आमचे मित्र, कामगार नेते मारुती विश्वासराव यांच्या कृतार्थ जीवनाचा हा आलेख. योगायोगाने आज त्यांच्या विवाहाचा वाढदिवस असल्याने न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे विश्वासराव उभयतास हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे या ग्रामीण भागातून दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मारुती विश्वासराव यांना त्यांचे चुलते रामचंद्र विश्वासराव यांनी पुढील महाविद्यालयिन शिक्षणासाठी मुंबईला आणले. शिक्षण घेत असतानाच, प्रभादेवी येथील ग्रोवर्स प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीत ते कामाला लागले.
मुंबईत १८ जानेवारी १९८२ रोजी सुरू झालेल्या गिरणी कामगार संपात डॉ. दत्ता सामंत यांच्या १२ लाख सभासद असलेल्या संघटनेबरोबर काम करण्याची संधी विश्वासराव यांना मिळाली. त्यांनी ग्रामीण भागातून धान्य गोळा करून गोदी कामगार संघटनेमार्फत मुंबईत गिरणी कामगार संपात कामगारांना वाटले. गिरणी कामगारांना न्याय मिळावा म्हणून ठाणे येथे गोदी कामगार संघटनेमार्फत जेलभरो सत्याग्रह केला.
विश्वासराव यांनी कामगार चळवळीत काम करीत असतानाच एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये पाठपुरावा केल्याने त्यांना २ सप्टेंबर १९८३ रोजी मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये टॅली क्लार्क म्हणून नोकरी लागली. अशा रितीने त्यांचे वडील किसन विश्वासराव यांची पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी लागण्याची इच्छा पूर्ण झाली.
मुंबई बंदरातील आवश्यक काम म्हणजे आयात निर्यात मालाची चढ-उतार असते. या कामाची नोंद करणे हे विश्वासराव यांचे प्रमुख काम होते. ते गोदीतील तिन्ही पाळ्यामध्ये काम करू लागले. त्यांच्या बरोबर अनेक सहकारी मुंबई पोर्टमध्ये कोणी वडिलांच्या जागेवर तर कोणी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मार्फत भरती झाले. नोकरी करत असतानाच मित्रांच्या सहकार्याने त्यांना कामगार चळवळीत काम करणे शक्य झाले.

दरम्यान, नोकरी लागल्यानंतर ५ वर्षांनी म्हणजेच ७ मार्च १९८८ रोजी विश्वासराव यांचा विवाह मुख्याध्यापिका असलेल्या नूतन यांच्या शी झाला. विशेष म्हणजे विश्वासराव यांच्या सामाजिक आणि कामगार चळवळीतील कार्यात नूतन वहिनींनी आडकाठी न आणता उलट होईल तितके सहकार्य, पाठिंबा दिल्याने, समजून उमजून संसार केल्याने विश्वासराव यांना त्यांचे कार्य अधिक जोमाने करता आले, याचा ते नेहमी आवर्जून उल्लेख करीत असतात.
स्वातंत्र्यसेनानी व ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्पलॉईज युनियनमध्ये सभासद होऊन विश्वासराव यांनी युनियनमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे सहकारी जे. एस. कासकर, पी.एल. शेंडे, ए. आर. ए. सय्यद, टी.ए. दळवी, समीर राणे, सी.एस. नारकर, सुरेश करलकर, निसार युनूस, दत्ता खेसे, एस. एस. खरात, रघुनाथ जाधव, अनंता सैतावडेकर, सुदला राममूर्ती, बळीराम घाणेकर, अशा अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना कार्य करण्यासाठी सहकार्य केले. ते १९९६ साली कामगारांच्या सहकार्यामुळे युनियनचे सेक्रेटरी झाले. १९९७ पासून ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल व संपादक ॲड. एस. के. शेट्ये, यांनी ना.म. जोशी यांच्यानंतर पोर्ट ट्रस्ट कामगार अंक काढण्याची जबाबदारी मोठ्या विश्वासाने विश्वासराव यांच्यावर सोपविण्यात आली. या कामी त्यांना सहकारी विजय रणदिवे व दत्ता खेसे यांनी चांगले सहकार्य केले.

डॉ. शांती पटेल यांचे स्वप्न होते की, कामगार कार्यकर्त्यांना वृत्तपत्रातून यथोचित प्रसिद्धी मिळत नाही, त्यांना लिहिण्यासाठी आपण हक्काचे व्यासपीठ तयार केले पाहिजे. या कल्पनेतूनच कामगारांनी कामगारांसाठी १९९७ पासून “पोर्ट ट्रस्ट कामगार” हा दिवाळी अंक सुरू केला. गेली २८ वर्ष हा दिवाळी अंक सातत्याने प्रसिद्ध होत आला आहे. या अंकात ५० टक्के कामगार तर ५० टक्के मान्यवरांचे लेख असतात.
मुंबई बंदरात १२ खात्यामध्ये बेचाळीस हजार कामगार होते. युनियनचे कार्य करण्यासाठी प्रत्येक खात्यात जाण्याची संधी विश्वासराव यांना मिळाली. सेवानिवृत्तीचे निरोप सोहळे, श्री. सत्यनारायणाची महापूजा, कामगारांना बढती, संपाच्या दरम्यान गेट मिटिंग, वेतन करारानंतर गेट मिटिंग, गोदी कामगारांचे मेळावे, कामगारांची प्रशिक्षण शिबिर, कामगारांचे प्रशिक्षण वर्ग, अधिवेशने, गोदी सुरक्षा समितीमध्ये कार्य करण्याची संधी, पोर्ट ट्रस्ट कामगार अंक काढणे, अशा विविध प्रकारे कामगारांची सेवा करण्याची संधी युनियनमुळे मिळाली. “कामगारांची सेवा ही ईश्वर सेवा आहे” असे मानणाऱ्या विश्वासराव यांना या सेवेतून खूप आनंद मिळतो. त्यांचे हे कार्य आजही अविरतपणे चालू आहे. त्यांच्या आयुष्यात डॉ. दत्ता सामंत व डॉ. शांती पटेल असे दोन डॉक्टर, त्याचप्रमाणे ॲड. एस. के. शेट्ये, ॲड. सुधाकर अपराज, ॲड. जयप्रकाश सावंत सारखे युनियनचे पदाधिकारी व कामगारांचे प्रख्यात वकील भेटले त्यामुळेच आपल्याला कामगारांचे प्रश्न सोडवण्याची संधी मिळाली, असे ते म्हणतात.

