माझ्या जहाजाच्या जीवनावरील मालिकेला मी सुरुवात केली आहे. पहिला भाग आपल्या सर्वांच्या पसंतीला उतरला. त्याला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलात. अजूनही अनेक लोकांकडून मेसेज, फोन येत असतात. हे सर्व पाहून माझं मन भरून आलं. खूप आनंद झाला आणि आपली जबाबदारी वाढत चाललीय याची जाणीव झाली. तुम्हा रसिक वाचकांचे प्रेम ही माझ्यासाठी लिहिण्याची ऊर्जा आहे. तुम्हा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देते. माझ्या हातून चांगलं आणि योग्य लेखन होऊ दे ही गुरुमाऊलीला विनंती करते. ☘️🪷🙏
आज पुढचा दुसरा भाग लिहिण्याऐवजी सध्याच्या युद्ध परिस्थितीत माझे अनुभव मागे वळून न्याहाळताना मनात आलेले विचार तुमच्यासमोर मांडावेत असं वाटलं. म्हणून आजच्या लेखाचा हा थोडासा वेगळा प्रयत्न.
रसिक वाचक हो,
आज इराण, इजरायल आणि अमेरिका यांच्यात मध्यपूर्वेमध्ये जे महासंहारक, भयानक युद्ध सुरू आहे त्यानं आपण सगळेच फार अस्वस्थ झालो आहोत. सध्या काही दिवसांसाठी युद्ध थांबलंय खरं, पण हा भेसूर, भीषण संहार, आगीच्या ज्वालांचं तांडव, आगीच्या भक्षस्थानी पडून बेचिराख झालेली गावं, उजाडलेले संसार, अनाथ झालेली मुलं आणि सर्वांच्या डोक्यावर लटकणारी भीषण प्रलयंकारी युद्धाची तलवार हे सारंच फार भयावह आहे.
या आखाती देशांचे काही भाग अनेक वर्षांपूर्वी मी १९८३ साली जहाजातून पाहिले आहेत.
ही गोष्ट आहे, त्या आधीची, सुमारे चव्वेचाळीस वर्षांपूर्वीची….
साल १९८१.
माझ्या मोठ्या मुलीच्या वेळी मी सांगलीत बाळंतीण होते. माझ्या आई-बाबांकडे होते. माझे पती मुकुंद त्यावेळी मर्चंट नेव्ही मध्ये चीफ इंजिनियर म्हणून काम करत होते. मोगल लाईन या जहाजाच्या कंपनीत ते नोकरीला होते.ऋताच्या जन्माच्या वेळी त्यांचं पोस्टिंग लोक सहाय्यक या कार्गो शिप वर होतं.
आज ज्या खर्ग आयलँड वर बॉम्बिंग होऊन ते जवळजवळ नष्ट होतंय की काय, अशा बातम्या आपण दूरदर्शन वर पहात आहोत,त्याच बंदरात मुकुंदांचं जहाज त्यावेळी होतं.
त्यावेळी मोबाईल फोन वगैरे नव्हते. जहाजावर फोन करण्याची सोय नव्हती. त्यामुळे ख्यालीखुशाली फक्त पत्रामार्फतच कळायची.
मुकुंदांचं मला पत्र आलं की….
इराणच्या वाॅरझोन मधून आम्ही जात आहोत. जहाजात सल्फर हा अतिशय डेंजरस, ज्वालाग्रही असा कार्गो घेऊन आम्ही जात आहोत. जवळून रोज एक दोन बॉम्बेर्स जातात. एका दुसऱ्या कंपनीच्या जहाजाला बॉम्ब लागून त्यात एक इंजिनियर मारला गेला. इथून पुढे आम्ही हा कार्गो घेऊन युरोप कडे निघालो आहोत.
ही सारी वर्णनं वाचताना अक्षरशः धडकी भरायची.
आम्हाला मुलगी झाली आहे. आपलं पहिलं बाळ जन्माला आलं आहे ही बातमी देणारं पत्र सुद्धा मुकुंदाना ऋताच्या जन्मानंतर वीस दिवसांनी मिळालं. ते सुद्धा या बातमीची उत्कंठेने वाट बघत होते. पण ती बातमी पोहोचायला सुद्धा बाळाच्या जन्मानंतर इतका उशीर लागला.
त्यानंतर सुमारे महिन्याभरात दुर्दैवाने युरोपमध्ये पोस्ट खात्याचा संप सुरू झाला. “खर्ग आयलँड आणि इराणच्या वॉर झोन मधून आम्ही जात आहोत” हे सांगणाऱ्या पत्रानंतर मुकुंदांचे कोणतेही पत्र मला मिळू शकले नाही.
