मेणा पाठवा घेण्याला
सुखी लाडक्या राणीला
देवा नारायणा तुझा
दाव प्रकाश गाडीला
ओवी गाता गाता कशी
मला लागली उचकी
माझ्या भरल्या घरात
लेक साऱ्यांची लाडकी
भाऊ बीजेचा चंद्रमा
वाट पाहतो पहाटे
म्हणे सूर्याला दुरुनी
तिला पहावे रे वाटे
चंद्र म्हणाला रवीला
दिस तुझा, रात माझी
तेल उटणे लावून
जातो फिरुनी आकाशी
सारं दळण दळले
लेक माझी का येईना ?
पारी करंजीची का हो
हवी तशी मुरडना
घर अधीर जाहले
मन वेढले शंकेने
घुंगराच्या मेण्याला हो
कोणी घातली बंधने
दिस डोईवर आला
तरी उन्हं का कोवळी
बिथरली असेल का ?
पोर माझी हो कोवळी
सण साजरा होईल
दारी पाहिल लेकिला
हिरा जडवला माझ्या
जावयाच्या अंगठीला
काव काव करुनी तो
पहा थकला कावळा
माय बहिणे झणी ये
हरी म्हणतो सावळा
आला आला घुंगराचा
मेणा वाजत गाजत
लेक माहेरी आली हो
भाचे नाचुनी सांगत
माझ्या लेकीच्या वरुनी
पाणी तुकडा उतरा
नातवंड नी जावई
— रचना : सौ.प्रज्ञा कुलकर्णी. वसमत
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484880