं अचानक काय झालं की M. A. च्या अभ्यासाची आठवणच येईना !
मुकुंदांशी लग्न झाल्यावर माझी मी पूर्णपणे बदलूनच गेले होते. प्रेयसी, पत्नी, गृहिणी या भूमिकांच्यात मी कधी शिरले, त्यांच्याशी एकरूप झाले आणि त्यात विद्यार्थिनी कधी विरघळून गेली ते माझं मलाच कळलं नाही.
रुचिरा पुस्तक पाहिल्याबरोबर लहानपणीच्या असंख्य आठवणी जाग्या झाल्या.
सांगलीत गाव भागात पुढच्या गल्लीत आजीचं घर म्हणजे आईचं माहेर आणि मागच्या गल्लीत आमचं घर होतं.
आजी राहायची त्या वाड्याच्या समोरंच ओगल्यांचा खूप मोठा वाडा होता. आजीच्या घराच्या समोर त्या वाड्याचं प्रवेशद्वार होतं आणि मागचं दार दुसऱ्या रस्त्यावर उघडायचं, इतका मोठा,दोन रस्त्यांच्या मध्ये पसरलेला ऐसपैस वाडा ! कमलाबाई ओगले यांचं हे सासर.
गोर्यापान रंगाच्या, किंचित कुरळ्या केसांच्या, नऊवारी नेसलेल्या कमलाकाकू मला आठवतात.
ओगल्यांचा प्रदीप माझा वर्गमित्र होता. आम्ही प्राथमिक शाळा डॉ बापट बाल शिक्षण मंदिरला ओगल्यांच्या वाड्यातूनच जायचो.
कमलाबाई प्रदीपच्या सगळ्यात मोठ्या काकू. तो त्यांना कमलाकाकू म्हणायचा. त्यामुळे माझ्याही लक्षात तेच नाव राहीलं. कधी कधी त्या आमच्या घरी हळदी-कुंकवाला वगैरे आलेल्या पण आठवतात.
रुचिरा अचानक सापडल्यावर अभ्यास राहिला बाजूला.त्याच पुस्तकाचं वाचन सुरू झालं आणि माझ्या स्वयंपाकघराच्या मागण्या वाढायला लागल्या. माझं हे स्वयंपाकासाठीचं indent फारशी खळखळ न होता मंजूर होत होतं.
एकदा बाजारात गेलो होतो तेव्हा काचेच्या सहा लहान घट्ट झाकणाच्या बरण्या आणि तशाच छोट्या सहा प्लास्टिकच्या बरण्या घेतल्या. माझा तो पसारा बघून आमचा स्टुअर्ड करवालोने चीफ स्टुअर्ड कडून एक मोठी ब्रेड-बॉक्स आणून दिली. त्यात फोडणीचे सर्व साहित्य, तसेच तिखट, मीठ, मसाले भरलेल्या या बरण्या, बाटल्या ठेवल्या. अशा तऱ्हेने माझं फोडणीचं पंचपाळं नव्हे *बारापाळं* सजलं !
करवालोनेच त्यात ठेवण्यासाठी प्लास्टिकचे चार छोटे चमचे आणून दिले. मी बावळटपणाने त्याला विचारलं “ये इतने सारे चम्मच किस लिये?”
त्यानं बहुधा मनातल्या मनात डोक्याला हात लावला असणार आणि मनातंच म्हणाला असणार “इधर तो सब शुरू से शुरू करना पडेगा !”
उघड म्हणाला, “आपको भाजी, दाल बनाते समय जीरा, राई, हलदी, मसाला डालना पडेगा ना, तो ये काम आ जायेगा ! वैसे जीरा राई के लिए एक चम्मच चलेगा. लेकिन मिरची पावडर, मसालों के लिये अलग अलग चम्मच लगते है ना ! नही तो उनकी खुशबू चली जाती है |”
माझ्या मनात करवालो बद्दल प्रचंड आदर दाटून आला. मी खरोखर प्रथमच एकटीने स्वयंपाकाची सुरुवात करणाऱ्या नव्या सुनेला घरातली नोकर मंडळी किती मोठा आधार असतात.