त्यावेळी नेमकं पुढच्या तीन महिन्यात जहाजावरुन कोणीही रजेसाठी उतरणारं नव्हतं. त्यामुळे जहाजातून रिलीव्ह होऊन रजेवर येणाऱ्या बरोबर जहाजातून दिलेली पत्रं मिळणं हे ही होऊ शकलं नाही.
मुकुंदांची कोणतीही ख्यालीखुशाली मला समजू शकत नव्हती. तीन महिन्याची माझी पिटुकली ऋता, हातात घेऊन भविष्यात काय वाढून ठेवलं आहे याची चिंताच माझं अस्तित्व व्यापून राहिली होती.
मुकुंदांच्या कंपनीला मी अधून मधून फोन करत होते. त्याकाळी लँडलाईन फोन पण क्वचितच एखाद्याच्या घरी असे. माझ्या आई – बाबांकडे फोन नव्हता. बाबांच्या घराच्या पुढच्या गल्लीत एकांच्या घरी फोन होता. तिथून फोन करायला मिळत होतं.
घरात सासरी दिराचं लग्न होतं. लग्नात जेवायच्या वेळेपर्यंत तरी आम्ही मुकुंदाना नक्की पोहोचवू असे कंपनीने सांगितले होते. त्यासाठी मुकुंदांच्या ऑफिसने खूप प्रयत्नही चालवले होते.
पण वेळच अशी आली होती की त्यांची शिप बाहेर मध्य समुद्रात अँकरेज मध्ये अडकली होती. त्यांचा रिलिव्हर तिथे वेळेत जाऊ शकला नाही. जहाज किनाऱ्याला आल्यावरच मुकुंद आम्हाला फोन करू शकणार होते.
पण या सगळ्याची आम्हाला कुठलीही बातमी किंवा कोणताही तपशील कळूच शकत नव्हता. युरोपातल्या पोस्टाच्या संपामुळे मुकुंद नेमके कुठे आहेत समजत नव्हतं. त्यांचा कुठलाही फोन, निरोप, पत्र काहीही मिळू शकलं नाही.
मग मात्र माझा धीर सुटला. भर मांडवात मी खूप रडले. माझ्या सासू-सासर्यांना माझ्या मनाची अवस्था समजत होती. पण ते लग्नाच्या गडबडीत होते. मी रडले यासाठी मी घरातल्या इतरांकडून भरपूर बोलणीही खाल्ली.
पण वयाच्या 24 व्या वर्षी तीन महिन्याच्या बाळाला घेऊन माझ्या पुढे काय मांडून ठेवलं आहे, या विचाराने मला ब्रम्हांड आठवत होतं. या जीवघेण्या प्रतिक्षेत मुकुंद येईपर्यंत आपण कशा राहू शकू असं वाटत होतं. मला माझे आई-बाबा, भाऊ धीर देत होते. सांभाळत होते.
लग्नाची जेवणं वगैरे संपवून वर्हाडी परत निघाले. त्यावेळी शेवटी एकदा कार्यालयात मुकुंदांचा फोन लागला. त्यांचे काका त्यांच्याशी फोनवर बोलले. मुकुंद म्हणालेलं मला एवढंच समजलं की,
मी जहाजावरून रिलीव्ह होऊन रजेवर आलो आहे. मद्रास इथे पोहोचलो आहे आणि दोन दिवसात घरी येत आहे.
माझं तर सगळं अस्तित्वच सुन्न होऊन गेलं होतं. मुकुंदांच्या त्या निरोपाने मरणाऱ्याला संजीवनी मिळावी तसं मला झालं.
मुकुंद घरी परत आले तेंव्हा युरोप मधला संप मिटला होता. त्यानंतर त्यांनी युरोप मधून पोस्टाने पाठविलेली खुशालीची चार-पाच पत्रे मला एकत्र मिळाली.
आज आखाती देशात युद्ध पेटलं आहे. बॉंबच्या वर्षावात, आगीच्या तांडवात शहरंच्या शहरं जळून खाक होत आहेत. बंदरांवर बॉम्बिंग होत आहे. बंदरात अडकलेल्या जहाजांच्या, ऑइल टँकर्सवरच्या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या घरातल्यांची काय मनस्थिती असेल याची मी पूर्ण कल्पना करू शकते.
डोळ्यात प्राण आणून आपला नवरा सुरक्षित घरी कधी येईल याच्या वाटेकडे त्यांच्या बायका डोळे लावून बसलेल्या असतील. चिल्ली-पिल्ली मुलं आपले वडील घरी कधी येतील त्याची वाट बघत असतील. प्रतिक्षेच्या जीवघेण्या यातना त्या कशा सहन करत असतील हे मी समजू शकते.

