आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चे नियमित लेखक, शिकागो स्थित श्री माधव गोगावले यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार श्री प्रशांत गौतम यांनी घेतली असून ती मुंबईतील ‘रंगबावरी ’ या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. नवी दृष्टी देणारी ही मुलाखत पुढे देत आहे. सर्वश्री माधव गोगावले आणि प्रशांत गौतम यांचे मनःपूर्वक आभार.
— संपादक
मुळ पुणेकर असलेले माधव गोगावले हे अमेरिकेतील शिकागो येथे ४५ वर्षापासून उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने स्थाईक झाले आहेत.या साडे चार दशकाच्या कालावधीत त्यांनी अमेरिकेत महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून अनेक मराठी माणसांना एकत्र आणले.मराठी भाषा संवर्धन संगोपनासाठी ते कायम सक्रीय असातात व इतरांनाही प्रेरणा देत असतात.वर्षभर विविध उपक्रम ऑनलाईन/ऑफलाईन राबवतात. रचना या त्रैमासिक व दिवाळी अंकातून तेथील व भारतातील लेखकांचेही साहित्य प्रकाशित करातात. मराठी भाषा संवर्धन संगोपनात अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाची काय भूमिका आहे,या विषयाच्या अनुषंगाने त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला.

● नमस्कार माधवजी…
आपण किती वर्षा पासून अमेरिकेत आहात, तिकडे कधी व कोणत्या उध्देशासाठी गेला आहात ?
□ नमस्कार प्रशांत जी. आपण मला ‘मराठी भाषेचे शिकागो भागात संवर्धन’ यावर विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी ,माधव गोगावले शिकागो अमेरिकेहून आपले मनःपूर्वक आभार मानतो.
गेली ४५ वर्षे मी अमेरिकेत आहे.१९८० साली पुण्याहून मी अमेरिकेत आलो. इथे येऊन उच्च शिक्षण घेणे हा मुख्य उद्देश होता.
● मराठी भाषा संवर्धन व संगोपनासाठी आपण आपल्या शिकागो येथील महाराष्ट्र मंडळात काय काय उपक्रम राबवता ?
□ मराठी भाषा संवर्धन व संगोपनासाठी महाराष्ट्र मंडळ शिकागो अनेक उपक्रम राबवत आहेत. त्यातील महत्त्वाचे म्हणजे दर मंगळवारी होणारा साहित्यकट्टा व महिन्यातील शेवटच्या रविवारी होणारा बोलकाकट्टा, रचना त्रैमासिक अंक, मराठी शाळा, दर आठवड्याला चालणारे वेगवेगळे कट्टे – अध्यात्मपीठ, इतिहास मंच, अर्थविचार, त्याचप्रमाणे महिन्यातून एकदा भ्रमणगाथा, आरोग्यधाम, भजनसंध्या, परंपरा, यासारखे उपक्रम मराठीतच केल्यामुळे श्रोत्यांना मराठी ऐकण्याची व बोलण्याची संधी मिळते. वर्षातून मंडळ पाच ते आठ सांस्कृतिक कार्यक्रम करत असतात. त्या कार्यक्रमाच्या वेळी सुद्धा बहुतेक जण मराठीतच बोलतात. युवकांना मराठीतून कार्यक्रम सादर करण्याची संधी यावेळी दिली जाते. बाहेर अमेरिकन दैनंदिन जीवनात मराठी ऐकायला मिळतेच असं नाही त्यामुळे अनेकांना मराठीचा विसर पडतो. असे कार्यक्रम मराठी भाषा जोपासण्यासाठी खूप मदत करतात. इतिहास मंचावर इतिहास तज्ञांकडून भारत व मराठ्यांचा जाज्वल्य गौरवशाली इतिहास मराठी सादरीकरणातून श्रोते व प्रेक्षक यांना प्रेरणा मिळते.
● उपक्रमास प्रतिसाद कसा असतो? किती मराठी भाषक यात सहभागी होत असतात ?
□ महाराष्ट्र मंडळ शिकागोचे सुमारे वीस वेगवेगवेगळे कट्टे आहेत. आपल्या आवडीनुसार त्या त्या कट्ट्यांवर मंडळाचे सभासद व इतर मराठी भाषिक भाग घेतात. आभासी कार्यक्रमात साधारणपणे वीस ते साठ सभासद येतात. त्याचप्रमाणे ह्या कट्ट्यांवरील सादरीकरण महाराष्ट्र मंडळ शिकागो युट्युब वाहिनीवर थेट प्रक्षेपित (Live YouTube) केले जातात त्यामुळे बरेचसे लोक घरबसल्या मोठ्या टीव्हीवर हे कार्यक्रम आपल्या सवडीनुसार पाहत असतात. मराठीच्या प्राध्यापिका डॉक्टर सुजाता महाजन यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकजण सध्या देवनागरी लिपीचा सर्रास वापर करत आहेत.

● रचना हे काय आहे, मासिक की दिवाळी अंक ? या माध्यमातून लेखन वाचन चळवळ कशी राबवता ?
□ ‘रचना’ त्रैमासिक अंक महाराष्ट्र मंडळ शिकागो – संक्रांत, गुढीपाडवा, गणपती, दिवाळी असे वर्षातून चार विशेषांक प्रकाशित करते. काही वेळी ‘सिंहासनाधीश्वर’ यासारखे खास विशेषांक पण प्रकाशित केले जातात.
रचना अंकामध्ये वेगवेगळ्या विषयावर विविध प्रकारचे साहित्य प्रकाशित केले जाते. आतापर्यंत शिकागो निवासी रचना अंकात आपले साहित्य प्रकाशित करत होते पण गेल्या वर्षापासून भारत व इतर देशातील साहित्यकांचेही साहित्य प्रकाशित करत असतो. दरवर्षी रचना संपादक चमूत वेगळ्या व्यक्तींचा समावेश असतो. ते विविध अगर एखाद्या खास विषयावर त्रैमासिक प्रकाशित करतात. शिकागो भागातील मराठी भाषिक रचनासाठी आपल्या कविता, लेख, निबंध, कोडी, पाककला यासारख्या अनेक विषयावर साहित्य प्रकाशनासाठी पाठवतात. मराठी साहित्य लिहिण्यासाठी ‘रचना’ अंक लोकांना प्रोत्साहित करते.
● साहित्य संमेलने या बाबतीत काय, योगदान देतात.
□ ‘साहित्यकट्टा’ वर वर्षातून काही विशेष काव्य संमेलन, कथा संमेलन यासारखे आभासी कार्यक्रम किंवा प्रत्यक्ष कार्यक्रमांमध्ये साहित्यिकांना त्यांचे लेख, कथा, किंवा कविता सादर करण्याची संधी देतात. गेले काही वर्ष मंडळाच्या सहलीमध्ये हा उपक्रम चालवला जात आहे. काही कलाकार मंडळाच्या सभासदांसाठी एकपात्री नाटक किंवा खास मराठी गाणी, गझल, असे विविध साहित्य सादर करतात. सभासद त्यावर रसग्रहण व चर्चा करतात. भारतातील साहित्य संमेलनात आमच्यातील काही सदस्य भाग घेतात त्यांचे अनुभवही सभासदांना प्रेरणादायी असतात.
● आपण साहित्य विषयक ऑनलाईन उपक्रम राबवता, त्या विषयी सांगा.
□ कोविड काळात सुरू केलेले आभासी (ऑनलाईन) उपक्रम आजही अगदी जोरात चालू आहेत. संस्कृती ही केवळ ग्रंथांमध्ये लिहिलेली नाही, तर ती आपल्या भाषेचा, परंपरांचा, सणांचा, वेशभूषेचा, खाण्यापिण्याचा अविभाज्य भाग आहे. भाषेचे रक्षण केले की संस्कृतीचे रक्षण होते, व करता येते. म्हणून दर मंगळवारी, मंडळाचा ‘साहित्यकट्टा’ चालतो, त्यात कविता, लेख इत्यादींच्या सादरीकरणानंतर मराठी साहित्याची चर्चा होते. मराठी भाषेचे भारतातील प्रसिद्ध साहित्यिक, रंगभूमी, चित्रपटसृष्टीत नावाजलेले कलाकार, संगीतकार, दिग्दर्शक, भारतात कार्यक्रम चालविणारे तज्ञ व समाजसेवक इत्यादी व्यक्तींना ‘साहित्यकट्टा’ वर सादरीकरणासाठी आमंत्रित केले जाते. या कार्यक्रमाचे मंडळाचे सदस्य लाभ घेतात. त्याचप्रमाणे मंडळाच्या युट्युब वाहिनीवर हे कार्यक्रम उपलब्ध असल्यामुळे अनेक मराठी लोक वेळ मिळेल त्याप्रमाणे ते सादरीकरण पहात असतात. आपल्या भारतीय संस्कृतीची व मराठीची जोपासना करण्यासाठी हे उपक्रम योगदान देतात. आपल्या भाषेची पुढील पिढीसाठी जोपासना करणे हे आपले कर्तव्य आहे. ‘साहित्यकट्टा’ मागचे उद्दिष्ट प्रामुख्याने अमेरिकेत मराठी भाषेची जोपासना करून वाचन- लेखनाद्वारे ती वृद्धिंगत करणे, सभासदांच्या मनात मराठी साहित्याविषयी गोडी निर्माण करणे, नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या साहित्याच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ देणे, ज्यांच्यात साहित्यिक दडला आहे त्याला जागृत करणे आणि अर्थातच उत्तम कार्यक्रम आयोजित करून श्रोत्यांचे मनोरंजन करणे हे आहेत.
● मूळ महाराष्ट्राचे भूमी पुत्र असलेले आपण अमेरिकेसारख्या परदेशात मराठी भाषा जगवता, वाढवता. या विषयी काय वाटते ?
□ मराठी भाषेची अमेरिकेत जोपासना व संवर्धन करणे यात आम्हाला खूप धन्यता वाटते. मराठी भाषा टिकविण्यासाठी खारीचा का होईना आपण वाटा उचलत आहोत यातून आम्हाला अतिशय आनंद मिळतो. सध्या महाराष्ट्रात मराठी शाळांची चाललेली वाताहात;हे बघून वाचून मन दु:खी होते. एका मागून एक मराठी भाषेचे महाराष्ट्रात बुरुज ढासळू लागले आहेत. या उलट अमेरिकेतील मंडळे मराठी शाळा चालवतात. शिकागो उपनगरात सध्या तीन मराठी शाळा चालू आहेत आणि त्यातून सुमारे दोनशे विद्यार्थी मराठी शिकत आहेत. आपल्या संस्कृतीची पुढील पिढीसाठी जोपासना करणे हे आपले कर्तव्य आहे ,असे समजून मराठी भाषा जगवता व वाढवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ते इतर मराठी भाषिकांनीही करावेत असे मनापासून वाटते. मराठी भाषेचा असाच परदेशातही प्रसार व संवर्धन करीत राहणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. महाराष्ट्र मंडळ शिकागो येथील ‘साहित्यकट्टा’ चे आयोजक व सभासद हे प्रयत्न नक्कीच करत आहेत.

— मुलाखतकार : प्रशांत गौतम. छ. संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
