Wednesday, July 2, 2025
Homeलेखमाणूस म्हणून जगताना

माणूस म्हणून जगताना

ह्या विषयावर लिहायला बरंच काही आहे.
१ माणसाने कसं जगावं ? (एक हा दार्शनिक दृष्ट्या विचार.)
२ माणसाला जगताना काय करायचं असतं ?
३ तो कसा जगत असतो ?

माझे विचार सगळ्यांना पटतीलच असे नाही. तरी
मी माझे विचार व्यक्त करीत आहे.

मी माणूस म्हणूनच जन्माला कां आलो ? ह्यात काही गूढ आहे का ? मी कोण ? कशासाठी जन्माला आलो ? मला काय करायचं आहे ? मी काय करतो आहे ? ह्या आणि अशा अनेक प्रश्नांचे काहूर माजते.
खरंतर प्रत्येक आत्मा हा ‘ईश्वरीय अंश’ आहे. हे सत्य आहे. तर प्रत्येक माणसात ईश्वराचा वास. हे ही सत्य. तरी ही आपण एखाद्याला दुखवतोच ना ? म्हणजेच ईश्वराला दुखावतो. “मला खरं आणि स्पष्ट बोलायला आवडतं” असं जेव्हां म्हणतो, तेंव्हा आपण खरं आणि स्पष्ट बोलतो की फक्त दुसऱ्याचा अपमान करतो ? हे पडताळून बघतो का ? खरं बोलणं आणि त्याचा आधार घेऊन घालून बोलणं ह्यात नक्कीच फरक आहे. अनेकदा फक्त दुसऱ्याला कमीपणा देण्यासाठी आपण कळत नकळत आपले मानसिक स्वास्थ हरवून बसतो आणि सुरु होतात डॉक्टरांचे हेलपाटे.

त्या उलट ही बघायला मिळतं. एखादा सदैव कुरकुरत असतो “माझी कोणाला पर्वा नाही, मी निरुपयोगी आहे, परमेश्र्वराच्या कृपेला मी पात्र नाही, मला काही जमतच नाही, मी निष्क्रिय आहे.” असं करणं ही ईश्वरीय अंशाचा निरादर नाही का ?

प्रगतीच्या नावाखाली, आपण काय कमवतो आणि गमवतो हे कळतच नाही. आणि कळतं तेंव्हा बराच उशीर झालेला असतो. पैसा कमविण्यासाठी स्वास्थ गमवतो आणि ते परत मिळविण्याच्या नादात पैसा गमवतो आणि गोळाबेरीज एक.

आयुष्यात माणसाला ‘श्रेयस’ आणि ‘प्रेयस’ ह्या पैकी काय निवडायचे, ते ज्याचे त्याने ठरवायचे असते. सध्या जे आवडतं आहे असं वाटतं, ते आपल्यासाठी योग्य होतं का ? हे भविष्यकाळ ठरवितो.

बऱ्याच वेळा जे हवं ते मिळत नाही, आणि जे मिळालेलं असतं ते आवडत नाही. एक इंग्रजी म्हण आहे.
“As a rule man is a fool
when it is hot, he wants it cool
when it is cool, he wants it hot
and always wanting, what is not
अनेकदा असे घडतं ना की आपल्याला ‘हेच’ हवं पण ते मिळत नाही. आणि भविष्यात कळतं जे मिळालं ते मी मागत होतो त्यापेक्षा योग्य होतं.

रविंद्रनाथ टागोर यांनी गीतांजलीत लिहिले आहे ‘देवा ! माझ्या मनासारख्या इच्छा पूर्ण न करून तू अनंत उपकार केले. आज मला कळतंय की जर त्या इच्छा पूर्ण केल्या असत्या तर मी आज जो आहे तो झालो नसतो. (इंग्रजी वाक्याचा माझ्या शब्दात मी केलेला अनुवाद केला आहे)

जन्म घेताच क्षणी मृत्यू त्याचा पाठलाग करु लागतो असं म्हणतात जन्माच्या तारखे बरोबरच मृत्युची तारीख ही ठरलेली असते. जन्म आणि मृत्युच्या मधला काळ कसा घालवायचा हेच त्याच्या हाती असतं. तो काळ त्याने चांगला घालवावा हेच योग्य असते. पण म्हणतात ना “कळतं पण वळत नाही” माणूस जेंव्हा प्रगति सोपान चढत असतो तेंव्हा त्याच्या बरोबरीने कुठल्यातरी रूपात काळजी ही येत असते. त्या काळजीत गुंतून जगण्याचा आनंद गमवायचा की जास्त न अडकता जीवनास्वाद घ्यायचा हे ठरवायला तो मोकळा असतो.

माणूस म्हणूनच जगताना लक्षात येतं की नियतिने अनेकदा आपल्या चुकांना क्षमा दिली आहे. पण ते लक्षात येण्यासाठी उसंतच नसते. आणि लक्षात आलंच तर परत तसं घडू नये ह्या कडे तो किती लक्ष देतो ?

जगताना बरेच वेळा मन सांगतं ‘बाबा रे ! षडरिपुं पासून दूर रहा हो.’ पण माणूस त्यातच अडकलेला असतो. आणि त्यात ‘मी’ पणा अति महत्त्वाचा. समर्थांनी म्हटले आहे.
आपण म्हणजे मी पण, मी पण म्हणजे जीवपण
जीवपण म्हणजे अज्ञान
पण “मी” पणाच्या अज्ञानाची आवड इतकी होते की त्यातच रमण्यात त्याला सुख लाभते. आणि जर का एकदा त्या “मी” पणाला घक्का लागला की तो कोलमडतो. आणि मग देव आठवतो.

माणूस म्हणून जगताना एक विचार असाही येतो की तो मान सन्मान, अभिमान ह्यात इतका अडकतो, की तो निरपेक्ष भावनेने कोणाला धड मदत ही करित नाही. ‘माझं नाव होईल का ? मला ह्यातून काही फायदा होईल का ?’ हा विचार करुन तो काय करायचं ते ठरवतो. देणगी देताना लोकांना कळलं पाहिजे मी किती देणगी दिली. माझं नाव छापून यायला पाहिजे. लोकांनी आभाराचे, अभिनंदनाचे शेरे दिले पाहिजे. गुणगान केले पाहिजे. तर त्या देणगीला अर्थ.

आता सगळेच असे नसतात. सगळ्यांना एका पारड्यात ठेवणे योग्य नव्हे. आणि म्हणूनच जगात आनंद दिसून येतो.
माणूस म्हणून जगताना जे मिळालं आहे त्यात समाधानी राहून, सर्वांबरोबर खेळीमेळीने वागून, निसर्गची किमया, प्रकृतिचे खेळ बघत जमेल तितकी इतरांना मदत करत जगता आलं तर.
आनंदी आनंद गडे….

राधा गर्दे

– लेखन : राधा गर्दे. कोल्हापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. 🌹अप्रतिम लेखन, माणूस म्हणून जगताना.
    सर्व जीवनाचे पैलू योग्य प्रकारे मांडले आहेत. 🌹
    🌹धन्यवाद मॅडम 🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४