आपल्या आयुष्याची चित्तर कथा सांगताहेत
कोलबाड, ठाणे येथील डॉ. उषा रामवाणी गायकवाड
डॉ. उषा रामवाणी गायकवाड यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात मार्गदर्शकाच्या मदतीशिवाय २००६ साली पीएच्.डी संपादन केली आहे.
पीएच्.डी चा विषय होता, “एकोणिसाव्या शतकातील निबंधवाङ्मयातून व्यक्त होणारे स्त्रीजीवनविषयक चिंतन”
या प्रबंधाला प्रा. अ. का. प्रियोळकर हे उत्कृष्ट प्रबंधाचे पारितोषिक मिळाले आहे . या यशाची दखल मराठीतील सर्व वर्तमानपत्रांनी घेतली. तसेच ‘ई’ मराठी (कलर्स) वाहिनीवरील ‘संवाद’ या सदरात राजू परुळेकर यांनी; तर सह्याद्री वाहिनीवरील ‘आजचे पाहुणे’ या सदरात श्रीराम वैद्य यांनी त्यांची मुलाखत घेतली होती.
सोलापूर येथील ‘विठाबाई पसारकर स्मृत्यर्थ’ दिला जाणारा संशोधनासाठीचा पुरस्कार त्यांना ऑगस्ट २०१८ मिळाला आहे.
त्यांनी ‘मृण्मयी’ हा पारितोषिकप्राप्त दिवाळी अंक सहा वर्षे एकहाती संपादित – प्रकाशित केला आहे. (१९९३ पासून) त्यांच्या पहिल्याच अंकाला बार्शी येथील सीतादेवी सोमाणी प्रतिष्ठानचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
‘प्रथम’ या मुंबईतील सामाजिक संस्थेत दीड वर्ष
Master Trainer & Content Developer या पदावर काम करताना त्यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी; विशेषतः औरंगाबाद येथील नांद्राबाद येथे लेखन-कौशल्यविषयक अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत.
हिमाचल प्रदेश राज्यात सोलन येथे हिंदी लेखन-कौशल्यविषयक कार्यशाळा घेतली होती (२०११).
‘लेखन कौशल्य’ या विषयावर त्या शाळा – कॉलेजेसमध्ये कार्यशाळा घेत असतात. त्यांनी या विषयावर फेसबुकवर एकतीस दिवसीय कार्यशाळा घेऊन बराच विचारविमर्ष घडवून आणला आहे.
अनेक प्रतिष्ठित नियतकालिकांत पुस्तक परीक्षणे, लेख, कविता, नामवंतांच्या मुलाखती, पत्रे प्रसिद्ध झाल्या आहेत.
त्यांना राज्यस्तरीय अनेक निबंधस्पर्धांत प्रथम, द्वितीय क्रमांकाची पारितोषिके प्राप्त आहेत. ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे दिल्या जाणाऱ्या श्री-स्थानक साहित्य पुरस्कार समितीच्या त्या एक परीक्षक आहेत.
या शिवाय त्यांनी बर्याच प्रकाशन संस्था, तसेच वर्तमानपत्रांत; विशेषतः संपादन साह्य, पुस्तक-निर्मिती, उपसंपादक तसेच मुद्रितशोधकाची जबाबदारी पार पाडली आहे.
न्यूज स्टोरी टुडे परिवारात डॉ. उषा रामवाणी गायकवाड मॅडम यांचे मनःपूर्वक स्वागत आहे.
– संपादक
फाळणीचा आगडोंब सोसून ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर या आदिवासीबहुल खेड्यात माझे आजोबा स्थायिक झाले. वडील गावातले प्रतिष्ठित व श्रीमंत किराणा व्यापारी. माझा जन्म सरंजामशाही सिंधी कुटुंबात झाला.
मला सिंधी लिहिता-वाचता येत नाही. आईवडिलांशी बोलणं सिंधीतच. भावंडं बहुधा मराठीतच बोलतो. लासी ही आमच्याकडची तळागाळातली ‘सुखवस्तू आदिवासी’ जमात ! सर्वांगीण आधुनिक प्रगतीपासून हजारो कोस दूर असलेल्या या मूठभर जमातीची मी प्रतिनिधी. माझ्या जमातीतली त्यावेळची मी एकमेव पदवीधर महिला. समाजातली मुलांचीही पहिली पिढी नुकतीच कॉलेजला जातेय. मुलं पारंपरिक व्यवसाय सांभाळतात. सुखवस्तूपणामुळे नोकऱ्या करत नाहीत. त्यामुळे शिकत नाहीत. परिणामी, मुलीही शिकत नाहीत. समाजात नाती पूर्ण व्यवहारी, civilizationचा कायमच अभाव. संख्येने मूठभर असलेल्या या जमातीबद्दल इतर उच्चवर्णीय सिंध्यांनाही सहसा माहीत नसतं. माझी जात कागदोपत्री कुठेच नाही.
माझ्यामुळे प्रेरणा घेऊन माझ्या समाजातल्या अनेक मुली शिकत्या झाल्या. समाजातल्या मुलींना घराबाहेर पडायचं फारसं स्वातंत्र्य अजूनही नाही. जमातीत मुलामुलींच्या लग्नाबाबत वयोमर्यादाही आताआतापर्यंत पाळली जात नव्हती.
मराठी साहित्यात, मार्गदर्शकाच्या मदतीशिवाय मुंबई विद्यापीठातून मी बीएनंतर पीएच.डी. केलं आहे (२००६). प्रबंधाला प्रा. अ. का. प्रियोळकर हे प्रतिष्ठेचं पारितोषिक (सुवर्णपदक) मिळालं. विषय होता – एकोणिसाव्या शतकातील निबंधवाङ्मयातून व्यक्त होणारे स्त्रीजीवनविषयक चिंतन. या यशाची दखल मराठीतील सर्व वृत्तपत्रांनी घेतली (मात्र स्थानिक आवृत्तीत). तसंच ‘ई’ मराठी वाहिनीने ‘संवाद’ या कार्यक्रमात आणि सह्याद्री वाहिनीने ‘आजचे पाहुणे’ सदरात मुलाखत घेतली.
डॉ. छाया दातार यांनी व्हायवा घेताना “तुझा प्रबंध प्रकाशित करण्यायोग्य आहे अशी सूचना मी विभागाला केली आहे’, ‘स्त्रीमुक्तीच्या पाऊलखुणा’ या पंधरा वर्षांपूर्वीच्या मालिकेत हा प्रबंध पुस्तकरूपाने यायला हवा होता” असे कौतुकोद्गार काढून त्यांच्या नि अन्य परीक्षक शर्मिला रेगे यांच्या रिपोर्टमधला काही भाग वाचून दाखवला.
दातार आणि प्रियोळकर समितीने त्यांच्या अहवालात काय लिहिलं होतं हे कळावं अशी विभागाला विनंती करूनही कळू शकलं नाही.
कौटुंबिक व सामाजिक बंडखोरी करत जगण्याच्या मूलभूत गरजांसाठीच, किंबहुना अस्तित्वासाठीच आजवर मला जीवघेणा संघर्ष करावा लागला. आजवर मी जे जगले ते सगळंच अशक्यकोटीतलं, अॅबनार्मल होतं ; कुठल्याही सुशिक्षित स्त्रीच्या वाट्याला येणार नाही असं…
आम्ही पाच बहिणी, एक भाऊ (लहान). इतर बहिणी दहावी पास. त्यांची लग्नं त्यांच्या विशीच्या आतच झाली. त्यांना नातवंडंही. भाचेमंडळींमध्येही दहावी – बारावीच्या पुढे कोणी शिकलं नाही. भाऊ सहावी नापास. त्याचा मुलगा तिसरी नापास. भावाची घरात कायम दादागिरी. विशेषतः माझ्यावर. मौजमजा, उधळपट्टी करण्यासाठी वडिलांनी त्याला आयुष्यभर भरपूर कर्जं काढून दिली !
मोठ्या बहिणीचा मराठी आगरी कुटुंबात प्रेमविवाह झाला. एक बहीण सोळाव्या वर्षी साध्वी झाली. दहावीला तिला ८६ % गुण होते. मेरीटमध्ये अपेक्षित होती. माझ्यावरही असेच संस्कार करण्याचे प्रयत्न झाले. पण मी बधले नाही. घरात मतिमंद आणि पायाने पंगू काका (एकुलता). त्याचा बराच त्रास असे.