एकदा गावात गेलेले असताना नेहमीप्रमाणे भरपूर चमेली-अबोली यांचे गजरे, थोडीशी भाजी घेतली. त्यात तीन मोठी वांगी पण घेतली. वांगी, सुरण यांचे काप कसे बनवायचे याची कृती पुस्तक चाळताना सहजच वाचली गेली होती. त्यातूनच मोठी वांगी घ्यायची स्फूर्ती मिळाली असावी.
माहेरी घरी वांग्याचे काप कधीतरी व्हायचे.पण स्वयंपाकात माझी मदत म्हणजे भाजी चीर, दाण्याचं कूट कर इतपतंच असायची. ते सुद्धा संध्याकाळी. पण आई पदार्थ कसे करते ते मात्र मी पहात असायची.
मग बाजाराच्या यादीत तांदुळाची पिठी पण सामील झाली. दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणात वांग्याच्या कापांचा बेत ठरला.
सकाळी मुकुंद इंजिनरूमला गेले. अन् मी स्वयंपाकाला लागले. शेजारी रुचिरा ठेऊन कापांची सिद्धता सुरू झाली. कृती वाचताना चुकून पान उलटलं आणि ते परत उलटताना तेलाचा पहिला डाग पानावर पडला. त्याच्या जोडीने छोटा तिखटाचा डाग ही चढला.काचेच्या प्लेटमध्ये तांदुळाची पिठी काढली.पिठीत हिंग, मीठ, तिखट पडलं. चुलीवर तवा चढला आणि सगळे काप तेलावर मस्तपैकी खमंग भाजून घेतले.
लिंबू सरबत घेऊन करवालो आला. कापांचा पहिला नैवेद्य माझ्या या गुरूला दाखवला. त्याला आग्रहाने दोन काप खायला घातले.
“मेमसाब, बहोत टेष्टी बना है” त्यानं सर्टिफिकेट दिलं.
तेवढ्यात सरबत प्यायला मुकुंद केबिनमध्ये आले. “अहो जरा नमुना बघा ना” मी म्हणताच दोन-तीन कापांचा नमुना बघून झाला.
मग एका डिश मध्ये साताठ काप घालून करवालोला कॅप्टनच्या केबिनमध्ये नेऊन द्यायला सांगितले. अगदी एखादा खास पदार्थ केला की आई शेजारी पाठवायची तसंच !
पाच मिनिटात मिसेस कुठारचा फोन आला. तिच्या खास गुजराती पारसी हिंदीत म्हणाली, “वेदवती, इतना बर्हिया (बढिया) बना है ! tasty, crispy, tempting chops ! We literally gobbled them down.”*
संपूर्णपणे एकाहाती केलेल्या पहिल्याच पदार्थाला अशी शेजीबाईची जोरदार दाद ऐकून मस्त वाटलं !
केबिनमध्ये करवालो जेवण घेऊन आला. “आज कौनसी सब्जी है?” मी विचारलं.
“आज सब्जी मे मॅरो और स्प्राऊट का उसल है”.
“ये मॅरो क्या है?“
“वो व्हाईट कद्दू होता है ना, वो”
ना मला मॅरो कळला, ना कद्दू समजला !
१०० मार्कांच्या आमच्या एस एस सी हिंदीत कद्दूशी कधी गाठ पडलेली आठवत नव्हती.
मी कळल्यासारखं बरं म्हटलं.
आपलं भाषांचं ज्ञान किती तोकडं आहे याची मला पदोपदी जाणीव होत होती.
मी बाऊल्स उघडून पाहिले. उसळ मला समजली. पण मॅरो हा नेमका कशाचा अवतार आहे याचा पत्ता लागेना. म्हटलं “जाऊ दे, काय का असेना.” दोन्हीची चव पाहिली, तर ती मात्र एकच !
तुम्ही जर खरंच नशीबवान असाल तरंच जहाजावर तुम्हाला चांगला खानसामा मिळू शकतो.
नाहीतर रामा…. शिवा….. गोविंदा…. यांच्यावरच भरवसा ठेवून जेवायचं !
