एकदा सनदी साहेब सकाळची मीटिंग आटपून रूममध्ये आले. रूममध्ये मी एकटीच एका ताज्या बातमीवरच्या संवादाचं लेखन करत बसले होते. रूममध्ये येताच ते म्हणाले, “माधुरी, मिसेस जोशी रजेवर आहेत. आज डॉक्टर मंदाकिनी पुरंदरे यांची मुलाखत तुला घ्यावी लागेल.”
माय गॉड ! डॉ. मंदाकिनी पुरंदरे या प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ. विषय प्रसुती संदर्भातला. माझं या विषयातील ज्ञान शून्य. हल्लीसारखा मदतीला गुगल बुवा नाही की यु ट्यूब बाई नाही. पुस्तकांमधून काही माहिती मिळवायचा प्रयत्न करावा असा विचार करून मी लायब्ररीकडे वळले. लायब्ररीयन प्रणोती चांगली मैत्रीण होती. तिने भराभर संदर्भ ग्रंथ काढून हातांत ठेवले. मी वाचायला सुरुवात केली. पण सगळं ज्ञान डोक्यावरून जाऊ लागलं. हातांत अवघा अर्धा तास होता. मी घड्याळावर नजर टाकली. कामगार सभेचा सकाळचा कार्यक्रम संपत आला होता. विमलमावशी रूम मध्ये असण्याची शक्यता होती. मी तिच्या सेक्शन कडे मोर्चा वळवला. अपेक्षेप्रमाणे ती रूममध्ये होती. एका स्क्रिप्टच वाचन करत होती. मी हळूच तिच्या समोर बसले. माझी चाहूल लागताच स्क्रिप्ट वाचन थांबवून माझ्याकडे ती प्रश्नार्थक नजरेने बघू लागली. मी चाचरत म्हटलं, “विमल मावशी, “अवघड प्रसुतीची आव्हानं” या विषयावर स्त्रीरोगतज्ञ डॉ. मंदाकिनी पुरंदरे यांची मुलाखत घ्यायची आहे. पण मला त्या विषयाची काहीच माहिती नाही”.
“तुझं अजून लग्नही झालेलं नाही. लहान आहेस तू. ठाऊक आहे मला.” ती चटकन म्हणाली. “पण माधुरी आता तू आकाशवाणी सारख्या संवेदनशील माध्यमात काम करतेस. आकाशवाणी हा माहितीचा अखंड स्त्रोत आहे. आपण श्रोत्यांना अद्ययावत माहिती पुरवण्यासाठी बांधील आहोत. आपल्याला कधीही कोणत्याही विषयावर कार्यक्रम करावे लागतात हे लक्षात ठेवून तुला नेहमी वेगवेगळ्या विषयांवर वाचन करायला हवं. रोजची किमान दोन ते तीन वर्तमानपत्र वाचायला हवीत. महत्त्वाच्या चालू घडामोडींवरच्या लेखांच्या आणि बातमीच्या कात्रणांची व्यवस्थित फाईल बनवायला हवी. प्रत्येक वेळी प्रत्येक विषयाचा अनुभव घेऊनच मुलाखती घेणं किंवा स्क्रिप्ट लिहिणं शक्यच नसतं. म्हणून जमेल तितका अभ्यास करण्याची सवय स्वतःला लाव. सातत्याने वाचन करून स्वतःला अपडेट ठेवत जा. आज मी तुला या मुलाखतीसाठी मदत करतेय. पण दरवेळी मी तुला मदत करेन या भ्रमांत राहू नकोस.”
स्वावलंबनाचा परखड सल्ला देत विमल मावशी माझ्याशी चर्चा करू लागली. मला वेगवेगळे मुद्दे सुचवू लागली. मात्र तिने मला या विषयावरचा एकही तयार प्रश्न दिला नाही. तिने माझी प्रश्नावली मलाच तयार करायला लावली. त्यावर एक नजर टाकून फक्त मान हलवत मूक संमती दिली आणि ती उठलीच. स्टुडिओत निघून गेली.
माझ्या प्रश्नावलीवर पसंतीची, कौतुकाची मोहोर सुद्धा न उमटवता! मी थोडी खट्टू झाले. पण मला स्वतंत्रपणे वाटचाल करायला भाग पाडायला लावणारा तिचा परखड स्पष्टवक्तेपणा एव्हाना सवयीचा झाला होता आणि तो योग्यच होता.
