गो. नी. दाण्डेकरांचा आशीर्वाद
आकाशवाणीत माझी “दुष्टचक्र” ही कथा प्रसिद्ध झाली ती १९७५ साली ! पण खरंतर तत्पूर्वी तीन एक वर्ष आधीच लेखनाला सुरुवात झाली होती. वय अल्लड. पण अहंकार धारदार. या धारदार अहंकारावर वर्मी घाव बसला आणि त्यांतूनच लेखनाचं बीज अंकुरलं मनांत !
त्याचं असं झालं एकदा माझी मावशी आमच्या घरी पाहुणी आली होती. तिच्या चार दिवसांच्या मुक्कामात अनेक वेळा तिने तिच्या पुतणीचं कौतुक पुराण ऐकवलं होतं. नयना एवढी हुशार आहे, छान कविता लिहिते, तिच्या कविता शाळेच्या मासिकात प्रसिद्ध होतात, तिच्या सगळ्या शिक्षिका तिचं खूप कौतुक करतात म्हणे !
आता ही नयना माझ्याच वयाची. समवयस्कर ! नयनाच्या अखंड कौतुक पुराणाने माझ्या निर्बुद्धपणावरच जणू मावशी शिक्कामोर्तब करत होती. आता “हम भी कुछ कम नही” हे सिद्ध करणं गरजेचं होतं. बहिणीचा पाहुणचार घेऊन मावशी तिच्या घरी निघून गेली खरी ! पण माझा अहंकार डिवचून ! पुन्हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणतात ती गत !
शेवटी इर्षा जागृत झाली. पेन उचललं. र ला ट जुळवून दोन कविता लिहिल्या. पण लवकरच लक्षात आलं, कविता करणं अपने बस की बात नही. कठीणच आहे ते ! कवितांचे कागद फाडून टाकले. तरी मनांतला असूयेचा अग्नी मात्र धगधगत राहिला. अखेर एक कथा सुचली. ती भराभर लिहून काढली. आता ती दाखवायची कोणाला ? अर्थात हक्काची वाचक घरांतच होती. माझी आई. तिला कथा वाचायला दिली खरी ! पण लवकरच साक्षात्कार झाला. ही काही लेकीचं कौतुक करणारी टिपिकल प्रेम स्वरूप आई नाही. आमच्या मातोश्री रोखठोक. सडेतोड. असं म्हणतात निंदकाचं घरं असावे शेजारी ! अहो शेजारी कुठलं ? घरातच होतं ते ! त्यामुळे ही कथा किती रद्दड झाली आहे ते आईने रोखठोक मला सुनावलं. मला रडू कोसळलं. पण आता मी जिद्दीला पेटले. आणखी एक कथा लिहिली. मात्र ती आईला न दाखवता थेट “गृहलक्ष्मी” मासिकाच्या पत्त्यावर रवाना केली. मनांत एक सुप्त विचार मूळ धरून होताच. नयनाच्या कविता शाळेतल्या मासिकांत छापून येतात म्हणे ! माझी कथा ‘गृहलक्ष्मी’ सारख्या प्रख्यात लोकप्रिय मासिकांत छापून आली तर मला किती मोठा वाचकवर्ग मिळेल ! माझं नांव सर्वदूर पसरेल.
‘गृहलक्ष्मी’ मासिकासाठी कथा रवाना केली त्या दिवसापासून सतत मी पोस्टमनची चाहूल घेत होते. आपण शाळेत गेल्यावर पोस्टमन आला आणि घरांत कोणी नाही म्हणून मासिक परत घेऊन गेला तर ? या आशंकेने घराजवळच्या पोस्टऑफिसमध्ये सुद्धा दररोज चकरा मारणं सुरू झालं.
एक दिवस मात्र तो खाकी कपड्यातला मेघदूत चक्क माझ्या दारांत अवतरला. एक जाडजुड लिफाफा त्याने माझ्या हातांत ठेवला. हाय रे दैवा! त्या लिफाफ्यातून “गृहलक्ष्मी”च मासिक नव्हे, तर चक्क माझ्याच कथेचं हस्तलिखित खाली पडलं. “चांदण्याची फुलं” नांवाच्या त्या कथेने ‘साभार परत’ चे कांटे जणू मला अंगभर टोचले. मन घायाळ झालं. पण खचलं मात्र नाही.
