समाजात दिवसेंदिवस मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. आनुवंशिकता आणि परिस्थितीजन्य विविध कारणांमुळे हे घडत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने या बाबतीत गांभीर्य ओळखुन २४ फेब्रुवारी, २०१५ पासून १०४ या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू केली आहे. मानसिक आजार झालेल्या व्यक्तींना, त्यांच्या कुटुंबातील,नात्यातील व्यक्तींनी, कार्यालयातील सहकाऱ्यांनी, मित्रांनी संबंधित रुग्णांची लक्षणे ओळखून तत्काळ मनसोपचार तज्ज्ञांची मदत घेतल्यास या आत्महत्या टळू शकतील, असे मानसरोगतज्ज्ञ डॉ.नीलम मुळे याना वाटते.
डॉ. नीलम मुळे ( पूर्वाश्रमीच्या नीलम रमेश कुयरे ) या मानसरोगतज्ज्ञ आहेत.त्यांनी मानसशास्त्रात मास्टर्स पदवी घेतली आहे. शिवाय निसर्गोपचार , योग,ध्यानधारणा यातील ३ वर्षांचा पदवी अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. समाजातील वाढत्या मानसिक समस्या आणि त्यावर उपाय यांबाबत त्या सतत जनजागृती करीत असतात.
डॉ. नीलम मुळे या मूळ अमरावतीच्या. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९७७चा.त्यांचे शालेय, महाविद्यालयीन शिक्षण अमरावती येथेच झाले. लहानपणापासूनच माणसाचे स्वभाव वेगवेगळे का असतात ? विशेषत: एकाच घरातील असूनही वेगवेगळे स्वभाव का दिसून येतात ? या कुतूहलामुळे त्यांना लहानपणापासूनच
मानसशास्त्राची आवड निर्माण झाली. पण या विषयाकडे जाऊ नये म्हणून घरच्यांचा विरोध होता.हा विषय वेड्यांशी संबंधित आहे, असे घरच्यांचे मत होते.सामान्य माणसाशीही हा विषय संबंधित आहे हे त्यांना मान्य नव्हते; पण नीलम दहावीत असताना एका अपघातात त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले,५ महिने रुग्णालयात राहावे लागले; पण धीर खचू न देता त्या दहावीच्या परीक्षेला बसल्या आणि ५० टक्के गुणांसह
उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या कठोर प्रयत्नांमुळेच त्या वाईट परिस्थितीतून पुढे जाऊ शकल्या.
पुढे मानसशास्त्र विषयात बी.ए. आणि एम.ए. परीक्षेत त्या विद्यापीठातून प्रथम श्रेणीत सर्वप्रथम आल्या. मनाबरोबर समाजाचाही अभ्यास करणे गरजेचे आहे हे जाणवल्याने त्यांनी समाजशास्त्रातही एम.ए. केले. त्याचा आता त्यांना खूप फायदा होतो. महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाबरोबर त्यांनी खेळाकडे ही लक्ष दिले. थ्रो बॉल आणि बॅडमिंटन या खेळात त्यांनी प्रावीण्य मिळवून राष्ट्र क्रीडा स्पर्धे मध्ये सहभाग मिळविला. या निमित्ताने त्यांचे भारतदर्शनही झाले.
शिक्षण संपल्यानंतर अमरावती येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ.लक्षीकांत राठी यांच्या गोवर्धन हॉस्पिटलमध्ये त्यांनी ३ वर्ष समुपदेशक व मानसरोगतज्ज्ञ म्हणून काम केले. या दरम्यान विद्या भारती महाविद्यालयात मानसशात्राच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केले.
विवाह नंतर त्या नाशिकला आल्या. नाशिकला आल्यावर त्यांनी नागाजी हॉस्पिटलमध्ये ( आजचे सह्याद्री हॉस्पिटल )
समुपदेशक व मानसरोगतज्ज्ञ म्हणून ७ वर्ष काम केले.पूर्ण अनुभव आल्याची खात्री पटल्यावर डॉ.मुळे यांनी २००९ पासून स्वतःची स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली. मानसिक आजार होण्याची प्रमुख कारण म्हणजे आपल्या आई / वडिलांपैकी आधीच्या सहा पिढ्यांमध्ये कुणाला मानसिक आजार असेल तर शक्यता खूप असते. दुसरे कारण परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे मानसिकतेवर विपरित परिणाम होतो.
