Wednesday, December 18, 2024
Homeयशकथामाझी मैत्रीण "अंजली कीर्तने"

माझी मैत्रीण “अंजली कीर्तने”

खरे तर ती माझ्या आयुष्यात खूप उशीरा आली. पण इतके सख्य वाढेल हे कधीच वाटले नाही. माझ्यासाठी तिचे बोलणे, वाचणे खास करून तिचे डॉक्युड्रामा , संगीत , कविता जास्त . पण तिच्या पुस्तकातून ती मला आकळत गेली. तिचे गुरू, तिची धडपड, तिची जिद्द, तिचे सतार वादन, तिच्या विषयांचा आवाका, तिचे वाङ्मय प्रेम , ध्येय साधण्यासाठी काहीही करण्याचे तिचे प्रयत्न हे बघून मी दिपून जात असे. “अगं, तू आपल्या तब्येतीची काळजी कधी घेणार ?” या प्रश्नाचे तिच्या जीवनात काहीच सोयर सूतक नव्हते असे वाटते.

संगीतावरील तिचे प्रेम तिने तयार केलेले डॉक्यु ड्रामा वरून आणि पुस्तकातून सहज लक्षात येते. तिची पुस्तकं म्हणजे सामाजिक ,सांस्कृतिक असा अमूल्य ठेवा आहे , एक दस्तावेज जणू. परिपूर्णता हा तिचा श्वास होता .मग ती एखादी फिल्म असो, ते एखाद्या घराचे चित्रण असो व एखादे व्यक्ती चित्रण असो, त्या त्या वस्तूचा, वास्तूचा , व्यक्तीचा खोलवर जाऊन अभ्यास करणे, समाधान होत नाही तोवर प्रयत्न करीत राहणे हा तिचा गुण होता. पं. दत्तात्रेय विष्णू पलुस्कर यांच्यावरील फिल्म तिने तयार केली तेव्हा ती बारा वर्षे शोध घेत होती. एक तपच उलटले . त्यानंतर ५०० पानी ग्रंथ लिहिण्यास ती सज्ज झाली .तिच्या डॉक्युड्रामा साठी स्वतः फिल्मलाईनचे प्रशिक्षण घेतले. दिग्दर्शन केले . पटकथा लिहीली, पात्रं निवडली, त्यासाठी अगदी लाहोर पर्यंत जाऊन आली. आनंदीबाईंवर फिल्म तयार करताना कल्याणचा त्यांचा जुना ,पडका त्रिखांबी वाडा बघायला गेली. तर अमेरिकेत तिची समाधी शोधायला ,त्या ज्यांच्याकडे राहिल्या त्यांचे घर शोधायला पोचली. तसेच दुर्गाबाईवर लघुपट तयार करताना. पायपीट, वणवण करण्यासाठी सदैव तत्पर.

लेखणी ही तिची सखी होती. ती म्हणते , “वयाच्या बाराव्या वर्षी माझ्या जीवनात कायमची वास्तव्यासाठी आली ती माझी सखी ..लेखणी…तिच्या वाचून जगणं अर्थहीन वाटेल.”

तिने आपल्या ..सोयरीक घराशी” या तिच्या पुस्तकात आनंदीबाईंच्या जुन्या घराचे अपूर्व वर्णन केले आहे त्या घराचे ,त्या आठवणींचे मोहोळ हे सारे तिच्याच शब्दात वाचावे. ती म्हणते, ” मी दारातच थबकले, एकोणिसाव्या शतकात याच घराचा हाच उंबरठा ओलांडून आनंदी बाहेर पडली. तेव्हा तिनं काय काय ओलांडलं ? हा उंबरठा किती रुढींच , अप समजुतीचं प्रतीक बनला असेल ?तो ओलांडून आनंदीन एका अर्थी तत्कालीन स्त्री – जीवनाचा कुचंबलेला परिसरच ओलांडला असेल

ते पुस्तक वाचताना आपण ही तिच्याबरोबर त्या त्या जागी हिंडून येतो.