‘गृहलक्ष्मी’ मासिकाकडून “साभार परत” आलेल्या त्या कथेच हस्तलिखित दुसऱ्या लिफाफ्यात भरलं. त्यावर “मानिनी” मासिकाचा पत्ता लिहिला आणि पोस्टाने रवाना केलं. पंधरा दिवसांनी तिथूनही हस्तलिखित परत आलं. आता मन स्वस्थ बसेना. ते हट्टाला पेटलं. नव्या दमाने आणखी एक कथा लिहिली आणि ती तत्कालीन अत्यंत लोकप्रिय “माहेर” मासिकाकडे रवाना केली. “माहेर” मासिकात आपलं लिखाण छापून यावं ही इच्छा मनांत प्रबळ होती. आता “माहेर” मासिकाच्या प्रथितयश लेखिका ज्योत्स्ना देवधर, शैलजा राजे, वसुंधरा पटवर्धन यांच्या पंक्तीत लवकरच आपण विराजमान होणार अशी स्वप्न दिवसाढवळ्या पडू लागली. एक दिवस “माहेर” मासिकाकडूनही “साभार परत” चा शिक्का लेवून ही कथा परत आली !
आता एक नवा उद्योग सुरू झाला. साभार परत आलेली कथा नव्या पाकीटात घालायची. पाकिटावरील पत्ता बदलायचा आणि द्यायची पाठवून दुसऱ्या मासिकाकडे ! त्या काळांत मासिकांचा वाचक वर्ग खूपच मोठा होता. माहेर, मेनका, गृहलक्ष्मी, ललना, मानिनी, स्त्री, किर्लोस्कर ही सगळी तेव्हाची मासिकं प्रसिद्ध आणि लोकप्रिय होती.
दरम्यान दिवाळी जवळ आली. त्यावर्षी पोस्टमनला मी मजबूत दिवाळी भेट दिली. कारण तो ठरलेला पोस्टमन परत आलेल्या कथेच बाड निगुतीने माझ्या हाती सुपूर्द करत असे.
माहेर, गृहलक्ष्मी, ललना, मानिनी या सर्व तत्कालीन मासिकांकडून रितसर माझ्या कथा साभार परत येत होत्या. अशा डझनभर कथा परत आल्यावर, शाळकरी वयाला अनुसरून थोडं आत्मचिंतन सुरू केलं. आपल्या कथा सर्रास परत कां बर येत आहेत? आपण कसं लिहायला हवं ? हा विचार मनांत सुरू झाला. दरम्यानच्या काळांत माझं वाचनवेड आणि वाचनवेग दोन्ही वाढलं होतं. वडिलांनी पु. ल. देशपांडे, गो.नी. दांडेकर, ना. सं. इनामदार, जयवंत दळवी यांच समग्र साहित्य वाचून घेतलं होतं. त्याची पोषक तत्व मनाच्या मातीत रुजत होती. कथा बीजांना अंकुरत होती. अशीच एक कथा सुचली “पतिता”. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे “पतिता” ही कथा गृहलक्ष्मीकडे दिली पाठवून आणि एक दिवस चक्क “गृहलक्ष्मीचा” नवा कोरा अंक हातात पडला.
अरे वा ! माझा आनंद गगनात मावेना. मासिकाच्या अनुक्रमणिकेत लेखिकांच्या यादीत एक नांव ठळकपणे मिरवत होतं. कथा : पतिता लेखिका : माधुरी मधुकर प्रधान. अखेर चिवटपणे पाठपुरावा करून वेगवेगळ्या विषयांवर कथा लिहून कथा लेखिकांच्या यादीत नांव नोंदवलं तर !
नयनाच्या कविता शाळेच्या मासिकांत छापून येतात. माझी कथा तर “गृहलक्ष्मी” सारख्या लोकप्रिय मासिकांत छापून आली. स्वतःच्याच अभिमानाने उर भरून आला. साभार परत आलेल्या डझनभर कथांच्या अपयशाचं संचित गांठीशी बांधून, “पतिता”च्या रूपाने ओंजळभर प्रतिभा पुनरुज्जीवीत झाली होती.
