“बालकल्याण नगरी” इथला बाह्य ध्वनीमुद्रणाचा कार्यक्रम संपवून दुसऱ्या दिवशी सगळ्या टेप्स घेऊन मी आकाशवाणीत दाखल झाले. मला सनदीसाहेब स्टुडिओत घेऊन गेले. मी रेकॉर्डिंग केलेल्या डझनभर टेप्स भराभर त्यांच्यासमोर ठेवल्या. ते हतबुद्ध होऊन पहातच राहिले. “अग तू तिथे दिवसभर रेकॉर्डिंग करत फिरत होतीस की काय ?” त्यांनी हसत हसत गंमतीने विचारलं. मी तोऱ्यात उत्तर दिलं, “हो तर. मी संस्थेतल्या सगळ्याच मुलांशी बोलले. त्यांची माहिती घेतली. त्यांचा दिनक्रम, त्यांच शिक्षण, प्रशिक्षण, खेळ, सणवार, त्यांचे पालक, शिक्षक सगळ्या सगळ्यांची माहिती रेकॉर्ड केलेय मी”. माझा उत्साह उतू जात होता. ते मात्र विचारांत पडल्यासारखे दिसले. त्यांनी एकूण अंदाज घेतला. मी किमान सहा तासांचं रेकॉर्डिंग करून आणलं होतं.
ते म्हणाले, “अगं आपल्याला कार्यक्रमाची फायनल टेप बनवायची आहे, ती अवघी वीस मिनिटांची ! त्या वीस मिनिटांमध्ये तुझं ओपनिंग, क्लोजिंग, संगीताचे पिसेस, थोडेसे इफेक्ट्स यांचाही वापर करायचाय. तुझं ओपनिंग दोन मिनिटं, क्लोजिंग दोन मिनिटं आणि मधली कॉमेंट्री एक मिनिटाची ! म्हणजे वीस मिनिटांतून त्यासाठी लागणारी पाच मिनिटं गेली. हातात उरतात फक्त पंधरा मिनिटं ! पंधरा मिनिटांतली तीन मिनिटं संस्थाचालकांच्या मुलाखतींसाठी वापरावी लागतील. उरलेल्या बारा मिनिटांत मुलं, शिक्षिका आणि समुपदेशक ! त्यामुळे सहा तासांच्या या रेकॉर्डिंगमधून आपल्याला जेमतेम बारा मिनिटांचं रेकॉर्डिंग उचलायचय. त्या बारा मिनिटांत श्रोत्यांना बालकल्याणनगरीच्या कार्याविषयी नेमकेपणाने माहिती कळायला हवी.”
सनदी साहेबांच्या मिनिटांच्या हिशोबाने माझं तर डोकंच गरगरायला लागलं. समोर पसरलेल्या सहा तासांच्या रेकॉर्डिंग मधून बारा मिनिटांचं “मटेरियल” उचलण्याचं शिवधनुष्य पेलायचं आहे या कल्पनेने मी सुन्न झाले. पण तोवर सनदी साहेब कामाला लागले होते. त्यांनी सर्वप्रथम सगळं “मटेरियल” टेप्सवरून आकाशवाणीच्या स्पूलवर उतरवायला सुरुवात केली. ती करत असतानाच बहुधा यातलं नेमकं काय घ्यायचं आणि काय वगळायचं ह्याचे अंदाज ते बांधत असावेत ! मधून मधून मला प्रश्न विचारून ते एकीकडे संस्थेची माहिती करून घेत होते. अचानक त्यांनी मला प्रश्न केला, “या रूपकाचं ओपनिंग आणि क्लोजिंग लिहून आणलं आहेस कां ? दाखव बरं मला !”
मी कांहीच लिहून आणलं नव्हतं.
त्यांनी संयमाने माझ्या हातांत दोन कागद ठेवले. म्हणाले, “एक फुलस्केप म्हणजे दोन मिनिटांचं निवेदन ! आपल्याला तेवढंच पाहिजे लक्षांत ठेव. असं दोन आणि दोन पानांत तुझं ओपनिंग आणि क्लोजिंगचं निवेदन लिही. मी ते रेकॉर्ड करतो !”