” विशिष्ट राजकीय परिस्थिती, सामाजिक प्रक्षोभ, हिंसाचारांचं थैमान मुळे माणसांची ,घरांची ताटातूट ” तिला अस्वस्थ करते, त्या चिंतनात ती सुंदर कविता लिहून मोकळी होते.
ज्यू मंडळींनी लिहिलेल्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आईनस्टाईन घराची अशीच कथा ..ती लिहीते ” माणसं नाकारणं अथवा नकोशा माणसांना दरवाजे बंद करणं घराला शक्य असतं, तर त्यानं नाझींना घराबाहेरच थोपवलं असतं; पण माणसांचा प्रतिकारही जिथे संपतो, तिथे मुक्या भिंतींनी काय करावं ? “
नॅन्सी कॉबस्टोनच घर,शेरलॉक होम्स च्या घरासाठी तसेच बांधलेले म्युजियम, मादाम तूसांचं घर, स्टीफन झ्वाईग ची फिरती घरं, एनी फ्रॅंक चे भूमिगत घर ,पर्ल बकचं घर येथे ती स्वतः जाते न लेखणीतून आपल्याला पटवून देते . माणसाचं माणसाशी जसं जिव्हाळ्याचं नातं असतं तसंच घराशी असतं. आपण वाचताना गुंग तर होतोच पण तिचे शब्द आपल्या अंतरंगात झिरपत जातात.

तिने आयुष्यात इतके कार्य केले की स्वतः च्या शरीराकडे दुर्लक्ष झाले असेच मला वाटते . किती ऑपरेशन्स, किती वेळा ते इस्पितळात दाखल होणं पण जरा बरे वाटताच लेखणी सुरू. अगदी शेवटी तब्येत बरी नसतानाही तिचे शेवटचे पुस्तक आले..आठवणींचा पायरव..हे तिचे पुस्तक थोडे वेगळे आहे.
तिने कथा, कविता, ललित लेखन ,चरित्र लेखन असे बरेच काही केलं पण या पुस्तकात तिने जपलेल्या काही प्रियजनांच्या
प्रतिमा रेखाटल्या आहेत . त्यात विंदा आहेत, श्री पु.भागवत, प्रा वा.ल. कुलकर्णी, म.वा .धोंड आहेत. तसेच विश्राम बेडेकर, सुधा करमरकर, श्यामसुंदर आढाव, कुमार केतकर ,डॉ रवी बापट , शरद जोशी , निर्मला देशपांडे ही आहेत .

ती लिहीते… ” प्रियजनांशी वाद होतात, संघर्ष ही होतात. हा नातेसंबंधाचा एक अविभाज्य भाग असतो . असे संघर्षाचे प्रसंग ही मी मोकळेपणी लिहिले आहेत याचं कारण माणूस हा गुणदोषांनी युक्त असतो त्यातच प्रत्येकाचं माणूस पण दडलेलं असतं माणसांची गुळगुळीत एकरंगी केवळ गुणवान चित्रं म्हणजे भ्रामक आणि सपाट प्रतिमा मला अशा कृतक प्रतिमा रंगविण्यात रस नव्हता त्यामुळे जे घडलं ते मी लिहिलं ते लिहिताना माझं काय चुकलं याचाही विचार माझं मन करत राहिलं.”

श्री श्रीकांत बोजेवार या लेखांना म्हणूनच स्वभाव चित्रं म्हणतात.