मानसिक आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे अशा व्यक्ती संशयी प्रवृत्तीच्या होतात.त्यांना आपल्याविरुद्ध कुणी काही कट कारस्थाने रचतात की काय ? असे वाटत राहते. परत कुठल्यातरी विशिष्ट गोष्टीची सतत भीती वाटत राहते.
त्या एकच गोष्ट सतत करत राहतात. मानसिक आजारांची नावे म्हणजे डिप्रेशन,स्किझोफ्रेनिया ( त्यात परत पॅरानॉइया एक प्रकार), ऍनास्काटी कॅटाटॅनिक डिसऑर्डर, बायपोलर डिसऑर्डर अशी आहेत. आजारांच्या लक्षणांवरून ती ओळखता येतात. स्किझोफ्रेनियामध्ये रुग्णाचे मन कशात लागत नाही. त्याच्या मनात सतत असंबद्ध विचार येत राहतात. तो खूप आळशी बनतो. कॅटाटॅनिकमध्ये रुग्ण एकाच स्थितीत दिवसेंदिवस राहतो.उदा. एकटक पाहत राहिले तर तसेच पहात रहातील.अशा रुग्णांना प्रसंगी शॉक ट्रीटमेंट द्यावी लागते. अशा रुग्णांचे प्रमाण कमी असते.
पॅरानॉइयामध्ये रुग्ण संशय खोर असतो. तो सतत संशय घेत राहतो. बायको असेल तर नवऱ्याचा, नवरा असेल तर बायकोचा; त्यामुळे अशा जोडप्यांमध्ये सतत भांडणे होतात. वैवाहिक जीवन कष्टप्रद होते. बऱ्याचदा अशा विवाहाची परिणती घटस्फोटात होते. प्रसंगी काही रुग्ण जोडीदाराची हत्या पण करतात. त्यांच्या डोक्यात ते सतत कट कारथाने रचत असतात.कधीतरी त्यांच्या हातून कृती घडते. डिप्रेशन हे अनुवंशिकते मुळे होऊ शकते. तसेच ते बाह्य वातावरणामुळेही होऊ शकते.घरातील वातावरणही कारणीभूत असू शकते. अशी व्यक्ती मनातील गोष्टी कुणाशी बोलत नाही.ती एकलकोंडी बनते. त्यामुळे डिप्रेशन मध्ये ती लवकरच जाते. काही वेळा अशा व्यक्तीच्या जीवनात असे काही प्रसंग येतात की, ती कुणाशी बोलत नाही आणि एकलकोंडेपणा वाढत जातो.
फोबियामध्ये व्यक्तीला एका विशिष्ट गोष्टीची भीती वाटत राहते.ही भीती उंचीची,पाण्याची,गर्दीची,सभेत बोलण्याची असते.एका मर्यादेपलीकडे ही भीती गेली की,त्याला फोबिया म्हणतात. रुग्णाच्या मानसिक आजाराचे निदान होण्यासाठी त्याचे कुटुंब, नातेवाईक, मित्र यांची भूमिका फार महत्वाची असते.त्यांनी रुग्णांची लक्षणे ओळखून त्याला तत्काळ मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले पाहिजे.
या रुग्णांचे उपचार म्हणजे त्यांना मानसोपचार तज्ज्ञाने लिहून दिलेली औषधे नियमितपणे घेणे, गरजेनुसार विद्युतलहरींचा वापर करणे, समुपदेशन ही होत.उपचारांचा कालावधी रुग्णांच्या आजाराच्या प्रमाणावर अवलंबून असतो. स्किझोफ्रेनिया मध्ये मात्र आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात. पॅरानॉइयाच्या रुग्णास डिप्रेशनमध्ये औषधाबरोबर समुपदेश जास्त महत्वाचे असते.
डिप्रेशन काही काळापुरतेच असू शकते.वेळेवर व योग्य उपचाराने ते कायमचे बरे होऊ शकते .पण वेळेत औषध न घेतल्यास असा रुग्ण आत्महत्येस प्रवृत्त होतो किंवा अन्य व्यक्तीची हत्या करू शकतो. भावनिक,संवेदनशील व्यक्तींना डिप्रेशन येण्याची शक्यता जास्त असते.
