माझ्या लेकीचा २३ जुलैला लेकीचा अॅस्टन युनिव्हर्सिटी बर्मिंगहॅम येथे पदवीदान समारंभ (convocation) होता. त्यासाठी मला १९ जुलै २०२४ रोजी इंग्लंडला जाण्याचा योग आला. १९ ला रात्री ६.३० वाजता हिथ्रो एअरपोर्ट लंडन येथे सुखरूप लॅंड झाले. लेकीने बुके देऊन लंडन एअरपोर्ट वर माझे स्वागत केले.
जेवढी उत्सुकता मला लंडनला येण्याची होती तेवढेच टेंशन सलग दहा तास मुंबई ते लंडन प्रवासाचे होते. कारण विदेशवारी मी या आधी एकटीने कधीच केली नव्हती. लंडन एअरपोर्टवर इमिग्रेशन वगैरे आटपून रूमवर पोचेस्तोवर रात्रीचे ११.३० झाले होते. थकवा असल्याने थोडेसे खाऊन लगेच झोपी गेले. कारण सकाळीच ८ वाजता साईट सीनसाठी निघायचे होते.
काॅट्सवर्ड्स हा इंग्लंड मधील सुंदर खेड्यांचा अगदी स्वप्नातील वाटावा इतका सुंदर देखणा निसर्ग असलेला भाग आहे. एकसारखी सुंदर टुमदार चॉकलेटी मधाळ, दुमजली घरे, लक्ष वेधून घेतात.काॅट्सवर्ड्स, बायबरी, बर्टन ऑन वाॅटर,स्टाॅव ऑन द वोल्ड, चिप्पिंग कॅमडन हा इंग्लंडचा सुरेख खेड्यांचा दर्शनीय भाग आहे. इथले आर्किटेक्चर कमाल आहे. आपण कॅलेंडर वर, पोस्टरमध्ये बघतो तशी सुंदर टुमदार छोटी छोटी एकसारखी घरे ओळीने इथे बघायला मिळतात.
येथील खेडीसुद्धा बघण्यासारखी आहेत. म्हातारी माणसेसुद्धा मजेत आयुष्य घालवत असतात. कुणी रेस्टॉरंट चालवतात. तर कुणी शाप्स, वाईन बार चालवतात.कुणीही कुणावर निर्भर नाही.
काॅट्सवर्लडला जाताना दुतर्फा हिरवळ तर व्हिटची, बारलीची हिरवी पिवळी सुरेख शेते आढळतात.जागोजागी, रस्त्याच्या आजूबाजूला लवेंडरची जांभळी फुले लक्ष वेधून घेतात. कुठेही रस्त्यावर घाण दिसत नाही. निटनिटकेपणा युरोपियन लोकांना फार आवडतो. यांचे राहणीमान, खाणे पिणे, संस्कृती, पेहराव सगळंच वेगळे. इथे म्हातारी माणसे सुद्धा स्वत:ची कामे स्वतः करतात. अदबीने बोलतात.
इंग्लंड हा भारी लोकसंख्या असलेला देश आहे. इथे इंग्रजांसोबत पाकिस्तानी, तुर्की, इस्त्रायली, आफ्रिकन, बोहरा, बांग्लादेशी मुस्लिम, मराठी अशा सगळ्या प्रांतातील लोकं बघायला मिळतात. थेम्स नदीच्या काठावर दुतर्फा वसलेले लंडन हे अतिशय सुंदर शहर आहे.
लंडनला स्वतः चा इतिहास आहे. आपला इतिहास आणि खाणाखुणा गोऱ्यांनी अजूनही जपलेल्या आहेत. इथले कॅसल्स पाहताना आणि इतिहास वाचताना त्यांची संस्कृती अवगत होते. युरोपियन संस्कुतीचा जागोजागी पगडा दिसून येतो. थेम्स नदीवरील लंडन ब्रिज हे लंडनचे अट्रॅक्शन आहे. खरोखरच या पुलाची भव्यता, डिझाईन आणि बांधणी आर्किटेक्चर कमालीचे आहे. लंडन ब्रिजवरील टाॅवरवरून शहराचा खूप सुंदर नजारा विशेषतः सायंकाळी बघायला मिळतो. टाॅवर ऑफ लंडन, थेम्स नदीवरील भव्य असा देखणा लंडन ब्रिज, लंडन टाॅवर, लंडन आय म्युझियम, बकींघम पॅलेस बीग बेन, हाऊस आफ पार्लमेंट ही भव्यदिव्य देखणी अशी पुर्वीच्या इंग्रजांच्या काळातील सेंट पाॅल कॅथड्रील (चर्च) ही सुंदर ऐतिहासिक वास्तू, लंडन पॅलेस शार्ड, व्हिक्टोरीया, सेंट्रल लंडनमधील प्रत्येक वास्तू आणि आर्किटेक्चर कमालीचे सुंदर आहे.
