आज पत्रकार दिंन आहे. या निमित्ताने पत्रकारितेच्या विद्यार्थिनी प्रियंका देशपांडे यांचा हा विचार प्रवर्तक लेख….
– संपादक
आजच्या प्रसार माध्यमांचा अफाट विस्तार झाल्यामुळे माध्यम क्षेत्रात करीअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारतात झपाट्याने विकसित होत असलेल्या माध्यम क्षेत्रात आजच्या घडीला 70 हजार वृत्तपत्रे आणि 800 टेलिव्हिजन चॅनल्स आहेत. सोबतच रेडिओ, सिनेमा, वेब पोर्टल, ऑनलाइन, सोशल मीडिया जाहिरात, जनसंपर्क इत्यादी क्षेत्रही विस्तारत आहेतच.त्याचबरोबर माध्यम संशोधन, प्रसिद्धी माध्यमे, प्रकाशन क्षेत्र, माहितीपट व चित्रपट, शासकीय कार्यालये यात पत्रकारीतेचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आकाशवाणी, दूरचित्रवाणी, शिक्षण व संशोधन क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
वृत्तपत्रांच्या खपाच्या बाबतीत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतात दररोज बारा कोटींपेक्षा अधिक अंकाची विक्री होते. त्यामुळे वृत्तपत्र क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर करिअर करण्याची संधी आहे. आज प्रत्येक वृत्तपत्राची ऑनलाईन आवृत्ती निघु लागली आहे. मॅगझीन जर्नलिजमचे क्षेत्रही नव्याने भरारी घेत आहेत.
पत्रकारितेत करिअर करणाऱ्यांनी कुठल्या तरी एका विषयाबाबत सखोल ज्ञान मिळवणे उपयुक्त ठरते. हे क्षेत्र आव्हानात्मक आणि तेजोवलय लाभलेले आहे. उच्चपदस्थ, राजकारणी, समाजकारणी, अधिकारी, चित्रपट, कलावंत, साहित्यिक, शास्त्रज्ञ, इत्यादिंच्या सतत संपर्कात राहण्याची संधी पत्रकारांना मिळते.
प्रसार म्हणजे पसरविणे आणि माध्यम म्हणजे स्वतःला व्यक्त करण्यासाठी आपण ज्याचा आधार घेतो . ह्या दोघांचे एकत्रिकरण केल्यावर त्याचा अर्थ होतो की एखादी गोष्ट पसरविण्यासाठी आपण त्याचा आधार घेतो त्याला प्रसार माध्यमे म्हणतात.
आजच्या प्रसार माध्यमांनी मोठे रूप धारण केले आहे. या प्रसार माध्यमांच्या साह्याने आपण खूप मोठ्या लोकसंख्येसोबत माहितीची देवाण-घेवाण वेगाने करू शकतो. अशा प्रकारे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती आपल्याला मिळू शकते. तसेच कमी वेळेत आपण अनेक लोकांसोबत जोडले जाऊ शकतो. अशा अनेक विविध कारणांमुळे संपूर्ण समाजाचे लक्ष वेधण्याची प्रचंड क्षमता प्रसार माध्यमांकडे आहे.
पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाते. उर्वरित तीन स्तंभावरील नोंदी प्रकट करण्याचे काम पत्रकारितेतून केले जाते. सामाजिक परिवर्तनाचे फार मोठे सामर्थ्य पत्रकारितेत असून पत्रकारिता हा समाजाचा आरसा आहे. पत्रकार सामान्य माणसाची सुखदुःखे समाजापुढे मांडू शकतात. पत्रकारांनी सदैव निर्भिडता जोपासुन वस्तुनिष्ठ बातम्यांद्वारे समाज जोपासणे महत्त्वाचे आहे.
सोशल मीडियाच्या आगमनानंतर आज बऱ्याचदा पत्रकारांचे आधी आणि खात्री न केलेली बातमी लोकांपर्यंत पोहोचविण्याचे लोकांच्या हाती आलेले एक शक्तिशाली शस्त्र असते तरी त्यास वेगळी किनारही आहे.