आईवडिलांचा मानसिक आधार, कुटुंब- घटकाचा दर्जा मला कधी मिळालाच नाही. मुलगा-मुलगी / सून-मुलगी असा प्रचंड भेद त्यांनी कायम केला. स्त्रीच्या वाट्याला येणारी कुठलीही सांकेतिक सुरक्षितता वाट्याला आली नाही. वडिलांशी तर आयुष्यात चार वाक्यंही कधी बोलणं झालं नाही. शाळेत प्रगतिपुस्तकावर सही करण्यापुरताच त्यांचा संबंध.
आईवडिलांनी आयुष्यभर देवदेव केलं. आधी विठोबा, मग पोटोबा ! घरात संतांचा कायम राबता. त्यामुळे दिवाळी-दसरा. आयुष्यातले सर्व महत्त्वाचे निर्णय आईवडिलांनी त्यांच्याच सल्ल्याने घेतले. बारा वर्षांपूर्वी संन्यास घेऊन सध्या शहापूरला ते मठात राहत आहेत.
मला दहावीला ७४ % गुण (१९७९) होते. घरात कुठलंही शैक्षणिक वातावरण नि प्रोत्साहनही नव्हतं. परीक्षेच्या काळातही स्वयंपाकादी कामं चुकली नाहीत. खायचं म्हणजे कामं करायलाच हवीत असा लहान बहिणींचाही अलिखित दंडक असे. त्यामुळे अभ्यासाबाबत स्पेशल कन्सेशन्स कधी मिळाली नाहीत.
सुरुवातीपासूनच मी नेहमी अभ्यासू आणि हुशार होते. मराठीत highest असायचे, गणितात बहुधा पैकीच्या पैकी गुण असत. अक्षर सुंदर असल्याने कायम तारीफ होई. निबंध, पत्रलेखन वर्गात वाचून दाखवलं जाई. निबंधस्पर्धांत बक्षिसं मिळवली.
दहावीनंतर प्रथेप्रमाणे लग्न करायचं म्हणून दोन वर्षं शिक्षण थांबलेलं. मला दहावीनंतर शिकवावं का ? हे ठरवण्यासाठी आईवडिलांनी गुरूंचा सल्ला घेतला. त्यांचा नकार होता. मात्र दोन वर्षांनी यांचं पत्र आलं, ‘उषाला शिकवा’.
त्या दरम्यान लग्नासाठी मला कुठलाही मुलगा सांगून आला नाही. त्याचं महत्त्वाचं कारण ; मला जाड भिंगाचा चष्मा होता. समाजाच्या दृष्टीने ते व्यंग होतं. खरंतर, बरंच आधीपासून चष्मा लावायची गरज होती. पण काही वर्षं आईवडिलांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. दोन वर्षांच्या या काळात शिवणकाम, भरतकाम, हस्तकला, पेटी वगैरे शिकण्याचा प्रयत्न केला. चित्रकला उत्तम होतीच. बुद्धिबळ, बॅडमिंटन खेळायला शिकले. ladies games club सुरू केला. बौद्धिक क्षमता जसजशी वाढत गेली, बुधिजडत्व येत गेलं तशा या सगळ्या बाबी पूर्ण मागे पडल्या, वेळेचा अपव्यय करणाऱ्या वाटू लागल्या.
पुस्तकांचं ग्रंथालय असतं हे या काळात कळलं. विद्यापीठात येईपर्यंत बोलताना खूप अडखळायचे. त्यामुळे वक्तृत्व स्पर्धांत भाग घेणं टाळत आले. भावनिक, वैचारिक परिपक्वता आल्यावर हा दोष गेला असावा. गावातले डॉ. श्री. व डॉ. सौ. प्रधान तसंच अनेक प्रतिष्ठितांनी मला शिकवण्यासाठी वडिलांना मनवायचा प्रयत्न केलेला. पण उपयोग झाला नाही. उपोषणं, रडणंभांडणं ही माझी शस्त्रं मी अधूनमधून उपजत असे. अखेर कंटाळून वडिलांनी शिकण्याची परवानगी दिली. मग बिर्ला कॉलेजला विज्ञान शाखेत प्रवेश मिळवला. मेडिकलला जायचं ठरवलं होतं. बारावी उल्हासनगरहून, आजीकडे राहून केलं. मामा (एकुलता आणि वेडसर) आजीच्या हातचं जेवत नसे. मी केलेलं त्याला आवडायचं. आजी त्याच्या जेवणात औषध मिसळायची. त्याला तशी शंका येई. त्यामुळे आजी मलाच स्वयंपाक करायला सांगे. परिणामी, बारावीला गुण पडले ५४ %! मराठीत गुण होते ७१. (तिन्ही शाखांत highest). अनेक स्पर्धांत प्रावीण्य मिळवलं. कॉलेजचे प्राचार्य गोखले सर खूप नाराज झाले. त्यांचा आग्रह होता – आर्ट्स करायचंच तर इथेच कर. पण उल्हासनगरला राहायचं नसल्याने मी ठाणा कॉलेजची निवड केली.
बारावीनंतर दरवर्षी ; शिक्षण सोड, तुझं लग्न लावायचंय असा वडिलांचा लकडा सुरू झाला. पण तेव्हा मात्र मी ठामपणे विरोध करे, ‘माझ्यायोग्य मुलगा आधी समोर आणून उभा करा, आवडला तर नक्की लग्न करेन. उगीचच शिक्षण सोडणार नाही.’
विज्ञान रुक्ष वाटू लागल्याने ठाणा कॉलेजला मराठी साहित्यात बीए केलं. शहापूर-ठाणा अप-डाऊन करून. बीएला ठाण्यातच एका होस्टेलला राहिले. दोन लोकलच्या मधे सुमारे चार तासांचं अंतर असायचं. रिक्षा अस्तित्वात नव्हत्या. पर्याय टांगा. ८.३०च्या कॉलेजसाठी ५.३०ची गाडी पकडून सातच्या सुमारास पोचावं लागे (इतर मुलींना त्यांच्या घरचं कोणीतरी सोडायला यायचं). पुढील गाडीने गेल्यावर दहा मिनिटं उशीर होई. अकराला लेक्चर्स संपल्यावर ११.१०च्या गाडीसाठी सुसाटायचं. कारण नंतर चार तासांनी गाडी असे. बीएला घरच्या प्रश्नांमुळे ठाण्यातच एका होस्टेलला राहिले. बीएला गुण होते ४५ % …
अशा धबडग्यात मित्रमैत्रिणींची गरज भासली नाही, वेळही नव्हता. कॉलेज लाईफ एन्जॉय करणं काय असतं हे कधी कळलंच नाही. शाळेत असताना तर मुलांशी बोलायला मज्जाव असे. आठवीत दिल्लीला ट्रीप गेली असताना ५० – ६० जणांत माझा फोटो मुलाशेजारी म्हणून ऐकून घ्यावं लागलेलं.
कॉलेजच्या प्रा. सिंधू पटवर्धन व डॉ. म. पु. केंदूरकर यांची मी नेहमीच लाडकी होते. कॉलेजला वाङ्मयीन वातावरण असं प्रथमच अनुभवत होते. एकदा मराठी वाङ्मयीन मंडळाची सेक्रेटरीही झाले.
कॉलेजमध्ये राज्यस्तरीय अनेक निबंधस्पर्धांत पहिली – दुसरी बक्षिसं मिळवली. भाग घेतलेल्या पहिल्याच राज्यस्तरीय निबंधस्पर्धेत पहिलं पारितोषिक मिळालं. विषय होता स्वातंत्र्यवीर सावरकरांची काव्यसृष्टी. इकडून तिकडून संकलन करून निबंध लिहिला होता. मग स्पर्धांचा आत्मविश्वास वाढत गेला, नि बक्षिसं मिळवण्याचा सपाटाच लावला.
पिंगेज क्लासेसने आजोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंधस्पर्धेचे प्रा. माधव मनोहर हे सलग दोनदा परीक्षक होते. दोन्ही वेळा मला प्रथम पारितोषिक होतं. लवकरच मी त्यांची लेखनिक झाले तेव्हा त्यांनी उद्गार काढले होते, ”मला वाटलेलं, ‘उषा रामवाणी या टोपणनावाने कोणीतरी नामवंत प्रस्थापिताने निबंध लिहिला असेल.”’