शार्ड ही काहीशी पिरॅमिडच्या आकाराची देखणी इमारत, इथून ६७ व्या मजल्यावरून संपूर्ण लंडनचा सुंदर नजारा दिसतो. हाॅप ऑन हाॅप ही लंडन दर्शन बस लंडनची सफर घडवते. लंडन ब्रीजवरून बसने जाता येता, नदीकिनाऱ्यावरील सुंदर नजारा आणि देखण्या वास्तू लक्ष वेधून घेतात. बरोउ मार्केट खवैयेगिरीसाठी प्रसिद्ध आहे. खाण्याचे विविध चविष्ट प्रकार इथे खायला मिळतात.
लंडनमध्ये सगळीकडे एकसारखे घराचे डिझाईन बघायला मिळते. त्यामुळे दिसायला सर्व एकसारखे आणि खूप भारी दिसते. आॅर्कीटेक्चर पुरातन असून कमाल आहे. शिस्तबद्धता, मेहनत आणि जीवनशैली, असं बरंच काही यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. गरिब- श्रीमंत असा इथे भेदाभेद दिसत नाही. कारण श्रीमंत देश आहे. सगळे स्वतः ची कामे स्वतः करतात. त्यामुळे कुठल्याही कामाचा त्यांना कमीपणावाटत नाही. लोकसंख्या भरपूर असूनही शिस्तबद्धता आहे. अगदी पेट्रोलपंप पासून, बससेवा सुद्धा शिस्तीत चालते. कुठे ही गाड्यांचे कर्कश हॉर्न किंवा आवाज नाही की गोंधळ गडबड नाही.
मुंबई प्रमाणेच लंडन हे धावते शहर आहे. आम्ही होतो तेव्हा तिथे उन्हाळा सुरू होता. उन्हाळ्यात रात्री १० वाजता अंधार पडतो आणि सकाळी ५.३० ला चक्क उजेड असतो. कामाची आणि वेळेची इथे खूप किंमत आहे. संध्याकाळी ५.३० पर्यंत ऑफिस, बाजार पटापट बंद होऊन जातात. त्यामुळे दिवसा पाचपर्यंत सगळी कामे उरकावी लागतात. ५ नंतर फक्त खाण्यापिण्याची दुकाने, हाॅटेल्स, बार तेवढी उघडी दिसतात. वेगवेगळ्या तर्हेची वाईन घेणे हा इथल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग.
समारंभ आणि सेलिब्रेशन मध्ये शॅंपेन, वाईन सर्व्ह केली जाते. अर्थात काही ड्रिंक्स नान अल्कोहोलिक शितपेयासारखी असतात. इथे शनिवार, रविवारी सगळीकडे सुट्टी असते. त्यामुळे चांगला वेळ घालविण्याकडे सर्वांचा कटाक्ष असतो. कामाच्या ठिकाणी कुठेही आरडाओरडा नाही की दंगा नाही, की आपल्या सारखे पानटपरीवर पान, खर्रा खाऊन थुंकणारी रिकमटेकडी तरुणाई इकडे दिसत नाही. सगळी माणसे आपापल्या कामात व्यस्त असतात. कुणीही कुणाकडे ढुंकून पाहात नाही. अतिशय शिस्तबद्ध आणि शांत असे हे शहर आहे. कुठेही अवास्तव गोंधळ, गाड्यांचे किंवा हाॅर्नचे आवाज ऐकू येत नाहीत. श्रीमंत देश असल्याने जीवनशैली भारी, दर्जेदार आहे. इथे कामावरून भेदाभेद किंवा माणसांची कॅटेगरी ठरत नाही. अगदी भिकारी आणि ड्रगिस्ट लोकांना इथले सरकार आसरा देते. भिकारी खूप कमी दिसतात. शनिवार, रविवार सुट्टी असल्याने रात्री बार, पब्ज मध्ये गर्दी आढळते. अल्कोहोल वाॅईन शॉपमध्ये सुद्धा रात्री उशिरा पर्यंत पार्टी चालते, परंतु कुठेही गोंधळ किंवा उत्छृंखलपणा आढळत नाही. खऱ्या अर्थाने ही मंडळी मजेत जीवन जगतात आणि नव्या उमेदीने कामाला लागतात.
