Saturday, December 21, 2024
Homeलेख"माध्यम पन्नाशी" भाग : २

“माध्यम पन्नाशी” भाग : २

कथा “दुष्टचक्र” रेकॉर्ड करण्यासाठी सनदी साहेब स्वतः मला घेऊन स्टुडिओत येतात. ऑफिसच्या विभागापासून स्टुडिओ अगदी दुसऱ्या बाजूला. एका लांबलचक कॅरीडोरच्या दुतर्फा छोटे छोटे स्टुडिओ. उजवीकडच्या दालनांवर लाल लाईट चमकतोय. आंतमध्ये माइक समोर अनाउन्सर अनाउन्समेंट करते. याला लाईव्ह अनाउन्समेंट म्हणतात असं कळतं. डावीकडे रेकॉर्डिंग स्टुडिओ. एक भला मोठा दरवाजा ढकलून सनदी साहेब मला घेऊन आत येतात. उजवीकडचा आणखी एक दरवाजा ढकलून मला तिथे घेऊन जातात. हे एक प्रशस्त दालन. जाळीदार भिंतीच्या या दालनात मधोमध हिरवा गालिचा घातलेला प्रशस्त टेबल. त्यावर तीन चार माईक्स. समोर दोन तीन खुर्च्या. मला एका खुर्चीवर बसवून साहेब अंतर्धान पावतात आणि क्षणात मला समोरच्या प्रशस्त‌ काचेपलीकडील दालनात दिसतात. तिथून त्यांचा आवाज माईक वरून स्पष्टपणे कानावर येतो “आधी आपण व्हॉइस टेस्ट घेऊया !”
म्हणजे ? आता व्हॉइस टेस्ट घेऊन समजा यांना माझा आवाज नाही आवडला तर माझी इथेच गच्छंती ?
आता छातीची धडधड वाढते.
डोळ्यांत पाणी येतं.
माझ्या मनांतल्या घालमेलीची त्यांना किंचितही जाणीव नसते. ते म्हणतात, हां करा वाचायला सुरुवात.
‌‌ मी धडाधड कथा वाचायला सुरुवात करते.
“थांबा थांबा”
अरे देवा ! माझा आवाज नाहीच आवडला वाटतं यांना !
रेडिओ आर्टिस्ट होण्याचं माझं स्वप्न माझ्या डोळ्यांदेखत चक्काचूर होतंय असं वाटतं. ते काहीतरी खाटखुट करतात आणि तिथूनच म्हणतात, “लेव्हल घेतलेय. आता आपण रेकॉर्डिंग सुरू करूया !”
‌अच्छा ! म्हणजे माझा आवाज पटलाय तर यांना ! आता मला संधी सोडायची नसते. मी वाचायला सुरुवात करते. धडाधड दहा मिनिटांची कथा तीन मिनिटांत एकदाची वाचून संपवते आणि हूश्श करते.
सनदी साहेब मला त्या छोट्याशा खोलीत बोलवतात. तिथे भलं मोठं रेकॉर्डिंग मशीन असतं. फेडर असलेल. एक फेडर ते ऑन करतात आणि मला अचानक माझाच आवाज ऐकू येतो. मी दचकते. माय गॉड ! इतका घोगरा आहे का माझा आवाज ? सनदीसाहेब टेप गुंडाळून खोक्यात ठेवतात. आम्ही स्टुडिओ बाहेर पडतो. ऑफिस रूम मध्ये येतो. ते चहा मागवतात. मी गुमसुम बसून राहते. चहा येतो. तोवर मी चहाची चव चाखलेलीच नसते. तो पहिला चहा मला त्या क्षणी अमृतासारखा लागतो. पहिल्या वहिल्या रेकॉर्डिंगच्या आगळ्या अनुभवाची नशा त्या इवल्या ग्लास मधल्या चहात जणू उतरलेली असते.

स्टुडिओतली ती खुर्ची. मंदिराच्या गाभाऱ्यात जाणवावी अशी ती नि:शब्द पवित्र शांती! स्वतःचा ऐकलेला आवाज आणि आकाशवाणी कलावंत माधुरी प्रधान या नावाची उद्घघोषणा. प्रसिद्धीचा पहिला वहिला परिस स्पर्श ! “फिरूनी नव्याने जन्मेन मी !” ची अनुभूती देऊन जातो.

दूरदर्शन, त्यावरील विविध वाहिन्यांचा मोहमयी वावर सुरू होण्यापूर्वीचा तो काळ! आकाशवाणीची मोहिनी जनमानसावर ! त्यामुळे जणू काही हवेत तरंगत मी घरी पोहोचते. यच्चयावत नातलगांना, मित्र-मैत्रिणींना तीन ऑक्टोबरला वनिता मंडळात माझा कार्यक्रम आहे ही बातमी पोहोचवली जाते. माझ्याकडून ! आईकडून !

3 ऑक्टोबर उजाडतो. ठीक बारा वाजता वनिता मंडळाची धून वाजते. कार्यक्रम सुरू होतो. स्वतःची कथा स्वतःच्या आवाजात ऐकण्यासाठी व स्वतःच्या नावाची उद्घघोषणा ऐकण्यासाठी कानांत प्राण गोळा होतात. उद्घघोषणा होते. आता ऐकू या कथा “दुष्टचक्र”. लेखिका : माधुरी प्रधान. निवेदिका: कमलिनी विजयकर !
‌अंगावर जणू वीज कोसळते. कथा तर माझीच आहे. मग ती वाचताहेत कमलीनी विजयकर. कथा रेकॉर्ड तर माझ्याच आवाजात केली गेली होती. मग ती गेली कुठे ? आता नातलग, मित्र-मैत्रिणी काय म्हणतील ?
‌‌चार भिंतीतील संकुचित आश्वस्त विश्वातून मोकळ्या विश्वात पाय टाकल्या टाकल्या एक जबरदस्त धक्का अनुभवायला मिळतो. वाटतं, नको ती आकाशवाणी, नको ते कार्यक्रम, नको ती प्रसिद्धी ! मात्र दिवसेंदिवस एकच भुंगा मनाला कुरतडत राहतो. माझ्या आवाजात रेकॉर्ड झालेली ती कथा गेली तरी कुठे ?

“दुष्टचक्र” पहिली वहिली कथा आकाशवाणीवरून प्रसारित झाली, त्याला जेमतेम महिना उलटून जातोय, तेवढ्यात पुनश्च एक खाकी लिफाफा पोस्टाने येतो. आंत एक कॉन्ट्रॅक्ट असतं. त्यांत एका नव्या कथेची मागणी असते. दुधाने पोळलेलं तोंड ताकही फुंकून पितं तसं काहीसं होतं. क्षणभर वाटतं, नकोच ते आकाशवाणीला जाणं ! नकोच ते कार्यक्रम ! पुन्हा आपला आवाज गायब झाला तर पुनश्च चारचौघात नाचक्की ! नकोच तो मोह !

पण क्षणांत मन कोलांटी उडी घेतं. पाहू या तर खरं जाऊन ! निदान कळेल तरी त्या कथेचं नेमकं झालं तरी काय ? या कॉन्ट्रॅक्टवर ब्रॉडकास्टची तारीख असते १४ जानेवारी १९७६. मकर संक्रांत. रेकॉर्डिंग असतं एक जानेवारीला. पुन्हा एकदा उत्साहाने मकर संक्रांतीची संकल्पना घेऊन नवी कथा लिहिते. एक जानेवारीला ठीक सकाळी ११ वाजता आकाशवाणीत पोहोचते. आता तो लांबलचक कॅरिडॉर, पलीकडचा चिंचोळा गॅंगवे, त्याला लागून डावीकडची भली मोठी इंजिन रूम, उजव्या बाजूची जाळीदार लांबलचक खिडकी— सगळं सगळं ओळखीचं वाटतं आणि मी एक एक पाऊल आत्मविश्वासाने टाकत पुढे जाते. आता उजवीकडे तोच प्रशस्त जिना दिसतो. मात्र डावीकडे चार माणसांचा घोळका उभा असतो. अच्छा ! तर ह्या भिंतीआड लिफ्ट होती तर ! लिफ्टमन अदबीने दार उघडतो. पाचव्या मजल्यावर लिफ्ट थांबते. आता “कुटुंब कल्याण” विभागाची खोली शोधायची नसते. मी सराईतपणे आंत पाय टाकते. उजवीकडच्या टेबलावर एक प्रौढा बसलेली असते. ती माझ्याकडे पाहून एक हंसरा कटाक्ष टाकते. सनदीसाहेब कामांत गढून गेलेले असतात. मी पाठवलेली कथा त्यांच्या समोर असते. ते जुजबी चौकशी करतात आणि त्या स्त्रीला फर्मान सोडतात. “रेकॉर्डिंग करून या”. आज सनदी साहेब स्टुडिओत येत नाहीत. ती प्रौढा येते. आता माहीत असतं, तोच TALK पाटी असलेला स्टुडिओ. क्रीम कलरच्या जाळीदार भिंती. तेच टेबल. तसाच समोरचा माईक. तीच खुर्ची !