माझे वरील निबंध आणि अभ्यासाच्या नोट्स मी किती ढिसाळ पद्धतीने लिहिल्या आहेत याची केंदूरकर सरांनी नेहमीच डोळस चिकित्सा केली. म्हणूनच कॉलेजनंतरच्या आयुष्यात जे लेखन केलं असेल त्याला योग्य दिशा, वळण मिळत गेलं. विशेषतः पुस्तक परीक्षणं.
बीएला कुठला विषय घ्यावा असा मुद्दा पुढे आल्यावर केंदूरकर सरांनी सायकॉलॉजी विषय सुचवला. त्यासाठी शहापूरहून रुईया कालेजला जावं लागणार होतं. पटवर्धन बाईंचा आग्रह होता, ‘मराठीच घे.’ गावातल्या सदा पाटील सरांनी सुचवलं, ‘मराठी घेतलंस तर वलय लाभेल.’
अखेर, मराठीत एमए करण्यासाठी विद्यापीठाच्या लेडीज होस्टेलमध्ये प्रवेश घेतला नि दुनियेच्या एका विस्तीर्ण प्रांगणात अवतरले…
एमएला आल्यावर विभागप्रमुखांना माझं प्रचंड कौतुक होतं. एका राज्यस्तरीय निबंधस्पर्धेत मी तिसरं पारितोषिक मिळवलं. विभागप्रमुखांच्या माझ्याकडून सुवर्णपदकाच्याच अपेक्षा होत्या.
वर्षाखेरीस स्टुडण्ट्स कौन्सिलच्या निवडणुकीत माझा सहभाग होता. बरंच राजकारण झालं. त्यात एक प्राध्यापकही सामील होते. त्यांनी वर्षभर अनेक प्रकारे मानसिक त्रास द्यायचा प्रयत्न केला. विभागप्रमुखांनी माझ्याकडुन तसा तक्रारअर्ज लिहवून घेतला. त्या प्राध्यापकाबद्दल इतरही अनेकांच्या तक्रारी होत्या. परिणामी, कुलगुरूंनी त्या प्राध्यापकाला नोकरीतून हटवलं. प्राध्यापक दलित असल्याने प्रकरण विभाग प्रमुखांवर शेकलं. मग त्यांनी मला जाब विचारायला सुरुवात केली ! तोवर माझ्या वैयक्तिक अडचणींच्या मार्गदर्शनासाठी कधीतरी मी त्यांच्याकडे जायचे. मात्र त्यांचे गैरसमजच होत गेले.
होस्टेलचं वातावरण नि अन्नही मला मानवत नव्हतं. गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी परीक्षेची चौकटही भयंकर जाचक वाटू लागली होती. परिणामी, प्रथम वर्षाची अंतिम परीक्षा देता आली नाही. विभागप्रमुखांनी फ्रेश अॅडमिशन घ्यायचं सुचवलं व वडिलांच्या संमतीने मी ती घेतली. लवकरच ; परवडत नाही असं सांगून वडिलांनी आर्थिक मदत करणं बंद केलं. मग विभागप्रमुखांनीच कुलगुरूंना विनंती करून फ्रेश अॅडमिशन रद्द करवली.
मग नोकरीसाठी वणवण सुरू झाली. हॉस्टेलच्या नियमानुसार नोकरीला परवानगी नव्हती. मिळालेल्या नोकरीत खूप त्रास होता. परीक्षेच्या अभ्यासासाठी रजा मिळू शकली नाही. एकूणच, सगळ्या वातावरणाला उबल्याने आणि संशोधनाची आवड असल्याने एमए सोडून पीएच.डी. करण्याकडे प्रवृत्त झाले.
विभागप्रमुखांच्या मते बीएला पहिला वर्ग असेल तरच बीएनंतर पीएच.डी. करता येतं. त्यानंतर तत्कालीन कुलगुरूंकडे चौकशी केल्यावर; ‘करता येते’, त्या क्षणार्धात म्हणाल्या. ‘तू त्यांचं ऐकू नकोस, त्यांना नियम नीट माहीत नसतात’ विभागप्रमुख म्हणाल्या. ‘उद्या इंदिरा संत यांनाही बीएनंतर पी.एचडी. करायची असली तर तशी परवानगी त्यांना द्यायची का ?’ असंही त्यांनी विचारलं.
मग संबंधित नियम मी शोधूनच काढला. त्यात दोन महिने गेले. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दोन महिन्यांनी हातात पडल्यावरही उपकुलगुरूंनी विचारलं, ‘नियमाबाबत नीट खात्री करून घेतलीय ना ?’
डॉ. जयंत वष्ट यांनी मुंबई विद्यापीठातून बीएनंतर पहिली पीएच.डी. केल्याचं नंतर कळलं.
विभागातला एकही प्राध्यापक मार्गदर्शकाची जबाबदारी घ्यायला तयार नव्हता. त्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला. फक्त केंदूरकर सरांकडूनच आशा होत्या. ते विद्यापीठात व्हिजिटिंग लेक्चरर होते. आधी होकार देऊन नंतर ते नाही म्हणाले होते. ‘पीएच.डी. करणं हे तुझ्या भल्याचं आहे हे पटवून दे. तरच गाईड म्हणून मी तुझा स्वीकार करेन’, सर म्हणालेले. माझ्या परीने ; पत्र लिहून त्यांना पटवून दिलेलं.
मार्गदर्शक विभागाचा नसल्याने प्रबंधाच्या मार्गदर्शनासाठी नि प्राचार्यांची एखादी सही घेण्यासाठीही सांताक्रूझहून ठाण्याला जावं लागे. सही त्या दिवशी प्राचार्य कॉलेजात असूनही कधीच मिळू शकली नाही. त्यासाठी एक किंवा अधिक वेळा खेपा घालाव्या लागत. कधीतरी ; फी भरूनही ती भरल्याचं कारकून बाईंकडून नाकारलं जाई. फीचे पैसे दिल्याचं लिहून द्यायचंही त्या टाळू लागल्या. कॉलेजच्या प्रशासनाचा त्रास इतका वाढला, की एकदा तर दोन वर्षांची फी एकदमच भरून टाकली ! त्यानंतर त्यांच्यापैकी कोणाचंही तोंड पाहायची वेळ आली नाही!
कुठलीही फेलोशिप-शिष्यवृत्ती नसल्याने छोट्यामोठ्या सिंधी संस्थांकडून ; मुख्यमंत्री निधीतून (सुधाकरराव नाईक व शरद पवार यांच्या तसंच कुलगुरू निधीतून) तुटपुंजी मदत मिळू शकली. एशियाटिक सोसायटीची तसेच कुलाबा येथील महिला पदवीधर संघाची अत्यल्प फेलोशिप मात्र मिळाली.
१९९३ साली निवृत्त झाल्यावर मार्गदर्शकांनी त्यांच्या सर्वच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं बंद केलं, तसंच मलाही. माझा ग्रंथालयीन सगळा अभ्यास आणि दोन प्रकरणं पूर्ण झाली होती. ध्यासाने झपाटून अभ्यास करत होते. पाच वर्षांत पूर्ण करायचं ठरवलं होतं.
विद्यापीठातल्या प्राध्यापकांना मार्गदर्शनासाठी पुन्हा विचारणा केली. एकच प्राध्यापक तयार होते. ते स्वतः पीएच.डी. नव्हते. मार्गदर्शक म्हणून रजिस्ट्रेशन मिळायला त्यांना वर्ष लागणार होतं. मग ड्रॉप घेऊन मी घरी बसले नि १९९३ साली मृण्मयी या दिवाळी अंकाची निर्मिती केली.
त्यानंतर नव्याने नोंदणी करून होस्टेलला परतले. मात्र नवीन नियमाप्रमाणे कोणालाही पाच वर्षांपेक्षा जास्त काळ राहता येणार नव्हतं. तोवर मुंबईतल्याही मुली तिथे वर्षानुवर्षं राहत होत्या. शहापूरहून अप-डाऊन करणं अत्यंत गैरसोईचं होतं. मग उपकुलगुरूंकडे मुदतवाढीसाठी ‘विशेष बाब’ म्हणून अर्ज केला. नवीन आलेल्या विभागप्रमुखांनी त्यांना माझ्याबद्दल चुकीची माहिती पुरवली होती. मग माझी सविस्तर पार्श्वभूमी लिहून कथन केल्यावर परवानगी मिळाली. तरी प्रबंध पूर्ण होऊ न शकल्याने होस्टेलसाठी पुन्हा अर्ज केल्यावर कुलगुरू बदलले होते. मात्र प्रबंधाचं थोडंच काम बाकी होतं.