मी त्या छोट्याशा स्टुडिओतल्या एका कोपऱ्यात बैठक घेतली. सनदी साहेबांचं एडिटिंग चालू होतं. कालच्या मुलाखतीच्या रेकॉर्डिंगचे आवाज एकीकडे माझ्या कानांवर आदळत होते. त्या आवाजातही चित्त एकाग्र करून, जणू पुन्हा एकदा मनाने मी बालकल्याणनगरीत पोहोचले. त्यांनी मला दिलेली संस्थेच्या कार्याची पुस्तिका मी सुदैवाने वाचली होती. त्यांतले महत्त्वाचे संदर्भ टिपले आणि अतिशय संवेदनशीलतेने ‘बालकल्याणनगरीच्या’ कार्याची माहिती श्रोत्यांना समजेल उमजेल अशा भाषेत लिहिली. समारोपाच्या निवेदनात मी आवर्जून लिहिलं की संस्थेच्या या कार्यामुळे बालकांचं खरोखरं कल्याण होतं आणि संस्थेचं बालकल्याण नगरी हे नांव सार्थ ठरतं !
माझं निवेदन सनदी साहेबांच्या हातात ठेवलं. ते समाधानाने हंसले. म्हणाले, “चांगलं लिहिलं आहेस निवेदन ! अतिशय सेन्सिटिव्ह आणि सहज. बोलीभाषेत. गुड !” छोट्या रेकॉर्डिंग बूथ मधून त्यांनी वेगळ्या टेप वर माझं निवेदन आणि मधली कॉमेंट्री रेकॉर्ड केली.
आता त्यांनी माझ्या मदतीने एडिटिंगच्या कामाला सुरुवात केली. ते नेमकेपणाने शिक्षक, मुलं, समुपदेशक यांच्या मुलाखतीतला ठराविक भाग उचलत होते. माझ्या निवेदनाशी जोडत होते. मध्येच संगीताचा एखादा पीस पार्श्वभूमीवर वाजवत होते. हे सगळं काम वेगवेगळ्या मशीन्सवर ते अत्यंत एकाग्रतेने करत होते आणि मी अवघं चित्त एकवटून त्यांचं काम पाहत होते. इतक तांत्रिक काम कौशल्याने करणं मला कधी जमेल कां ? कोण जाणे ! पण जमायला हवं. हे काम शिकायला हवं. माझ्या मनांत विचार चालू होते. एखाद्या शब्दात जर्क येणं, महत्त्वाचा शब्द गाळला जाणं, शब्दांचं Overlapping होणं यातलं काहीही होऊ न देता, निर्दोष टेप तयार करणं हे खरोखर आव्हानात्मक आणि कौशल्यपूर्ण काम आहे. ते अत्यंत एकाग्रतेने करायला हवं. कारण त्यांतून त्या विषयाची उपयुक्त माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचत असते. पण त्यासाठी त्या माहितीला, मुलाखतींना, निवेदन, संगीत, वेगवेगळ्या आवाजांचे पार्श्वसंगीत याने सजवायला लागतं. तरच श्रोत्यांचं ते ऐकण्यात मन रमतं.
एकूणच हे काम खूप इंटरेस्टिंग आहे खरं ! पण ह्यातला कळीचा मुद्दा त्या पहिल्या एडिटिंगने मला लक्षात आणून दिला. बाह्य ध्वनीमुद्रण करताना फापटपसारा टाळून महत्त्वाची माहिती नेमकेपणाने टिपता यायला हवी. त्यासाठी मुळांत कार्यक्रम किती मिनिटांचा आहे, ते लक्षांत घेऊन, मिनिटांच्या काटेकोर चौकटीत तो नेमकेपणाने बसवायला हवा. वेळेची मर्यादा पाळून रंजकपणे तो सादर करता यायला हवा. एकूणच त्या पहिल्या बाह्यध्वनी मुद्रणाच्या रेकॉर्डिंग आणि एडिटिंग ने माझ्या नवखेपणातून झालेल्या चुकांमुळे खूप दमछाक झाली ! माझीही आणि सनदी साहेबांचीही ! पण तो कार्यक्रम रेडिओवरून प्रसारित झाला आणि त्याला श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्या क्षणी सगळ्या कष्टांचं चीज झालं असं वाटलं. मान्य आहे ! माझ्या नवखेपणामुळे, माझ्या चुकांमुळे सनदीसाहेबांचे कामाचे सात तास त्यासाठी खर्ची पडले. पण त्यांनी एका आकाशवाणी कलावंताला बाह्य ध्वनीमुद्रणाच्या कार्यक्रमासाठी तयार केलं. इतकं की गेली ५० वर्षे अव्यहातपणे हे काम सुरू आहे. मला ते आनंद देत आहे. मात्र त्या पहिल्यावहिल्या कार्यक्रमामुळे बऱ्याचशा खाचाखोचा लक्षात आल्या आणि परत अशी संधी कधी मिळेल याची मी आतुरतेने वाट पाहू लागले.