मी धन्य झाले. लेखणीला आत्मविश्वासाची धार आली. मनांत उन्मेषाचं कारंज थुईथुई करू लागलं. आता आजूबाजूला चौकस नजर फिरू लागली. कथेसाठी विषयांचा शोध घेऊ लागली आणि खरंच नव्या नव्या कथावस्तू मिळू लागल्या.
मात्र या कथा वस्तू टिपणारी “नजर” लाभली ती एका अकल्पित घटनेने ! “पतिता” या कथेला आशीर्वादाचा परिसस्पर्श लाभला आणि अत्यल्प साहित्य मूल्य असणारी ती कथा अमूल्य झाली. भाग्यवंत झाली.
१८ डिसेंबर १९७४ या दिवशी मी माझ्या कुटुंबासह कोल्हापूरला निघाले होते. ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’ मध्ये सामान सुमान ठेवलं. स्थिरस्थावर झालो. समोरच्या बाकावर एक आजी-आजोबा नातीसह प्रवास करत होते. सुंदर साधीशी आजी. गोरेपान, उंच शेलाटी अंगयष्टी असलेले दाढीधारी तीक्ष्ण नजरेचे आजोबा आणि छोटीशी गोरी गोमटी नात! थोड्याच वेळांत टी.सी. तिकीट तपासायला हजर ! समोरच्या बाकावर बसलेल्या आजोबांनी टी .सी.च्या हातांत तिकीटं ठेवली आणि नांव सांगितलं, “गो.नी.दाण्डेकर !”
समोरच्या बाकावरून हा प्रसंग गंमत म्हणून पाहणारी मी, ताडकन उभी राहिले. ज्यांच्या साहित्यावर आपला पिंड पोसलाय, ज्यांच्या “कुण्या एकाची भ्रमणगाथा” या आत्मवृत्ताची पारायणं करण्यात अनेक रात्री जागवल्यात, ज्यांच्या लेखनशैलीने आपल्याला झपाटून टाकलय, ज्या लेखकावर आपण जीव ओवाळून टाकतो, ज्यांची संपूर्ण ग्रंथसंपदा झपाटल्यासारखी वाचतो, ते साहित्यिक गो.नी. दाण्डेकर साक्षात माझ्या समोरच्या बाकावर !
मी थेट त्यांचे पायच धरले. गाडीने वेग घेतला त्याच्या दुप्पट वेगाने मी त्यांच्या लिखाणाबद्दल त्यांच्याशी भरभरून बोलू लागले. या शाळकरी मुलीच्या बडबडीने कदाचित त्यांचं रंजन होत असावं ! पण ते ऐकत होते. मनापासून बोलत होते, आपल्या पुस्तकांबद्दल, गडकिल्ल्यांबद्दल.
आता माझा धीर चेपला. मी हळूच म्हटलं, “नुकतीच माझी एक कथा गृहलक्ष्मी मासिकात छापून आलेय. मी कोल्हापूरला वि. स. खांडेकरांना ती दाखवण्यासाठी मासिक सोबत घेतलंय. आपण ही कथा वाचाल का ?” ते छान हंसले. म्हणाले, “वा ! खांडेकर नाही तर दाण्डेकर भेटले की !” मी खुशीत बॅगेतून मासिक काढलं. त्यांच्या हातांत ठेवलं. त्यांनी सावकाश कथा संपूर्ण वाचली. पेन काढलं आणि आपल्या सुंदर हस्ताक्षरात त्यांच्या खास शैलीत अभिप्राय लिहिला.