सुरुवातीला त्या अनुकूल नव्हत्या. मेडिकल फिटनेसचं प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक होतं. त्यासाठी विद्यापीठाने नेमलेल्या डॉक्टर जाॅनकडे वॉर्डनने मला परस्पर पाठवलं. डॉक्टरने रिपोर्टमध्ये काय लिहिलं होतं ते शेवटपर्यंत कळलं नाही. पण तो प्रतिकूल होता.
१९९०-९२च्या दरम्यान ताणांच्या डोकेदुखीसाठी मी नायर हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र काहीच जाणून न घेताच नवीन आलेल्या वॉर्डनने कुलगुरूंना माझ्याबद्दल चुकीची माहिती पुरवली नि मला परवानगी नाकारली गेली. जाॅन तर चक्क माझ्या तोंडावर म्हणाले, ‘मॅडम, माफ करा. उद्या अपरात्री तुमची तब्येत बिघडली तर तुम्हाला माझ्याकडेच पाठवलं जाईल नि विद्यापीठ मलाच जबाबदार ठरवेल. मला रिस्कच नको.’ मग सेकण्ड ओपिनियनसाठी मी नायर हाॅस्पिटल गाठलं. त्या अहवालानुसार मला सीव्हिअर अॅनिमिया झाल्याचं सिद्ध झालं. ते प्रमाणपत्रही खोटं असल्याचं वॉर्डनने कुलगुरूंना सांगितलं. त्यानंतर कुलगुरूंनी माझ्या तब्येतीचा सगळा रेकॉर्ड जातीने डोळ्यांखालून घातल्यावर माझ्याबाबतचे त्यांचे गैरसमज दूर होऊन मला एका वर्षाची मुदतवाढ दिली गेली.
पण मग मात्र मला हॉस्टेलमधून काढायचा वॉर्डनने जणू चंगच बांधला. तशी संधी माझ्या नकळत त्यांना मिळाली. एकदा रात्री अकराच्या सुमाराला मला थोडं अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मला डॉक्टरकडे न्यावं लागलं. नि दुसऱ्या दिवशी मला घरी आरामासाठी पाठवून माझ्या खोलीला डबल लॉक लावलं!
मग पुढच्या लढाईसाठी शहापूरहून माझ्या फेऱ्या सुरू झाल्या. कुलगुरूंना मी कोमात असल्याचं सांगितलं गेलं. ‘गोळ्या खाऊन मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला’ असाही अपप्रचार केला गेला.
अधूनमधून माझ्या खोलीतून सामान काढायचं तरी सिक्युरिटी ऑफिसरला पाचारण केलं जायचं.
लवकरच वॉर्डनने राजीनामा दिला. प्रभारी वॉर्डनने तर जास्तच असहकाराचं धोरण स्वीकारलं. विलेपार्ल्यात स्वतःचं घर असलेल्या एका मैत्रिणीचा नियमामुळे माझ्यासारखाच प्रश्न झाल्यावर ; वॉर्डन असलेल्या दुसऱ्या हॉस्टेलमध्ये याच बाईने काही वर्षं अनधिकृतपणे ठेवून घेतलं होतं. कुलगुरूंनी डबल सीटेड रूम द्यायचा तोडगा काढून तसं पत्र या वॉर्डनना पाठवलं होतं. त्यावर या वॉर्डन मला विचारतात, ”तू त्यांना का वारंवार भेटतेस? तू त्यांना त्रास देतेस. त्या आम्हाला त्रास देतात. त्यांचं ऐकलं तर इथे डबल सीटेडसाठी मुलींच्या रांगा लागतील.”
होस्टेल प्रकरणाबाबत कुलगुरूंशी मी पाच महिने भेटीगाठी, संवाद, पत्रव्यवहार करत होते. अखेर, काहीही कारण न देताच होस्टेल सोडण्याबाबतचं पत्र पाठवलं गेलं.
मग मात्र खरीखुरी वेडी व्हायच्या आतच मी होस्टेल सोडलं नि पुढच्या वाटचालीसाठी अनिश्चिततेच्या प्रवाहात झोकून दिलं…
विद्यापीठाच्याच गेस्ट रूमसाठी ५-६ वर्षांत खोऱ्याने अर्ज केले असतील. सुदैवाने २००३ सालानंतर कुठलाही अर्ज न करता दोनदा गेस्ट रूम मिळू शकली. होस्टेलची क्लार्कही त्रास देण्यात मागे नव्हती.
प्रबंध ओळखीतून; माहीमला एका ठिकाणी फुकटात टाईप करणार होते. ऑपरेटरकडून पहिल्या प्रुफात नसलेल्या चुका दुसऱ्या प्रुफात, नि दुसऱ्या प्रुफात नसलेल्या चुका तिसऱ्या प्रुफात आढळू लागल्या! हे कमी म्हणून की काय, चक्क फुकट्यासारखंच ट्रीट केलं त्यांनी!! मी कुर्ल्याला होस्टेलला राहून नोकरी करत होते. कधी कामाला रजा टाकून या कामासाठी अपॉइंटमेंट घेऊन गेलं तरी इतर ‘महत्त्वाची गिऱ्हाइकं’ आली, की ‘थोडा वेळ’ थांबायला सांगून चार चार तास बसवून ठेवत, कधी जायलाही सांगत. हा प्रकार इतका वाढला, की अखेर पेशन्स संपला नि किमान निम्मं झालेलं त्यांच्याकडचं काम अर्धवट सोडून मी जी निघून गेले ती परत फिरकलेच नाही ! काही दिवसांनी त्यांचा फोन आला, ‘तुम्हाला पैसे द्यावे लागतील.’ अर्थात, ते देणं शक्य नव्हतं ! अखेर, शहापूरहून अपडाऊन करून दादरला प्रबंध नव्याने टाईप केला. इथेही संगणकावरचा मजकूर एकदा उडाला होता.
नवीन मार्गदर्शकांनी अतोनात छळलं (कारणाबाबत सुज्ञांस अधिक सांगणे न लगे!).
प्रबंध दोन वर्षं अडकवून, शेवटी ; हरवल्याचं सांगितलं. संगणकीकृत पूर्ण प्रबंध त्यांच्याकडे घेऊन गेल्यावर ; मी यापुढे मार्गदर्शन करणार नाही असा पवित्रा घेत ; ‘प्रबंध सादर करायची तुमची मुदत संपली ना?’ – त्यांनी विचारलं.
मग विद्यापीठात अर्ज केला, ‘एकतर ; दुसरा गाईड मिळवून द्या किंवा पीएच.डी. स्वतंत्रपणे करण्याची परवानगी द्या.’ विद्यापीठाला दुसरा गाईड न मिळाल्याने त्यांना पीएच.डी. स्वतंत्रपणे करायची नियमबाह्य परवानगी द्यावीच लागली. याचं बरंच श्रेय बोर्ड ऑफ स्टडीजच्या अध्यक्ष प्रा. मीना गोखले यांना जातं. त्यांनी काही आर्थिक मदतही केली.
खरंतर, दोन्ही मार्गदर्शकांचं मार्गदर्शन असं काहीच झालं नव्हतं (दोघंही आज हयात नाहीत).
पीएच.डी.नंतर संबंधित सगळ्यांना पेढे दिले. विभागातले डॉ. वसंत पाटणकर म्हणाले, ‘सॉरी. आम्ही कोणी काही मदत नाही करू शकलो!’ मार्गदर्शकांची वेळोवेळी अनेक प्रकारची अकादमिक मदत झाली होतीच . त्यांनाही पेढे देण्यासाठी गेले. त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला. पण मी तो यशस्वी होऊ दिला नाही! अखेर, पेढा घेतल्यावर म्हणाले, ‘ forget & forgive’ हा तुमचा गुण वाखाणण्याजोगा आहे!’
पीएच.डी.साठी महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी तसंच दिल्ली, गोवा, बेळगाव इथे फिरूनही दुर्मीळ व मौलिक संदर्भ मी गोळा केले. विषय पठडीतला नव्हता. सर्वसाधारणपणे टेबलवर्क किंवा ऑथर स्टडी असतो.
