आजही समाज मोठ्या प्रमाणात पुरुष प्रधान आहे. कुटुंबाने यश मिळविले तर माझ्यामुळेच अशी श्रेष्ठत्वाची, अहंकाराची भावना पुरुषांमध्ये दिसून येते. अशा या पार्श्र्वभूमीवर “माझी पत्नी, माझा अभिमान”
असे अभिमानाने सांगताहेत श्री किरण वनगुजर. न्यूज स्टोरी टुडे परिवारात वनगुजर परिवाराचे हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
पुर्वाश्रमीची कुमारी मुक्ता रंगनाथराव जवकर २२ फेब्रुवारी १९९२ रोजी माझ्याशी विवाहबध्द होऊन सौ मुक्ता किरण वनगुजर झाली.
बीडच्या वैभवशाली कुटुंबातुन माझ्या सारख्या सर्वसामान्य व्यक्तीची ती सहचारिणी बनली. कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना, लग्नानंतर पदवीधर झाली.
मी प्राथमिक आरोग्य केंद्रात, खेडेगावात नोकरी करत असताना तीही खेडेगावात माझ्यासोबतच आयुष्यात रंग भरत राहिली. अजूनही ते काम ती अगदी मनापासून करते आहे.
आमच्या संसार वेलीवर दोन सुंदर फुले बहरल्यावर खेड्यातील आयुष्य संपवून तालुक्याच्या ठिकाणी रहायला आलो आणि मुक्ताच्या माहेरच्या व्यावसायिक गुणांची चुणूक जाणवू लागली. सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून ती ब्युटी पार्लर च्या सर्व कलांत पारंगत झाली. नंतर तिने स्वतःच्या व्यवसायाला सुरवात केली. बघता बघता स्वतःच्या मेहनतीच्या बळावर ती एक यशस्वी व्यावसायिक झाली.
माझ्या वेतनाच्या तुलनेत तीनपट मासिक कमाई करुन घरकुलाचे स्वप्न पुर्ण करण्यात खुपच हातभार लावला.
नोकरी निमित्त मी बऱ्याचदा बाहेरगावी असायचो. अशा वेळेस दोन्ही मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत ती अतिशय सजग राहिली.
नकळतपणे मुलगी, अपूर्वा दहावीच्या परीक्षेत अतिशय छान गुण घेऊन पास झाली आणि उच्च शिक्षणाचा प्रश्न समोर आला.
तालुक्याच्या ठिकाणी त्याकाळी फारशा सुविधा नव्हत्या. त्यामुळे मराठवाड्याची शैक्षणिक पंढरी औरंगाबादला येण्याचा आम्ही निर्णय घेतला. हाच निर्णय आमच्या आयुष्यात एक चांगला निर्णय ठरला.
मुलांना शैक्षणिक प्रगती साठी अतिशय सुंदर वातावरण लाभले. मुक्तालाही तिच्या आजवर दाबुन ठेवलेल्या ईच्छा आकांक्षाचं मुक्त आभाळ मिळालं.
खुपच छान सामाजिक भान तिच्याकडे होतंच. औरंगाबादला नवनवीन मित्रमंडळी मिळाली. आणि तिला भरारी घेण्यासाठी खरंच एक मोकळं वातावरण मिळाले.
मुक्ताने काही शारीरिक व्याधीमुळे दरम्यानच्या काळात व्यवसायाला बाजुला ठेवले. मुलगी परदेशी शिक्षणासाठी गेली. मुलगा आशिष पुण्यात होता. मग तिने एका नवीन आयुष्याला सुरवात केली.
आजवरच्या काळात सगळ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी तिने अतिशय आनंदाने खुप काही केलंय. संसारात येणाऱ्या अनेक अडीअडचणी सहजपणे दुर करून सर्वांच्या आनंदासाठी लढत राहिली.
औरंगाबाद शहरात अनेक अतिशय चांगली हॉस्पिटल्स आहेत. त्यात उपचारासाठी येणाऱ्या नातेवाईकांना, गोरगरीब लोकांना डबे पुरवणे, आर्थिक मदत मिळवून देणे, रुग्ण वाहिकेची व्यवस्था करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या अडीअडचणी समजुन त्यांना मदत करणे अशी समाजोपयोगी कामे ती करू लागली.
अन्नदानाच्या कार्यातही ती तनमनधनाने सहभाग घेत असते. गोरगरिबांना गरम कपडे, दैनंदिन वापरासाठी नवीन कपडे वाटप, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ती सातत्याने करीत असते. कोविडच्या अतिशय कठीण काळातही तिला जमेल त्या पातळीवर ती समाजासाठी ऊभी राहिली.