समाजात आज जीवघेणी स्पर्धा, तुलना यामुळे डिप्रेशनचे प्रमाण वाढताना दिसते.यास एकल कुटुंबपद्धती मोठया प्रमाणात कारणीभूत आहे.संयुक्त कुटुंब पद्धतीत बोलण्यासाठी, समजून घेण्यासाठी घरातील आजी, आजोबा,काकू इतर भावंडे असतात. त्यामुळे संयुक्त कुटुंबात डिप्रेशनचे प्रमाण अत्यल्प असते. आईवडील दोघेही नोकरीला असणाऱ्या कुटुंबातील मुलांमध्ये डिप्रेशनचे प्रमाण अधिक असते; परंतु दोघांनीही नोकरी/ व्यवसाय करणे आवश्यकच असेल तर त्यांनी मुलांची भावनिक, मानसिक, बौद्धिक काळजी घेतली पाहिजे.त्यांच्याशी सतत संवाद साधला पाहिजे. लहान मुले आपल्याला वेळोवेळी समजून घेतात. त्यामुळे त्यांना आपण समजून घेतले पाहिजे. एकत्र चहा घेणे, निदान रात्रीचे जेवण एकत्र करणे, घराशी संबंधित बाबींमध्ये त्यांचे मत विचारणे,त्यांना मान देणे अशा गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. समाजात याविषयी जागृती होण्यासाठी वृतपत्रांमध्ये लेख लिहिणे,महिलामंडळे,शाळांमध्ये, कॉलेजमध्ये पालकसभा, कंपन्यांमध्येही प्रशिक्षण घेणे असे उपक्रम डॉ. मुळे सतत करत असतात.
आपले विचार अनियंत्रित होऊ नये म्हणून योग आणि ध्यानधारणेचा फार उपयोग होतो; म्हणून प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान दहा मिनिटे तरी ध्यानधारणा करायला हवी; त्यामुळे मन समतोल राहण्यास मदत होते. आपण मनाला सतत सकारात्मक सूचना देत राहिले पाहिजे. स्वतः डॉ. मुळेही नियमित योगासने, ध्यानधारणा करीत असतात. आपले मन हे रिकाम्या भांड्यासारखे असते.त्यात चांगले विचार टाकले तर चांगली कृती होते. नकारात्मक विचार टाकले तर व्यक्ती कृतीशून्य होते किंवा नकारात्मक बाबी करण्यास प्रवृत्त होते.
आयुष्यात आपण संकटाला कसे सामोरे जातो,तेही खूप महत्त्वाचे आहे.आपण नशिबाला देवाला दोष देतो; पण संकटाला संधी समजलो,तर आपण ते आव्हान पेलू शकतो आणि त्यातून मार्ग काढू शकतो. म्हणून व्यक्तीने भविष्याचा अतिविचार न करता, वर्तमानकाळ कसा चांगला होईल हे पहिले पाहिजे.
आजकाल आईवडील दिवसभर बाहेर रहातात. पूर्वी मुले फक्त टीव्ही पाहू शकायची; पण आता इंटरनेट मुळे चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टींही मुलामुलींपर्यंत तत्काळ पोहचतात; त्यामुळे पालकांनी मुलामुलींना योग्य वेळीच सर्व गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत. संपूर्ण आयुष्य ही एक परीक्षा असते हे आपण समजून घेतले पाहिजे. ताण तणावातून दूर ठेवण्यासाठी व्यक्तीला काही न काही छंद असला पाहिजे. वाचन,लेखन,पोहणे,फिरणे, खेळणे, मित्र मंडळींशी गप्पा गोष्टी करणे, असे काही न काही छंद असलेच पाहिजे. स्वतः डॉ. मुळे यांना अभिनयाचा, मॉडेलिंगचा, कविता करण्याचा छंद आहे. आजपर्यंत त्यांनी दहा मराठी चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या आहेत,तर पन्नास हुन अधिक जाहिरातींमध्ये काम केले आहे.तसेच जवळपास शंभर कविता केल्या आहेत. व्यक्तीमत्व विकासावर त्यांनी एक पुस्तकही लिहिले आहे.पती श्री मनोज, कन्या रसिका व मुलगा आर्यन या सर्वांच्या सहकार्याने डॉ. मुळे आपले कौटुंबिक व्यावसायिक व सामाजिक कार्य समर्थ पणे पार पाडत आहेत.
– रश्मी हेडे
Nice information,,,👌👌🙏🙏🌹🌹