उसळीचा थोडा कायापालट केला. आपल्या गोडा मसाल्याचा वास सगळ्या डे रूम मध्ये दरवळला.
मुकुंद इंजिन रूम मधून आले.आज जेवणात माझे वांग्याचे काप आणि सुसंस्कारीत उसळ होती.
“मस्त झालंय सगळं” मुकुंद म्हणाले.
“बरं झालं उसळीत मसाला घातलास. नाहीतर हा ‘डेडली मॅरो’ खावा लागला असता.”
माझा सवाल आलाच,
“मॅरो म्हणजे काय ?”
“अगं, दुधी भोपळा !”
बिच्चारा दुधी भोपळा ! त्याचा मॅरो झाल्या बरोबर छानसा हलवा नव्हे,तर *डेडली भाजी* बनायचं त्याच्या नशिबी आलं.
तोच इकडे,
“हे वांगीचं चाॅप्स तर नंबर वन आहे.”
हरी त्याच्या मराठीत तारीफ करून राहिला.
दुपारी मुकुंद परत इंजिन रूमला जायला निघाले.
मी म्हटलं “मी जरा खालच्या डेक वरती चक्कर मारून येते” तर गालात हसून मला म्हणाले,
“जा, पण परत येताना आपली केबिन सापडेल ना ? नाहीतर त्या8 दिवशी सारखं… ‘हरवली आहे. सापडवून देणाऱ्यास बक्षीस !’ असं होईल.” आणि आपणच हसंत सुटले. मग म्हणाले, “त्यापेक्षा दोन जिने उतरलीस की खाली recreation room आहे. चक्कर मारून ये.”
रिक्रिएशन रूम म्हणजे काय ? कोण असतं तिथं ? वगैरे मी विचारायच्या आत हे इंजिनरूम कडे पसार !
मी म्हटलं, “काय बाई तरी ! पहिल्या प्रेमाची इंजिनरूमच प्यारी !”
मग मी मोर्चा दोन मजले खाली recreation room कडे वळवला. दुपारी साडेचारची वेळ असेल. त्या हॉल सारख्या मोठ्या रूम मध्ये हळूच डोकावले. आतून फटाफट बॉल मारल्याचा आवाज येत होता. चहा प्यायला आलेला एक कॅडेट आणि एक फिफ्त इंजिनियर टेबल टेनिस खेळत होते. मला पाहिल्याबरोबर त्यांनी खेळ थांबवला.
“Good evening mam”
“Good evening” वगैरे एकमेकांना सलामी झडली. “आईए, मॅम आप खेलोगी?”
मी म्हटलं “मैं आपका खेल देखूंगी”
जहाजावरच्या मंडळींना खेळ, entertainment यासाठी ही हॉल सारखी स्वतंत्र खोली होती.
कॅडेटनं तत्परतेनं पुढे होऊन सांगितलं, “इधर टेबल टेनिस, कॅरम, कार्ड्स खेल सकते हैं | खेलने का सब समान इस कबर्ड मे रखा हुआ होता है | जब थोडा फ्री टाईम होता है तो हम खेलने के लिए आते है |
एवढ्यात मेस मधून एका स्टुअर्डने आम्हा तिघांच्या साठी तिथेच चहा आणून दिला.
इंजिनीयर म्हणाला,“जब सेलिंग शुरू होगा तब मूव्हीज भी दिखाते हैं | हप्ते मे दो या तीन बार.. |”
“थोडी इंग्लिश, थोडीसी हिंदी मूव्हीज की व्हिडिओ कॅसेट्स हैं | video player, T V सब है इधर | मुव्हीज का टाइम टेबल हमारे पर्सर और रेडिओसाब फिक्स करते हैं | उसका सब typed programme भेजते है |”
“पढने के लिए इधर थोडे बुक्स भी है |”
त्या दोघांनी उत्साहाने सबंध रिक्रिएशन रूमशी माझा परिचय करून दिला. ते ड्युटीला निघून गेले.
पर्सर हे नाव मी पहिल्यांदाच ऐकत होते. मुकुंद केबिनमध्ये आल्याआल्या त्यांना पहिलाच प्रश्न,
“पर्सर हे कोण असतात ? त्यांचं काम काय असतं?”