फी भरायला कित्येकदा पैसे नसायचे. अगदी शेवटी ; चार-पाच वर्षं फी भरली नव्हती. शेवटच्या क्षणी नेमक्या आकड्याबाबत विद्यापीठाने दिलेल्या माहितीप्रमाणे कुठूनकुठून उसनवारी करून फीची रक्कम घेऊन गेल्यावर विद्यापीठाला त्यांची ‘चूक’ लक्षात आली. त्यांनी फी चक्रवाढव्याजाने वसूल केली. आत्याने आधी मदत केली होतीच. अखेरच्या क्षणीही तिच्याचकडे हात पसरले. फक्त दहा दिवसांचीही टर्म फी घेतली गेली. कित्येक वर्षं विद्यापीठाच्या ग्रंथालयाचा वापर न करताही तिथलीही फी चुकली नाही. प्राध्यापकांना शैक्षणिक शुल्कात अनेक प्रकारची सूट दिली जाते. मात्र माझा ; फीमाफीचा, फी उशिराव भरण्यासंबंधीचाही अर्ज फेटाळला गेला. फीच्या राक्षसाला निपटून अगदी शेवटच्या दिवशी संध्याकाळी प्रबंध सादर झाला ! प्रिंटरने प्रबंधाच्या एका प्रतीला सीनॅप्सीसच जोडला नव्हता . पण तो नंतर जोडायची परवानगी मिळाली. या दलदलीत पीएच.डी. पूर्ण व्हायला सतरा वर्षं लागली! पदवीधर व्हायला सतरा वर्षं लागतात. ‘द्विपदवीधर’ व्हायला मला पुढची सतरा वर्षं लागली.
वनवासच!! ‘prolonged disease’ म्हटलं तरी चालेल !!! हाच वेळ, शक्ती, पैसा अन्यत्र गुंतवला असता तर आयुष्यात उभी तरी राहू शकले असते !
सगळ्याच शैक्षणिक व्यवस्थेने केलेल्या खच्चीकरणाने कम्बर्ड पुरतं मोडून गेलं !
कधी कधी दबक्या आवाजात कुठून तरी चर्चा ऐकल्या, की अनेक प्रस्थापित मान्यवरांनीही त्यांच्या वैयक्तिक किंवा अकादमिक अडचणींमुळे करत असलेली पीएच.डी. सोडली. मी सोडून कोणालाही वाटत नव्हतं, की मी ती पूर्ण करेन. एका मैत्रिणीने विचारलं होतं, “या जन्मी तरी होईल का ?” बहीण म्हणायची, ”लोकं मला त्याबद्दल विचारतात तेव्हा लाज वाटते.” गावातले गुजरे काका पीएचडी झाल्यावर म्हणाले होते, ”तू गाडीला जाताना पाहिलं, की कळायचं नाही, तू नेमकं करतेस तरी काय ? आता कळलं.” कधी तांत्रिक काही चुकलं तरी अनेकांकडून ऐकून घेतलं ”पीएच.डी. ना तू !”
कॉलेजची पायरीही न चढलेल्या एका लेखकाने तर छापवूनच आणलं, ”हिची पीएच.डी. कधी होणारच नाही. ती लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करते. तिने काय लिहिलंय हे तिलाही सांगता येणार नाही. मुंबई विद्यापीठ काय कोणालाही देतं पीएच.डी.!” आई, भाऊ, क्वचित लोकांकडूनही कधीतरी ऐकून घेतलं, ”का केलीस पीएच.डी.? कॉमर्स का नाही केलंस ?”
माझ्या पीएच.डी.वरही पीएच.डी. होऊ शकते असं माझा संघर्ष थोडाफार पाहिलेल्यांनाही वाटतं.
पीएच.डी.नंतर वेगळीच गुंतागुंत अनुभवली. भल्याभल्यांच्या मनात माझ्याविषयी inferior complex, असूया निर्माण झाली. ओळखीची माणसं ओळख दाखवेनाशी झाली. jealousy मुळे लोकं दुरावली. माझ्या विशुद्ध यशाची पाळंमुळं त्यांना शोधता आली नाहीत. मला अनेकांच्या दैवी भाग्याचा हेवा वाटतो, तर अनेकांना माझ्या ‘स्वयंभू’ भाग्याचा हेवा वाटतो.
१९८५ सालापर्यंत कुटुंबाची तांत्रिक सुरक्षितता होती. त्यानंतर अनेक कारणांमुळे घर तुटलं. घरच्यांंना मी नको असल्याने त्यांंनी घराबाहेर काढलं. घरी खूप प्रश्न होते. त्यामुळे आजवर १५ ते २० पत्ते (होस्टेल्स, पेईंग गेस्ट, भाड्याची घरं) झाले असतील. घरमालकांचे, दलालांचे अनुभव वेगळेच. डिपॉझिटसाठी हितचिंतकांकडे कधी हातही पसरले.
नोकरी नसताना वर्किंग वुमेन्स होस्टेलला राहता येत नव्हतं ( नोकरी असणं हा नियम ). फक्त विद्यार्थिनींची अशी होस्टेल्स मुंबईत नव्हती. नोकरीचं खोटं सर्टिफिकेट देऊनही राहवं लागलं .
खोटेपणा उघडकीला आल्यावर निघावंही लागलं. शहापूरहून मुंबईला अपडाऊन करताना मुंबईत कोणाकडे तरी एखादी रात्र मुक्काम करण्याची गरज भासायची. नेहमीच ती पूर्ण व्हायची नाही. मैत्रिणींचे कटू अनुभवही यायचे. स्वत:चं भाड्याचं घर झाल्यावर या अवलंबित्वातून मुक्त झाले. कधीतरी कुठेतरी ‘आश्रित’ म्हणूनही राहिले.
माझ्या समाजात नोकरी करणारी महिला आताआतापर्यंत नव्हती. समाजात, कुटुंबात प्रोफेशनल अवेअरनेसचं वातावरण, संस्कार कधीच नव्हते. नोकऱ्या वगैरे नेहमीच सर्वस्वी मेरीटवरच, बौद्धिक क्षेत्रातच मिळवल्या. अर्थार्जनाचे मार्ग मुंबईत होते. नोकरी कधी असायची, कधी नसायची. खासगी क्षेत्रात, त्यातही साहित्यक्षेत्रात नोकरीच्या संधी अत्यल्प होत्या, नोकरी नसताना बऱ्याचदा ‘हातावर पोट’ भरणंही असायचं.
मराठी भाषेची ; मुद्रितशोधन व संपादनातली सूक्ष्मातिसूक्ष्म जाण असल्याने त्याच्याशी संबंधितच बहुसंख्य कामं केली. विशेषतः शाळा-कॉलेजांत बुक मार्केटिंग खूप केलं. लोकल गाड्यांत, चैत्यभूमीतही पुस्तकं विकली. मात्र आर्थिक गणितं जमली नाहीत. क्वचित ; मिळणाऱ्या नोकऱ्यांत ‘मराठी’ वृत्तीला सामोरं जावं लागायचं. नोकऱ्यांमध्ये प्रचंड आर्थिक, मानसिक शोषण ; राजकारण झालं – भीक नको पण कुत्रं आटोप इतपत. कधी हक्काचे पैसेही बुडवले गेले. घोर बौद्धिक उपेक्षाही झाली. या नोकऱ्या काटेरी, रक्तबंबाळ करणाऱ्या ठरल्या. नोकऱ्यांबाबतचे वरील अनुभव पीएच.डी. केल्यानंतरही आले. फुकटातही कामं केली.
पीएच.डी. असूनही गरजेपोटी किरकोळ कामं करण्याची तयारी असायची. मात्र कित्येकदा काम देणार्याला संकोच वाटायचा नि काम मिळायचं नाही.
मॉन्टेसरीतल्या मुलांना शिकवावं तरी संबंधित प्रमाणपत्र लागतं. नोकरीसाठी नव्याने एखादा कोर्स करावा तर ( उदा . बीएड् ) ; ज्यात करिअर करायचं नाही तो प्रांत विचारपूर्वक, कटाक्षाने टाळला. पैसे, ताकद, वेळ यांची अनुपलब्धता हेही मुद्दे होते.
