“ने मजसि परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला !”
सावरकरांच्या ह्या प्रसिद्ध ओळी माहीत नाही असा मराठी माणूस शोधून सापडणार नाही. ही कविता आणि मंगेशकर बंधु – भगिनींनी आपल्या स्वर्गीय आवाजाचा सुवर्णसाज चढवून, ज्या तळमळीने ती गायली आहे हा दोन्हींचा संगम म्हणजे एक अद्वितीय
दुग्धशर्करा योग आहे. सावरकरांचे शब्द आणि मंगेशकर बंधुभगिनींचे गायन, दोन्हीतून त्यांचे मायभूमी वरचे प्रेम व्यक्त होते .
मायभूमीच्या विरहाने तळमळत असलेल्या सावरकरांची मार्सेलिस बंदरातली ती उडी जगप्रसिद्ध आहे. केवढी ही तळमळ !
पोर्ट होल मधून घेतलेली उडी !
चुकली तरी मरण,
अन्यथा बर्फाळ पाण्यात गोठून मरण !
सापडलो गेलो तरी बंदुकीच्या गोळ्यांनी मरण किंवा मरणापेक्षाही भयंकर अशा यातनायुक्त अंदमान तुरुंगात पुन्हा रवानगी किंवा फाशी.
एकूणच सर्व बाजूंनी मरणाची खात्री असूनही जिवावर उदार होऊन सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात उडी घेतली ती केवळ मायभूमीच्या दर्शनासाठी !
कुठे सावरकर, कुठे आपण सामान्य माणसे ?
तरी सुद्धा मी माझ्या मनातील तीच भावना व्यक्त करण्यासाठी ह्या घटनेचा आधार घेत आहे. कारण तीच ओढ मलाही भारत दर्शनासाठी वाटत आहे.
गेली दोन वर्षे मी ऑस्ट्रेलियात सिडनी येथे मुलाकडे आहे. मुलगा-सून, नातवंडांचा सहवास, प्रेम लाभत आहे. माझी पूर्ण काळजी घेतली जात आहे. तरीसुद्धा मन मायभूमीच्या ओढीने कधीकधी व्याकूळ होते.
कोविड, कोरोना, डेल्टा आता ओमिक्रॉन ‘लॉक डाऊन, विमानसेवा बंद इ . कारणांमुळे इथेच मुक्काम वाढत आहे. मग मायभूमीचे दर्शन तर दूरच !

ऑस्ट्रेलिया देश निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण आहे. निसर्ग वैभव देवाने भरपूर दिले आहे. इथली झाडे, पाने, फुले, पक्षी सारेच फार सुंदर आहे.
आता कोणाला वाटेल इतके सगळे असून भारताची आठवण येण्याचे कारण काय ?
खरे सांगू ?
साधा पाऊस पडला तरी मला भारताच्या काळ्या मातीचा सुगंध येतो. आपल्याकडेही अनेक सुंदर डेरेदार वटवृक्ष, आम्रवृक्ष, सुरुची झाडे आहेत. अनेक फुलांचा सुगंध तर मनात भरून आहे.
सिडनी येथील सागरकिनारे अतिशय सुंदर आहेत. एकदा असेच मुलगा, विजय मला येथील प्रसिद्ध
“पाम बीच” बघायला घेऊन गेला. काय सांगू निसर्ग वर्णन ? उंचीवरून खाली अथांग समुद्र किनारा ! नयनरम्य !
पण थोडे खाली उतरल्यावर अचानक मोगऱ्याचा सुगंध आला. इकडे तिकडे पाहिलं तर प्रवेशालाच मोगऱ्याची टवटवीत फुलं स्वागत करत होती. मी तर त्यांना पाहूनच वेडावून गेले. खूप वेळ थांबून पहात राहिले, सुगंध नाकात भरून घेतला. थोड़ी पावले पुढे गेलो तर गुलाबी गुलाब स्मित हास्य घेऊन. त्या छोट्याश्या पार्कमध्ये मला लाल चाफा, पांढरा पिवळा देवचाफा, जास्वंद, कण्हेर, कर्दळ सगळी फुले भेटली.
पुढे जाता मात्र आश्चर्याने “आ” वासायची वेळ आली. कारण – – – – –
एक छोटेसे तळे बनवले होते त्यात चक्क जांभळ्या गुलाबी रंगाची चक्क नऊ कमळे दिमाखात फुललेली होती. आता मात्र मी हे सुंदर चित्र डोळ्यात, हृदयात साठवून घेण्यासाठी तिथेच बाकावर बसले.
खालचा अथांग सागर किनारा माझे लक्ष वेधून घेत नव्हता. कारण मी इथेच हरवून गेले होते.
त्या सुगंधी मोगर्याचा गजरा मी देवीला अर्पण केला.
ते जास्वंदाचे फूल गजानन चरणी वाहिले.
ती कमलपुष्पे कुलस्वामिनीला अर्पण केली. (सारे मनाने बरं का !)
आणखी पुढे जाण्याची गरजच उरली नाही. कारण — –
इथे मला “भारत” भेटला.

– लेखिका : सुलभा गुप्ते. ऑस्ट्रेलिया
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
तुमची ओढ अगदी समजू शकते सुलभाताई ! अशा अनोळखी ठिकाणी वृक्षांच्या रूपात का होईना आपल्या जवळच्या खूणा भेटल्या की होणारा आनंद वर्णनातीत आहे.
अगदी खर आहे सुलभाताई. मी पूर्णपणे समजू शकते. ५० हून अधिक वर्ष यु.के. त राहूनहि भारताची “ओढ” आहेच. आॅस्ट्रेलियाचे सुरेख वर्णन केले आहे. फुलांच्या रूपात तुम्हाला तिथे मायदेश भेटला. खुप छान वाटले.