मुकुंद म्हणाले, सर्व लोकांच्या पगाराचे वाटप करणे हे पर्सरचे महत्त्वाचे काम असते. तो कॅप्टनचा मदतनीस असतो. कॅप्टनला ऑफिसला पाठवायची पत्रे तो टाईप करतो. कॅप्टनकडे शिपच्या किराणा, मंडई म्हणजे provision साठी काही कॅश ऑफिसने दिलेली असते.ती सांभाळणं, त्याचा हिशोब ठेवणं इत्यादी कामं त्याचीच. थोडक्यात शिपाची तिजोरी सांभाळायचं काम पर्सरचं !
तसं पाहिलं तर जहाजाच्या प्रत्यक्ष यंत्रणेशी आणि कामाशी याचा डायरेक्ट संबंध नसतो.
“अच्छा, म्हणजे पर्स सांभाळतो तो पर्सर ! म्हणजे थोडक्यात जहाजाचा मुनीमजी”
मी म्हटलं.
“अरे वा, हुशार आहेस की” मुकुंदांचा चिडवणारा शेरा. शेवटचा की* खास सांगली ढंगाचा !
“लग्न झाल्यापासून हुशार व्हायला जमतंय का ते बघतेय” माझा पलटवार.
आम्ही पती-पत्नीची डिग्री नुकतीच घेतली होती, आता भांडाभांडीची सनद घ्यायचं काम सुरू झालं होतं बहुतेक !
आमच्या केबिनचे दार उघडं होतं. चहा घेऊन येणाऱ्या करवालो बरोबर कॅप्टनचा स्टुअर्ड जोरजोरात हसत, हातवारे करत ऍली वे मधून येत होता. आनंदाने मध्येच एक गिरकी घेतली आणि म्हणाला, “आज चिपिष्टुवर्ड को अच्छा पुडिंग मिला,” तो आनंदात निघून गेला.
मी विचारलं “क्या हुवा ?”
करवालो म्हणाला, “इसका और चिपिष्टुवर्ड का कुछ झगडा हो गया | दोनो कॅप्टनसाब के पास गये | चिपिष्टुवर्ड भी बडा हरामी है | काम बराबर किया तो भी खालीपिली बोंब मारता है |”
“आज कॅप्टनसाब से उसे अच्छा पुडिंग मिला |”
(उच्चारी चिपिष्टुवर्ड म्हणजे लेखी चीफ स्टुअर्ड – chief Steward)
रागावून घेणे अगर ओरडा मिळणे याला त्याने तयार केलेला पुडिंग मिलना हा बहारदार वाक्प्रचार फारच भारी होता. आयुष्यभर मेनू, पुडिंग, केक, बैदाकरी, सूप इत्यादी करण्यात आणि खाऊ घालण्यात बुडून गेलेल्या जहाजावरच्या स्टुअर्डने त्याच्या व्यवसायाच्या भाषेत हिंदी भाषेला एक नवा वाक्प्रचार बहाल करून टाकला होता….
त्यामुळे माझ्या जहाजाच्या शब्दकोशात पण भर पडत चालली होती.
संध्याकाळी आम्ही दोघेही ब्रिजवर गेलो. जहाजाचा ब्रिज ही जहाजाची सर्वात वरची डेक.
इथे मधोमध एक अर्धगोलाकार खोली असते. तिच्या दोन्ही बाजूंना port & starboard sides ना फिरता येतील असे छान डेक असतात. या खोलीतून दोन्ही wingsना – बाजूंना डेकवर जाण्यासाठी दरवाजे असतात. खोलीच्या भिंती चार फूट लाकडी आणि वर संपूर्ण अर्धगोलाकार, पारदर्शक काचेने बनवलेल्या असतात. इथून सर्व समुद्र बऱ्याच दूर अंतरापर्यंत स्वच्छ पाहता यावा म्हणूनच ही अशी रचना केलेली असते.
