लेखिका सौ लीना फाटक यांनी त्यांचा “मानवतेची गुढी” हा पुढील लेख त्यांच्या खुप जवळच्या दिवंगत मैत्रिणीला, मंदा फडणीस हिला अर्पण केला आहे. तिला हा लेख खुप आवडला होता. जाण्यापूर्वी काही आठवडे हा “लेख वेबपोर्टलसाठी पाठवला आहेस ना ?” असं तिनं विचारल होतं.
आपण बऱ्याचदा वरकरणी सण साजरे करतो. पण मनात मात्र आपले दिवंगत कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्र मंडळी यांच्या आठवणी दाटून येत असतात. हा लेख दिवंगत मैत्रिणीला अर्पण करण्याच्या निमित्ताने लेखिकेच्या मनातील हळवा कोपरा आणि दिवंगत मंदा फडणीस यांचं आपल्या पोर्टलवरचं प्रेमही दिसून येतं. खरंच, अशी मैत्री चिरायू होवो. आपल्या परिवारातील मंदा फडणीस यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन🙏
– संपादक

आपल्या हिंदु धर्माच्या नविन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे “गुढीपाडवा”. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातला एक शुभ मुहूर्त. रामायण काळापासुन या दिवशी आपण घरोघरी गुढ्या उभारून नविन वर्षांचे स्वागत करतो. गुढी उभारणे हे विजयाचे प्रतिक समजले जाते. गुढीला “ब्रम्हध्वज” म्हणतांत हे मात्र मला नुकतेच समजले हे प्रामाणिकपणे कबुल करते.
माझ्या लहानपणी सगळेच सण धार्मिक व कौटुंबिक दृष्टिकोनातून साजरे केले जायचे. सध्याच्या “चंगळवादी” पार्श्वभूमीवर ते फार जाणवते. त्या सर्व आठवणी जागृत झाल्या.
गुढीपाडव्याला सगळीकडे खुप उत्साहाचे, आनंदाचे वातावरण असायचे. सगळ्यां घरांच्या अंगणांतून सडे, रांगोळ्या घातल्या जायच्या. घरांच्या दारांवर आंब्याच्या पानांचे व कडुलिंबाच्या डहांळ्यांचे तोरण बांधले जायचे. घरोघरी सुंदर गुढ्या उभारल्या जायच्या.
आमची दिवसाची सुरूवात कडुनिंबाची पाने खाऊन व्हायची. जेवतांना सुद्धां त्याची चटणी असायची. शिवाय गोडाधोडाचा स्वयंपाक पण असायचाच. जशी कडुमुळे गोडाची तशीच दुःखे व संकटांमुळे सुखाची किंमत कळते हा त्यांतून अर्थ काढतां येईल. कडुनिंबात औषधी गुण तर आहेतच त्याप्रमाणे दु:ख, संकट, आपत्तीत खचुन न जाता त्यांतुनहि शिकण्यांसारखे असते असा समतोल विचार आपण करायला हवा, असा मी त्यांतून अर्थ काढते.
सकाळच्या आंघोळीनंतर लहानमोठे सर्वजण नटुनथटुन देवळांत जायचो. देवाला व घरांतल्या सर्व मोठ्यांना आदराने नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचो. सर्वांचे आशीर्वाद भावी जिवनांतील उत्कर्षासाठी महत्त्वाचे वाटायचे. मोठ्यांबद्दल आदर, इतरांबद्दल सहिष्णूता, माया, ममता ही सगळी नैतिक मुल्ये जपली जायची. त्यांमुळे समाजांत एकमेकांच्या सहकार्यामुळे सुख, शांतता होती. त्यामुळे सध्याच्या रोजच्या बातम्यांमधुन जगांतील वाढत असलेली अस्थिरता व कमी होत असलेली शांतता व मानवता फार जाणवते आहे.
सामाजिक हितासाठीच धर्माची स्थापना होते. त्यामुळे सर्वच धर्मांची नैतिक मुल्ये सारखीच व चांगलीच असतांत असे मला वाटते. पण काहींचा स्वार्थीपणा व धर्मांधता यामुळे धर्माचा दुरूपयोग केला जातो. त्यामुळेच जगांतील माणुसकी व शांतता कमी होत चालली आहे. म्हणून या वर्षीच्या गुढीपाडव्याला मी नविन विचारांची “मानवतेची गुढी” उभारायचे ठरवले आहे.