ती अभ्यासू होती, स्पष्टवक्ती होती. तिचा व्यासंग दांडगा होता . त्यामुळेच ती आपली मतं ठाम पणे मांडू शकत असे.आणि याचमुळे कधी कधी माणसं दुरावत. शरद जोशींसारखे व्यक्ती जे तिचा अतिशय आदर करीत , तिला त्यांच्या अनुपस्थितीत ‘चिंतन शिबिर ‘देखील घ्यायला सांगत, अगदी तिला स्व.भा.प. पक्षाची ‘रोझा लुक्झेबर्ग’ सुद्धा म्हणत. शिवाजी पार्क सारख्या मोठ्या मैदानावर सभेत बोलायला सांगत, तिची चण लहान पण आत्मविश्वास दांडगा . कुठे ही मुद्देसूद बोलून येई. ती आयन रँड चे तत्वज्ञान कोळून प्यायलेली. तिची ती जबरदस्त प्रशसंक..जोशींशी देखील तिचे वाद होत.पण ते कौतुक करीत.नंतर नंतर मात्र संघर्ष.
श्री पु भागवत यांच्या बद्दल तर तिच्या मनात नितांत आदर, पण काही कारणांचे ती वर्णन करते .अबोला कसा झाला सांगते.ती लिहीते.. एका प्रश्नाचे उत्तर शोधताना दुसरे अनेक प्रश्न उगवतात अस्वस्थ पाकोळ्यांसारखे मनाच्या पोकळीत भिरभिरायला लागतात साऱ्याच प्रश्नांची उत्तरं माणसाला मिळतातच असे नाही अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात प्रश्नाचे उत्तर पुन्हा प्रश्नच असू शकतं याला जीवन ऐसे नाव . प्रत्येक माणसाच्या मनात अंधाऱ्या गूढ वाटा असतात त्या ज्याच्या त्यालाही ठाऊक असतातच असं नाही.

इतकी तात्विक , वैचारिक प्रगल्भता असलेली अंजली तिच्या ..हिरवी गाणी….या काव्य संग्रहात वेगळीच वाटते .अतिशय तरल , मनाला भिडणाऱ्या त्या कविता वाचून कधी कधी सुन्न व्हायला होते. तर कधी प्रसन्नतेने गुणगुणावेसे .. तिच्या अनेक मैत्रिणी होत्या, अनेकांशी जवळचे संबंध आलेत . पण बहुदा ती सर्वांना विभागून ठेवीत असावी . माझा कप्पा होता गीत, संगीत ,फिल्म , चित्र यांच्याशी निगडीत. कधी कधी मला विचारीत असे ..तू या विषयावर काही काढले आहेस का ? बहुदा तिला काव्य सुचत असावे. एकदा तिने माझे एक चित्र तिच्या फेसबुक पेज वर टाकले आणि लिहिले ..

माझी मैत्रीण स्वाती वर्तक हिचं हे रानचित्र. या चित्रामुळे मला कविता स्फुरल.

कवितेचं घर

माणसाच्या मनात असतं एक किर्र रान
गर्द हिरव्या अंधारात सुस्कारणारं, सळसळणारं,
पानांच्या ओठांनी पुटपुटणारं,
स्वतःशीच हसणारं.

असतात पाऊलवाटा
दूर दूर पावलं टाकत
मनाच्या गर्भागारात अदृश्य होणाऱ्या ….

तिथेच असतं कवितेचं घर!

मला भेटायचं असेल तर
इतक्या दूरचा प्रवास करून
तुला कवितेच्या घरी यावं लागेल.

जमलं तर येताना
हिरव्या रानात हरवलेलं
सोनेरी पान घेऊन ये.
उजेड कसा असतो
ते कविता विसरली आहे.

— रचना : अंजली कीर्तने.

तिची खूप इच्छा होती तिची पं द.वि. पलुस्कर यांच्यावरील फिल्म ग्वाल्हेरला दाखवावी कारण ते ग्वाल्हेर घराण्याचे होते. त्यापूर्वी तिला त्या फिल्म मध्ये सारी शीर्षके हिंदीत करून घ्यायची होती. त्यामुळे आमच्या भेटी वाढल्या, संदेश झालेत . कितीही नाही म्हटले तरी , “एवढेसे श्रेय ही ज्याचे त्यालाच मिळाले पाहिजे ” या तिच्या मतांमुळे माझा रोष पत्करून ही तिने माझे नाव घातलेच .
मी तिला माहेरचा पत्ता दिला व सांगितले..आनंदाने जा तेथे. घरी सारेच संगीत प्रेमी , दर्दी.. आरामात रहा. भावाने तिला अगदी हस्सु हद्दु खां चे घर ही दाखवले . संगीत विश्वविद्यालयांच्या प्राचार्या , संगीतकार इतरांशी ओळख करून दिली आणि ग्वाल्हेर मधेच नव्हे तर संस्कार भारतीच्या सहकार्याने ग्वाल्हेर शहराजवळील इतर नगरांमध्येही फिल्म दाखविण्यात आली. खूप खुश होती.
दिवाळी अंकातील एका लेखात तिने भावाचा उल्लेख ही केला.