या खोलीत मधल्या जागी जहाजाला दिशा देणारे wheel – चक्र, सुकाणू असते. त्याला Helm असं ही म्हणतात. म्हणून या खोलीला wheel house असे ही म्हणतात. भिंतींच्या लगत टेबल्स आणि त्यांच्या वरती प्रकाश टाकणारे टेबललॅम्प्स असतात. या टेबलांवर मोठे लांब रुंद नकाशे पसरलेले असतात. त्यांना charts चार्ट्स म्हणतात. जगातल्या सर्व समुद्रांचे, निरनिराळ्या देशांचे, अनेक पोर्ट्सचे charts असतात.
अनेक दर्यावर्दी लोकांनी, शास्त्रज्ञांनी शेकडो वर्षे समुद्र सफरींच्या वेळी केलेल्या निरीक्षणातून, अनुभवातून हे चार्ट्सचं आधुनिक रूप तयार झालं. जगातल्या प्रत्येक समुद्राची खडानखडा माहिती या चार्ट्स वर मिळू शकते. समुद्राची खोली कुठे किती आहे, पाण्यात खाली किती पातळीवर वाळू, खडक इतर काही अडथळे आहेत, कोणते जहाज कोणत्या ठिकाणी बुडालेले होते….. अशा सर्व खुणा या चार्ट्स वर असतात. हे चार्ट्स म्हणजे दर्यावर्दी लोकांचे गीता – भागवतच ! समुद्रात जहाज हाकारले की जहाजाची दिशा ठरवायला तेच मार्गदर्शन करतात.
त्याच्या समोरच भिंतीला लागून radar screens – रडार स्क्रीन्स असतात. वर फिरणाऱ्या रडार कडून पाठवले जाणारे संदेश या स्क्रीनवर प्रक्षेपित होत रहातात. जवळच्या समुद्राची खोली कुठल्या भागात किती आहे,
अजूबाजूला किती अंतरावर कुठली जहाजं उभी आहेत, कोणते जहाज कोणत्या दिशेने येत आहे, ते किती दूर अगर जवळ आहे,
जवळपास पाण्यात खाली कुठे किती मोठे खडक, वाळूची बेटे आहेत…. इत्यादी सर्व माहिती या स्क्रीनवर सतत पाठवली जात असते.
या चार्ट्स, रडार स्क्रीनवरची पिक्चर्स तसेच सूर्याच्या व आकाशस्थ ग्रह गोलांच्या निरीक्षणाच्या मदतीने जहाजाचा course – मार्ग आखला जात असतो.
ही सर्व यंत्रणा, त्या चार्ट्स मधले अत्यंत सूक्ष्म तपशील पाहून खरंच थक्क व्हायला झालं. अनंत पसरलेल्या सागराच्या छाताडावर अभिमानानं किती दर्यावर्दी आपली जहाजं घेऊन हजारो मैलांचा प्रवास करून आले असतील. त्यात किती लोकांनी आपले जीव गमावले असतील. तरीही समुद्र जिंकायची माणसाची इच्छा कमी न होता ते आव्हान सतत पेलत किती साहसी सफरी केल्या असतील, किती अभ्यास केला असेल आणि नंतरच्या पिढ्यांसाठी हे सर्व ज्ञान नकाशांच्या रूपाने कसं पोहोचवलं असेल हे पाहून सर्वच दर्यावर्दी लोकांच्या बाबतीत अत्यंत आदराने मान झुकते.
युनिफॉर्म मधले डेक ऑफिसर्स तेथे काम करत होते.

ब्रिजच्या छताच्या वरती असलेल्या भागाला monkey Island म्हणतात. हा जहाजाचा सर्वात उंचावरचा भाग !
येथे महत्त्वपूर्ण नेव्हिगेशनल आणि कम्युनिकेशन उपकरणे ठेवलेली असतात. त्यात रडार स्कॅनर, सॅटेलाइट अँटेना, सिग्नल लाइट्स आणि चुंबकीय होकायंत्र यांचा समावेश असतो. येथून ३६०-अंशाचे विनाअडथळा दृश्य दिसते. म्हणजे हा जहाजाचा टेहळणी बुरुजच असतो.