केंद्रीय कामगार शिक्षण योजनेअंतर्गत कामगार शिक्षक झाल्यानंतर विश्वासराव यांना अनेक उद्योगांना भेटी देण्याची संधी मिळाली. हे सर्व कार्यालयातील सहकारी मित्र व युनियनमुळेच शक्य झाले. मुंबई पोर्ट मधील सेवेच्या कालावधीमध्ये त्यांना हरभजनसिंग सिद्धू, डॉ. शांती पटेल, कॉ. एस. आर. कुलकर्णी, मनोहर कोतवाल, ॲड. एस. के. शेट्ये, सुधाकर अपराज, केरसी पारेख, हनुमंत ताटे, संदीप शिंदे, कॉ. यशवंत चव्हाण, डॉ. दत्ता सामंत, दादा सामंत, कॉ. वेणू नायर, प्रदीप शिंदे, अब्दुल गणी सारंग, मिलिंद कांदळगावकर, जे. आर. भोसले, अनिल गणाचार्य, कॉ. विश्वास उटगी, संजय वढावकर, विद्याधर राणे अशा विविध उद्योगातील अनेक मान्यवर कामगार नेत्यांशी भेटण्याची व काम करण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे सेवेत असताना व सेवेनंतर युनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे, युनियनचे उपाध्यक्ष व आताचे मुंबई प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, युनियनचे सेक्रेटरी विजय रणदिवे, मनीष पाटील, पदाधिकारी विकास नलावडे, संदीप चेरफळे, आप्पा भोसले, मीर निसार युनूस, कार्यकर्ते जे.पी. मुजावर, शेखर बर्वे, प्रकाश परब, प्रकाश दाते, विवेक तवटे, प्रदीप गोलतकर, एकनाथ मराठे, पांडुरंग भाबल, लहू कोकणे, नरेंद्र वाडीकर, विजय पंदीरकर, विठोबा पवार, सतीश तुपे, अशोक डफळ, मनीषा पेंढुरकर, शीला भगत, योगिनी दुराफे, बळीराम घाणेकर, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी काम करताना त्यांचे चांगले संबंध आले. पोर्ट ट्रस्ट कार्यालयात व युनियन कार्यालयात काम करत असताना अगदी खेळीमेळीचे आणि आनंदाचे वातावरण असते. सर्वांच्या सहकार्यामुळे व प्रेमामुळेच सेवेत असताना ३७ वर्ष व आता निवृत्तीनंतर गेली ६ वर्ष मुंबई बंदरात कामगारांची कामे करण्याची त्यांना संधी मिळाली.

विश्वासराव यांनी सेवानिवृत्तीनंतर नवी मुंबईतील सानपाडा येथील गार्डन ग्रुपमध्ये अनेक मित्र जमा केले. इथे त्यांच्या अनेक सामाजिक व राजकीय नेत्यांच्या भेटी झाल्या. चांगले संबंध निर्माण झाले. त्यामुळे या ठिकाणीही सामाजिक काम करण्याचा त्यांना आनंद मिळत आहे.

विश्वासराव यांना रामहरी, नरहरी, दत्ता असे तीन भाऊ, रोहिणी, मनीषा व नंदा या सुसंस्कृत भावजया तर कमल व सगुणा या दोन बहिणी आहेत. विशेष म्हणजे आजही त्यांचे कुटुंब एकत्र आहे.

विश्वासराव यांना सतीश आणि किरण अशी दोन मुले आहेत. सतीश हा एजिस लॉजिस्टिक या मल्टिनॅशनल कंपनीत केमिकल इंजिनियर तर किरण हा कॅनडा मध्ये एडवर्ड जोन या अमेरिकन कंपनीत फायनान्शियल ॲडव्हायझर आहे. त्यांना सौ. विजयासारखी चांगली सून मिळाली असून, कुमार युविक सारखा गोंडस नातू आहे.
समाजाची सेवा निष्ठेने व प्रामाणिक पणाने करण्यातूनच खरा आनंद मिळतो, असे केवळ न म्हणता प्रत्यक्ष तसे जीवन जगणाऱ्या, आपले विचार कृतीत उतरविणाऱ्या मारुती विश्वासराव आणि त्यांच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800