Tuesday, September 16, 2025
Homeसाहित्यमाझे स्वप्न …

माझे स्वप्न …

एकदा काय झालं ?
अशोकचक्र माझ्या स्वप्नात आलं,
आणि-
थोड्याच वेळात दिसेनासं झालं;

त्याच्या अंधूक होत गेलेल्या
आकाशासारख्या आणि समुद्रासारख्या
निळाईकडं पहात मी म्हणालो,
“अशोकचक्रा, कुठं तू गेलास ?
काही न बोलता गायब झालास”.

सिंहांची डरकाळी ऐकून
मी घाबरलो,
‘कुठं शस्त्र मिळतं का ?’
हे शोधू लागलो.
तोच दुसरा आवाज आला,
पण-
तो मंद स्वरातला,
“भिऊ नकोस, मित्रा, मी दिसत नाही म्हणून;
मी असतो त्या स्तंभावर,
मी वसतो, त्या स्तंभावर
तिथल्या तीन सिंहांचा तो आवाज आहे”;

परत माझी गाळण उडाली,
हातापायातली शक्ति गेली;
पुन्हा तो आश्वासक ध्वनि आला,
‘भिऊ नकोस’ म्हणाला.
“ह्या सिंहांमध्ये जरी असेल –
सामर्थ्य आणि शक्ति,
आळवतात ते सदा माणसांचीच भक्ति;
आणू नकोस मनात भिती,
सिध्दांत त्यांचा असतो शांती;

नकोस म्हणू की,
मी दिसत नाही,
मी आहे सर्वत्र
का तू बघत नाही ?

हमाल श्रमतो, तिथं मी आहे,
मजूर घाम गाळतो ना-
तिथं मी आहे;
शेतकऱ्यांच्या गळ्यात मी आहे,
ते जिथं राबतात-
त्या शेतमळ्यांत मी आहे;

हुंडयासाठी लग्नाच्या होमकुंडात
होरपळणा-या ताईमध्ये मी आहे,
अश्रूंमध्ये भाकर भिजवून लेकरांना
भरवणा-या आईमध्ये मी आहे;

एटीएम मधून येणाऱ्या नोटांमध्ये मी आहे,
मतदानातून प्रकटणा-या नोटांमध्ये मी आहे;
सोन्याच्या खाणीत मी आहे,
दुर्बलांच्या वाणीत मी आहे;

खपाटीला गेलेल्या पोटांमध्ये मी आहे,
पेटीवर झंकारणा-या बोटांमध्ये मी आहे,
मंदिरां मधल्या जोडलेल्या हातांमध्ये मी आहे,
क्रिकेटच्या मैदानात भारतासाठी झुंजणा-या,
वीरांच्या मस्तकावर मी आहे

युद्धभूमीत विजयी शूरांनी रोवलेल्या,
डोंगरशिखरावर मी आहे;
या देशासाठी लढलेल्या- स्वातंत्र्यसैनिकां मध्ये मी आहे,
सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमध्ये मी आहे;
चंद्रावर दिमाखात उतरलेल्या यानावर
मी आहे;

अविद्ये विरूध्द लढणाऱ्या तलवारीच्या
म्यानावर मी आहे;
इथल्या मनामनांत मी आहे;
इथल्या कणाकणांत मी आहे;

भेटलास आज तू तर –
एक विनंती करतो,
“लोकशाहीची आठवण ठेवा,
संविधानाने दिलाय तुम्हाला अमोल ठेवा;
याच संविधानानं – सिहांना शांतीदूत केलंय
आणि-
गलितगात्र मेंढरांना सिंह केलं;

हक्कांचा आग्रह जरूर धरा,
पण कर्तव्याचीही कास धरा;
तेव्हा कुठं-
संविधानाच्या स्वप्नांना
सत्याचे पंख मिळतील
आणि
लोकशाही चक्राचे
सगळे आरे वेगाने फिरतील”.

सतीश शिरसाट

— रचना : प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे, ह. मु.इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments