सहसा आपल्याला जरा दुखले, खुपले की आपण “आई..आई” करीत बसतो. या आई शब्दातच इतके सामर्थ्य आहे की तो उच्चारताच आपल्याला सहन करण्याचे बळ मिळते. आई म्हणजे “आ.त्मा व ई.श्वर” यांचा मिलाप. तिच्यासमोर आपल्या बाळासाठी संकटांचे आव्हान उभे ठाकले तरी ती डगमगत नाही. उगाच नाही गडावरून आपल्या बाळासाठी उतरून जाणाऱ्या माऊलीचा शिवाजी राजे सत्कार करीत.. कधी ती रणरागिणी होते तर कधी पृथ्वी चे नावच क्षमा.. क्षमे प्रमाणे कोमल, हळुवार, नितळ होऊन मुलांच्या दुःखावर हळुवार फुंकर घालते. प्रसंगी सूर्याचा प्रखरपणा दाखविणारी मुलांच्या आजारपणात चंद्राहूनही अधिक शीतल होणारी म्हणजे आई. दुर्दम्य आशावाद तिच्या रोमा रोमात भरलेला असतो. मूल कसेही असले तरी जिद्दीने त्याचे संगोपन करून त्याला वाढविते, मोठा करते, स्वतःच्या पायावर उभे करते अशीच आहे ही आई…
सौ माधवी कुंटे. तिच्यासाठी मनात येतो तो फक्त मानाचा मुजरा. म्हणून मी तिला म्हणते .. त्रिवार वंदन तुला ..
मातृत्वाची गोड स्वप्ने बघत असताना, संसार वेलीवर येणाऱ्या नाजूक फुलाची वाट पाहताना, आयुष्याच्या गोड हिंदोळ्यावर झुलत असताना अवघ्या 22 व्या वर्षी अचानक प्रौढत्व आले. जन्माला आलेलं मूल विकलांग आहे हे तिला कळताच एका सर्वसामान्य व्यक्तिप्रमाणे तिला प्रथम धक्काच बसला पण ती खचली नाही कारण ती हिरकणी होती, बाळासाठी काहीही करण्यास सिद्ध. बाळाचे नाव ..अजित मोरेश्वर कुंटे.. तो जन्मला तेव्हा फक्त अकराशे ग्रॅम वजनाचा होता सहा महिन्यापर्यंत कोणतीच हालचाल नव्हती. जन्मल्याबरोबर ऑक्सिजन कमी पडल्यामुळे शरीराचा तोल सांभाळणाऱ्या पेशींवर त्याचा परिणाम झाला आणि तो बहु विकलांग आहे म्हणून डॉक्टरांनी निदान केले एवढेच नाही तर त्याच्या बुद्धीवर आणि दृष्टीवरही परिणाम झाला. जगाच्या पाठीवर याला कोणतेच उपाय नव्हते. सेरेब्रल पाल्सी म्हणजेच बहु विकलांगता हे अपंगत्व त्याच्या वाट्याला आलेआता माधवी समोर उभे होते बाळाचे आणि फक्त बाळाचेच भविष्य. तिच्या शब्दकोशातून अनेक शब्द हरवले.. हौस, मौज, मजा, हिंडणे, फिरणे. उरला एकच शब्द .. काळजी ..बाळाची ! त्याचे पाय एकमेकांत गुंतले होते. हातही वेडे वाकडे.. आणि दृष्टी अधू.. ही आई.. जिद्दीने पेटून उठली.. सुरू झाला ऑपरेशन्सचा यज्ञ. त्यात किती तरी समिधा घातल्या. पाय सोडवले, “मसल ट्रान्स्फर” .. च्या शस्त्रक्रियेने उजवा हात सरळ करण्याचा प्रयत्न केला. मोठमोठ्या आठ शस्त्रक्रिया झाल्या.
ती स्वतः सरपटत पुढे जात अजितला शिकवत असे की पुढे कसे जायचे. बाहेर जाताना त्याला उचलून नेत असे. आपली समाजव्यवस्था अजून खरेच इतकी प्रगल्भ झाली नाही. ते सारे लोक तिच्याकडे विचित्र नजरेने बघत. पण माधवी 16 वर्षापर्यंत त्याला खांद्यावर घेऊन, खांद्यावर बसवून गर्दीमध्ये गणपती दाखवत, समुद्रकिनाऱ्यावर फिरायला नेत असे. हे सर्व करत असतानाच त्याला अपंगांच्या विशेष शाळेमध्ये प्रवेश घेतला. तेथे नेताना आणखी वेगळे संकट म्हणजे बस मधून चढताना उतरताना तिला ब्रम्हांड आठवे पण ती डगमगली नाही. सारे निगुतीने केले. तिने त्याला श्लोक शिकविले, कविता मोठ्या आकारात छापून घेतल्या. जेवढे जमेल तेवढे सगळे कष्ट तिने केले.अजितने बी.ए (राज्य शास्त्र) ची पदवी विशेष प्रविण्यासह संपादन केली आहे. अजितने कथाकथनामध्ये विशेष ठसा उमटवला आहे. पु ल देशपांडे, व पु काळे, शंकर पाटील यांच्या कथा तो सादर करतो. तो स्वतःचे दुःख बाजूला करून लोकांना आनंद देतो. त्याला अनेक बक्षिसे मिळाली आहेत.
असे मुलाला घडविणारी माधवी, अशी आई नक्कीच लोकांच्या कौतुकाचे पात्र ठरली. इतर अनेक अशा स्त्रियांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे. तिला देखील अनेक ठिकाणी गौरविण्यात आले. त्यांची नावे सांगणे या छोट्या लेखात जमणे शक्य नाही एवढी मोठी ती यादी आहे. तसेच अजितच्याही कार्याचा, बक्षिसांचा पूर्ण उल्लेख करणे अशक्य आहे .. असे त्या दोघांचे उत्तुंग कार्य आता झाले आहे.अजित एका रीह्याबिटेशन सेंटरमध्ये प्लास्टिक मोल्डिंग चे काम अत्यंत कुशलतेने करतो. सध्या अजित पार्थिव गणेश पूजा व सत्यनारायण महापूजा सांगतो. (त्याने ज्ञान प्रबोधिनी मधून पौरोहित्य वर्ग केला आहे) अजित चे वडील श्री मोरेश्वर कुंटे देखील तेवढेच कौतुकास पात्र आहेत त्यांनी आपल्या पत्नीला वेळोवेळी सहकार्य केले आहे. दोघांच्या सहकार्यानेच, मुलाला घडविण्याचा हा संकल्प त्यांनी सिद्धीस नेला आहे.
माधवी कुंटे यांनी मिळविलेले पुरस्कार…
१.. २००३. प्रिझम फाउंडेशनच्या लार्क स्कूलचा *आदर्श आई पुरस्कार.*
२.. २००९. आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान पुणे यांच्या तर्फे देण्यात येणारा *सुधाताई अत्रे अवार्ड आदर्श माता पुरस्कार* माननीय केंद्रीय मंत्री श्री प्रकाशजी जावडेकर यांच्या हस्ते.
३.. २०१०. रोटरी क्लब कडून.. *बेस्ट वुमन पार्टीसिपॅन्ट* .. पुरस्कार.
४.. २०११. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था पुणे यांचे तर्फे *अपंग सेवा पुरस्कार.*
५.. २०१४. मध्ये ठाणे येथील आचार्य अत्रे साहित्यिक कट्टा कडून सत्कार, *मातृदिना निमित्त मुलाखत* .
६.. २०१५. रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट तर्फे *गुणवंत विद्यार्थ्यांची आई* म्हणून सत्कार.
७.. २०१५. साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त *श्यामची आई* म्हणून पुरस्कार. प्राध्यापक महापौर दत्ताजी धनकवडे पुणे यांच्या हस्ते.
८.. २०१५. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली तर्फे तिला गेलेल्या रिटापॉल मेमोरियल आई महोत्सव मध्ये.. *गुणवंती, धैर्यमती, सुमती माता पुरस्कार*
याशिवाय पुढील अनेक सामाजिक कार्यामध्ये देखील माधवीने झोकून दिले आहे.
१.. स्त्री शक्ती प्रतिष्ठान व ग्राम विकास अंतर्गत भोर तालुक्यातील गावांमध्ये *महिला सक्षमीकरणाचे कार्य* .
२.. विशेष मुलांच्या पालकांचे एकत्री करणाचे कार्य
३.. दिव्यांग बहु विकलांग मुलांच्या पालकांसाठी *समुपदेश*
४.. सक्षम ह्या अखिल भारतीय स्तरावरील अपंगांच्या पुनर्वसन करणाऱ्या संस्थेचे कार्य
५.. मजूर महिलांसाठी विनामूल्य रांगोळी व मेहंदी क्लास
६.. दिव्यांग मुलांच्या हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीकरिता मदत अशी अनेक कामे ती सतत करत असते.
या लेखात तिच्या प्रत्येक पुरस्काराचा किंवा सामाजिक कार्याचा आढावा घेतलेला नाही. यावरूनच चोखंदळ वाचकांना तिच्या कार्यव्याप्तीची जाणीव व्हावी.