त्याच्या एका टोकाला साधारण जहाजाच्या मध्यात येईल अशा भागात जहाजाचा सर्वात उंच खांब main mast – जहाजाची डोलकाठी असते. त्याच्यावर रडार – radar बसविलेले असते. एक सात आठ फूट लांबीची बीम असावी अशी एक फळी सारख्या आकाराची वस्तू तिथे गोल फिरत असते. Electromagnetic waves च्या सहाय्याने आजूबाजूच्या सर्व गोष्टींची चित्रे ती अखंड टिपत असते.
यापूर्वी खालच्या डेक वरून मी खूप लांबून ही डोलकाठी पाहिली होती.आज ब्रिजवर आल्यावर जवळून बघायला मिळाली.आता वरचं रडार स्पष्ट लक्षात येत होतं.
या मेन मास्ट वर जायला एक खडा शिडी सारखा जिना असतो. त्याला मागून चढणाऱ्याला आधार मिळावा म्हणून इंग्रजी C च्या आकाराच्या पट्ट्या थोड्या थोड्या अंतरावर लावलेल्या असतात. माकड झाडावर चढावं तसं या खड्या शिडीवर चढावं लागतं. म्हणून याला मंकी आयलंड म्हणत असावेत. मी लगेच त्याचं मराठी भाषांतर मर्कट भूमी असं करून टाकलं.
या मेन मास्ट पोलवर आपल्या भारताचा तिरंगा डौलाने फडकत होता. कोणत्याही भारतीय कंपनीचं जहाज परदेशात जाते तेव्हा आपल्या तिरंग्याबरोबर त्या देशाचाही ध्वज ही चढवला जातो. हे मला मुकुंदनी सांगितलेलं होतं.
सध्या लोकपालक जेट्टीला उभी होती. ब्रिज वरून समोर पाहिलं तर खाली बंद असलेल्या चार हॅचिस चार पटांगणे दिसावी तशा दिसत होत्या.
सर्व दूर पसरलेलं विशाखापट्टण बंदर किंवा जहाजाच्या भाषेत Vijag – वायझॅक – पोर्ट नजरेच्या टप्प्यात येत होतं. डावीकडे अथांग पसरलेला समुद्र दिसत होता. ऑक्टोबर संपत आला होता. समुद्र शांत होता. पण थंडी अशी नव्हतीच.
ब्रिजच्या बाहेर येऊन डेकवर उभे राहिलो. समुद्राचा भळाळता वारा सगळीकडे पिंगा घालत होता. अजूनही समुद्राकडून जमिनीकडे खारेवारे वाहत होते. मुकुंद म्हणाले अजूनी रात्र वाढली की जमिनीकडून समुद्राकडे वारे वाहू लागतील. ओ हो…. हे तर खारेवारे आणि मतलई वारे ! शाळेतला भूगोल एकदम आठवला.
दिवसा वाहतात ते खारेवारे-sea winds आणि रात्री वाहतात ते मतलई वारे- land winds ! तिथे शिकलेलं आता प्रत्यक्ष अनुभवाला येत होतं.
संध्याकाळ होत आली होती. आकाशाचा रंग लालसर केशरी झाला होता. थोड्या वेळातच अंधार होऊ लागला, एखादी चांदणी चमकायला लागली. तसे आजूबाजूच्या सर्व जहाजांवरचे दिवे उजळले. त्या संधी प्रकाशात दूर दूर उभ्या असणाऱ्या शिप्स फार मोहक दिसत होत्या, जसे दिव्यांचे गजरे माळलेल्या जलपऱ्याच !
जवळच रेडिओ रूम होती. रेडिओ ऑफिसर जहाजाला येणारे मेसेज घेत होते आणि जहाजाचे मेसेजेस पाठवत होते. त्यांचं काम सुरू होते. त्या यंत्राचा कट्ट कडकट्ट असा आवाज येत होता.
बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्याचं त्या काळी जहाजावर हेच एकमेव महत्त्वाचं साधन होतं. जहाज फोनच्या रेंजमध्ये असेल तरच VHF – very high frequency ही यंत्रणा उपयोगात यायची. म्हणजे जहाज जेट्टीला अगर किनाऱ्याच्या जवळच अँकरंजमध्ये असेल तरच या व्ही एच एफ वर बोलता येत असे. ते बोलणं आजूबाजूच्या सर्व जहाजांना ऐकू जात असे. एरवी संपूर्ण भरोसा फक्त रेडिओ मेसेज वर ! त्यावेळी मोबाईल फोन वगैरे तर स्वप्नातही नव्हते.
