पाहतात वाट डोळे लावून माणसाची,
पाहतात आतुरतेने वाट पावसाची ॥
भरते घर येणाऱ्या माणसाने,
बहरते पृथ्वी कोसळणाऱ्या पावसाने ॥
घराचा कर्ता करविता माणूस,
पृथ्वीचा सुफलाम जनक पाऊस ॥
सामंजस्य वृत्ती आनंदी माणसाची,
रिमझिम सरीत शोभा पावसाची ॥
अंथरावी सुखे वैचारिक माणसाने,
फुलवावा निसर्ग मध्यम पावसाने ॥
राखावा चढउतार संसारी माणसाने,
करावी भरतीओहोटी समुद्री पावसाने ॥
विखरते घरकुल व्यसनी माणसाने,
कोलमडते जनजीवन मुसळधार पावसाने ॥
विस्कटते घरकुल विक्षिप्त माणसाने,
बुडते धरती वादळी पावसाने ॥
माणूस नि पाऊस साम्य दोघांचे,
असावेत दोघे इच्छाधारी स्वभावाचे ॥
पावसाच्या खेळात मानवी जीवन,
दुर्भाग्य माणसास दुष्काळी कारण ॥

– रचना – सौ. वर्षा भाबल
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर आशय आहे,मानवी जीवन आणि निसर्ग समजणे कठीण.