Sunday, March 16, 2025
Homeसेवा"माझी माती, माझा देश"

“माझी माती, माझा देश”

स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून “माझी माती, माझा देश” हे अभियान भारत सरकारतर्फे 9 ते 30 ऑगस्ट दरम्यान देशभर एकाचवेळी सुरू करण्यात आले आहे. आपल्या देशावर, येथील मातीवर आपले प्रेम, श्रद्धा असली पाहिजे तरच सगळे मिळुन देशाची प्रगती करू शकु ही उदात्त भावना या अभियानाद्वारे देशातील सर्व नागरिकांच्या मनामध्ये रुजवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

खरं म्हणजे, स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच अनेक देशभक्त नागरिक विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य व प्रजासत्ताकदिन साजरा करतात. कोणी घरावर तिरंगा ध्वज फडकवतो तर कोणी जिलेबी वाटून आनंदोत्सव साजरा करतो.

रत्नागिरी येथील राष्ट्रभक्त माऊली श्रीमती संजीवनी विलनकर या गेली अनेक वर्षे विविध उपक्रमांनी हे दोन राष्ट्रीय सण साजरे करतात. या दिवशी त्या भारतमातेच्या प्रतीमेचे व देशातील विविध राज्यातून जमा केलेल्या पवित्र मातीचे पुजन करतात. खरं म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देश हा उपक्रम साजरा करत आहे पण श्रीमती विलणकर या 2007 पासून हा उपक्रम दरवर्षी साजरा करत आल्या आहेत. यादिवशी समाजातील मान्यवर व्यक्तींना घरी आमंत्रित करून सर्वांच्या साक्षीने हा कार्यक्रम होतो. त्यानंतर जिलेबीचे वाटप होते. घरगुती कार्यक्रम असला तरी देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणात हा सोहळा संपन्न होतो.

श्रीमती संजिवनी विलणकर या मुळच्या रत्नागिरीच्या. तिथे थिबा पॅलेस रोडवर त्यांचे स्वतःचे दुमजली घर आहे. तसेच वडीलोपार्जित शेती आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातून वरिष्ठ कारकून या पदावरून त्या निवृत्त झाल्या आहेत. घरी आजोबांच्या काळापासून देशभक्तीचे वातावरण. आजोबा रघुनाथ महादेव विलणकर यांनी 1942 च्या चले जाव आंदोलनात भाग घेतला होता. त्यामुळे स्वातंत्र्यलढ्यात विलणकर कुटुंबियांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यानंतर वडील राजाराम व आई निर्मला यांनी तो वारसा पुढे चालवला. स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिन त्यांच्या घरी प्रतिवर्षी साजरा होत असतो.

श्रीमती विलणकर यांच्यावर लहानपणापासूनच देशभक्ती, देशप्रेम यांचे संस्कार झाले आहेत. त्यांनीही आपल्या घराण्याचा देशभक्तीचा वारसा विविध उपक्रमाद्वारे सुरु ठेवला आहे. यामध्ये नवीन काय भर घालता येईल याबाबत त्यांचे सतत प्रयत्न चालू असतात.

श्रीमती संजीवनी विलणकर या अविवाहित आहेत त्यामुळे निवृत्तीनंतर कोणीतरी सोबत असावे तसेच समाजातील गरजु विद्यार्थ्यांना मदत व्हावी या हेतूने त्यांनी आपल्या घरातील वरच्या मजल्यावरील खोल्या त्यांना राहण्यास दिल्या. कोणी दिले तर पैसे घ्यायचे अथवा तसेच राहु द्यायचे असा उदात्त सामाजिक दृष्टिकोन त्यांचा आहे. यामुळे देशातील व राज्यातील अनेक भागातील विद्यार्थी त्यांच्याकडे राहवयास येऊ लागले.

एकदा 2007 साली या विद्यार्थ्यांची सहल कन्याकुमारी येथे गेली होती. सर्वांचा एकत्र फोटो घेतेवेळी श्रीमती विलणकर यांना एक कल्पना सुचली की हे विद्यार्थी देशाच्या अनेकविध प्रांतातून आले आहेत. जशी त्यांची आई आहे तशीच तेथील माती म्हणजे भारतमातेचे प्रतिक ही पण त्यांची आईच होय तर देशभरातील पवित्र माती जमा करून ती एका ठिकाणी ठेवली तर सर्वांना समस्त भारतमातेचे एकत्रित दर्शन होईल. त्याक्षणी त्यांनी कन्याकुमारी येथील माती हाती घेतली आणि या उपक्रमाची सुरवात झाली.

