Tuesday, January 14, 2025
Homeलेखमाझी दंतकथा

माझी दंतकथा

दाताचे दुखणे म्हणजे अतिशय अवघड! असे मी बर्‍याचदा ऐकलेले आणि प्रत्यक्षात पाहिलेलेदेखील !
अनेक दिवाळी अंकात दातांच्या डाॅक्टरांवर विनोद देखील वाचलेला की दाताच्या दवाखान्यातील आतील पेशंटचे ओरडणे ऐकून बाहेरील पेशंट पसार झाले. असे एक ना अनेक विनोद – – –
काही दिवसांपूर्वी माझ्या नातवाची दाढ सुजल्याने ती दुखू लागली (चाॅकलेटचा परीणाम). माझी एक स्टुडंट दाताची डाॅक्टर आहे म्हणून मुलाला आणि सुनेला सांगितले नातवाला घेऊन तिच्याकडे जा. मी घरीच होते. काही वेळाने मुलाचा फोन आला, “आई दवाखान्यात ये.” मी जरा अस्वस्थतेनेच दाताच्या दवाखान्यात गेले ; तर माझी स्टुडंट म्हणाली, “मिस मुलाचे रडणे ऐकून तुमच्या सुनेला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. तिला समोरील दवाखान्यात ॲडमीट केले आहे.”
सुनेला रक्त बघितले तरी चक्कर येते. पळत दवाखान्यात गेले तर तिला सलाईन लावले होते. ते बघून चक्कर यायची पाळी माझ्यावर आली. काही वेळाने तिला बरे वाटू लागले आणि आम्ही घरी आलो. त्यामुळे दाताचा विषय निघाला की पोटात खड्डा पडतो.

अश्यात गेले पंधरा दिवस माझी हिरडी सुजलेली दिसू लागली. वाटले दिवाळीच्या फराळातील करंज्या सकाळ संध्याकाळ चहा मलाई बरोबर खाल्ल्याने असेल कदाचित! पण सूज जास्त दिसू लागली. आता रिस्क नको म्हणून डाॅक्टरकडे गेलेच पाहिजे, असे वाटले. पण जायचे कुणाकडे ? आणि एकदम आठवले वीस वर्षांपूर्वी अपना बझारच्या पुढे डाॅ. देशमुख यांचा तुपेच्या गिरणी जवळ दातांचा दवाखाना होता. त्यावेळी मी आणि माझे पती त्यांच्याकडेच ट्रिटमेंट घेत असू. उंच, शेलाटे असे! बोलण्यात मात्र अतिशय मजेशीर.

डाॅक्टर माफक दरामध्ये पेंशटला बघत असत. माझे मिस्टर अतिशय अबोल (आता घूमे म्हटले की राग येईल 😜) असे . माझी मात्र सारखी बडबड. देशमुख डाॅक्टर म्हणत मॅडम बिचार्‍याला तुम्ही बोलूच देत नाही. नेहमी माझी चेष्टा आणि मिस्टरांची बाजू घेत. अतिशय सुस्वभावी सर्वांबरोबरच हसत बोलत त्यांची ट्रिटमेंट चाले.. त्यांच्या दवाखान्यात सावळ्या रंगाच्या अगदी साध्या अशा रिसेप्शनिस्ट होत्या. त्याही अगदी अगत्याने बोलणार्‍या! त्यामुळे दवाखाना लहान असून देखील नेहमी भरलेला असे. डाक्टरांनी कधी व्यवहार पाहिला नाही. पूर्वी डाॅक्टरांना देव मानत. त्याच कुळातील देशमुख डाॅक्टर.

हल्ली त्यांनी प्रॅक्टीस बंद केली आहे. त्यांची मुले देखील दाताचेच डाॅक्टर झालेत. हे मला माहित होते. चार वर्षापूर्वी मी त्यांच्याकडून दाताची कॅप बसवून घेतली होती. आताही त्यांच्याकडेच जावे असे ठरवून मी गेले. डाॅ. प्रसाद यांनी हिरडी चेक करून काही औषधे देऊन तिसऱ्या दिवशी बोलविले. तिसऱ्या दिवशी एक्सरे काढला तर कळाले की दाढेला आतपर्यंत क्रॅक गेला आहे. अश्यात कॅप घालता येणार नाही. दाढ काढून नंतर काय करायचे ते बघू. दाढ काढायची म्हटल्याबरोबर माझ्या समोर छिन्नी हातोडा घेतलेला हात दिसू लागला. पक्कड दिसू लागली. एका घावात ते दाढ काढतील किंवा पक्कडने ओढतील (उपसतील) रक्ताची चिरकांडी उडेल – –
नाही नाही ते विचार येऊ लागले. मी डाॅक्टरांना विचारले डाॅक्टर, दाढ काढताना दुखेल का हो ? प्रसाद डाॅक्टर म्हणाले, नाही दुखणार ! आपण इंजेक्शन देऊन ती जागा बधीर करू. काही वेळ थांबू नंतरच दाढ काढू. औषधे घेऊन मी घरी आले.