उत्तम पत्रकार होण्यासाठी सर्वकष ज्ञान व कौशल्ये आत्मसात करावी लागतात. जनसज्ञापण व वृत्तपत्रविद्या विभागात प्रवेश घेतल्यावर सर्व स्पर्शी ताज्यघडामोडींचा अभ्यास करणे गरजेचे असते. मिळालेली माहिती नाट्यपूर्ण शैलीदार पणे व अचूकपणे वाचकांसमोर ठेवणे म्हणजे उत्तम बातमीदार असणे होय. बातमीदार हा विचक्षक असावा लागतो. पत्रकार कधीही सर्वज्ञ असू शकत नाही. सर्व विषयांना वृत्तपत्रात स्थान असते. कारण वाचकांना ती माहिती असावी लागते, मात्र वृत्तपत्र हे माध्यम टीव्ही रेडिओ हे मर्यादित स्वरूपात कोणतेही विषयाला सामोरे ठेवू शकते. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त व अचूक माहिती शैलीदार आणि वाचकाला समजेल अशा भाषेत देणे हे पत्रकारितेची कौशल्य आहे. सर्व क्षेत्रातल्या व जगातल्या घडामोडी व बातम्या या सर्वात आधी कोणत्याही वृत्तपत्रात न्यूज चॅनल वर असतात. म्हणूनच कोणताही पत्रकार म्हणजे संवादक, स्तंभलेखक, स्फूट लेखक, व्यंगचित्रकार छायाचित्रकार हे प्रामुख्याने बातमीदारच असतात. बातमीदार हाच माध्यम सृष्टीचा आत्मा आहे. इतिहासातील प्रत्येक घटना त्या वेळेला वर्तमानतच असते आणि ती इतिहासात जमा होत असते. त्या वेळेच्या त्या वर्तमानावर संशोधन करून, त्या घटनांचा अन्वयार्थ लावून त्यांची कार्यकारण मीमांसा देणे आवश्यक असते.म्हणजे त्या दृष्टिकोनातून पाहिले तर बातमीदार हा वर्तमानाचा इतिहासकार असतो. भविष्यात इतिहास लिहिणारा केवळ कल्पनेने भूतकाळात जात असतो. बातमीदार घडणाऱ्या इतिहासाचा म्हणजेच वर्तमानाचा साक्षीदार असतो. बातमीदाराच्या दृष्टिकोनावरूनच त्यांनी जमा केलेली माहिती, त्याने ज्या पद्धतीने ती लिहिली त्यावरून आणि कोणत्या वृत्तपत्रात व कशा पद्धतीने ती प्रसिद्ध झाली यावरून तिचे वर्तमानकालीन व ऐतिहासिक महत्त्व ठरते. सावध व चाणाक्ष पत्रकार नेहमी यशस्वी पत्रकारिता करतो.
लोकशाही मूल्य चौकटीत संसद प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांच्या इतकेच वृत्तसंस्थेलाही महत्त्व आहे.
जनहिताचे कायदे करणे आणि धोरण आखणे यात संसदेचा पुढाकार असतो. राज्यघटनेच्या चौकटीत राहून संसदीय ध्येय धोरणांना मूर्त स्वरूप देण्याची जबाबदारी प्रशासन सेवेची असते. मानवी हक्कांना आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे कायदेशीर संरक्षण पुरवण्याचे काम न्यायव्यवस्था करते परंतु व्यक्तीची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता या सामाजिक न्यायाच्या संकल्पना जनमानसात रुजवण्यासाठी कायद्याचा प्रसार करण्याचे काम माध्यमे करतात. ह्या अर्थाने पत्रकार सामाजिक न्यायांचे संरक्षण करणारा दक्ष पहारेकरी असतो.
पत्रकार म्हणून जनमानसात एक विधायक प्रतिमा निर्माण करायची असते. त्यामुळे पत्रकार म्हणून आपण आपले आचरण आणि सर्वसाधारण व्यवहारात नैतिकदृष्ट्रया स्वच्छ ठेवण्याची गरज असते. कुठल्याही घटनेकडे वृत्तमूल्य पाहताना दृष्टी आणि सावधानता ठेवायला हवी.
सध्याचे युग हे स्पर्धेचे व गतिमान युग असल्याने आणि तंत्रज्ञानात सतत होणारी प्रगती यामुळे जगात सतत बदल होत आहेत. यात माध्यमांची भूमिका फार महत्त्वाची असते. यासाठी माध्यमांनी सतत नाविन्याचा स्वीकार करून वाचकांना व प्रेक्षकांना जे अपेक्षित आहे ते द्यावे लागते. या सर्व गोष्टी अभ्यासपूर्ण करून वाचकांपर्यंत व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवाव्या लागतात. नवीन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष कामात अवलंब करण्यासाठी आपल्याला तितकं अपडेट राहावं लागतं .वेळेला अनन्य साधारण महत्त्व असल्याने न्यू मीडिया अति जलद व अग्रेसर आहे.याच न्यू मीडिया चा आता सर्व वृत्तसंस्थांमध्ये वापर केला जातो. यासाठी स्वतंत्र विभाग देखील कार्यरत असतात.
तर चला, विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो सज्ज होऊ या, माध्यम विश्वात भरारी घेण्यासाठी.
– लेखन : प्रियंका देशपांडे. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800