राजधानी शिलाँग येथून सकाळी प्रवासाला सुरुवात करून काझिरंगा अभयारण्य दर्शनासाठी पुन्हा आसाम राज्यात प्रवेश केला.वाटेत रिफ्रेशो फूड कोर्ट मध्ये स्थानिक पालेभाज्यांची रेलचेल असलेल्या काशाच्या ताटवाटीत आसामी थाळीचा यथेच्छ आस्वाद घेतला.पुढे रस्त्यालगत उजव्या दिशेस नुकतेच बांधलेले महामृत्युंजय मंदिराचे दर्शन सहल दौऱ्यात नसूनही गाईड सुबोधने घडवले. अवाढव्य महादेवाच्या पिंडीच्या आकारात असलेले हे मंदिर खरेच प्रेक्षणीय आहे. सायंकाळी आम्ही नऊ जोडपे काझिरंगा येथील धनश्री रिसोर्ट मध्ये दोन दिवसाच्या मुक्कामासाठी पोहोचलो.

पहाटे चार वाजता एलिफंट सफारी साठी रवाना झालो. एका हत्तीवर दोन जोड्या याप्रमाणे थंड वातावरणात प्रथम आम्हाला एकशिंगी गेंड्याचा चरणारा कळप दिसला.सुमारे वीस हत्तीच्या सफरीवरून फिरणाऱ्या आमच्या समूहाची त्या गेंड्यांना बिलकुल फिकीर नव्हती.ते सारे गवत चरण्यात मग्न होते.पुढे हरणांचा कळप तर प्रातःकाळी विविध पक्षांची किलबिल ऐकत व बघत मन प्रसन्न झाले.पण वाघोबाचे दर्शन झाले नाही. रिसोर्ट वर परतून निवांत जलतरण व नाश्ता करून थोडी विश्रांती घेतली.
विश्रांतीनंतर काझिरंगा नॅशनल ऑर्किड व बायो डायवर्सिटी पार्क दुर्गापूर येथे भारतातल्या सर्वात मोठ्या ऑर्किड गार्डन ला भेट दिली. येथे देश विदेशातील सुमारे दोन हजार ऑर्किड जतन केलेले आहे.येथे माती शिवाय जगणारे म्हणजे ईपीफायटिक तर मातीत येणारे टेरेस्ट्रियल ऑर्किड पाहिले.प्रामुख्याने पांढऱ्या रंगाचे सुवासिक अल्बा ऑर्किड, व्हेनीला, चॉकलेट वासाचे ऑर्किड तसेच ६ ते ३६ अंश सेल्सिअस वातावरणात तग धरणारे विविध रंग व आकाराच्या फुलांचे ऑर्किड संग्रहालय खरेच सुंदर आहे. येथे आसामी जीवनशैलीच्या विविध दालनाची सविस्तर माहिती मिळाली.आसामी सिल्क हातमाग उत्पादन, विविध आकारांची व फुलांची कॅक्टस,विविध प्रकारची बांबू लागवड, औषधी व भाजीपाला लागवड पहायला मिळाली.येथे उत्पादित सेंद्रिय भाजीपाल्याची आसामी बाहुबली थाळी ज्यात सुमारे अठरा अन्न प्रकारांचा यथेच्छ आस्वाद घेतला.येथेही भेटवस्तू व कपडे विक्रीस उपलब्ध होते. येथून आम्ही जिप्सीने पुन्हा काझिरंगा सफारीस रवाना झालो.
अभयारण्यात प्रवेश करताच गवत चारणारे एक शिंगी गेंड्याचे व हत्तीचे कळप नजरेस पडले.पुढे हरणाच्या कळपात काही खाली बैठक मारून रवंथ करत होते,तर काही शेपटी हलवत आजुबाजूला नजर ठेवत चरत होते.लांब अंतरावर बावरलेले रानटी डुक्कर धावत होते.
एक घोरपड उन्हात निवांत पहुडलेली होती.वेगवेगळ्या पक्षांची किलबिल कानावर येत होती.मात्र का कोण जाणे या वेळीही वाघोबानी दर्शन दिलेच नाही. जंगलचा राजाच तो,त्याची मर्जी !. असो. तासाभराची सफारी करून रिसोर्ट वर परतलो.
सायंकाळी स्थानिक कृषक मुक्ती संग्राम आसाम झंकार संस्थेने आयोजित केलेला सांस्कृतिक कार्यक्रम पहायला गेलो. पारंपारिक वेशात सुमारे वीस तरुण तरुणींनी सवाद्य दोन तास खालील नृत्ये सादर केली.
१.भूरटल नृत्य
२.एका मुलाने विविध अवताराचे समर्पक हावभाव दाखवत सादर केलेले विष्णू व दशावताराचे नृत्य सर्वांची दाद मिळवून गेले.
३.बोडो बोगुरुम्बा नृत्यातून फुलपाखरू नाच सादर केला.
४.राभा हमजर नृत्य
५.माती अखरा नृत्यातून पुन्हा त्या एकट्या मुलाने विविध योगा प्रकाराचे सादरीकरण करताना पडलालित्य व ताल बोलाचा समन्वय राखला.
६.तीवा नृत्यातून थाळी नृत्य दाखवले गेले.
७.काळा पेहराव व मोकळे सोडलेले केस अन् उग्र चेहऱ्यानं मुलीनी सादर केलेलं भयानक देवधनी नृत्य लक्षवेधक होते.
८.मिसिंग डान्स
९.कारबी बांबू नृत्यातून भात उत्पादन लागवड, कापणी, कांडणी,उफननी कामकाजाचे दर्शन घडवले.
१०.वसंत, माघ हंगामात सादर केले जाणारे बिहू नृत्य सादरीकरणानंतर हा कार्यक्रम संपन्न झाला.कोणताही अंग विक्षेप न करता सामाजिक, सांस्कृतिक आसामी सात्विक संदेश देणारा हा कार्यक्रम मनावर छाप उठवून गेला.रात्री रिसोर्ट वर या साऱ्या आठवणी मनात साठवत मुक्काम केला.
क्रमशः २
— लेखन : संजय फडतरे. पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 98694 84800