मीं ठाणे येथील सौ.मीना घोडविंदे-वनगे. स्व.वडिलांच्या इच्छेनुसार नर्सिंग कोर्स करून सर्व वर्षांच्या अंतिम परीक्षेत प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकने उत्तीर्ण होऊन प्रशिक्षण पूर्ण केले. अन व्यवस्थापनाने मला ठाणे येथेच सरकारी सेवेत रुजू करून घेतले. आमच्या घराण्यात अन ज्ञाती- समाजात कोणीही अशी वेगळी वाट निवडून या पद्धतीचे शिक्षण घेतलेले नव्हते. त्याकाळी वरील शिक्षणाचा विचार जीवनाचा अगदी टर्निंग पॉईंट ठरला.
कोणतीही पूर्वपिठीका नसताना, केवळ अभ्यासू वृत्तीने प्रशिक्षण उत्कृष्टरित्या पूर्ण केले अन सेवेत रुजू झाले, याचे घरातील सर्व अन जवळच्या नातेवाईक यांना खूपच कौतुक वाटले, कारण माझ्या वयाच्या 10 व्या वर्षीच माझ्या प्रिय आईला देवाज्ञा झाली होती. त्याकाळी घरातील सर्व जबाबदारी सांभाळून यशप्राप्ती लाभताना खूपच तारेवरची कसरत झाली. अन प्रवेश घेतला त्याच सरकारी हॉस्पिटल मधे पूर्ण 41 वर्षे कामकाज करून माझ्या उत्कृष्ट कामकाजची वरिष्ठ स्तरावर दखल घेतली गेली .कारण पूर्ण सेवाकाळात वरिष्ठ यांच्या आदेशानुसार पूर्ण ठाणे जिल्ह्यातील आदिवासी डोंगराळ भागातील वंचित, दुर्बल घटक, रुग्णांसाठी सुमारे 24 वर्षे आरोग्य शिबिरातील कामकाज, शस्त्रक्रियेस,मदत, नातेवाईक यांना धीर देवून समजावून सांगणे, दर आठवड्यात 1 वेळा, हॉस्पिटल चे कामकाज सांभाळून करत होते. त्यामुळे माझ्या उत्कृष्ट कामाची प्रोफाइल दिल्ली येथे राष्ट्रपती भवन येथे आरोग्य मंत्रालय तर्फे प्रथम नामांक क्रमांकने सेवानिवृत्ती पूर्वी सतत 3 वर्षे 3 वेळा पाठवली गेली. त्यामुळे आदर्श परिसेविका म्हणून सर्वच सामाजिक, सांस्कृतिक, संस्था, महानगरपालिका, इतर सेवाभावी संस्था इ. सर्वानी सत्कार सोहळ्यात पुरस्कारीत केले.

सेवानिवृत्ती नंतर मीं जेष्ठ ना. संघ व इतर 3/4 साहित्यिक समूहात प्रवेश घेऊन माझी अपुरी राहिलेली लेखनकलेची, आवड उत्साहाने पुरी करत आहे. माझे लेखन मीं 3/4 साप्ताहिक, दैनिक, वृत्तपत्रातून संपादक यांच्या मदतीने प्रकाशित करू लागले.
असेच एका साहित्यिक समूहावर सरकारी निवृत्त माहिती संचालक , लेखक श्री. देवेंद्र भुजबळ, यांनी माझी ऑन लाईन मुलाखात घेऊन अन काही माहिती घेऊन, जागतिक परिचरिका दिनी, त्यांच्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टलवर 12 मे रोजी प्रकाशित केली. त्यात माझा सेवाकालीन, सामाजिक, जीवन प्रवास आटोपशीर पणे लिहिला. त्यामुळे ज्या ज्या समूहावर, माझे लेखन असायचे तेथील सहकारी लेखिका, साहित्यिका, माझे हॉस्पिटल मधील सहकारी, सर्व मित्र मैत्रीणी, जवळचे नातलग, या सर्वानी मिळून उत्तम अभिप्राय आवर्जून, लिहिले. आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामकाज केल्याचे सार्थक झाले.

कौतुक, शुभेच्छा, यांच्या वर्षावाने मी प्रोत्साहीत, उल्हासित झाले. अन पुढे याच श्री. भुजबळ सरांनी दिग्गज मान्यवर प्रतिभावंत, कर्तृत्ववान, आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे, यांच्यावर गौरवपर लिहिलेले लेख संकलन करून लिहिलेल्या “माध्यम भूषण “पुस्तकात प्रकाशित करून प्रसिद्धीस आणले, हे तर माझ्यासाठी खूपच महत्वाचे अन भाग्यकारक ठरले. ज्याची मीं जीवनात कधीच अपेक्षा केली नव्हती.

दैनिक जनादेश चे संपादक, श्री. कैलास म्हापदी, त्यांचे सहकारी, श्री. अजय जाधव, आमचे मराठी मुंबई चे संपादक स्व. सुगदरे, अन आता सातत्याने लेखन प्रकाशित करणारे, कोमसाप चे, श्री. मनीष वाघ सर, स्व. चंद्रशेखर वाघ, लोकसत्ता दैनिक चे माजी संपादक, यांचे सुपुत्र, यांची नेहमीच मदत झाली आहे. या सर्व संपादक सर यांचे धन्यवाद अन शतशः प्रणाम, की माझ्या लेखन कलेस प्रसिद्धी मिळत राहिली.

माझे वडील स्व. रामचंद्र वनगे, टेलर्स, यांनी भविष्याचा अन माझ्या भवितव्यचा विचारपूर्वक निर्णय घेऊन या क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन पूर्ण करण्यास सहकार्य करून भाग पाडले, अन माझ्या आयुष्याचे जणू सार्थकच जाहले. जीवनाच्या सांजवेळी संध्यकाळी, निवांत क्षणी, आज 71 व्या वर्षी प्रकृती-नियतीने जणू काही मला यश, प्रसिद्धी, सन्मानाने बक्षीस रुपी माळच घातली आहे.जीवनात अजून काय हवे ? पण हे सर्व प्रत्यक्षात बघायला माझे जिवलग जन्मदाते नाहीत याची खंत जाणवते.
भरल्या संसारी, सर्व बाजुनी कृतार्थ होऊन श्रद्धेने, दयाळू परमेश्वराची खूपच ऋणी आहे. त्यासंह माझ्या सर्वच क्षेत्रातील सर्वच सहकारी, माझे सासर, माहेरचे सर्व नातलग यांची आभारी आहे, तर स्व. जन्मदाते यांच्या पुण्याई मुळेच मीं जीवन प्रवास करत आहे.

— लेखन : सौ मीना घोडविंदे-वनगे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