काही प्रकाशन संस्थांनी वगैरे ; मी त्यांच्यासाठी मार्केटिंग, जाहिराती वगैरे मिळवून देण्याचं काम करावं असं सुचवलं. पण त्यांच्याकडचं प्रूफ रीडिंगचंही काम द्यायची त्यांची तयारी नसायची.
तुटपुंज्या पगारामुळे (१९८८ साली ३०० रुपये, २००४ साली २०००, २०१० साली १५०००) कित्येकदा बँकेत खातंही नसायचं (२०१० सालापर्यंत २५० रुपये डिपॉझिट ठेवणंही शक्य नसायचं). शहापूरला राहताना बँक घरासमोर असूनही नोकरीसाठी सकाळी घराबाहेर पडल्यानंतर रात्री परतेपर्यंत बँक तसंच डॉक्टरचाही उपयोग नसे.
अत्यंत विपन्नावस्थेत medals ही विकली. छप्पर नि पोटाचे प्रश्न तात्पुरते सुटले, एवढंच !
कुठलंही स्त्रीव्यासपीठ, शिष्यवृत्ती, सरकारी योजना, सवलती वगैरेंच्या साच्यात न बसल्याने त्यांचा लाभ मिळू शकला नाही. माझे प्रश्न एकटीचे, व्यक्तिगत असले तरी दुर्दैवाने ते सामाजिक होऊ शकले नाहीत. पीएच.डी. झाल्याचे काही सत्कार झाले. मात्र माझ्या जातवाल्यांनी दखल घेतली नाही. मी काय केलंय हे त्यांना कळलं नसेल, हा भाग वेगळा !
पीएच.डी.च्या निमित्ताने काही दिग्गज सिंधी व्यक्तींशी ओळखी झाल्या. पण निव्वळ ; काही ‘तांत्रिक’ कारणांमुळे मी त्यांच्यापर्यंत पोचू शकले नाही.
बालपण कसं गेलं, आठवत नाही. अकाली प्रौढत्व आलं. ‘शेअर आणि केअर’ हे सुख घरीदारी मला कधी लाभलंच नाही. ‘प्रेम,’ सहवास, नाती हा जगण्याचा पाया, ‘प्राणवायू’ कधी अनुभवलाच नव्हता. बुडत्याला काडीचाही आधार नव्हता. जगण्यासाठी निदान पैसा तरी हवा… पैशांंची कायम चणचण असूनही ती फारशी जाणवू दिली नाही. सगळं रामभरोसे चाललेलं. एकचाकी ढकलगाडी. जगणं एकखांबी तंबू, All in one असं. ‘त्वमेवं सर्वम’ची भूमिका निभावताना show must go on असा दृष्टिकोन बाळगावा लागला.
आत्महत्या करायला पर्याय नसलेलं आयुष्य! अपंगत्वाची भीती एवढीच जगण्याची प्रेरणा… जगण्यामरण्याचे प्रश्न सोडवण्यातच उभं आयुष्य पणाला लागलं. मानसिक, शारीरिक, भावनिक, पारंपरिक, बौद्धिक, सांस्कृतिक, शैक्षणिक (यांचं परस्परावलंबित्व हा स्वतंत्र विषय) इत्यादी बाबतींंतल्या एकटेपणाच्या परिणामांचं दुष्टचक्र अस्तित्वालाच गिळंकृत करणारं होतं! सगळी psychological ताकद हिरावल्यासारखी. रडण्याचीही ताकद संपलेली. ‘जीव’ नकोसा, संपल्यासारखा. संपलेलं आयुष्य रेटत होते. जगण्याची ‘मूलभूत’ ‘ताकद’ हरवून बसलेले ! दैनंदिन आयुष्यही पेलण्याच्या पलीकडचं असायचं. दैनंदिनी पार पाडता आली तरी खूप असायचं. कधी अन्नाच्या भुकाही मरायच्या. जेवण धड बनवायचे नाही, बनवलं तरी जाईलच असं नसे. रुटीन, तब्येत आणि office सांभाळताना पावलोपावली तारेवरची कसरत व्हायची. दुखणी अंगावर काढली. आजार शारीरिक की मानसिक हे मलाच कळायचं नाही, नि डॉक्टरच्या फीजची धास्ती वाटायची. कधी काही कमीजास्त झालं तरी सोयरसुतक असणारं कोणीच नव्हतं. घरच्यांचे फोन नंबर्सही कोणाकडे नव्हते. सुदैवाने, अशी वेळ कधी आली नाही.
‘जगवणुकी’च्या धबडग्यात सगळ्या जाणिवाच काय, सगळ्या’पलीकडे’ गेले… कधी इच्छाशक्ती आणि कार्यशक्तीत खूप अंतर पडायचं. अदृश्य असं जगावेगळं अपंगत्व! डोकं, मेंदू शाबूत ठेवणं हे मोठं आवाहनच होतं. वेड लागू दिलं नाही, विचार करून डोकं रिकामं झालं. विचार न करण्याचाही त्रास! मनाला कितीही समजावलं, बळ कितीही एकवटलं, कितीही मारावं म्हटलं तरी ‘मन’ मरू शकत नव्हतं. एकटेपणामुळे एकटेपणाचा घातांकच होई.
माझ्या आयुष्यात मला चांगली माणसं नाही भेटली (प्रासंगिक चांगलेपणा अनुभवला). माझा तेजोभंग करण्यात अनेकांनी समाधान मानलं. माझ्या जीवघेण्या आयुष्यातला संघर्ष अनेकांनी सोयीनुसार, समजानुसार enjoy केला. घरीदारी मला तर कोणी वालीच नव्हता. ‘पाया’रहित आयुष्य जगावं लागल्याने नि ‘पार्श्वभूमी’ माहीत नसल्याने आणि आकसापोटी माझ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल गैरसमजच अधिक पसरले, हेतुपुरःसर पसरवलेही गेले. माझ्या सगळ्या वागण्याबोलण्याचे चुकीचे, सोयीचे अर्थ काढले गेले. गैरसमजांतून, एकतर्फी गरजेतून लोकं दुरावली ; माणसं, नाती जोडण्याचे पुरेपूर गुण असूनही. अनेकांना वाटायचं, माझाच दृष्टिकोन नकारात्मक आहे, मीच लोकांशी पटवून घेऊ शकत नाही वगैरे. जो जो social interaction अनुभवलं, टक्केटोणपे खाल्ले; एकटी पडत गेले तसतशी ‘शहाणी’ होत गेले. लोकांशी कसं वागावं याबाबत अडाणी होते (so called normsबाबत).
मैत्रीची, भावनिकतेची अपेक्षा जिथे जिथे करायला गेले, अपेक्षाभंगच झाला. गरजू, गरीब, दु:खी, कोणाचंही कोणी नसलेल्या तरी हुशार, जेन्युईन बाईला कोणी जवळ करत नाही हे पदोपदी अनुभवलं. वैफल्य, दुःख, संताप, मन:स्ताप, फरफट, तगमग सतत अनुभवत होते…! इमोशनली कशाशीही जोडले गेले नाही. औपचारिक आयुष्य जगले. माणूस म्हणून जगलेच नाही. अलिप्त, रुक्ष, कोरडी राहिले.
हिडीसहिडीस, हाडतूड, याचना, नकार, rejection यांनी उबले होते. सर्वार्थाने एकटं असण्याच्या प्रश्नाशी झुंजताना ज्या शारीरिक, मानसिक परिणामांना सामोरं जावं लागलं, त्याला तोड नसेल. डायबेटिस, निद्रानाश, डिप्रेशन या समस्यांना या काळात सामोरं जावं लागलं.
या पीएच.डी.ने थोडीफार प्रतिष्ठा दिली, गुणवत्तेचं चार जाणकारांकडून चारचौघांत कौतुक होण्यापलीकडे काही झालं नाही. पीएच.डी.ने व्यावसायिक संधी दिल्या नाहीत. ‘संधीतून संधी’ मिळाली नाही. व्यक्तिगत आयुष्यात फरक नाही पडला. कारण तथाकथित एमएची पदवी घ्यायला व्यक्तिगत कारणांमुळे मी कमी पडले! माझ्या कार्याची, जगण्याची जाहीर ‘दखल’ कोणालाच घ्यावीशी वाटली नाही, सुशिक्षित समाजाच्या ‘प्रवाहा’त सामावता आलं नाही! माझ्या जातीत मी कुठेच नाही. मराठी समाजातही मी ‘पॅच’ आहे. मराठी समाजाने माझा स्वीकारच केला नाही. पुरेपूर प्रयत्न करूनही लौकिक यश नाही मिळालं. मानसन्मान, प्रतिष्ठा, पदं नाही मिळवता आली. एक प्रतिष्ठित संस्थाप्रमुख एकदा म्हणाले होते, ‘खरंतर, आज तू एका फॅकल्टीची विभागप्रमुख असायला हवी होतीस.’ जातिव्यवस्थेचे छुपे चटके तर पावलोपावली अनुभवले.