इथे प्रत्येक कामाची, वेळेची किंमत आहे. कलागुणांना वाव आहे. विकेंडला चौकाचौकात कलाप्रेमी मंडळी गिटार, पियानो, वाजवताना, कला सादर करताना, चित्र रेखाटताना दिसतील. तेवढीच दिलखुलास दादही इंग्रज लोक देतात.
भुयारी मार्गामधून वाहतूक चालते. सकाळी कामाच्या वेळेस रहदारी खूप असते. हजारो फूट अंडरग्राऊंड रेल्वे, स्वयंचलित मोठमोठे एक्सीलेटर, त्यामुळे सर्वत्र शिस्तबद्धता दिसून येते.
रेल्वे स्थानकांवर सुद्धा कुठेही गोंधळ गोंगाट आढळत नाही. कार्ड टॅपिंगने सगळे दरवाजे उघडतात, त्यामुळे व्यवहार सुलभ होतात. बसमध्ये सुद्धा कार्ड टॅपिंग चालते. त्यामुळे तिकिटासाठी थांबावे लागत नाही.
लंडनपासून दूर डोवर केंट नावाचे एक कॅसल (किल्ला) आहे. याला लागुनच छोटेसे डोवर शहर असून सागरी किनारा लाभलेले बंदर आहे. एकीकडे इंग्रजांचा जुना किल्ला आणि त्याला लागून समुद्रकिनारा, समुद्री वाहतुकीसाठी बंदर असे डोळ्यात साठवण्याजोगे विहंगम दृश्य वरून दिसते.
डोवर कॅसल अकराव्या शतकात ११८० मधे किंग हेन्री यांनी बांधला होता. तो सध्या इंग्लिश हेरिटेज च्या ताब्यात आहे. येथील समुद्राला लागून मोठमोठे व्हाईट क्लिप्स बघायला मिळतात. फ्रान्स ने इंग्रजांवर हल्ला केला तेव्हा त्यांचे जवळजवळ पाच हजार सैनिक फ्रान्स मधे अडकून पडले होते. अर्थात शत्रूपासून रक्षणासाठीच या किल्ल्याचे निर्माण केल्या गेले, म्हणून याला इंग्लंडची किल्ली असे म्हणतात. कारण इथूनच समूद्रीमार्गाने प्रवेश करता येत असे.
या किल्यात मोठेमोठे टाॅवर, अंडरग्राउंड हाॅस्पिटल, अर्थात हे सैनिकांसाठी होते. रेस्टारंट, कॅफेज, एक्झिबिशन सेंटर, रेजिमेंटल म्युझियम चर्च इ. बघायला मिळेल. किल्याला लागूनच सुंदर समुद्र किनारा आणि समुद्री वाहतुकीसाठी मोठे बंदर आहे. त्यामुळे खूपच सुंदर आणि देखणा नजारा बघायला मिळतो. अतिशय सुंदर शांत आणि रम्य असे हे ठिकाण आहे.
कॅंटबरी हे एक छोटेसे सुंदर हिल स्टेशन टुरिस्ट स्पाॅट आहे. इथे देशविदेशातील हजारो टुरिस्ट येतात. कॅंटाबरी चर्च अतिशय सुंदर आणि देखणे प्रार्थनाघर आहे. इथल्या सर्वच चर्च खूप सुंदर आणि मानसिक शांती देणाऱ्या आहेत. रिव्हरसाईड व्ह्यू कमालीचा देखणा कॅनव्हास वाटावा इतके सुंदर आहे. झुळझुळ वाहणारी संथ नदी, आजूबाजूला रंगबिरंगी फुलांच्या बागा, गार्डन, पाण्यात विहरणारी बदके, उडणारे विहंगम पक्षी, पाण्यातून चालणाऱ्या लहान मोठ्या होड्या, मधूनच रेंगाळणाऱ्या संथ झाडाच्या सावल्या हे सर्व दृश्य डोळ्यात साठवण्याजोगे विलोभनीय. अस वाटतं नदीच्या काठावर शांत बसून तासनतास फक्त निसर्ग न्याहाळावा आणि सृष्टीचा कॅनव्हास डोळ्यात साठवावा. निसर्गाने येथे मुक्तहस्ताने सौंदर्य आणि रंगाची उधळण केलीय. खरचं निसर्गाचे हे रूप अद्वितीय आहे.