लवकरच अशी संधी चालून आली. हाजीअली इथल्या अपंगांच्या संस्थेवर बाह्यध्वनीमुद्रणाचा कार्यक्रम करण्यासाठी मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं.
हाजीअली इथली ही प्रख्यात पुनर्वसन संस्था समुद्रकिनारी वसलेली आहे. मी तिथे पाय टाकला आणि त्या पहिल्या क्षणी ईश्वराला मनोमन धन्यवाद दिले. हात तुटलेले, एका पायाने अपंग अशी कितीतरी जण मला सभोवताली दिसू लागली. अनेक जणांच्या कुबड्यांचे ठक ठक आवाज तिथल्या शांततेवर ओरखडा उमटवत होते. या अपंग व्यक्ती शरीराने अधू असल्या, तरी मनाने सक्षम होत्या. आपल्या शारीरिक व्यंगावर मात करून ही सगळी जणं अनेक कामं करत होती. नवीन कामं शिकत होती. पर्यवेक्षकांच्या मदतीने मी मुलाखत घेत संस्थेमध्ये फिरत होते. आता निरक्षरविवेकाने नेमका मजकूर टिपणं हळूहळू कळू लागलं होतं. सुरुवातीला थोडंसं बोलताच अंदाज येत होता. त्यांना कसं बोलतं करायचं तेही कळू लागलं होतं. असंच फिरत फिरत एका अपंग रुग्णांच्या दालनात आले. तिथली बहुतेक माणसं बिछान्याला खिळलेली होती. काठी अथवा वॉकरच्या आधाराने चालणंही त्यांना शक्य होत नव्हतं. मी प्रत्येकाच्या पलंगापाशी जाऊन त्यांच्याशी बोलत होते. त्यांच्या मुलाखती रेकॉर्ड करत होते. त्यातल्या कोणाच्याही बोलण्यात अगतिकता अथवा विषादाची पुसटशी झलक सुद्धा दिसत नव्हती हे विशेष ! अशीच फिरत फिरत एका पलंगापाशी आले. त्या पलंगावर दोन्ही पायाने अपंग असलेला विशीतला एक मुलगा झोपला होता.
“कसा आहेस” मी अगत्याने प्रश्न केला.
“मी मस्त आहे”. तो प्रसन्नपणे म्हणाला. मी म्हटलं, “तू दिवसभर पलंगावर पडून असतोस. वेळ कसा जातो तुझा ? तुला कंटाळा नाही येत ?” त्याने न बोलता उशी खालून एक वही बाहेर काढली. माझ्या हातांत ठेवली. त्या वहीत छान छान कविता होत्या. मी म्हटलं, “तू कविता करतोस ?” “हो” तो उत्तरला.
“पण तू तर इथून बाहेर पडू शकत नाहीस. बाहेरच जगसुद्धा पाहू शकत नाहीस !”
त्याने मला जवळ बोलावलं. म्हणाला, “इथे ये. या खिडकीतून बाहेर बघ.” मी त्या खिडकीतून बाहेर पाहू लागले. तो पुढे म्हणाला, “माझी नजर या खिडकीतून बाहेर जाते, तेव्हा मला कितीतरी गोष्टी दिसतात. या खिडकीला लागून फुलझाडाची वेल आहे ना ! सीझनमध्ये ती बहरते. आधी त्यावर अगदी छोट्याशा कणभर आकाराच्या कळ्या येतात. हिरव्या पानांतून त्या हळूच माझ्याकडे डोकावून बघतात. लहान मुलं आईच्या पदराडून अनोळखी माणसाला लपून कसं बघत असतात ना !अगदी तशाच त्या मला बघतात. मग हळूहळू कळ्या मोठ्या होतात. उमलतात. फुलतात. त्यांचा सुगंध या खिडकीतून माझ्यापर्यंत येतो. या खिडकीतून तो समोरचा बहावा फुललेला दिसतो ना तेव्हा माझ्या कवी मनालाही बहर येतो. मी भराभर कविता लिहितो.”
मनांत आलं, खरंच ! जे न देखे रवी ते देखे कवी म्हणतात तेच खरं आहे.
तो पुढे बोलतच राहतो. जणू खूप दिवसांनी तो त्याच्या काळजातलं गुपित उलगडून दाखवत होता. “या समोरच्या झाडांवर पानगळ सुरू झाली की मला कळतं, हेमंत ऋतू आता जवळ येतोय. सगळी झाडं निष्पर्ण होतात. मग वसंतात त्यांना लालसर पोपटी पालवी फुटू लागते.रंगीबेरंगी पक्षी त्या झाडांवर झुलू लागतात. निसर्गाचे हे ऋतुचक्र मला रोज नव्याने जगण्याची ऊर्जा देतं. प्रसन्नता देतं”.