अनुकूलता आणि हुशारी व कष्ट असले की नुसतं जगणंही फार कठीण नसतं! अनेक सामान्य वकुबाच्या माणसांना विनासायास, ‘लायकी’ नसतानाही खूप ‘मिळत’ असतं ; वाईट याचं वाटतं. तुम्ही कोणाचे तरी कोणीतरी आहात, पैसेवाले आहात, सुंदर आहात, तुमच्यात समोरच्याचे ‘हितसंबंध’ गुंतलेले आहेत ; निदान तुमचे कोणी ‘फादर’, ‘गॉडफादर’ आहेत ; त्यापेक्षाही ‘तुमचं’ असं कोणीतरी आहे एवढ्या बळावरही ; तुम्हाला अपेक्षित यश नाही मिळालं तरी तुम्हाला निदान; सुसह्यपणे जगता तरी येतं. कुठल्याही तत्त्वांशी मी कधी तडजोड केली नाही. एकूणच; या व्यवहारी जगात माझी बुद्धी नि भावनांचा पाचोळा झाला. नोकऱ्यांत मी ‘एम्प्लॉई’च्या पुढे नाही जाऊ शकले. पावलोपावली उपेक्षा अनुभवली. ज्यांच्या हातात ‘अधिकार’ होते त्यांनीही जाणीवपूर्वक मला ‘दूर’ ठेवलं. प्रस्थापित समाजाशी टक्कर देत सगळ्यावर मात केली तरी उपेक्षेच्या ‘दुःखा’वर मी मात नाही करू शकले. तो दुखरा कोपरा आहेच.
पीएच.डी.तून ‘मुक्त’ झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नव्हते. प्रश्न, परिस्थिती बदलली नाही. आर्थिक आणि मानसिक अस्थिरता, असुरक्षितता तीच राहिली. प्रत्यक्ष व्यवहारात घोर नैराश्य पदरी पडलं. पदवी मिळवून पायांवर उभं राहण्याचं स्वप्न कुचकामी ठरलं. व्यावसायिक भवितव्य उलट दिवसेंदिवस अधिकच कठीण बनत गेलं. माझी गुणवत्ता, धडपड माहिती असणाऱ्यांकडूनही दारुण अपेक्षाभंग होऊन जगणंच ओझं बनलं. फक्त जगणंच कसंबसं चालू होतू. त्या’पलीकडे’ जाऊन सर्वार्थाने सक्षम व्हायचं स्वप्न मी पाहू शकत नव्हते.
आर्थिक व मानसिक स्थैर्याचा मार्ग शोधूनही सापडत नव्हता. कौटुंबिकपेक्षाही डाॅमिनेटेड बाहेरचे संघर्ष होते. शिक्षण, न्याय नि माणुसकीवरचा उरलासुरला विश्वासच उडाला होता. प्रत्यक्ष राजकारणातही नसेल असं सत्तेचं हिडीस, ओंगळ रूप चोहोकडे अनुभवलं. विद्यापीठातला भोंगळ, अकार्यक्षम नि बेशिस्त कारभार तसेच वाढलेल्या कंपूशाहीमुळे विद्यापीठाचं नावही नकोसं झालं. शिक्षण की शिक्षा? असाच प्रश्न पडावा. दारिद्र्य, बेकारी, निवारा, प्रकृती अशा जगण्याच्या प्रश्नांशी कायम झुंजत राहिले.
इतक्या सगळ्या प्रतिकूलतेतूनही माझ्या गुणांच्या जोरावर मी हवं ते ‘मिळवलं’. प्रयत्नपूर्वक शाबूत ठेवलेला आत्मसन्मान नि संवेदनशीलता मरू दिली नाही. खूपच प्रॅक्टिकल, सिलेक्टिव व जागरूक झाले. ताक फुंकून पितानाही शंकर वेळा विचार करायला लागले. अडथळे अमर्याद होते, तरी पीएच.डी.ला कधीच ‘गुंडाळावं’सं नाही वाटलं. पूर्ण समाधान झाल्यावरच प्रबंध सादर केला. जीव अडकला होता तिच्यात! फारच थोडे लोक ज्ञानासाठी शिकतात. सर्वस्व पणाला लावून जीवाची बाजी करणं काय असतं याची कल्पना कोणालाही येऊ शकणार नाही… तपश्चर्या, सत्त्वपरीक्षा हे शब्दही त्यापुढे फिके पडतील!
पदवीपर्यंत परीक्षार्थी, वरवरचं, पोकळ, दिखाऊ व औपचारिक शिक्षण लादलं गेलं. पण या पीएच.डी.ने नि तिच्यामुळे जगण्यातल्या मिळवलेल्या पीएच.डी.ने मला श्रीमंतीच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवलंय याचा मला कोण सार्थ अभिमान आहे हे सांगायला शब्द शतशः अपुरे आहेत…
गरजेप्रमाणे नेहमी स्वतःला बदलवलं. कितीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी एकटीने ; धैर्याने नि वैचारिक व भावनिक परिपक्वतेच्या आधारे तिला सामोरी गेले. खूप कठीण असलं तरी एकटेपणालाच जगण्याचं बळ ठरवलं. नियतीने पुढे इतकं अन्याय्य आयुष्य वाढून ठेवलं असेल याची सुतराम कल्पना स्वप्नातही येणं शक्य नव्हतं, तरी फक्त कर्मयोगाचं पालन करत आले. support systemने मिळणारी positive energy कधीच न अनुभवल्याने भावनिक स्वावलंबनाचंही आयुष्य जगायला शिकले. भाबडेपणातून जगाला पारखण्याचा प्रवास सुरू केला.
कधीही कुठलाही प्रतिष्ठेचा प्रश्न कधी केला नाही. कुठल्याही वादविवादात अडकले नाही. कोणाशीही संबंध बिघडवले नाहीत. शक्यतो react न होता निरीक्षक, तटस्थ, स्थितप्रज्ञ बनले. लवचीकता बाणवून आत्मसात केली. फायटिंग स्पिरीटचा पदोपदी वापर करत आयुष्याची उत्तम व्यवस्थापक बनले. भाड्याच्या डिपॉझिटचे पैसे परत करायला मालकांनी नकार दिला, रात्री-अपरात्री ध्वनिप्रदूषण होतंय, केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाहीये किंवा तत्सम कुठल्याही दांडगाईला-अन्यायाला वेळप्रसंगी पोलिसांच्या सहकार्याने नेहमी उत्तर दिलं. जे वाट्याला आलं त्यातूनही जगण्यातलं aesthetics, रसिकता जपली. मुंबईला कर्मभूमी बनवून स्वत:च्या कुठल्याही चांगल्यासाठी हवी ती किंमत मोजत संयम पणाला लावला. ते करताना art of living, विपश्चना, ब्रह्मविद्या, तणावनिर्मूलन शिबिरं, कुठलेही अध्यात्मगुरू किंवा तत्सम कुठल्याही सल्ल्यांपासून निग्रहाने लांब राहिले. प्रयत्नांत कसूर केली नाही नि अपेक्षाभंगाच्या दु:खात अडकून पडले नाही. देवाचं स्थान नसलेली spiritual development उत्तम साधली.
अत्यंत दुर्दैवी आयुष्य वाट्याला येऊनही अत्यंत दुर्मीळ असं ; कोणीही माझ्याकडे अभिमानाने, आदर्शाने पाहवं असं ‘अर्थपूर्ण’, मूल्यात्म आयुष्य दुर्दम्य चिवटपणाच्या बळावर मी ताठ मानेने जगले. मुंबईसारख्या शहरात एकटीने, कोणाच्याही मदतीशिवाय राहिले. माझं लिखाण, संशोधन वगैरेंची सभोवतालच्या समाजाला नोंद घ्यायला भाग पाडलं.