सनदीसाहेब मुलाखतीसाठी मला आणि डॉक्टर मंदाकिनी पुरंदरे यांना घेऊन स्टुडिओत आले. आम्हा दोघींना गोल टेबलावर समोरासमोर त्यांनी बसवलं. दोघींना स्वतंत्र माइक्स दिले. ते काचेपलीकडील रेकॉर्डिंगच्या छोट्या दालनात निघून गेले. माईक्सचे फेडर्स ऑन करून मला त्यांनी खूण केली. मला कळलं की ते माझ्या आवाजाची लेव्हल घेत आहेत. त्यांनी मला थांबण्याची खूण केली. मी कागदावरचे प्रश्न बघत बसले. त्यांच्या खाणाखुणा चालल्या होत्या. पण माझं लक्षच नव्हतं. डॉक्टर मंदाकिनी पुरंदरे पाठमोऱ्या होत्या. वास्तविक मी डॉक्टरांना आवाजाची लेव्हल देण्यासाठी खूण करायला हवी होती. शेवटी सनदी साहेब रेकॉर्डिंग सोडून आमच्या दालनात आले. मला म्हणाले, “लक्ष कुठे आहे तुझं ? जरा माझ्याकडे लक्ष दे ना ! डॉक्टरांना क्यू करायचं आहे.” मी ओशाळ हसले. सावरून बसले. पण मला या मुलाखतीचं खूपच टेन्शन आलं होतं. समोर मुलाखतीच्या प्रश्नावलीचा कागद होता. पण माझ्या मनांत मात्र वेगळेच प्रश्न होते. प्रश्नावलीतले माझे प्रश्न विषयाला धरून असतील का ? ते योग्य आहेत का ? डॉक्टरांच्या उत्तरावर मी कधी त्यांना थांबवायचं ? मुळांत त्यांच्यासारख्या इतक्या मोठ्या डॉक्टरांना मी मध्येच तोडणं योग्य होईल का ? मी नेमका कधी त्यांना प्रश्न विचारायचा? कसा विचारायचा? मी असाहाय्यपणे आधारासाठी सनदी साहेबांकडे पाहिलं. पण त्यांचं लक्षच नव्हतं
डॉ. पुरंदरेंच्या आवाजाची लेव्हल घेऊन सनदी साहेबांनी मला मुलाखत सुरू करण्याची खूण केली.
मी थरथरत्या आवाजात “नमस्कार डॉक्टर’ एवढच बोलले. मला समोरच्या कागदावरचे प्रश्नच दिसेनात. मी आवंढा गिळला आणि थांबले. सनदी साहेबांनी रेकॉर्डिंग थांबवलं. डॉ. मंदाकिनी पुरंदरेनी त्यांची पाण्याची बाटली माझ्याकडे सरकवली. मी त्या बाटलीतलं घोटभर कोमट पाणी प्यायले. थोडी स्थिर झाले. रेकॉर्डिंग पुनश्च सुरू झालं. डॉक्टर प्रत्येक प्रश्नाला सविस्तर उत्तरं देत होत्या. पण त्यांना योग्य जागी नकळत थांबवून पुढचा प्रश्न विचारण्याच तंत्र मला काही केल्या जमत नव्हतं. माझे प्रश्न आणि त्यांची उत्तरं यातली विसंगती मला स्वतःला जाणवत होती. ती सनदी साहेबांनाही जाणवली. पुन्हा रेकॉर्डिंग थांबवून ते आमच्या जवळ आले. डॉ. पुरंदरेना म्हणाले, “आपली मुलाखत बारा मिनिटांची आहे. पण पहिल्याच दोन प्रश्नांच्या उत्तरात त्यातली आठ मिनिटं संपलेत. आमची मुलाखत घेणारी आर्टिस्ट नवीन आहे. तेव्हा तुम्हीच आटोपशीर पण विषय पुरेसा श्रोत्यांना समजेल असं बोललात तर बरं होईल !”
डॉक्टर पुरंदरे समंजसपणे हसल्या. माझ्या हातांतल्या प्रश्नावलीच्या कागदावर त्यांनी नजर फिरवली. त्यांच्या तज्ञ, अनुभवी नजरेने प्रश्नांचा अचूक वेध घेतला. त्यांनी आजवर आकाशवाणीसाठी अनेकदा मुलाखती दिल्या होत्या. माझ्या हातांतल्या कागदावरच्या काही प्रश्नांवर त्यांनी काट मारली. काही नवे प्रश्न कागदाच्या तळाशी लिहिले. “आता हे प्रश्न विचार”, त्या म्हणाल्या. मी सरसावून बसले. पण कागदावर तळाला त्यांनी लिहिलेले प्रश्न मला वाचता येईनात.त्यांचं हस्ताक्षर समजेना. मी पुन्हा अडखळले. पुन्हा रेकॉर्डिंग थांबलं.
