जग दिखाऊपणा च्या तराजूकडे झुकत असताना माणसातला माणूस कुठंतरी हरवत चाललाय या गोष्टीची खंत हृदय पिळवटून टाकते. इंटरनेटच्या युगात प्रेम, माया, आपुलकी, आपलेपणा लुप्त होतेय असं प्रकर्षाने जाणवतं. या, बसा, तासभर बोला आणि निघा ही संस्कृती बोकाळतेय. कारणं ही तशीच, वेळ कोणाला आहे, प्रत्येकजण आपापल्या व्यापात. सोशल मीडियावरच हे प्रेम, माया, आपलेपणा उतू जाताना दिसतात.
क्षणिक सुखाच्या मृगजळा मागे पिढी धावतेय खरी पण प्रत्यक्षात समाधानाचा लेखाजोखा मांडून पाहिला तर बाकी शून्यच ……… संवाद बंद झाले…. भेटीगाठी बंद झाल्या…. आपुलकीचे चार शब्द बोलायला वेळ नाही….. बोललोच तर ते ही अगदी मोजकेच ……. खरं तर परमेश्वराने किती सुंदर घडवलं माणसाला ! अगदी प्रेमानं ओतप्रोत. पण प्रेमाची जागा अहंकाराने घेतली आणि इथंच सगळी गडबड झाली …….
अश्या विनाशाकडे जाणाऱ्या युगात माणुसकी जपणारी माणसं पाहिली की जग गवताच्या एका पात्यावर टिकून आहे या गोष्टी चा प्रत्यय येतो …. अशी माणसं जगात आहेत म्हणून कुठंतरी जग टिकून आहे असं मनोमन वाटतं …..
अश्या माणसातलं माणूसपण आजही टिकवून ठेवलेल्या लोकांना भेटण्याचा योग नुकताच आला. शहरी संस्कृती ला फाटा देत आजही आपलेपणा जपणारी खेड्यातली ही लोकं भेटली की मन तृप्त होतं…….
गेल्या आठवड्यात समाजाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्याला जाण्याचा योग आला. कार्यक्रम तीन वाजेपर्यंत आटोपून आम्ही सतरा ते आठराजणी महिला परतीच्या प्रवासाला निघालो. कात्रजचे स्वामीनारायण मंदिर पाहून बनेश्वर ला महादेव दर्शन करून मैत्रीणीच्या (विनयाचे) माहेर, सातारा जिल्ह्यातील काळंगवाडी, चंदन-वंदन डोंगराच्या
पायथ्याशी वसलेले सुंदर गाव…..
येथे रात्रीच्या भोजनाची व्यवस्था तिने केली होती. खरंतर जायला थोडा वेळच झाला होता, नाहीतर काळंगवाडीला लवकर पोहचून तिथल्या निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवू, शेतात फिरू, चंदन वंदन गड पाहू असा प्रोग्रॅम ठरला होता, पण अंधार पडल्यामुळे या गोष्टीला आम्ही मुकलो……
हायवेवरून काही किलोमीटर आत गेल्यावर विनयाचे घर आलं. बारीक पाऊस चालूच होता. गाडीतून खाली उतरलो आणि अंगणातच तिचे वडील जे रिटायर्ड पोलीस आहेत स्वागताला उभे होते. भारदस्त शरीरयष्टी, पिळदार मिश्या उंच धिप्पाड व्यक्तिमत्त्व, पाहता क्षणीच एक आदरयुक्त आकर्षण वाटावं असं…… . त्यांनी व तिच्या दोन काकांनी हात जोडून नमस्कार करून या या अस आपलेपणाने स्वागत केलं. समोर चार मजली प्रशस्त घर स्वागताला सज्ज होतं.
आत गेल्यावर तिची आई, काक्या, अगदी आईच्या मायेने…. प्रेमाने विचारपूस करीत स्वागताला आल्या. सहावारी गोल साडी, कपाळावर ठसठशीत लाल कुंकू आणि प्रेमाने आपुलकीने केलेली विचारपूस एका क्षणात आईची आठवण करून दिली त्यांच्या वागण्याने ……
(मला वाटत ज्या लोकांच्या सानिध्यात असा अनुभव येतो ते देवात्मे च खरतर). गेल्या गेल्याच पॉझिटिव्ह एनर्जी ने मन काठोकाठ भरून गेलं. सगळ्यांची ओळख झाली आणि तिच्या वडिलांनी वरती जाऊन तोंड हातपाय धुवून घ्या असं सांगितलं. डाव्या बाजूचा नळ सोडा तिथं गरम पाणी येईल !!!!!