मी रेकॉर्डर सुरू केला होता. पण त्याची औपचारिक मुलाखत घेण्यासाठी नव्हे ! तर त्याचं हळवं मनोगत शब्दबद्ध करण्यासाठी ! त्याचं मनोगत माझ्या कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार होतं !
“मी तुमचा कार्यक्रम नक्की ऐकेन. माझ्याजवळ ट्रांझिस्टर आहे ना !” तो उत्साहाने म्हणाला.
मी रेकॉर्डिंग संपवून बाहेर आले.
रस्त्यावर धावणाऱ्या गर्दीत मी शोध घेऊ लागले. खरंच नक्की कोण अपंग होतं ? यांत्रिकपणे धावणाऱ्या जगांतली ही समोरची गतिहीन, कोरड्या मनाची माणसं ? की इंचभर हलता न येता ही निसर्गाच्या ऋतुचक्राशी स्वतःच्या जगण्याची गती जुळवून, प्रसन्न मनाने गतिमान आयुष्य जगणारा तो मुलगा ?
मी आजही या प्रश्नाचे उत्तर शोधतेय !
क्रमशः
— लेखन : माधुरी ताम्हणे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान लेखन.ध्वनिमुद्रण ठराविक वेळेत कसे व समर्पक करावे याची कल्पना येते.
बाह्यध्वनीमुद्रणाच्या कामातील खाचाखोचा,अवांतर माहिती टाळून आवश्यक तितक्याच माहितीचा समावेश,वेळेची मर्यादा लक्षात घेऊन रंजक कार्यक्रम कसा करता येईल ह्याबाबतच मिळालेले मार्गदर्शन ह्या गोष्टी बाह्यध्वनीमुद्रण उत्तम होण्यासाठी आकाशवाणी कलावंताला किती मोलाच्या असतात हे तुमच्या अनुभवावरुन लक्षात येत आहे.तसेच बाह्यध्वनीमुद्रणानंतर तो कार्यक्रम श्रोत्यांपर्यंत पोहोचवेपर्यंतच्या मधल्या असंख्य महत्त्वाच्या तांत्रिक बाबी आम्हाला आजपर्यंत माहिती नव्हत्या.त्या समजल्या.वरिष्ठांचे वेळोवेळी मिळणारे सखोल मार्गदर्शन आणि त्यांनी दिलेले प्रोत्साहन हे ही विशेष.
हाजीअली येथल्या पुर्नवसन संस्थेतल्या अपंग मुलाच्या मनातला सकारात्मक भाव खरंच विचार करायला लावणारा आहे…
माधुरी वहिनी,ओघवत्या शैलीतील तुमचं लिखाण माहितीपूर्ण तसेच मार्गदर्शकही आहे आणि पुढचा प्रत्येक भाग वाचण्याची उत्सुकता निर्माण करणारे आहे.
माधुरी ताईंनी आपल्या उत्कृष्ट कार्यातून श्रोत्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. आकाशवाणीवरील मुलाखत, संपादन आणि प्रसारण प्रक्रियेतील त्यांच्या मेहनतीचे महत्व प्रत्येकाला जाणवते. आपल्या साध्या कार्यातून सामान्य श्रोत्यांनाही मुलाखतीचे महत्व पटवून दिले आहे, हे खरोखर प्रेरणादायी आहे.
उमेदवारीच्या काळात त्यांनी मिळवलेला अनुभव, प्राप्त केलेले मार्गदर्शन, आणि त्यांच्यातील तीव्र इच्छाशक्ती ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरली आहे. हाजी अली येथील अपंग संस्थेसाठी घेतलेली मुलाखत तर एक अमूल्य कार्य आहे. अपंग मुलांचे सकारात्मक जीवनदर्शन आणि ‘अपंग’ या शब्दाचे भावपूर्ण विश्लेषण हे मनाला एक वेगळ्या विचारांची दिशा देणारे आहे. त्यांनी केलेल्या या प्रयत्नांनी सर्वांमध्ये आत्मचिंतन आणि सकारात्मक दृष्टिकोन जागृत केला आहे.
तुमच्या लेखनाला आमच्या शुभेच्छा, आणि असेच तुमचे कार्य अखंड सुरू राहावे ही प्रार्थना!
चंद्रकुमार मधुकर देशमुख
गोरेगाव, मुंबई