ती स्वतःच्या तब्येतीची मुळीच काळजी घेत नव्हती. तिचा आपल्या यजमानांवर संपूर्ण विश्वास होता. आणि ते ही खरेच सतत तिच्या बरोबर . त्या दोघांचे विचार , आवडी निवडी खूप जुळत, दोघांचे आवडते लेखक ,लेखिका सारखेच .दोघांना आईन रँड आवडे. सतीश कीर्तने आजारी पडले आणि ती हवालदिल झाली. माझ्या जवळ येणाऱ्या तिच्या संदेशांमध्ये हतबलता डोकावे. तुझ्यासारख्या विदुषीला मी काय सांगणार गं.. असे मला वाटे.

ते गेल्यावर ती लिहीते… ” तुझं माझं नातं हे माझ्या आयुष्यातलं सर्वात अर्थपूर्ण नातं आहे तू आजूबाजूला असल्याने वेदनाग्रस्त अवस्थेतही मी निवांत असायची तू माझा आधाराचा खांब होतास. सुदृढ , कणखर, सक्षम आणि दिलासादायक. तुझ्या आजारपणातही तुला काळजी होती ती तुझ्या प्रकृतीची नव्हे ; तर आपल्या स्वप्नांची. तू प्रकाशकाला सांगितलं , ” मला अंजूची पुस्तकं पूर्ण झालेली बघायची आहेत.” तू म्हणजे आयुष्याने मला दिलेला सर्वात सुंदर , सर्वात मूल्यवान असा नजराणा होता. “

त्यांचे जाणे तिच्यावर फार मोठा आघात होता. काही दिवस त्यांच्या पहिल्या भेटीविषयी ती संदेश पाठवित होती, त्यांचा स्वभाव, कविता यावर बोलत असे पण त्यात एक नैराश्येचा भाव दडलेला वाटे. तिचे आजारपण बळावले आणि वर्षाच्या आतच ती ” त्या मूल्यवान नजराण्याला ” भेटायला , आपल्या कवितांच्या राज्यात निघून गेली.

अंजू.. तुझ्याच शब्दात पण तुला आवडणाऱ्या माझ्या हिंदीत लिहावेसे वाटते…

ज्ञात है मुझे….
नहीं आती मुझे कविता
किन्तु मेरे दिल में जो तूफां सा उठा है
थामना चाहती हूँ
उसे कागजपर बिखेरकर ,

मन की गुफाओं में
उठते हुए ग़ुबार को
उंगली के अग्र तक
छू जानेवाली संवेदना
स्याही में डुबोकर
छिटक देना है मुझे
अम्बर के उस पार

अल्प परिचय

जन्म…४ मे ५३
देहावसान….१७ डिसेंबर २३

ओळख

1…साहित्य, पत्रकारिता, लघुपट निर्मिती व व दिग्दर्शन क्षेत्रात लक्षणीय कार्य

2.. प्राध्यापक म. वा. धोंड आणि प्राध्यापक वा. ल. कुलकर्णी संपादित मराठी वाङ्मयकोशात उपसंपादक , पॉप्युलर प्रकाशन मध्ये मराठी विभाग प्रमुख. १९८६ नंतर मुक्त पत्रकारिता .

3..ग्रंथसंपदा

पॅशनफ्लॉवर, , हिरवी गाणी .वेडा मुलगा आणि शहाणी माकडे , माझ्या मनाची रोजनिशी, कॅलिडोस्कोप, चॅरीब्लॉसम , डॉ. आनंदीबाई जोशी. काळ आणि कर्तृत्व , गानयोगी पंडित द वि पलुस्कर , बहुरूपिणी दुर्गा भागवत , मनस्विनी प्रवासिनी, ब्रिटिश पर्व, एका लघुपटाची रोजनिशी, पाऊलखुणा लघुपटाच्या , अभिजात संगीताचं सुवर्णयुग, सोयरीक घराशी, आठवणींचा पायरव शिवाय अनेक लेख, कथा ,पेपर्स ,दिवाळी अंकातील सहभाग .