हे युद्ध लवकर थांबू दे, सर्व जहाजं सुखरूप बाहेर पडून त्यातील सर्व खलाशी, ऑफिसर्स आपापल्या घरी सुखरूप पोहोचू देत. आपली बायका-मुलं, आई-वडील यांच्याबरोबर सुखात, सुरक्षित राहू देत. एवढीच मी परमेश्वरा जवळ प्रार्थना करत आहे.
साल १९८३
आता मुकुंदांच्या बरोबर मी आणि छोटी ऋता जहाजावर प्रवास करू शकत होतो. ऋता दोन वर्षांची होती. जनप्रिया नावाच्या कार्गो शिप वर आम्ही होतो.

इजिप्त आणि इजरायल यांच्या मधून जाणाऱ्या सुवेझ कालव्यातून पुढे जायचे होते. अरबी समुद्रातून लाल समुद्रात शिरायचं, मग लाल समुद्र आणि भूमध्य समुद्र म्हणजेच मेडिटराॅनियन सी यांना सुवेझचा कालवा जोडतो. युरोपकडे यूजाण्यासाठी सात हजार किलोमीटर अंतर यामुळे वाचते. मोठी मोठी जहाजे या कालव्यातून सहज प्रवास करतात. मानवी बुद्धिमत्ता आणि प्रयत्न यांचा सुवेझचा कालवा हे एक मानचिन्ह आहे.

आमची जनप्रिया ही शिप सुवेझ मधून जात होती वेळेला सुद्धा सुवेझच्या दोन्ही बाजूला किनाऱ्याला वाळूच्या पोत्यांची रचलेली बॅरीकेड्स दिसत होती. आधी झालेल्या युद्धांच्या खुणा, पोत्यात घुसलेल्या बंदुकीच्या निशाणी स्पष्ट दिसत होत्या.
सुवेझ पार करून मेडिटरानियन म्हणजेच भूमध्य समुद्रात जहाज शिरलं. ग्रीक पुराणकथां मधल्या देवी देवतांचे आवडतं निवासस्थान. ग्रीक पुराणातल्या, त्यांच्या जुन्या साहित्यातल्या अनेक दंतकथा, कथा या भागाशी निगडित आहेत.
यातले अनेक भाग आज युद्धामध्ये आगीच्या ज्वालात लपेटले जात आहेत हे पाहून मनाला अतिशय त्रास होतो.
कशासाठी ही युद्धं, हे वैर ?
परमेश्वराने दिलेल्या या साधन संपत्तीचा आणि बुद्धिमत्तेचा उपयोग मनुष्य जातीच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी न करता हा विध्वंस करावा असं का वाटतं ?
कमालीचा स्वार्थ, अहंकार, अलोट संपत्तीची आणि सत्तेची अचाट हाव आणि राक्षसी महत्त्वाकांक्षा यातून माणसं कधीच बाहेर पडणार नाहीत का ?
हे प्रश्न कधीच न संपणारे आहेत. महाभारतीय युद्धातला संहार, वैर, मूल्यांची धूळधाण बघून हतबल झालेल्या व्यासांसारख्या महर्षींना सुद्धा ज्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकलं नाही, तिथं माझ्यासारखी एक सामान्य स्त्री काय विचारणार आणि विचार करणार ?
युद्धे, माणसं आणि साधन-संपत्तीचा संहार, निसर्गाचा ऱ्हास, दहशतवाद हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत नाहीत….. कोणतेही प्रश्न सोडवू शकत नाहीत.
सहिष्णुता, बंधुता, विवेक, सामंजस्य, प्रेम, करुणा यांनीच केवळ वैर थांबू शकते. मानवी जीवन आनंदमय, प्रगतिशील होऊ शकतं.
ज्ञानोबा माऊलींनी म्हटल्याप्रमाणे..,
जे खळांची व्यंकटी सांडो |
तया सत्कर्मी रति वाढो |
भूता परस्परे पडो |
मैत्र जीवांचे ||
…. अशी सर्व मानव जातया
मैत्र जीवांचे व्हावी,
वसुधैव कुटुंबकम् |
याची ओढ आणि जाण सर्वांना यावी,
फक्त याचसाठी
सर्वांना सद्बुद्धी लाभू दे.
युद्ध थांबू दे, संपून जाऊ दे.
जगात आनंद, प्रेम, शांतता नांदू दे.
एवढंच मागणं मागण्यासाठी परमेश्वरा पुढे पदर पसरते.

— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