दाढ काढायची ? काढू की नको ? हे द्वंद्व मनात चालू झाले. दाढ किती आत पर्यंत असते. आपण दवाखान्यातील फोटोत पहातोच. . रक्ताची धार लागेल. त्यात मला हाय बी पी. जर बी पी वाढला तर? कारण डाॅक्टरांनी बी पी चे कोणते औषध घेता मला विचारलेले. म्हणजे बी पी वाल्यांना त्रास होतो का? अशी शंका आली ? सून म्हणाली, “आई मनाची तयारी करून जा म्हणजे त्रास होणार नाही.” नवर्‍याची दाढ अगोदरच काढलेली. त्यांना विचारले दाढ काढताना दुखते का हो ? ते म्हणाले, “छे छे ! अजिबात दुखत नाही पण मला त्यांची सवय माहित आहे. (एखाद्याची कशी जिरवायची हे त्यांच्या कडून शिकावे.)

मुलाचीही दाढ काढलेली. त्याला विचारले परवेझ तुझी दाढ काढताना तुला दुखले का रे ? तो म्हणाला, “अम्मी माझी दाढ काढताना खूप त्रास झाला (कन्या राशीचा)
एकमन म्हणे ‘नको’. दुसरा विचार येई, ‘जास्त वाढण्यापेक्षा काढलेली बरी’. डाॅक्टर म्हणाले होते, कुणाला तरी बरोबर घेऊन या. दाढ काढल्यावर तुम्हाला बोलता येणार नाही. (आली का पंचायत न बोलता किती वेळ रहायचे?)
माझी मुलगी तशी खूप समजूतदार. ती म्हणाली, “आई मी येते तुझ्याबरोबर.”
माझ्या मनाची मी अशी तयारी करू लागले. जणू दाढ काढायला नाही लढाईवर मी निघाले. ( बी पी वाढून खूर्चीतच जर अटॅक आला तर ! मन चिंती ते वैरीही न चिंती)

आज २९ सकाळी ११ ची अपाॅंटमेंन्ट होती, तरी पोहचता पोहचता साडे अकरा झालेच. (तेवढीच उसंत)
डाक्टरांनी आत बोलावले मी परत विचारले, “डाक्टर दुखणार तर नाही ना ?” “अहो, नाही.” असे डाक्टर म्हणत त्यांनी मला खूर्चीत बसायला सांगितले. गालात आणि हिरडीत इंजेक्शन्स दिले काही क्षणातच गाल, जिभ बधीर होऊ लागली. पाच दहा मिनिटात त्यांनी त्यांच्या हत्याराचा ट्रे समोर घेतला.
लहान स्टीलचा राॅड पाहून माझे डोळे विस्फारले मला परत छिन्नी हातोडा दिसू लागला. मी डोळेच बंद केले ते बघायला ही नको आणि घाबरायला ही नको. संवेदनाहीन हिरडीवर त्यांचे काम सुरू झाले.
दाढ काढता काढता डाॅक्टर आपल्या स्टाफ बरोबर बोलत होते. काही वेळातच म्हणाले ,” दाढ काढली.”

मी डोळे उघडले तर त्यांच्या हातात दोरा पाहिला.. दोन की तीन टाके घालावे लागतील म्हणाले. मी परत डोळे मिटले. काही मिनटात टाकेही घातले. औषध लावून बोळा दाढेवर धरायला सांगितले. माझी दाढ इतक्या सहज काढली जाईल मला वाटले नव्हते.
पूर्वी लोक डाॅक्टरांना देव मानत. डाॅक्टरही तसेच वागत. डाक्टरांना मान सन्मान होता.
हल्ली डाॅक्टर कडे जायचे तर नको वाटते. किती टेस्ट करायला लावेल आणि किती बिल फाडेल आणि जीवाची शाश्वती नाहीच.
प्रसाद डॉक्टर मध्ये मला त्यांचे वडिल डाॅ देशमुख दिसू लागले. तेच वागणे, तसेच बोलणे आणि पेशंटबद्दल तीच आत्मीयता !

फरझाना इकबाल

— लेखन : फरझाना इकबाल
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अहेर on भोगी
राऊत सर संत ज्ञानेश्वर हायस्कूल कुर्ला पश्चिम on रस्त्यावरच्या मुलांसाठी शिक्षकांनी पुढे यावे – रामराव पवार