कथनशैली चांगली आहे. शब्द पुरेसे उपलब्ध आहेत. त्यांच्यासाठी अडावे थबकावे लागत नाही. मात्र या कथनशैलीला, शब्दसंपत्तीला आशय चांगला लाभला, तर याहून अधिक उजवी कथा लिहिली जाऊ शकते. विषयासाठी कुण्या देखण्या स्त्रीच्या आणि पुरुषाच्या प्रेमभंगाची किंवा विरहाची वाट पाहायची गरज नाही. किती किती नित्य नवे आणि मनास स्पर्शून जाणारे विषय भंवताली आपली वाट पाहत असतात. माय — लेकरांतले संबंध, धरित्री आकाशातलें नाते, चिरवैरिणी क्षुधा, नित्य नूतन निसर्ग, ऊन्ह आणि पाऊस, कोवळे दवबिंदू —- सांगावे तरी किती ? केवळ दृष्टी सदैव मोकळी ठेवायला हवी. मोकळी आणि अकल्पिताच्या स्वागतासाठी सिद्ध. तेवढे ते स्वागत करणे साधले, तर मग सारें साहित्य क्षेत्र नव्याच्या सत्कारासाठी सिद्ध आहे !
आप्पा दाण्डेकर
१८.१२.७४
गोपाल नीलकंठ दाण्डेकर
तळेगाव दाभाडे, जि.पुणे
गो. नी. दाण्डेकरांचा अकल्पितपणे लाभलेला हा लाख मोलाचा संदेश पुढील काळांत माध्यमांच्या जगांत नाविन्याचा शोध घेत फिरण्यासाठी पथदर्शी ठरला. आशीर्वादाचं हे मौलिक पाथेय उणीपुरी पन्नास वर्षे मला पुरलय.
कारण आप्पांचा हा अभिप्राय केवळ “अभिप्राय” नव्हता. गो.नी. दांडेकर या सिद्धहस्त साहित्यिकाचा एका नवोदित लेखिकेला मिळालेला तो साक्षात “आशीर्वाद” होता. एका सरस्वतीपुत्राच्या माध्यमातून जणू माता सरस्वतीचा वरदहस्त मला लाभला हे माझं भाग्य !
क्रमशः
— लेखन : माधुरी ताम्हणे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
गो नी दांडेकराचा,माधूरीताईना आशीर्वाद लाभणे म्हणजे दुर्मीळच
माधुरी ताई तुमच्या लेखनाचे गो नी दांडेकर यांच्याकडून कौतुक होणे म्हणजे अभिमानास्पद आहे. विधात्यानं ही योजना आखली असावी तुमच्या ध्यानी मनी ही नसेल श्री दांडेकर असे अचानकपणे भेटतील अणि तुमच्या लिखाणाचे कौतुक करतील.
माधुरी वहिनी, आजच्या भागात सुरुवातीला तुम्ही सांगितलेल्या काही आठवणी,काही वर्णन केलेले प्रसंग हे वाचून जितकी मजा वाटली तितकेच पुढचे वाचून मी तर भारावून गेले !!साक्षात गो.नि.दां चे तुमच्या कथेला अनपेक्षितपणे मिळालेले अभिप्राय.हा तर तुम्हाला त्यांनी दिलेला अनमोल आशिर्वाद!!खरच खूपच भाग्यवान आहात तुम्ही.
चांदण्याची फुलं” नांवाच्या त्या कथेने ‘साभार परत’ चे कांटे जणू मला अंगभर टोचले. मन घायाळ झालं. पण खचलं मात्र नाही.’
इतक्या वेळा अपयश येऊन देखील मन खुलं नाही हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती पुढे यशस्वी होण्यामागे.
त्यात नशिबाची साथ लाभल्यामुळेच आपल्याला गो.नी.दांडेकर, किंवा वि स. खांडेकर यांसारख्या लोकांचे आशिर्वाद लाभले. त्यात तुमचे वाचन, knowledge, talent या सगळ्यांमुळे तुम्ही इतक्या यशस्वी होऊ शकलात.
खूप खूप कौतुक
वाह,माधुरी ताईंच्या लेखनाला
गो.नी.दांडेकरांचा आशीर्वाद लाभलेला आहे,किती मोठे भाग्य आहे,असा आशीर्वाद लाभायला खरेच पूर्व संचित असले पाहिजे.
माधुरी ताई,तुम्ही इतक्या सहजतेने इतक्या गोष्टी केल्या आहेत,ते बघून खरेच आश्चर्य वाटते.
खूप छान शब्दांकन. गो नी दांडेकर यांच्याकडून कौतुक होणं म्हणजे अभिमानास्पद गोष्ट.