4..लघुपट निर्मिती व दिग्दर्शन

डॉ. आनंदीबाई जोशी , दुर्गा भागवत एक शोध, अभिजात संगीताचे सुवर्णयुग , गानयोगी : पंडित द. वि. पलुस्कर , संगीत विषयक दोन प्रोजेक्ट सीडीज .

5..पुरस्कार

साहित्य सम्राट न . चिं. केळकर पुरस्कार
काकासाहेब गाडगीळ पुरस्कार
वि. ना. ओक पुरस्कार
शं . ना. जोशी पुरस्कार
प्रा. वि . ह . कुलकर्णी पुरस्कार
डॉ. आनंदीबाई जोशी लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार
साहित्य लघुपट निर्मिती व दिग्दर्शन या क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल मधुसूदन सत्पाळकर पुरस्कार.
दूरदर्शन मुंबई तर्फे साहित्यिक मायलेकी म्हणून अंजली कीर्तने व पद्मिनी बिनिवाले यांना 2014 चा प्रेरणा पुरस्कार

स्वाती वर्तक

— लेखन : सौ. स्वाती वर्तक. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अंजली कीर्तने म्हणजेच पूर्वाश्रमीची अंजली बिनिवाले… शाळेत मला एक वर्ष ज्युनियर, पण आमच्या शाळेतल्या बाई, आमच्या लाडक्या टीचर, बिनिवाले बाई ह्यांची कन्या, म्हणून शाळेत तिचे अपरंपार कौतुक! खरंतर हा आमचा पूर्वग्रह की टीचरची मुलगी म्हणून तिला हा मान मिळतोय; पण तसे कधी नव्हते , खरंतर आमच्या बाईंना सुद्धा ते मान्य नव्हते. अंजली आपल्या बळावर, आपल्या कलागुणांवर शाळेत पुढे जात होती, हे तिने लवकरच काॅलेजमध्ये प्रवेश घेताच सिद्ध करून दाखवले. तिथे तर ती कोणत्याच टीचरची मुलगी नव्हती, पण तिची लोकप्रियता वाढतच होती आणि पुढे पुढे ती फक्त विद्यार्थी किंवा प्रोफेसर्स ह्यांच्या कौतुकाच्या वर्तुळातून बाहेर पडून बाहेरच्या विशाल विश्वात लोकप्रिय होऊ लागली, तेव्हा आम्ही “ही आमची जुनी मैत्रीण” असल्याचा स्तुतीचा डोंगर रचायला लागलो. पण खरंतर अंजली तोपर्यंत कीर्तीची अनेक शिखरे चढून खऱ्या अर्थाने “कीर्तने” झाली होती. तिच्या कामाच्या प्रचंड आवाक्यात आम्ही शालेय मैत्रिणी तिच्यापासून दूर फेकले जाणे साहजिकच होते. त्यातून मी झारखंड सारख्या दूरच्या राज्यात आणि मराठी साहित्य क्षेत्रापासून करोडो मैल दूरच्या प्रांतात गेल्याने, माझे संबंध तर साहित्यिकांच्या यादीत तिचे “बिनिवाले” नाव वाचण्यापुरतेच मर्यादित राहिले.
    आज स्वाती ताई वर्तक ह्यांचा लेख वाचून आपल्या ह्या बालमैत्रिणीने काय काय आणि किती उच्च दर्जाचे कार्य करून ठेवले आहे, ह्याची जाणीव झाली, आणि मन अभिमानाने भरून आले. आज अभिनंदन करायला अंजली आपल्यामध्ये नाही, पण माझे कौतुकाचे शब्द तिच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील, अशी खात्री आहे. अंजली, तुला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on निसर्गोपचार : ३
सौ.मृदुलाराजे on “माहिती”तील आठवणी” : ३१