चि. अजित कुंटे यास मिळालेले पुरस्कार…
१.. शाळेमध्ये उत्कृष्ट विद्यार्थी व कलाकार
२.. मधुश्री कलाविष्कार कान महोत्सव मध्ये सहभाग “नटसम्राट” मधील स्वगत सादर केले तसेच दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेत प्रथम क्रमांक २००२-०३
३.. साहित्य संघ दक्षिण पुणे, आडकर फाउंडेशन पुणे कडून कथाकथन स्पर्धेमध्ये पुरस्कार
४.. व पु काळे स्मृती प्रतिष्ठानच्या खुल्या गटातील राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त २०१०
५.. महाराष्ट्र साहित्य परिषद युवा मुक्त स्पर्धेत उत्तेजनार्थ पुरस्कार
६.. शाहू मोडक यांच्यातर्फे पुरस्कार २०११
७.. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित रंगोत्सव कार्यक्रमात “कथाकथन कला श्री पुणे” प्रथम पुरस्कार
८.. श्रुती सागर आश्रम, फुलगाव, यांच्यातर्फे “कसबा गौरव पुरस्कार “प्राप्त (वैयक्तिक अंदाजे १६० कथाकथनाचे कार्यक्रम केले आहेत)
९.. प्राध्यापक रामकृष्ण मोरे कला वाणिज्य महाविद्यालय आकुर्डी येथे शारदोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कथाकथन या विषयावर मार्गदर्शन केले २०११
१०.. अपंगांचे पहिले राज्यस्तरीय साहित्य संस्कृती संमेलन आजरा, जिल्हा कोल्हापूरला सत्कार व सहभाग
११.. सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ पुणे तर्फे आयोजित (२४ तास लेखन वाचन चिंतन मौन) या उपक्रमात सतत दहा तास वाचन व मौन स्वीकारून विक्रम प्रस्थापित केला त्यासाठी लिमका बुक ऑफ रिकॉर्ड मध्ये नामांकन झाले (६४० जणांचा सहभाग होता त्यात अजित एकमेव दिव्यांग विद्यार्थी)
१२.. २०१३,१४ यावर्षीचा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनातर्फे “अपंग कल्याण पुरस्कार” सामाजिक न्याय मंत्री मा. वा .राजकुमार बडोले यांच्या हस्ते
१३.. महाराष्ट्र शासन राजपत्र २०१९ विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी पुणे यांचे तर्फे नेमणूक झाली आहे
१४.. मिती एंटरटेनमेंट आयोजित कार्यक्रमात दादर येथे पु ल देशपांडे यांच्या कथेचे वाचन
१५.. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत आयोजित ग्रंथोत्सव २०२२ या कार्यक्रमांमध्ये कथाकथन
१६.. एकपात्री कलाकार परिषद महाराष्ट्र व निळू फुले कला अकादमी पुणे यांचे तर्फे आयोजित..
…..१..साने गुरुजी स्मृती महोत्सव
…..२..निळू फुले स्मृती महोत्सव
…..३.. विंदा करंदीकर जन्मशताब्दी महोत्सव
…..४..तसेच पु ल देशपांडे जन्मशताब्दी निमित्त कथाकथन महोत्सवामध्ये सहभाग
१७.. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्र व निळू फुले अकादमी पुणे येथे तसेच नाट्य संस्कार कला अकादमी, पुणे व नाट्य पुष्प या संस्थांसाठी वि वा शिरवाडकर लिखित “नटसम्राट” मधील नाट्य प्रवेश सादर केला २०२३-२४
ही झाली अजितच्या काही कर्तबगारीची यादी.. यावरून आपणास नक्कीच ऊरी अभिमान दाटून येईल की इतकी भरीव कामगिरी जर एक दिव्यांग करू शकतो तर तुम्ही आम्ही का नाही ?
आठवते बहिणाबाईंची कविता..
तिची इलुशीच चोच
तेच हात तेच बोटं
तुला दिले रे देवाने
दोन हात दहा बोटं
आणि त्याला असे घडविणारी आई … माधवी ..!
खरेच
त्रिवार वंदन तुला.
— लेखन : सौ. स्वाती वर्तक. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
🙏🙏🙏 त्रिवार वंदन या मातेला, खडतर आयुष्याची अप्रतिम कहाणी आहे. माता ही जगातील सर्वात मोठी लढवय्या असते. हे माधवी ताई च्या आयुष्यावरण कळते.
खूपच छान लिहून व्यक्त झाला आहात माधवी माझी छान मैत्रीण आहे अतिशय गुणी सर्वगुणसंपन्न आहे तिला माझ्याकडूनही त्रिवार मानाचा मुजरा
स्वातीताई,
खूपच भावस्पर्शी, प्रेरणादायी लेख.
धन्य ती माऊली.
माधवीताईंचे कष्ट, चिकाटी, ईश्वरावर श्रद्धा कौतुकास्पद, अभिमानास्पद.
चि. अजितचे व त्यांचे खूप खूप अभिनंदन.