भारताला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्ष झाली, याचा आपणा सर्वांना खूप आनंदही आहे आणि अभिमान ही आहे. आणि तो असायलाच हवा. देशाच्या अमृत महोत्सवी घरघर तिरंगा लहराये, देश की शान बढाये, मेरा भारत महान, अशा घोषणा देताना उर आनंदाने भरून येतो.
जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या सनातन भारतीय संस्कृतीचा मला अभिमान आहे. माझ्या माते इतकाच माझा देश मला पवित्र आहे. माझ्या देशातल्या प्रत्येक गोष्टीचा मला अभिमान आहे. शाळेत म्हटलेली प्रतिज्ञा माझ्या नसानसात भिनलेली आहे. माझ्या देशाच्या संविधानाचाही मला अभिमान आहे.
देश प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. हरित क्रांती, औद्योगिक क्रांती, दळणवळणाची साधने, महामार्गांचे जाळे, अणू संशोधन, शैक्षणिक प्रगती, जगातील इतर देशांशी मैत्री, इंटरनेटचे जाळे, मोबाईल ने तर जग अगदी जवळ आले आहे. भारत आता महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे.

हे सार खरे असले तरी देशापुढे काही आव्हानेही आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जसे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तरुणांच्या आत्महत्या, स्त्रीभ्रूणहत्या, महिलांवरील अत्याचार, गलिच्छ राजकारण, शिक्षणाचा झालेला बाजार, बेरोजगारी, भूकबळी, पाकिस्तान, चीन सीमा प्रश्न, अतिरेकी, घुसखोरी, असे कितीतरी प्रश्न देशापुढे उभे आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मोबाईलचा अतिवापर, प्रसार माध्यमांमुळे होणारे परिणाम या साऱ्या गोष्टींचा ठोस विचार होणे आवश्यक आहे. देश आपल्यासाठी काय करतो त्यापेक्षा आपण देशासाठी काय करतो ? याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे. देशापुढील आव्हानांचा विचार करता आपल्या परीने काय करता येईल ? हे जास्त महत्त्वाचे आहे. ‘माझ्या स्वप्नातील भारत’ असे म्हणताना माझ्या शब्दाला अधोरेखित केले पाहिजे.
आपण आपल्या शरीराची स्वतः जशी काळजी घेतो तशीच काळजी आपण देशाची घेतली पाहिजे. म्हणजेच स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. माझे घर आणि परिसर मी स्वच्छ ठेवला तर माझे अनुकरण घरातील इतर सदस्य करतील. त्यांचे पाहून शेजारी अनुकरण करतील, असे करत अख्खी आळी, स्वच्छ होईल. त्यानंतर दुसरी, असे करत गाव स्वच्छ होईल. त्यानंतर शेजारचे गाव, त्यानंतर तालुका, नंतर जिल्हा, नंतर राज्य, त्यानंतर आपोआपच देश स्वच्छ होईल.
आपण आता देशापुढील आव्हानांचा विचार करू या.
शेतकऱ्यांची आत्महत्या :
याविषयी आपण काय करू शकतो ? पहिले तर शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव ठेवा. त्यांच्या मालाला योग्य भाव द्या. अन्न वाया घालवू नका. शेतकऱ्याच्या मालाचा भाव कमी करू नका.
तरुणांची आत्महत्या :
तरुणांना एकटं पाडू नका. त्यांच्याशी संवाद साधा. लहानपणापासून त्यांना अपयश पचवायची सवय लावा. कोणतेही काम छोटं नसतं हे त्यांच्या मनावर बिंबवा. कोणत्याही परिस्थितीत परिवार तुझ्या पाठीशी असेल हा विश्वास द्या.
महिलांवरील अत्याचार :
याविषयी कायदा कडक करायला हवा. गुन्हेगाराला त्वरित शिक्षा व्हायला हवी. अजामीनपात्र गुन्हा ठरवावा.
स्त्रीभ्रूणहत्या :
मुलगा मुलगी भेद टाळा. दोघांना समान वागणूक द्या. स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्याला कडक शासन व्हायलाच हवे.
गलीच्छ राजकारण :
जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला उमेदवार निवडून द्या. प्रामाणिकपणा,देशभक्ती,विकासाचा ध्यास घेतलेला, इमानदार, उच्चशिक्षित, सुज्ञ अशा व्यक्तीला संधी द्या.
शिक्षणाचा बाजार :
शिक्षण हे सर्व स्तरातून सारखेच मिळाले पाहिजे. जास्त डोनेशन भरून जास्त चांगले शिक्षण मिळते असे नसावे. शिक्षणाचा बाजार थांबवावा. डोनेशनला विरोध करावा.
बेरोजगारी :
लोकसंख्येच्या वाढीमुळे बेरोजगारीचा प्रश्न उत्पन्न झाला आहे. सर्वांनाच नोकऱ्या मिळणे शक्य नाही. त्यामुळे तरुणांनी आपला पिढी जात व्यवसाय करावा. कोणतंही काम करताना लाजू नये ते प्रामाणिकपणे आणि सचोटीने करावे. कोणतंही काम करताना लाजू नये. ते प्रामाणिकपणे आणि सचोटीने करावे. जेणेकरून रोजगार उपलब्ध होऊन बेकारीचा प्रश्न कमी होईल.
उपासमारी :
यासाठी शासन प्रयत्न करतच आहे. आपणही आपल्या जेवणातील काही अन्न आजूबाजूला जे गरजू असतील त्यांच्यासाठी काढून ठेवावा. माणुसकीची भिंत, माणुसकीचा फ्रिज असे उपक्रम राबवावेत. जेणेकरून आपल्या गावात कोणीही उपाशी राहणार नाही.
सीमा प्रश्नासाठी आपले जवान आणि शासन सतर्क आहेतच.
जय जवान जय किसान
स्वप्न शास्त्रींचे साकार करा.
जेव्हा झोपतो देश सारा
दारी धरतो किसान बेचारा
सैनिक देतो सीमेवर पहारा !!!
संस्कार आणि संस्कृतीच्या नुसत्या गप्पा मारण्यात तथ्य नाही तर ते कृतीत उतरुन आचरणात आणण्याची गरज आहे. पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा प्रत्येक भारतीयाच्या नसा नसात रक्त बणून उसळले पाहिजे.

प्रसारमाध्यमांना नावे ठेवण्यापेक्षा रिमोट आपल्या हातात ठेवावा. चांगले कार्यक्रम बघावे म्हणजे मुलं त्याचे अनुकरण करतील. छोट्या छोट्या गोष्टीत खारीचा वाटा उचलून आपल्या स्वप्नातील भारताचे स्वप्न साकार करूया. शेवटी एवढेच म्हणते…
तिमीरातून तेजाकडे जावे
अस्वच्छ ते स्वच्छ व्हावे
स्वार्थ सारे व्यर्थ ठरावे
द्वेष सारे गळूनी पडावे
भ्रष्ट सारे नष्ट व्हावे
गंध सुगंधित वारे वाहवे
दृष्ट सारे इष्ट व्हावे
देशात माझ्या असे हे राम राज्य यावे !!!
जय हिंद !!!

— लेखन : आशा दळवी. दुधेबावी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
लोकशाहीत साध्य झालेल्या याबरोबरच निर्माण झालेले प्रश्न आव्हान म्हणून उभे आहेत हे सत्य आहे.