सनदीसाहेबांनी आंत येऊन मला एक कोरा कागद दिला. मी सगळे प्रश्न संगतवार त्यावर उतरवले. तोवर दोघे शांतपणे थांबून राहिले. पुन्हा मुलाखत सुरू झाली. मी भराभर प्रश्न विचारत होते.
डॉ. मंदाकिनी पुरंदरे उत्तरं देत होत्या. सगळी मुलाखत सात मिनिटांत संपली. मुलाखत फारच त्रोटक झाली होती. आता ती वाढवणं गरजेचं होतं. मला नवीन प्रश्न सुचेनात. डॉक्टरांनी थोडी माहिती दिली आणि म्हणाल्या, “मला ही माहिती देता येईल असे दोन-तीन प्रश्न आता विचार.”
मी मनांतल्या मनांत प्रश्नांची जुळवाजुळव केली. थांबत, अडखळत पुढचे तीन चार प्रश्न कसेबसे संपवले आणि एकदाची मुलाखत संपली. हूश्श !
मी घड्याळाकडे नजर टाकली. उणेपुरे तीन तास उलटून गेले होते. तेव्हा कुठे माझी पहिलीवहिली बारा मिनिटांची मुलाखत आकाशवाणीसाठी रेकॉर्ड झाली होती.
या अडखळत घेतलेल्या वेळखाऊ मुलाखतीने एक सत्य लख्खपणे जाणवलं. आकाशवाणी साठीच नव्हे, तर कुठेही मुलाखत घेणाऱ्याकडे विषयाची सखोल माहिती हवी. ती श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेशी शब्दसंपदा हवी. ती चपखलपणे योग्य जागी, योग्य वेळी वापरण्याचं कसब हवं. मुळांत अशा समृद्ध शब्दसंपदेसाठी चतुरस्त्र व्यापक वाचन हवं. वाचलेला मजकूर विषयाला अनुरूप तर हवाच. पण तो योग्य जागी आणि योग्य वेळी वापरण्यासाठी समय सूचकता अत्यावश्यक असते. स्मरणशक्ती तल्लख असेल तरच हे तंत्र जमून येतं.
मला नकळत माझ्या वडिलांची आठवण आली. लहानपणापासून माझ्यात वाचनाची—— दर्जेदार पुस्तकांच्या वाचनाची आवड त्यांनीच निर्माण केली. लायब्ररीतून आणलेलं पुस्तक अर्धी रात्र मी वाचून पहाटे त्यांना उठवायचं. पहाटेपासून ऑफिसला जायला निघेपर्यंत ते त्या पुस्तकाचे वाचन करत. अशी अनेक पुस्तकं आम्ही उभयतांनी वाचली होती. मृत्युंजय, श्रीमान योगी, मंत्रा वेगळा, कुणा एकाची भ्रमणगाथा अशा पुस्तकांचं केवळ वाचन नव्हे, तर त्या पुस्तकांवर आमच्या चर्चाही होत असत. त्यांतले खोल, गूढ अर्थ ते मला समजावून देत. ते स्वतः शेक्सपियर, डिकन्स, सॉमरसेट मॉम यांच्या पुस्तकांची पारायणं करत. मलाही समग्र जयवंत दळवी, समग्र पु. ल .देशपांडे, संपूर्ण गो.नी. दांडेकर अशा दिग्गज लेखकांची ग्रंथ संपदा आवर्जून वाचायला लावत. या पुस्तकांतले उतारे, अर्थवाही वाक्ये “अनमोल मोती” या नावाने मी वहीत संग्रहित करून ठेवत असे. त्याचा भाषेच्या विकासासाठी खूप उपयोग होत असे. त्यामुळे गणितात काठावर पास होणाऱ्या माझ्यासारखीला मराठीत मात्र अव्वल मार्क्स मिळत. स्मरणशक्तीच्या संवर्धनासाठी आईने लहानपणापासून माझ्याकडून मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष, रामरक्षा यांचं पाठांतर करून घेतलं होत. असं समृद्ध, सुसंस्कृत बालपण लाभणं हा खरा भाग्ययोग !
लिखाण करताना किंवा मुलाखत घेताना या संस्कारांचा खूपच उपयोग झाला. कारण मुलाखती म्हणजे केवळ कागदावरील प्रश्न आणि त्यांची साचेबद्ध उत्तरं असा प्रकार नसतो. तर तो दोन व्यक्तींमधलं ह्यदगत जाणून घेत, संवाद साधण्याचा प्रवास असतो. समोरच्या व्यक्तीच मनोगत जाणून घेण्यासाठी त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्या विषयाचा अभ्यास तर हवाच. पण अशा संवादासाठी, समोरच्या व्यक्तीच्या मनाचा तळ गाठण्यासाठी मुलाखत घेणाऱ्याचा दृष्टिकोन निखळ, आत्मलक्षी असायला हवा. तसंच समोरच्या व्यक्तीच्या मनाशी संवाद साधण्यासाठी अत्यंत ऋजु संवेदनशीलता हवी. मग विषय कितीही क्लिष्ट आणि तात्विक असला तरी श्रोत्यांपर्यंत /वाचकांपर्यंत तो अचूक पोहोचवता येतो.