तेवढ्यात रेडिओ ऑफिसर म्हणाले, “आता हेच मेसेज आलाय की तीन-चार दिवसात आपल्याला कलकत्त्याला जावं लागणार आहे. तिथे कंपनीने repairs, surveys arrange केले आहेत.”
आम्ही दोघे खाली केबिन मध्ये आलो. जेवायच्या वेळी मुकुंद आणि हरीचं बोलणं सुरू होतं. जहाजाचे रिपेअर्स, सगळे मोठे, महत्त्वाचे सर्व्हैज होणार असं काहीतरी चाललं होतं. आज ते दोघे फक्त सर्व्हे, रिपेअर यातच गुंगलेले होते. जेवणाकडे त्यांचे लक्षच नव्हतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेवायच्या आधी मी मिसेस कुठारना भेटायला गेले. कॅप्टन साहेब वर ब्रिजवर गेले होते. आम्ही दोघी गप्पा मारत होतो. त्या म्हणाल्या, “वेदवती हम बॉम्बे निकल रहे हैं | इधर से ही वापस जायेंगे | Now these people will be busy with surveys. We will be leaving by train.We will miss you”
जेवायच्या वेळी मी मिसेस कुठार आणि त्यांचा मुलगा परत मुंबईला निघाले आहेत हे मुकुंदाना सांगितलं. मुकुंद एकदम मला म्हणाले, “आता जहाज कलकत्त्याला जाणार. मी कामात प्रचंड गुंतलेला असणार आहे. काही वेळेला रात्रभर सुद्धा कामे चालतात. तुला दहाएक दिवस मुंबईला जाऊन यायचं असेल तर ये, कारण तू इथे खूप कंटाळशील. मिसेस कुठार निघाल्या आहेत. त्यांच्याबरोबर तुला जाता येईल. सोबत आहे म्हणूनच जायला हरकत नाही.”
“जहाजाच्या sailing च्या आधी तू परत join हो. त्यावेळी शिपवर काही ऑफिसर्स जॉईन होणार आहेत त्यांच्याबरोबर तुला येता येईल. कंपनीला कळवून तशी मी व्यवस्था करतो.”
हे सारं माझ्यासाठी फारच अनपेक्षित होतं. घरी दहा दिवस जाऊन यायची आयडिया मस्तच होती, पण मुकुंदाना सोडून…. ?
एक मन वृंदा, दादा, वहिनींच्या कडे पण ओढत होतं, जमलं तर आई-बाबा प्रसन्नदादा अतुल यांना भेटायची प्रचंड ओढ होती.
जहाजावर signing on आणि signing off हे कसं अचानक ठरत असतं त्याची पहिली झलक मी अनुभवत होते.
शेवटी मुंबईला मी जाऊन यायचं ठरलं. त्या कामाच्या धबडग्यात मी घरी जाऊन येणंच योग्य होतं. एकीकडे घरी जायची उत्सुकता आणि मुकुंदांना सोडून राहायची व्याकुळता यात मन हेलकावायला लागलं. आणि शेवटी जायचा बेत नक्की झाला.
मुकुंद स्टेशन वर पोचवायला आले होतेच. मिसेस कुठार बरोबर मी ट्रेनमध्ये चढले. माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. जड मनाने आम्ही एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवला होता. गाडी हालली, हात सोडून बाय बाय केलं. दहा दिवसात परत येतेच असं सांगून मुंबईच्या दिशेने निघाले…..!
मिसेस कुठार हळूच गालात हसल्या. माझ्या पाठीवर खूप प्रेमाने थोपटत म्हणाल्या, “बस अभी दस दिन में साहब के पास वापस आ जाओगी | यह तो सुरुवात है | जब छे…..छे महिना वेट करना पडता है…..”
तिचे पुढचे शब्द गाडीच्या धडधड आवाजात विरून गेले.
क्रमशः
— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 98694 84800