त्या खुर्चीत बसल्यावर नकळत एक थंडावा मनाला लपेटून टाकतो. क्षणभर कळत नाही, ही एसीची थंडगार शांती की त्या स्टुडिओतल्या अनाम शांतीचा सुखद गारवा ? पण मनांतला सगळा कोलाहल शांत करणारा तो आश्वस्त थंडावा खरंच खूप खूप सुखद वाटतो. मनांतली सगळी किल्मिषं मिटतात आणि वाटत, इथे येत राहावं —-
पुन्हा पुन्हा येत राहावं —–
रेकॉर्डिंग संपतं. मिसेस जोशी मला घेऊन ड्युटी रूममध्ये येते. ड्युटी ऑफिसरशी माझी ओळख करून देते. ही आमची नवी लेखिका माधुरी प्रधान. तो थोडासा अचंब्याने माझ्याकडे एक नजर टाकतो. मी त्यांतले भाव वाचते. शाळा कॉलेज सोडून ही इथे काय करते ?

मला माझ्या पहिल्या कार्यक्रमानंतर नुकताच घडलेला एक प्रसंग आठवतो. पुढील शिक्षण, व्यवसाय याची चाचपणी करण्यासाठी माझे मेहुणे सहज मला एका ज्योतिषाकडे घेऊन जातात. माझी पत्रिका बारकाईने पहात ते ज्योतिषी म्हणतात, “तुझं शिक्षण पूर्ण झालं की तू एअर होस्टेस हो. मी हंसते. मी काही एवढी देखणी नाहीये मी मनांत म्हणते. ते तेच वाक्य पुन्हा पुन्हा बोलत राहतात. शेवटी म्हणतात, “तुझी पत्रिका waves कडे खेचली जाते. तुझा व्यवसाय waves शी संबंधित असेल. म्हणून म्हणतो, एअर होस्टेस हो”. अचानक मेव्हणे उद्गारतात, ‘अग खरच की ! नुकताच तू रेडिओवर कार्यक्रम केलास ना ! त्या ही लहरीच आहेत की. ध्वनीलहरी—– Radiowaves! “
ज्योतिषी महाशय नकळत निश्वास टाकतात. म्हणतात, “होय ! वर्षानुवर्ष तुझा संबंध या ध्वनीलहरींशी येत राहणार हे नक्की !’

मला त्या क्षणी ते वाक्य आठवतं. मला रूमवर सोडून मिसेस जोशी दुसऱ्या कामाला जातात. सनदी साहेब आस्थेने चौकशी करतात. “कसं झालं रेकॉर्डिंग ?” मी अवघा धीर एकवटून त्यांना विचारते, “माझी मागची “दुष्टचक्र” ही कथा माझ्या आवाजात तुम्ही रेकॉर्ड केली होती पण कार्यक्रमात माझा आवाजच नव्हता. कमलिनी विजयकरांचा आवाज होता. ते हंसतात. “अरे हो ! त्याचं काय झालं तुझ्या आवाजातली ती कथा आमच्या स्टाफच्या हातून पुसली गेली. चुकून ती टेप ईरेज झाली”. अच्छा असं झालं तर ! माझं समाधान होतं. मी निघते. तेवढ्यांत सनदीसाहेब मला विचारतात, “आमच्या विभागांत स्टाफ आर्टिस्ट पदाची एक जागा रिकामी आहे. त्यासाठी मुलाखती चालू आहेत. पण अजून कोणाची निवड नाही झालेली. तुला इंटरेस्ट असेल तर कॅज्युअल आर्टिस्ट म्हणून मी १४ दिवसांचं कॉन्ट्रॅक्ट टाकतो. मात्र त्यासाठी तुला रोज इथे यावं लागेल. रेकॉर्डिंग, डबिंग शिकावं लागेल. लिखाण करावं लागेल. मुलाखती घ्याव्या लागतील.

माय गॉड ! इतकं सगळं जमेल मला ? मुख्य म्हणजे कॉलेजला १४ दिवस दांडी मारायला आई परवानगी देईल ? पण सगळेच योग जुळून येतात. आईची संमती मिळते. कॉलेजमधून रितसर परवानगी मिळते आणि लवकरच त्या दुसऱ्या रिकाम्या खुर्चीत अस्मादिक स्थानापन्न होतात.
क्रमशः

— लेखन : माधुरी ताम्हणे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. खूप छान. त्यावेळेची तुमची मनाची घालमेल आणि आजूबाजूचे वातावरण ह्याचे वर्णन खूप छान झाले आहे. पान एक प्रश्न आहे, माझ्यामते हे लेख “रिती भूतकाळ” मध्ये लिहिला आहे असं वाटत, त्याचे काही खास कारण आहे का?

  2. माधुरी वहिनी,खूपच छान!! आकाशवाणीबाबत तुमच्या ह्या पूर्वीच्या आठवणी मला माहिती नव्हत्या.वाचताना फारच छान वाटतय.

  3. खूप छान शब्दांकन. पुढील भाग वाचण्याची उत्सुकता वाढली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” १७
Purnima anand shende on निसर्गोपचार : ३
Manisha Shekhar Tamhane on निसर्गोपचार : ३