विशिष्ट ध्येय, महत्त्वाकांक्षा किंवा दृष्टिकोन समोर ठेवून मी शिकले नाही. निव्वळ ; आवड आणि ज्ञान मिळवणं एवढाच हेतू होता. मिळवलेल्या पदवीपेक्षाही ती मिळवताना जे जगले ते कित्येक पटींनी रम्य होतं. खूप एन्जॉय केला हा काळ. झालेल्या त्रासाची त्यापुढे फारशी तमा नाही. आयुष्याभर पुरेल इतकं अतिरिक्त ज्ञान मिळवलं. त्यापेक्षा जगण्यातलं दुर्मीळ ज्ञान प्रचंड श्रीमंती देऊन गेलं.
पीएच.डी.ने आर्थिक सक्षमता दिली नसली तरी त्यापलीकडचं जे अलौकिक संचित मिळवलं त्यापुढे टाटा-बिर्लांची आर्थिक सुबत्ताही फिकी पडावी!
एरव्ही, चाकोरीतली कुठलीतरी पदवी मिळवून भरपूर पैसा कमवत मळलेलं धोपटमार्गी आयुष्य जगले असते तर आज मिळवलेल्या या खऱ्याखुऱ्या विशुद्ध समाधानाला मुकले असते !
तीस वर्षांत जोडीदाराचा शोध घेण्याचा अथक प्रयत्न केला. पण तो मृगजळच ठरत गेला. माझ्या ‘आंतरिक’ सौंदर्यात डोकावून पाहणारी एकही व्यक्ती भेटली नाही. ‘जात’ हा लग्न न होण्यामागचा महत्त्वाचा घटक. माझ्या जातीत मागासपणाच! मराठी लोकांसाठी मी आंतरजातीय !! माझं ‘मराठीपण’ समजून घेणारं कोणी भेटलंच नव्हतं. ‘जाती’बाबत आडनावातच विकेट जायची. स्वत: कितीही कुरूप, बीजवर-तीजवर असले तरी ‘खाईन तर तुपाशी’ अशीच वृत्ती पहिली. विशिष्ट ठिकाणी भेटायचं ठरवल्यावर तिथवर येऊनही न भेटता गेलेले अनेक! माझ्या कधीच कुठल्याच अटी नव्हत्या. विवाह मंडळांचेही स्वतंत्र अनुभव. अशा सगळ्या अनुभवांमुळे, माझ्यातल्या स्त्रीत्वभावना पायदळी तुडवल्या गेल्या.
मॅट्रिमोनिअल ल तरी तुरळक प्रयत्न चालूच होते.
२८ मे २०१५ रोजी माझ्या आयुष्यात चमत्कारच घडला! माझ्या बावन्नाव्या वर्षी ठाणे येथील दीपक गायकवाड या सद्गृहस्थशी मी विवाहबद्ध झाले आणि माझ्या आयुष्याला turning point मिळाला.
दीपक हे स्वेच्छानिवृत्त ऑफिसर. लाखात एक माणूस. शिकताना गरिबीचे चटके सोसत खडतर आयुष्य जगले. एका टक्क्याच्या फरकाने मेडिकल हुकलं. घरी कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. सामान्य शेतकरी-पुत्र. जुन्नरकडील छोट्या खेड्यात बालपण गेलेलं.
आम्ही चेस – पत्ते – कॅरम खेळतो, फिरायला (walk) जातो. लग्नानंतर वर्षभरात काश्मीरला जाऊन आलो (माझा पहिला विमान – प्रवास) नाटक-सिनेमा, आसपासच्या साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावतो. आमच्यात बौद्धिक चर्चा, वादही होतात.
विवाहोत्तर आयुष्य जगताना भोगलेल्या आयुष्याचं ‘ट्रेनिंग’ कामी येतंय. लग्न दोन्हीकडच्या निवडक माणसांसहित अत्यंत साधेपणाने रजिस्टर पद्धतीने पार पडलं. माझी मोठी बहीण आशा वारघडे हिने लग्नाची सगळी जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. आईवडिलांना गुरूंची परवानगी नसल्याने ते आले नव्हते. मात्र पुढील वर्षी ; लेकीचा सुखासमाधानाचा संसार पाहायला ते येऊन गेले. सगळ्या प्रकारचं अवलंबित्व व विवशतेपासून दूर राहून संसारात मी छान सेटल झालेय. असहकार्य करणाऱ्या अनेक यंत्रणा आता सहकार्य करू लागल्या आहेत.
पुण्याला असलेली आमची मुलगी अधूनमधून माहेरपणाला येते. आम्ही भरपूर एन्जॉय करतो.
सुरुवातीपासूनच सर्व नातेवाइकांच्या सुखदुःखांत सहभागी होत मी नाती मेन्टेन करत आले. नात्यातले यंगस्टर्स ‘काकी तू , मामी तू’ ; लहान नणंद ‘वहिनी तू’ अशी एकेरी हाक सुरुवातीपासूनच न सांगता मारतात तेव्हा मस्त वाटतं. ही तरुण मंडळी माझी फेसबुक फ्रेंड्स आहेत.
यापूर्वी फक्त नशिबाची साथ नव्हती, प्रदीर्घ ‘अंधेर’ झाला एवढंच ! अर्थात, तो अंधार दूर सारायला कैक मरणं मरावी लागली !!!
माझे प्रश्न मी नक्कीच ओढवून घेतले नव्हते. नियतीने ते लादले ! शत्रूच्याही वाट्याला येऊ नये असं भयंकर होतं हे सगळं !
आज माझ्या क्षमतांचा उपयोग इलेक्ट्रॉनिक माध्यमांंतून नेटवर्क बिल्डअप करण्यासाठी, स्वत:चं marketing करण्यासाठी, नवीन तरी वेगळं व पर्यायी विश्व उभारण्यासाठी मी करत आहे. इंटरनेटच उशिरा का होईना, मला न्याय मिळवून देईल याची मला पूर्ण खात्री आहे. बऱ्यापैकी न्याय मिळत आहेही. माझी ही संघर्षगाथा इलेक्ट्रॉनिक माध्यमांंतून खूप व्हायरल होऊन नवीन पिढीला प्रेरक ठरतेय.
प्रबंध सादर केल्यानंतर; जुलै २००५च्या पावसात शहापूरला राहत असलेलं माझं व आईवडिलांचं घर उद्ध्वस्त झालं होतं. माझा फक्त ‘कागदी संसार’ पूर्ण वाचला! माझ्यातल्या Creativityला, लिखाण-संशोधन-संपादन क्षमतेला पुरेसा ‘न्याय’ देता येईलसं वाटतं. त्या दृष्टीने सुरुवातही केलीय. आत्मकथन लिहितेय. त्यासाठीच गेल्या पस्तीस वर्षांतला महत्त्वाचा वाटलेला कागदाचा तुकडा न तुकडा जपून ठेवलेला. हीच माझ्या आयुष्यातली इस्टेट. तिच्या आधारे ‘ध्येय’ गाठण्यासाठीच तग धरून जगू शकले.
शिक्षणाबाबत फारशी मजल न गेलेल्या, स्वतंत्र विचारसरणीची कुवत नसलेल्या, लाचार जिणं खितपत जगत असलेल्या माझ्या समाजातल्या कित्येक स्त्रियांची दाहक आयुष्यं समोर दिसत असतात. तेव्हा वाटतं – माझ्या उदाहरणाने मी त्यांच्यापुढे काय ‘आदर्श’ ठेवू शकले? ‘खूप शिका, स्वतःच्या पायांवर उभ्या राहा’ असा संदेश दुर्दैवाने मी त्यांना नाही देऊ शकत. एकीकडे महिला सबलीकरण, स्त्रीस्वातंत्र्य व समानतेचा गाजावाजा होत असताना उपेक्षित पण अनधिकृत दुर्बल सामाजिक घटक म्हणून प्रस्थापित समाजव्यवस्थेकडून आणि शिक्षणक्षेत्राकडून अपेक्षा एवढीच, की ‘माझ्या’सारख्यांच्या प्रश्नांकडे व्यक्तिगत किंवा वैयक्तिक बाब म्हणून न पाहता ‘विशुद्ध’ सामाजिक प्रश्न म्हणून बघितलं गेलं तरच यापुढील सगळ्याच उपेक्षित घटकांना योग्य न्याय मिळेल !!! जमेल तेवढा वाटा मी नक्कीच उचलणार आहे…

– लेखन : डॉ उषा रामवाणी गायकवाड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800