विनयाच्या वडिलांनी सांगितलं.
कोण करतं हो आजच्या युगात एवढं आपुलकीनं ? हल्ली लोकांना आपलं स्टेट्स खूप महत्वाचं. खेड्यात जायला, त्या लोकांमध्ये मिसळायला आत्ताची पिढी तयार नसते. लोकं आपलं आलिशान घरं, घरच काय त्यांची आलिशान टॉयलेट, बाथरूम खराब होतील, घर घाण होईल म्हणून आपल्याच पाहुण्यांना घरात बोलवायचं टाळतात. श्रीमंती चा माज असणारीही कितीतरी लोकं पाहिली, पण शहरी संस्कृती ला फाटा देणारी ही खेड्यातली लोकं माणसातला देवमाणूस जपणारीच !!!!!
याना भेटून मन प्रसन्न झाल.अगदी मंदिरात गेल्यासारख !!!! अतिथी देवो भव संस्कृती जपावी ती खेड्यातल्या लोकांनीच ……
फ्रेश होऊन आम्ही सगळं घर फिरून पाहिलं. विनया च्या आई आणि दोन्ही काकीनी सुग्रास भोजन बनवलं होतं. आम्ही सगळ्या मैत्रिणींनी भारतीय बैठक घालून या सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला. गरमागरम बासुंदीवर मस्त वरपुन ताव मारला सगळ्यांनी……अन्नदाता सुखी भव 🙌🏻 आपसूकच तोंडातून उमलटले. कीर्ती आणि वंदनाताईंनी आणि विनया च्या काक्या आणि आईनी भराभर पंगत वाढून काढली. मनसोक्त जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही सगळे हॉल मध्ये बसलो. थोड्या गप्पा झाल्या.
सर्वांची जेवणं आटोपून विनया च्या काकांच्या घरी सगळे चालत गेलो. काकांनी किती प्रेमाने आदरातिथ्य केलं !!!! जेवण झाल्यामुळे काही खाण्याचा प्रश्न च नव्हता. पण तरीही या दाम्पत्याने आम्हाला उकडून वाळवलेल्या शेंगा पिशवीतून भरून दिल्या घरी खाण्यासाठी ! किती ते प्रेम !!! किती ती माया !!!! आजकालच्या जगात अशी माणसं बघायला मिळणं म्हणजे आमचंच भाग्य म्हणावं लागेल नाही का ?
तिथला कार्यक्रम आटोपून आम्ही गाडीकडे वळलो. गाडीपर्यंत सगळे आई, वडील, काका काकी सगळेजण सोडायला आले. पुढच्या वेळी येताना जरा लवकर या. असा उशीर करून येऊ नका, म्हणजे सगळं नीट बघायला मिळेल अस त्यांनी आवर्जुन सांगितलं. रात्री दहा वाजता आम्ही एका खूप सुंदर अनुभवाच्या शिदोरीचा भला मोठा साठा घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो. पोटपूजा झाल्यामुळे सगळे निद्रादेवीच्या स्वाधीन झाले. पण मी एका वेगळ्याच विचारांच्या गर्तेत गेले. मनात विचार आला किती प्रेमळ असतात ही खेड्यातली माणसं ? कसला गर्व नाही. कसला बडेजाव नाही. नुसतं प्रेमानं ओसंडून वाहणार मन घेऊन जगतात. काळ्या आईची सेवा करण्यासाठी आपलं आयुष्य देतात. ना कसला दिखाऊ पणा ना कसला अहंकार. अगदी देवानं पाठवलेले देवआत्मेच जणू या जगाला सावरणारे.
माणसातला माणूस आहे याची खात्री देणारे. मनानं ठरवल यांच्यामुळे च तर जग तग धरून आहे. त्या विश्वाला आधार देणारी हीच ती गवताची पाती नाही का !!!!! मनात एक सात्विक समाधान घेऊन अश्या लोकांना मानाचा मुजरा करून मनात एक निश्चिय पक्का केला, काही झालं तरी आपल्यातलं माणूसपण टिकवण्यासाठी अश्या प्रेरणादायी लोकांना मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवायच अगदी जीवनाच्या अंतापर्यंत………..
शेवटी एकच वाटलं ……..
सुकर्म करुनि वंद्य हो
हात देऊनी मित्र हो
वर्तमानातून भविष्य हो
सावली देऊनी दिशा हो
कणाकणाला स्पर्श कर
माणूस म्हणून राज्य कर
माणुसकीच्या दर्शनाने
या धरेला स्वर्ग कर…….
– लेखन : सविता कोकीळ. इचलकरंजी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800