बॉस होतो ऐसा. ….
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात मी आधी जिल्हा माहिती अधिकारी, रायगड नंतर मंत्रालयात वरिष्ठ सहायक संचालक आणि त्या नंतर पदोन्नती मिळून कोकण विभागाचा माहिती उपसंचालक झालो. त्या दरम्यान आधी उपसंचालक म्हणून आणि नंतर संचालक म्हणून श्री सुधाकर तोरणे साहेब हे संचालक होते.सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या कडून हसत खेळत काम करून घेण्यात त्यांचा हात खंडा होता.प्रसंगी हास्य विनोद ही ते करीत. त्यामुळे माहिती खात्याचे काम ताण तणावाचे असून त्यांच्या स्वभावामुळे ते सुसह्य होत असे. पुढे नियत वयोमानानुसार ते सेवा निवृत्त झाले. आज ते सेवा निवृत्त होऊन बोलता बोलता २५ वर्षे झाली.
यथावकाश मी ही पदोन्नती मिळून माहिती संचालक झालो. संचालक पदाचा अवधी तसा मला थोडाच म्हणजे तरी साडेतीन वर्षे मिळाला आणि मी ही नियत वयोमानानुसार ३१ जुलै २०१८ रोजी निवृत्त झालो. दरम्यान मधे अनेक वर्षे माझा आणि तोरणे साहेबांचा काही संपर्क राहिला नाही.
कोरोनाच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीत नुसती बघ्याची भूमिका घेणे मला काही पटत नव्हते. म्हणून माझी मुलगी, जी स्वतः इंग्रजी वृत्तपत्रात पत्रकार आहे, तिच्या साह्याने घर बसल्या आपल्याला काही योगदान देता येईल, या उद्देशाने आम्ही न्यूज स्टोरी टुडे, www.newsstorytoday.com हे वेब पोर्टल सुरू केले. या पोर्टल च्या माध्यमातून हळू हळू खूप जुन्या आणि नव्या व्यक्ती संपर्कात येऊ लागल्या. जुन्या व्यक्तिंमधील एक व्यक्तिमत्त्व होतं ते म्हणजे तोरणे साहेबांचे. त्या वेळी त्यांचे वय ८० च्या घरात होते आणि तरीही ते पोर्टल साठी काही योगदान देऊ इच्छित होते. त्यांची ही मनस्वी ईच्छा पाहून, या वयातही काही करण्याचा त्यांचा मनोदय पाहून मला आनंद झाला. त्यांना असलेली वाचनाची आणि लिखाणाची आवड बघून आम्ही विचार विनिमय करून त्यांनी दर आठवड्याला पुस्तक परीक्षण लिहावे, असे ठरले. सदराला नाव दिले,
“मी वाचलेलं पुस्तक.” आज जवळपास सव्वा वर्ष झालं. ६० पुस्तकांची परीक्षणे या सदरात प्रसिद्ध झाली आहेत. नेमके, मुद्देसूद, आटोपशीर लेखन, त्या सोबत जिथे शक्य असेल तिथे पुस्तकातील निवडक छायाचित्रं या मुळे हे सदर खूपच वाचक प्रिय ठरलं. विशेष म्हणजे, कोणत्याही कारणाने होईना, एकाही आठवड्याच्या सदरात तोरणे साहेबांनी खंड पडू दिलेला नाही.कार्य निष्टा कशी असावी, याचे हे छान उदाहरण आहे .
या लेखन काळात व्यक्तिगत दुःख, अडचणी यांच्या वर मात करत त्यांनी सदर सुरू ठेवले आहे. आत्ता तर या सदराचे पुस्तकात रूपांतर करण्याच्या ते तयारीत आहे.
हे सदर लेखन करीत असताना तोरणे साहेबांनी मी लिहिलेल्या, माझ्या पत्नीने प्रकाशित केलेल्या काही पुस्तकांचे ही अतिशय सुंदर परीक्षण लिहिले आहे.
माझ्या हाताखाली काम केलेल्या अधिकाऱ्याच्या पुस्तकाचे मी का परीक्षण करू ? असा संकुचित, कोता विचार त्यांनी केला नाही. जो न्याय त्यांनी इतर पुस्तकांना दिला, तोच न्याय त्यांनी माझ्या पुस्तकांना दिला.
अर्थात इथे कुणाला, असे वाटू शकेल की मी त्यांचे सदर प्रसिद्ध करीत असतो त्याची परत फेड म्हणून किंवा ते तसेच पुढे चालू राहू द्यावे म्हणून ते माझ्या पुस्तकांची परीक्षणे लिहित असतील. तर तसे अजिबात नाही. कारण मुळातच इतरांच्या चांगल्या गुणांचे कौतुक करणे हा त्यांचा स्वभाव आहे. माहिती खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांचा “dgipr परिवार” हा व्हॉट्स ॲप ग्रुप आहे. या ग्रुप वर एखाद्या आजी माजी अधिकारी, कर्मचारी याने स्वलिखित काही पोस्ट केले किंवा काही फॉरवर्ड केले, एखाद्या आजी माजी छायाचित्रकाराने स्वतः काढलेले / काढलेली छायाचित्रे पोस्ट केली तर त्या सर्वांचं तोरणे साहेब मनापासून कौतुक करतात. अशा वेळी त्यांच्या पदाची किंवा वयाची जेष्ठता कधी आड येत नाही. अन्यथा काही आजी, माजी अधिकारी सदानकदा स्वतःच्या डोक्यात आणि वागणुकीत सतत त्यांची जेष्ठता बाळगून असतात. अशा पार्श्वभूमीवर तोरणे साहेबांच्या मोठेपणाचे खरेच कौतुक वाटते. हा त्यांचा गुण सर्वांनी नक्कीच घेण्यासारखा आहे. असो
खरोखरच तोरणे साहेबांच्या या मोठेपणाचे, या वयात सतत सक्रिय राहण्याचे आणि त्यांच्या कार्य निष्ठेचे मला फार कौतुक वाटते. निवृत्ती नंतर ही ते त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात सक्रिय रहात असल्याचे पाहून माझा त्यांच्या विषयीचा आदर नक्कीच द्विगुणित झाला आहे. साहेब, शतायुषी होवोत, याच या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा.
नुकतेच त्यांनी मी लिहिलेल्या “करिअरच्या नव्या दिशा” या पुस्तकाचे परीक्षण न्यूज स्टोरी टुडे पोर्टल बरोबरच ईतर काही वृत्तपत्रातून छापून आले आहे. त्याची कात्रणे आपण पाहू शकता.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800