आज दूरदर्शनवर अथवा व्यासपीठावरून अनेक मान्यवरांच्या अभ्यासपूर्ण मुलाखतींना श्रोत्यांची पसंतीची पावती मिळते, तेव्हा मला डॉक्टर मंदाकिनी पुरंदरे यांची हमखास आठवण येते. आपल्या वैद्यकीय व्यवसायात अत्यंत व्यस्त असूनही माझ्यासारख्या नवोदित मुलाखतकारासाठी तीन तास खर्च करणाऱ्या, न कंटाळता न त्रस्त होता, मला सांभाळून घेणाऱ्या डॉक्टर मंदाकिनी पुरंदरे आणि बारा मिनिटांच्या मुलाखतीचं तीन तास अत्यंत संयमीपणे रेकॉर्डिंग करणारे सनदी साहेब या दोघांना माझ्या मुलाखतीच्या ईवल्याशा कौशल्याचं श्रेय जातं. नि:संशय !
क्रमशः
— लेखन : माधुरी ताम्हणे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️9869484800
माधुरी ताई तुमचा लेख वाचताना मला पुरेपूर जाणीव झाली की तुमचे वाचन अफाट आहे. समोर आलेल्या प्रत्येक आव्हानांना तुम्ही धैर्याने तोंड दिले आहे. Hatsoff
माधुरी वहिनी,आजचा “माध्यम पन्नाशी”चा भाग म्हणजे अभ्यासपूर्ण मुलाखत कशी घ्यावी ह्याबाबतचे उत्तम मार्गदर्शन!आकाशवाणीवर तुम्हाला सखोल आणि आपुलकीने मार्गदर्शन करणारी थोर व्यक्तिमत्वे लाभली.किती छान!!
ताई, मला तुमचे लेख खूप आवडतात. मी सगळे लेख आवर्जून वाचते. तुमच्यासोबत मी पण रेकॉर्डिंग रूम मध्ये असल्याचा अनुभव मला येतो…. तुमची “अनमोल मोती ” संकल्पना मनाला खूप भावली. लहानपणी तुमच्या घरातलं वातावरण किती छान पुस्तकमय असेल….वाह खूपच मस्त…!!
खूप सुंदर शब्दांकन. तुमचा हा लेख म्हणजे नवोदित मुलाखतकारांना केलेले अतीशय उपयुक्त मार्गदर्शनच आहे.
खूप छान अनुभव कथन. मुलाखत घेतांना खरंच विषयाचा खोलवर अभ्यास हवाच.
अचानक आलेल्या कामामुळे किती टेन्शन आलं होतं ते जाणवत लेखातून.
सौ.माधुरी ताम्हाणे ह्यांचा लेख वाचून हे लक्षात आले की,मुलाखत घेताना केव्हढी मेहनत घ्यावी लागत असेल,त्या पाठीमागे किती अभ्यास करावा लागत असेल.लाईव्ह मुलाखत असेल तर प्रसंगावधान पण जरूरी असेल,अश्या क्षेत्रात माधुरी ताई सातत्याने इतकी वर्षे यशस्वीरित्या कार्यरत आहेत. खरच अभिनंदन करावी,अशीच कामगिरी आहे.पुढे अनेक वर्षे त्या अश्याच लिहित राहो,अशी सदिच्छा.
सौ.माधुरी ताम्हणेंचा लेख वाचताना हे लक्षात आले की एका मुलाखती मागे केवढे कष्ट असतात,अभ्यास असतो.शिवाय लाईव्ह मुलाखत असेल तेव्हा प्रसंगावधान लागत असेल.माधुरी ताईंनी घेतलेल्या मुलाखती अतिशय मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण असतात,त्याचे कारण त्यांना सुरुवातीच्या काळात मिळालेले उत्तम मार्गदर्शन तर आहेच पण त्यांची मेहनत पण दिसून येते.आज ही प्रत्येक मुलाखत अतिशय माहितीपूर्ण व्हावी, ह्यासाठी त्यांची धडपड दिसून येते आणि म्हणूनच त्या इतकी वर्षे सातत्याने ह्या क्षेत्रात काम करत आहेत.