मुक्ताने औरंगाबाद येथील ईको बटालियन आणि होल्डींग हँडस् यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात उंबर, चिंच, पिंपळ, वड अशा भारतीय झाडांची लागवड केली आहे. एव्हढेच नाही तर या झाडांचे ती जतनही करीत आहे.
मुक्ताने कासार समाजातील महिलांना एकत्र करुन रक्तदान शिबीर, हळदीकुंकू कार्यक्रम तसेच कासार समाज मँरेथाँन आयोजनात सक्रिय सहभाग घेतला आहे. मुक्ता फक्त फोटोपुरते कधीच काम करीत नाही.
अजून एक सांगायचं, ते म्हणजे औरंगाबाद ही पर्यटन राजधानी आहे. ईतक्या व्यस्त जीवनात असूनही मुक्ता भटकंतीवर मनापासून प्रेम करते. औरंगाबादच्या अवतीभवती असणाऱ्या सगळ्या डोंगररांगा आणि ऐतिहासिक ठिकाणी पुरातत्व विभागाच्या तज्ञासोबत अभ्यास करणारी, ही पन्नाशी पार केलेली तरुणी अखंडपणे धावते आणि त्यातून आनंद शोधते.
मुक्ताने आता परत नवीन उभारीने, मुलीच्या प्रेरणेने एक नविन व्यवसाय सुरु केला आहे. हा नवीन उपक्रम औरंगाबाद सारख्या ठिकाणी सर्वप्रथम सुरू करण्याचा मान तिच्याकडेच आहे.
तरुण मुलींना हवे असणारे पारंपरिक आणि पाश्चिमात्य फँशनचे कपडे भाड्याने देण्याचा व्यवसाय तिने सुरू केला आहे.
मराठी चित्रपटातील नायिकांना नवनवीन फँशनचे कपडे पुरविणे, हा तिच्या व्यवसायाचा एक भाग आहे.
वेळेचं नियोजन सामाजिक भान आणि समाजऋणातुन उतराई होण्याची धडपड ही मुक्ताची वैशिष्ट्ये आहेत.
म्हणुनच समाजाने तिची दखल घेऊन विविध सामाजिक व्यासपीठावर मानाची अनेक पारितोषिके तिला प्रदान केली.
मोठ्यांचे आशीर्वाद, सर्वांच्या सदिच्छा पाठीशी असल्याने ही वाटचाल सहजसोपी बनली, असे मुक्ता नम्रपणे म्हणते.

आमची मुलगी अपुर्वा सध्या आर्यंलंड मध्ये कॉर्क युनिव्हर्सिटीत क्रिप्टोग्राफी या विषयात डाँक्टरेट करत आहे. तर मुलगा आशिष ने पुणे येथील वर्ल्ड पीस युनिव्हर्सटीतून बी बी ए पुर्ण केलंय.
आज आमच्या कुटुंबाचे श्रेय निर्विवादपणे मुक्ताला आहे. खरोखरच माझी पत्नी माझा अभिमान आहे.

– लेखन : किरण वनगुजर. औरंगाबाद
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर प्रापंचीक वाटचाल आणि कौतुकाने पोचपावती दिलीत.👍
मुक्ताताई आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो तू असेच समाज उपयोगी काम करत जा तुला भावी काळासाठी शुभेच्छा
साहेब खूप छान .. आपल्या सुंदर .. सोप्या भाषेतून .. ताई कळल्या 🙏
Salute to your dedication n determination to
a family growth. Wish you all the best for more success in life.
माझी पत्नी माझ्या माझी जबाबदारी या सदरात सौ. मुक्ता किरण वन गुजर यांची यशस्वी जीवनाची कहानी वाचून मन अभिमानाने भरून आले. जिद्द आणि परिश्रमाने काम केल्यामुळेच हे शक्य झाले आहे असे मला वाटते.. पुढील जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा…
Salute to Mukta & family
आदरणीय भुजबळ सर,
सर्वप्रथम मनापासून धन्यवाद.
अहोंनी इतक्या सहजसुंदर आणि साध्या सरळसोप्या
भाषेत माझ्याविषयीच्या भावना व्यक्त केल्यात हे पाहून नकळतपणे डोळयात आनंदाश्रू आले.
आजवरचे अबोल प्रेम आज बोलकं झालयं ही सुखद
भावना दाटून आली. सर, आपण या त्यांच्या दिलखुलास
व्यक्त होण्यासाठी सुंदर व्यासपीठ उपलब्ध करून दिलेत.
यासाठी त्रिवार धन्यवाद सर🙏.