खरं पाहिले तर संपूर्ण इंग्लंड, त्यातल्या त्यात लंडनमध्ये खूप काही बघण्यासारखे आहे. फ्रेश फ्रुट, स्ट्राबेरी, रासपेरी, ब्लू बेरी तर खूपच फ्रेश मिळतात. एकेक टरबूज पाच, पाच किलोच्या वरून, लालभडक बघायला आणि खायला मिळतील. इथकी संस्कृती, खानपान, जीवनशैली वेगळी आहे. समोसा चाट, ढोकळा, इडली दोसा असे सर्व भारतीय चविष्ट पदार्थ मिळतर. आठ, दहा दिवस पण लंडन बघायला कमी पडतात.
Earn n learn अशी इथली संस्कृती असल्याने शिकत असतानाच विद्यार्थी अर्ध वेळ काही ना काही काम करतात. छोटी छोटी मुले सुध्दा स्वतंत्र असतात. म्हातारी माणसे सुध्दा स्वतः ची सर्व कामे स्वतः करतात.जीवन आनंदाने जगण्याकडे यांचा कल असतो. इथले लोकं कलाप्रेमी आहेत. गिटार, पियानो, सेक्सोफोन वाजवून करमणूक करणारे भरपूर कलाकार चौकाचौकात रात्री दिसतात. यांच्याकडे बघितले की असे वाटते खऱ्या अर्थाने ही मंडळी जीवन जगताहेत. कुठेही नाटकीपणा किंवा बेगडीपणा नाही. परप्रांतातील लोकांना फारसा भाव देत नाही.
इंग्रजांनी पूर्वी सर्व जगावर राज्य केले. परंतु आता मात्र जगभरातील सर्व प्रकारचे काळे गोरे लोकं इथे वास्तव्यास आहेत. सुमारे ५०० च्या वरून कॅसल्स, किल्ले इंग्लंडमध्ये अजूनही आहेत. आणि प्रत्येक किल्याला स्वतंत्र इतिहास आहे. स्टोनहेवन हार्बर, डनाटर कॅसल, क्रेगिवार कॅसल, कासव फ्रेजर, फाॅल्स ऑफ क्यू हे देखणे असे कॅसल आम्ही बघीतले.
लंडनहून ट्रेनने अगदी पाच तासांच्या अंतरावर स्काटलॅंड देश आहे.
इथे स्काॅटीश लोकांची वेगळीच संस्कृती आणि भाषा आढळते. एडिनबर्ग (एडिनब्रा) हे स्काटलॅंड मधील पर्यटनाचे, टुरिस्टचे आवडते ठिकाण.
ऐतिहासिक वास्तूंनी भरलेले सुंदर शहर.एडिनबर्ग कॅसल, शहरातील देखणा किल्ला बघण्यासाठी जगभरातील पर्यटक येतात. हा किल्ला किमान मारिस ३ च्या काळापासून अजूनही उत्तम स्थितीत आहे. आजुबाजूचा सुंदर नजारा येथून बघायला मिळतो. लागुनच समुद्र आहे.
कॅल्टन हिल, प्रिन्सेस स्ट्रीट, नेल्सन माॅन्यूमेंट स्टर्लिंन कॅसल, लाॅक लोमोंड, केल्पिज ही शहरातील बघण्यासारखी ठिकाणे आहेत.
अॅबरडिन हे सुद्धा स्काटलॅंड मधील सुंदर शहर आहे. डनाॅटर कासल, स्टोनहेवन हार्बर, फाॅल्स आॅफ क्यू, क्रेग्रीवार कॅसल, कासल फ्रेजर, गार्डन, ही अॅबरडिन मधील अतिशय सुंदर देखणी पर्यटनस्थळे आहेत. टुरिझम बसेस सुध्दा साईटसीन साठी उपलब्ध आहेत.
स्काॅटलॅंडचा निसर्ग कमालीचा सुंदर आहे. डोळ्याच्या कॅमेऱ्यात स्काॅटलॅंडचे सौंदर्य बंदीस्त करून, अनेक आठवणी घेऊन सकाळी फ्लाईटने लंडनसाठी रवाना झाले.
— लेखन : पल्लवी उमरे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800