26 जानेवारी च्या निमित्ताने 15 वर्षाच्या ऑस्ट्रेलियातील वास्तव्यानंतर एका भारतीयाने आपल्या भावना पुढील कवितेतून व्यक्त केल्या आहेत.
धस्स झालं पटदिशी
माझ्या काळजात
उडलं इमान जवा
उंच उंच आकाशात …
हा मायदेश शब्द
उमगला तवा मजशी
नकळत पोचलो जवा
मी ह्या परदेशी……
राहतोय कर्मभूमीत जरी
मी इथं तनानं
रमतोय मात्र मायदेशाच्या
मातीत मनानं ……
अनंत सांत्वनापारी
मन सदा तळमळतं
अधनंमधनं कळत-नकळत
ते का कळवळतं……
सोन्याच्या पिंजऱ्यात गुंतून
अडकलेला मी पक्षी
झुरतोया तुझ्यासाठी आतून
माझे अश्रू साक्षी
गल्ली बोळ आजोळ वाड्या
नकाशावरच बघतोय
आठवणींच्या खजिन्याची दारं
सपनातच उघडतोय…..
वाटतं कधी-कधी उचलून
मायदेशालाच इथं आणावं
इथल्या शांततेला हरवून
प्रेमाच्या गोंगाटात रहावं…..
कुढत राहणाऱ्या मनाला
मग मिळंल जरा दिलासा
खऱ्याखुऱ्या आनंदाचा
होईल मग सारा खुलासा…..
अपराधी भावनेने मी
शून्यात जातो कांही क्षणात
कथा कविता अन् गाण्यांच्या
मग पडतो प्रेमात…..
जोडली आहे नाळ मी
अजून मायदेशाच्या संपर्कात
देशभक्तीची गाणी रचून
जपतोय तुला हृदयात…..
हे मायदेशा तू साज माझ्या
आईच्या गळ्यातला
तुरा तू माझ्या बाबांच्या
जरीच्या फेट्यातला……
तू अंकुर पूर्वज्यांच्या
बलिदानी रक्तातला
मी एक पामर भक्त
तुझ्या सेवेचा भुकेला……
शोधतोय मायदेशा मी
चातका सारखी संधी
फेडेन म्हणतो मी पांग
तुझे कधी ना कधी
परदेशी वास्तव्याचे मी
केले जरी शतक
हे मायदेशा तुला मी
तहहयात नतमस्तक
एक ना एक दिवस करेन
उदात्त कार्य मायदेशा नक्की
आपुल्या नात्याची गाठ मग
अजून व्हावी पक्की……

– रचना : सर्जेराव पाटील. Sydney ऑस्ट्रेलिया
(कौलवकर – नाशिककर)
अतिशय सुंदर कविता