माणसं जोडण्याची नशा असते
मनातल्या निर्मळ तरुण वयात,
प्रत्येकच चेहरा वाटतो आपला
प्रत्येकच भेट दैवी वाटते
हसणं, बोलणं सगळंच जाळं
पण वेळ गेली की कळतं
प्रत्येक धागा रेशमाचा नसतो
काही फसवा प्रकाश असतो
माणसं जोडणं सोपं असतं,
जपणं मात्र कठीण असतं,
आपल्याला कोण जपतंय
हे ओळखायचं असतं.
काही माणसं येतात
हात द्यायला नव्हे
तर आपल्या खांद्यावर
स्वतःचं ओझं टाकायला
आपल्याला वाटते ते आपल्या
सुखदुःखातले साथीदार,
पण ते आपल्याच वेदनांनी
आपल्यावरच वार करणार
माणसं जोडणं म्हणजे
आपल्या आत्म्याचा दरवाजा उघडून देणं नव्हे,
तर बाहेर ठेऊनही शांती जपणे
कधी कधी भारावून जातो
कोणाच्या शब्दांनी, कृतींनी,
जवळ गेल्यावर लक्षात येतं,
त्यांचेही पाय आहेत मातीचेच
आयुष्यात माणसे लागणारच
पण प्रत्येकाला आपलं म्हणणं
गरजेचं वाटतच नाही
‘आतलं वर्तुळ’ छोटं ठेवा,
‘बाहेरचं’ फक्त ओळखीपुरतं असू द्या
एवढंच मात्र पुरेसं असतं.
कधी कधी गोडपणाचं जास्तीचं प्रमाण
कटुतेच्या स्वरूपात
परत येतं हे लक्षात हवं
माणसं जोडावीत पण मापात,
माणसं जोडणं कला आहे,
स्वतःला जपणं साधना आहे.

— रचना : डॉ. चंद्रकांत हलगे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