या “गुढीला” कोणच्याच धर्माचे बंधन नाही. आबाल-वृद्ध सर्वांनी आपल्या मनांत तिची स्थापना करायची आहे. रोजच तिचे स्मरण करून प्रत्येकाने जास्तित जास्त आचरणांत आणायची आहे. भ्रष्टाचार, हिंसा यांसारख्या वाईट गोष्टींवर विजय मिळवायचा आहे. भविष्यकाळांतील पिढ्यांच्या सुख शांतीसाठी विजयाचे प्रतिक असलेली गुढी, ही “मानवतेची गुढी” घरांघरांतुन अभिमानाने फडकवायची आहे. या “मानवतेच्या गुढीची” स्थापना कशी करायची ते थोडक्यांत सांगते.
प्रथम, आनंदवृक्षाच्या हिरव्यागार ताज्या पानांचे व समतोल विचारांच्या डहांळ्यांचे तोरण प्रवेशद्वारावर बांधायचे. मग गुढीसाठी स्वार्थ, धर्मांधता नष्ट करण्याच्या प्रतिज्ञेची काठी घेऊन तिला सकारात्मक विचारांच्या धाग्यांनी घट्ट विणलेली गर्भ-रेशमी पैठणी नेसवायची. मानवतेचा अस्सल चांदीचा कलश तिच्यावर ठेवायचा. मग तिला प्रेम, माया, ममतेच्या सुंदर, सुवासिक भावपुष्पांचा हार आणि सौजन्याच्या गोड शब्दांच्या बत्ताशांची माळा घालायची. अशी सजवलेली “गुढी” घरावर उभारून तिची आप्तेष्टांसह हंसत-खेळत, खुप आनंदाने मन:पूर्वक पुजा करायची. पुजेसाठी व्यापक दृष्टिकोनाच्या मनांचे सुबक तबक घेऊन त्यांत पुजेचे सगळे साहित्य ठेवायचे. त्यांतील सर्व जाती-धर्माबद्दल सहिष्णूता व आदर यांचे हळद-कुंकू व दया, क्षमा यांच्या गंध, अक्षता गुढीला लावायच्या. निसर्गाबद्दल प्रेम व जाणीव यांची पाने, फुले तिला वहायची. मग स्वार्थत्यागाच्या निरांजनाने ओवाळून आरती करायची. आणि निरपेक्ष कर्तव्य-कर्माच्या ध्येयाने मंत्र-पुष्पांजली म्हणायची. जगभर शांती पसरवण्याची धुरा खांद्यावर घेऊन तोच “नैवेद्य” सगळ्यांना वाटायचा. शेवटी मनोभावाने नमस्कार करून प्रार्थना करायची की हे नविन वर्ष जगभर सर्वांची सद्सत्-विवेकबुद्धी जागृत करो आणि हे येणारे वर्षच नाही तर सगळा भविष्यकाळच जगांतील सर्वांना सुख, समाधानाचा, सुआरोग्य, संप्पन्नतेचा, व शांतीदायक जावो.
“मानवतेची गुढी” उभारणे, त्यांतील अलंकारिक, रूपकात्मक भाषेमुळे वाचकांना कदाचित अनाकलनिय वाटेल, परंतु, निसर्गाबद्दल आदर, सर्वांबद्दल मनांत सहानुभुती बाळगून मानवतां जपणे हा त्यांतला मुलभूत अर्थ. तो प्रत्येकाने जितका व जसा जमेल तसा, सहजतेने आचरणांत आणला तर आपल्या जवळपासच्या सर्वांनाच तशी प्रेरणा मिळेल आणि आपण उभारलेली ही “मानवतेची गुढी” सगळीकडे झळकेल.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने माझे स्वप्न थोडेतरी साकार होईल अशी अपेक्षा करते. आपल्या या सनातनी हिंदु धर्माच्या नविन सुरु होत असलेल्या वर्षांसाठी सर्वांना खुप खुप हार्दिक शुभकामना.

– लेखन : सौ. लीना फाटक. यु.के.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +91 9869484800
🌹मानवतेची गुढी 🌹
निशब्द झालो मी.
अप्रतिम
🌹🌹🙏🙏