बोलणे निःशब्द झाले, वागणे ही बदलले |
माणसाचे माणसाशी, नाते सारे संपले ||
जाहला संसार सारा, कोरडा अन् मतलबी |
स्वार्थापायी बदलणे जणू, नवीन त्याची ही खुबी ||
तोलुनी सारीच नाती, केली किंमत बाजारी |
नाती म्हणजे उरली केवळ, व्यवहार तो पैशापरी ||
दुःख हे विसरूनी जाऊ, विसरु सारे क्लेश |
एकमेका प्रेम देऊ, काढू मनीचे द्वेष ||
जाणुनी तो जन्म आपुला, सार्थ करण्या योग्य |
जाहला मानवजन्म, हेच आपुले भाग्य ||
– रचना : आमोद अ. पाटील