सुरवात छोटी होती पण देशप्रेमाने भारावलेली होती. त्यानंतर विविध भागातील विद्यार्थी, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार, स्नेही यांच्या माध्यमातून देशभरातील माती जमा करण्याचा चंगच त्यांनी बांधला. त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे. त्यामुळे घरी कोणी येणार असेल तर त्या दुसरे काही आणू नका पण तुमच्या भागातील माती मला नक्की आणून द्या असे आवर्जून सांगतात.

मी ही एका भेटीत त्यांना हातकणंगले, शिरोळ, कागल आणि पन्हाळा तालुक्यातील माती दिली आहे. असे करत आजमितीस त्यांच्याकडे देशातील बहुतेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील अनेक गावं, तालुके आणि जिल्ह्यातील माती जमा झाली आहे. ही माती त्यांनी काचेच्या बरणीत व्यवस्थित जतन करून ठेवली आहे. प्रत्येक बरणीवर सविस्तर माहिती लिहिली आहे.

सध्या प्रकृती अस्वास्थामुळे श्रीमती विलणकर यांना बाहेर जाता येत नाही, काही मर्यादा येतात. पण देशभरातील प्रत्येक गावातील माती जमा करायचीच ही जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच जमेल तसे या देशकार्याला त्यांनी वाहून घेतले आहे.

भविष्यात या मातीच्या संग्रहातुन भारतमातेचे एक मोठे मंदिर रत्नागिरी येथे बांधण्याचे त्यांचे स्वप्न आहे. यासाठी त्या अहोरात्र झटत आहेत पण प्रकृती अस्वास्थ्य व आर्थिक मर्यादा यामुळे अनेक बंधने येत आहेत.

सध्या भारत सरकारतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘माझी माती, माझा देश’ या अभियानमुळे श्रीमती संजीवनी विलणकर यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आपण करत असलेले कार्य देशपातळीवर राबवले जात आहे याचा त्यांना अभिमान आहे. या देशव्यापी अभियानातून जमा होणाऱ्या मातीतील काही भाग (तालुकावार किंवा जिल्हावार) त्यांना मिळावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यांची ही मागणी भारत सरकारपर्यंत पोहचणे महत्वाचे आहे, जेणेकरून या राष्ट्रभक्त महिलेचे स्वप्न पुर्ण होईल आणि लो.बाळ गंगाधर टिळक यांची जन्मभूमी व स्वा.विनायक दामोदर सावरकर यांची कर्मभूमी असणाऱ्या रत्नागिरीत, राष्ट्रप्रेम व देशभक्तीचे अनोखे मंदिर साकारेल यात शंका नाही. याकामी लोकप्रतिनिधी, प्रशासनिक अधिकारी, सामाजिक संस्था, पत्रकार यांनी त्यांना मदत करावी असे वाटते. त्यांचे संपर्क क्र. 94212 33624, 84465 26100 असे आहेत.

त्यांचा अजुन एक उपक्रम आहे तो म्हणजे भारताचा नकाशा व त्याच्यावर तिरंगा ध्वज अशी प्रतिमा असलेले स्टीलचे स्मृतिचिन्ह त्या तयार करून घेतात आणि घरी आलेल्या पाहुणे, मित्रपरिवार यांना भेट म्हणुन देतात व घरातील देव्हाऱ्यात त्याचे पुजन व्हावे अशी इच्छा व्यक्त करतात. यासाठी त्या आपले महिन्याला मिळणारे अंदाजे 2000 हजार रुपयाचे निवृत्तीवेतन वर्षभर जमा करतात व त्या रकमेतून त्या हे देशकार्य करत आहेत. ही रक्कम संपल्यानंतर ज्यांना शक्य आहे त्यांनी हे स्मृतिचिन्ह विकत घ्यावे आणि त्याचे पुजन करावे असे आवाहन त्या करतात. याद्वारे घरोघरी राष्ट्रभक्त नागरिक तयार व्हावेत अशी आशा त्यांना वाटते.

स्वातंत्र्य लढ्यात आपण स्वतः भाग घेतला नसला तरी अनेक हुतात्मे, क्रांतिकाऱ्यांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य जपणे व भारतमातेच्या परम वैभवासाठी तन, मन आणि धन अर्पण करून अहोरात्र काम करणाऱ्या या माउलीला त्रिवार वंदन. त्यांच्या या देशसेवेच्या प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा तसेच त्यांनी भारतमातेसाठी पाहिलेली स्वप्ने पुर्णत्वास येवोत अशी सदिच्छा.

अमर कुलकर्णी

— लेखन : अमर कुलकर्णी, हुपरी
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments