पाहुनी धडपड या बालकांची
झाली मज आठवण शाळेची.
होती आंब्याच्या झाडाखाली
खुली गोड हवा त्या काळाची.
भिंत नव्हती, छप्पर नव्हते,
तरी सुख होते त्या ठायी.
लहानशी शाळा आमुची,
मनात आजही रंगत राही .
चारच वर्ग, मास्तर एक,
खाकी इजार पांढरा वेश.
डोकीवर टोपी काळीकुट्ट,
नजरेत कडकपणाचा प्रकाश.
लवचिक छडी लिंगडीची,
थरथर होत होती हातांची.
नव्हती बिशाद विसरण्याची ,
किमया चष्म्यातील नजरेची .
नव्हते दप्तर, पाटी एक,
फळकुटावर खडूचा लेख.
छमछम छडी लागे जेव्हा,
रटणे यावे तत्क्षणीच नेक.
आजच्या शाळा रंगीबेरंगी,
चित्रे, झोपाळे, खेळ करी.
स्वच्छ परिसर, सुंदर भिंती,
आनंदाची दुनिया ही न्यारी.
वही, पुस्तके, टॅब हातात,
शिक्षकही प्रेमळ अनेक.
गाणी, नाच, धडे विविध,
शिकणे झाले सोपे अधिक.
गेली छडी, भीती मागे सारी,
विद्या सुखकारी झाली भारी.
उज्ज्वल मार्ग उरला प्रेमाचा ,
वर्ग हा निर्भय, सुंदर आशेचा
— रचना : जगदीश जाधव.
निवृत्त सहायक पोलीस आयुक्त, नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
